'श्रीमंतांच्या लैंगिक विकृतीला बळी पडतायेत महिला', दुबईतील सेक्स स्कँडल काय आहे?
- Author, रुनाको सेलिना
- Role, बीबीसी आय इन्व्हेस्टिगेशन्स

(इशारा: या लेखात लैंगिक कृत्यांविषयीची काही विचलित करणारी माहिती आणि वर्णनं आहेत.)
दुबईतील सर्वात ग्लॅमरस परिसरातून सेक्स रॅकेट चालवणारा आणि असुरक्षित महिलांचं शोषण करणारा एक पुरुष बीबीसीच्या तपासातून समोर आला आहे.
त्याचं नाव चार्ल्स म्वेसिग्वा आहे. त्याचं म्हणणं आहे की तो लंडनमध्ये बस ड्रायव्हर होता.
त्यानं बीबीसीच्या अंडरकव्हर रिपोर्टरला सांगितलं की तो सेक्स पार्टीसाठी महिला पुरवू शकतो. त्यासाठीची किंमत 1,000 डॉलर्स (740 पौंड) पासून सुरू होते. तो पुढे म्हणाला की यातील बहुतांश महिला ग्राहकांना हवं असेल तसं 'बरंच काही' करू शकतात.
गेल्या अनेक वर्षांपासून युएई अमिरातीमध्ये वाईल्ड सेक्स पार्ट्या होत असल्याच्या अफवा चर्चेत होत्या. #Dubaiportapotty हा हॅशटॅग टिकटॉकवर 45 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा हॅशटॅग काही पॅरडी अकाउंट्सकडून वापरला जातो. असं म्हटलं जातं की आपला खर्च भागवण्यासाठी संबंधित महिला गर्भश्रीमंतांच्या सेक्शुअल फँटसीजची पूर्तता करतात.
बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या तपासावेळी रिपोर्टर्सला असं सांगण्यात आलं की यातील वास्तव हे आणखी गडद, गंभीर आहे.
युगांडातील तरुणींनी सांगितलं दुबईतील वेश्या व्यवसायाचं भयाण वास्तव
युगांडाच्या एका तरुण महिलेनं आम्हाला सांगितलं की म्वेसिग्वासाठी लैंगिक कृत्ये करावी लागतील असं त्यांना वाटलं नव्हतं. काही वेळा, तर त्यांना वाटलं की त्या युएईमधील सुपरमार्केट किंवा हॉटेलमध्ये काम करण्यासाठी जात आहेत.
त्या महिलेची ओळख लपवण्यासाठी तिला आम्ही 'मिया' असं नाव दिलं आहे. मियानं सांगितलं की म्वेसिग्वाच्या ग्राहकांपैकी किमान एकजण नियमितपणे महिलांवर शौच करतो. तिनं सांगितलं की ती म्वेसिग्वाच्या नेटवर्कमध्ये अडकली होती.
म्वेसिग्वा मात्र हे सर्व आरोप नाकारतो. त्याचं म्हणणं आहे की तो श्रीमंत लोकांच्या माध्यमातून महिलांची राहण्याची व्यवस्था करतो. तसंच दुबईतील श्रीमंत लोकांशी त्याचा संपर्क असल्यामुळे महिला त्याच्या पार्ट्यांमध्ये जातात.
आम्हाला असंही आढळून आलं की म्वेसिग्वाशी संबंधित दोन महिलांचा उंच इमारतींवरून पडून मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यूला आत्महत्या ठरवण्यात आलेलं असलं तरी त्यांच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना वाटतं की पोलिसांनी यासंदर्भात आणखी तपास करायला हवा होता.
म्वेसिग्वा म्हणाला की या घटनांचा तपास दुबई पोलिसांनी केला होता. त्यानं आम्हाला अधिक माहितीसाठी पोलिसांनी संपर्क करण्यास सांगितलं. त्यांनी आमच्या प्रश्नांना उत्तर दिलं नाहीत.

फोटो स्रोत, Family handout
या दोन मृत पावलेल्या महिलांपैकी एक होती मोनिक करुंगी. ती पश्चिम युगांडामधून दुबईत आली होती.
म्वेसिग्वाकडे काम करणाऱ्या एका महिलेचं नाव केइरा असं ठेवलं आहे. तिच्या म्हणण्यानुसार ती 2022 मध्ये दुबईत मोनिकबरोबर राहत होती. युगांडातून आल्यानंतर मोनिक म्वेसिग्वासाठी काम करणाऱ्या इतर डझनभर महिलांवर एका फ्लॅटमध्ये राहत होती.
"त्याची जागा म्हणजे एखाद्या बाजारासारखी होती. तिथे साधारण 50 तरुणी होत्या. मोनिक तिथे आनंदी नव्हती कारण तिच्या अपेक्षेनुसार तिला काहीच मिळालं नव्हतं," असं केइरानं आम्हाला सांगितलं.
मोनिकची बहीण रिटानं सांगितलं की मोनिकला वाटलं होतं की ती दुबईमधील एका सुपरमार्केटमध्ये काम करणार आहे.
"मी जेव्हा त्याला (म्वेसिग्वा) सांगितलं की मला घरी परत जायचं आहे, तेव्हा तो आक्रमक झाला होता," असं मिया म्हणाली. ती दुबईत मोनिकला ओळखत होती.
ती म्हणाली की ती जेव्हा पहिल्यांदा दुबईत आली, तेव्हा म्वेसिग्वानं तिला सांगितलं की ती आधीच त्याचं 2,000 पौंडाचं (2,711 डॉलर) देणं लागते आणि दोन आठवड्यातच ते कर्ज दुप्पट झालं आहे.
मिया म्हणाली, "विमानाच्या तिकिटाचे, व्हिसा, तुम्ही जिथे झोपता, जेवता त्याचे पैसे."
"याचा अर्थ तुम्हाला खूप, कठोर, कठोर परिश्रम करावे लागतील, पुरुषांनी तुमच्याबरोबर झोपावं अशी विनंती त्यांना करावी लागेल."
विकृत ग्राहकांकडून होणारा अमानवी छळ
मोनिकच्या एका नातेवाईकाला आम्ही मायकल असं नाव दिलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार काही आठवड्यानंतर मोनिकवर म्वेसिग्वाचं 27,000 डॉलरहून (19,918 पौंड) अधिक पैशांचं कर्ज झालं.
मायकलनं सांगितलं की त्याला मोनिकचे रडतानाचे ऑडिओ मेसेज मिळाले.
मियानं आम्हाला सांगितलं की त्यांचे ग्राहक प्रामुख्यानं युरोपियन श्वेतवर्णीय पुरुष होते. यात काहीजण अतिरेकी कामवासना असलेलेसुद्धा होते.
तिनं शांतपणे सांगितलं की, "एक ग्राहक असा आहे की तो मुलींवर शौच करतो आणि त्यांना ती विष्ठा खाण्यास सांगतो."
आणखी एका महिलेला आम्ही लेक्सी असं नाव दिलं आहे. ती म्हणते की तिला वेगळ्या नेटवर्कद्वारे फसवण्यात आलं होतं. तिची कहाणी मियाच्या कहाणीसारखीच होती. ती म्हणाली की 'पोर्टा पॉटी'च्या मागण्या वारंवार येत होत्या.

लेक्सी म्हणाली की, "एक ग्राहक होता, तो म्हणाला: 'तुझ्यावर सामूहिक बलात्कार करण्यासाठी, तुझ्या तोंडावर लघवी करण्यासाठी, तुला मारहाण करण्यासाठी आम्ही तुला 15,000 अरब अमिराती दिरहम (4,084 डॉलर, 3,013 पौंड) देऊआणि तसंच तू विष्ठा खाल्ल्याचं रेकॉर्डिंग करण्यासाठी आम्ही तुला आणखी 5,000 अरब अमिराती दिरहम (1,361 डॉलर, 1,004 पौंड) देऊ.'"
तिला आलेल्या अनुभवांमुळे तिला असं वाटू लागलं आहे की या अतिरेकी लैंगिक क्रियांमागे वांशिक घटक आहे.
ती पुढे म्हणाली, "प्रत्येक वेळेस मी जेव्हा त्यांना असं सांगायचे की मला ते करायचं नाही. तेव्हा त्यांना आणखी रस निर्माण व्हायचा. त्यांना असं कोणीतरी हवं असायचं, जी रडेल, ओरडेल आणि पळून जाईल. त्यांना असं कोणीतरी हवं असायचं जो (त्यांच्या नजरेत) कृष्णवर्णीय असेल."
लेक्सी म्हणते, तिनं फक्त अशा लोकांकडून मदत घेण्याचा प्रयत्न केला, जे तिला वाटलं की तिची सुटका करू शकतात. ते म्हणजे पोलीस.
मात्र ती म्हणते की "पोलिसांनी तिला सांगितलं, तुम्ही आफ्रिकन लोक तुमच्या-तुमच्यातच समस्या निर्माण करता. तुमच्या समस्यांमध्ये आम्हाला भाग घ्यायचा नाही. असं म्हणून ते फोन ठेवायचे."
आम्ही या आरोपांची पडताळणी करण्यासाठी दुबई पोलिसांशी संपर्क केला, मात्र त्यांनी उत्तर दिलं नाही.
अखेरीस लेक्सी परत युगांडाला पळून गेली. आता ती अशाच परिस्थितीत अडकलेल्या महिलांना वाचवण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी मदत करते.
वेश्या व्यवसायाच्या नेटवर्कच्या प्रमुखाचा शोध
चार्ल्स म्वेसिग्वाला शोधणं ही सोपी गोष्ट नव्हती. आम्हाला त्याचा फक्त एक फोटो तेवढा ऑनलाईन सापडला. तोही मागच्या बाजूनं घेतलेला होता. तो सोशल मीडियावर वेगवेगळी नावं वापरतो.
मात्र ओपन-सोर्स इंटेलिजन्स, गुप्त संशोधन आणि त्याच्या नेटवर्कच्या एका माजी सदस्याकडून मिळालेली माहिती यांचा एकत्रित वापर करून आम्ही त्याला शोधून काढलं. तो जुमेराह व्हिलेज सर्कल या दुबईच्या मध्यमवर्गीय वस्तीत आम्हाला सापडला.
सूत्रांनी आम्हाला त्याच्या व्यवसायाबद्दल म्हणजे विकृत लैंगिक कृत्यांसाठी महिला पुरवणं याबद्दल जे सांगितलं होतं, त्याची खातरजमा करण्यासाठी आम्ही एका अंडरकव्हर रिपोर्टरला पाठवलं. त्यानं सांगितलं कीतो श्रीमंतांच्या पार्ट्यांसाठी महिलांचा पुरवठा करणारा आयोजक आहे.

म्वेसिग्वा त्याच्या व्यवसायाबद्दल बोलताना शांत दिसत होता. तो आत्मविश्वासानं बोलत होता.
तो म्हणाला, "आमच्याकडे 25 तरुणी आहेत. यातील बऱ्याचजणी खुल्या विचारांच्या आहेत...त्या जवळपास सर्वकाही करू शकतात."
मग त्यानं त्यासाठीची किंमतदेखील सांगितली. एका रात्रीसाठी एका तरुणीचे 1,000 डॉलर (738 पौंड) पासून सुरू होणारे दर त्यानं सांगितले. मात्र 'विकृत, विचित्र गोष्टीं'साठीचे दर जास्त होते. मग त्यानं आमच्या रिपोर्टरला एका 'सॅम्पल नाईट'साठी आमंत्रण दिलं.
आमच्या रिपोर्टरनं त्याला जेव्हा 'दुबई पोर्टा पॉटी'बद्दल विचारलं, तेव्हा त्यानं उत्तर दिलं की "मी तुम्हाला सांगितलं आहे की त्या खुल्या विचारांच्या आहेत. मी जेव्हा म्हणतो की खुल्या विचारांच्या, याचा अर्थ सर्वकाही करणाऱ्या आणि त्यातील सर्वांत तयार मुलगी तुम्हाला देईन."
या संभाषणादरम्यान म्वेसिग्वा म्हणाला की पूर्वी तो लंडनमध्ये बस ड्रायव्हर होता. 2006 मध्ये पूर्व लंडनमधील एका अधिकृत कागदपत्रावर त्यानं या नोकरीचा उल्लेख केल्याचे पुरावे आम्ही पाहिले आहेत.
मग त्यानं आमच्या रिपोर्टरला सांगितलं की त्याला हा व्यवसाय खूप आवडतो.
तो म्हणाला, "मला लॉटरी लागली, अगदी दहा लाख पौंड जरी जिंकलो, तरीदेखील मी हाच व्यवसाय करेन...हा आता माझ्या आयुष्याचा भाग बनला आहे."
म्वेसिग्वासाठी काम करणाऱ्या ट्रॉयनं केला अनेक गोष्टींचा उलगडा
आम्हाला ट्रॉय नावाचा माणूस सापडला. तो म्हणतो की तो म्वेसिग्वाच्या नेटवर्कचा ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून काम करत होता. त्यानं हा व्यवसाय नेमका कसा चालतो याची आम्हाला अधिक माहिती दिली.
ट्रॉय म्हणाला की म्वेसिग्वा वेगवेगळ्या नाईट क्लबमधील सुरक्षारक्षकांना पैसे देतो. त्यामुळे ते म्वेसिग्वाच्या महिलांना ग्राहक शोधण्यासाठी आत जाऊ देतात.
ट्रॉय पुढे म्हणाला, "मी इथे सेक्सच्या अशा प्रकारांबद्दल ऐकलं आहे, जे मी माझ्या आयुष्यात कधीही पाहिलेलं नाही. जोपर्यंत त्याचे श्रीमंत ग्राहक खूश आहेत तोपर्यंत तुम्ही कशातून जात आहात यानं फरक नाही...(महिलांना) त्यांना सुटकेचा कोणताही मार्ग नाही...त्या संगीतकारांना पाहतात, त्या फुटबॉलपटूंना पाहतात, त्या राष्ट्राध्यक्षांना पाहतात."
ट्राय दावा करतो की म्वेसिग्वा हा सर्व व्यवसाय चालवून नामानिराळा राहू शकला आहे, कारण ट्रॉय आणि इतरांचा वापर फक्त ड्रायव्हर म्हणून केला जात नाही.
ट्रॉय म्हणतो की कार भाड्यानं घेण्यासाठी आणि फ्लॅट भाड्यानं घेण्यासाठीदेखील म्वेसिग्वानं त्यांच्या नावाचा वापर केला आहे. त्यामुळे कागदोपत्री त्याचं नाव कुठेही समोर येत नाही.

27 एप्रिल 2022 ला मोनिकनं अल बर्शामधून एक सेल्फी पोस्ट केली. अल बर्शा हा दुबईतील परदेशी लोकांमध्ये लोकप्रिय असलेला निवासी परिसर आहे. चार दिवसांनी मोनिकचा मृत्यू झाला. ती दुबईमध्ये फक्त चार महिन्यांपासून होती.
मियानं दिलेल्या माहितीनुसार, मोनिक जाण्यापूर्वी मोनिक आणि म्वेसिग्वामध्ये नियमितपणे वाद होत होते. मिया म्हणते की म्वेसिग्वाच्या मागण्या पूर्ण करण्यास मोनिक नकार देत होती. तिला त्याच्या नेटवर्कमधून बाहेर पडण्याचा मार्ग सापडला होता.
"तिला एकप्रकारची नोकरी मिळाली होती. त्यामुळे ती खूप उत्साहात होती. तिला वाटलं होतं की आता तिची सुटका होणार आहे. ती तिचं आयुष्यं पुन्हा जगू शकणार आहे. कारण आता तिच्याकडे खरीखुरी नोकरी होती. तिला पुरुषांबरोबर झोपण्याची आवश्यकता नव्हती," असं मिया म्हणाली.
मोनिक म्वेसिग्वानं दिलेला फ्लॅट सोडून तिथून 10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या वेगळ्या फ्लॅटमध्ये राहण्यास गेली होती. याच फ्लॅटच्या बाल्कनीतून ती 1 मे 2022 ला पडली.
मोनिकच्या मृत्यूचं रहस्य आणि नातेवाईकांचे न्यायासाठीचे प्रयत्न
मोनिकचा मृत्यू झाला तेव्हा तिचा नातेवाईक मायकल युएईमध्ये होता. मायकल म्हणतो की त्यानं तिच्या मृत्यूबाबत उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न केला होता.
मायकल म्हणतो की पोलिसांनी त्याला सांगितलं की त्यांनी या प्रकरणाचा तपास थांबवला आहे. कारण मोनिक ज्या फ्लॅटमधून पडली होती, तिथे त्यांना अंमली पदार्थ आणि दारू सापडली आणि बाल्कनीत फक्त तिच्या बोटांचे ठसे सापडले.
त्यानं हॉस्पिटलमधून मोनिकच्या मृत्यूचं प्रमाणपत्र मिळवलं, मात्र तिचा मृत्यू कसा झाला हे त्यात स्पष्ट केलेलं नव्हतं. तिच्या कुटुंबाला तिचा टॉक्सिकोलॉजी रिपोर्ट मिळू शकला नाही.
मात्र त्या अपार्टमेंट राहणारा घानाचा एक पुरुष अधिक मदत करण्यास तत्पर होता. तो मला शेजारच्या फ्लॅटमध्ये घेऊन गेला आणि त्याने तो मोनिकचा बॉस असल्याचं सांगितलं, असं मायकल म्हणाला.

फोटो स्रोत, Instagram
मायकल सांगतो, तो जेव्हा तिथं पोहोचला तेव्हा तिथं महिलांना कुठे ठेवलं होतं हे त्यानं पाहिलं.
तो म्हणतो की बैठकीच्या खोलीत असलेल्या हुक्क्याच्या धुरातून त्यानं टेबलवर कोकेनसारखं काहीतरी पाहिलं तसंच खुर्च्यांवर महिला ग्राहकांबरोबर सेक्स करत असल्याचं पाहिलं.
त्यानं दावा केला की आम्ही आधी ज्याची चार्ल्स म्वेसिग्वा म्हणून ओळख पटवली होती, तो माणूस दोन महिलांसह त्याला बेडवर आढळला. त्यानं जेव्हा म्वेसिग्वाला पोलिसांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला तेव्हा म्वेसिग्वा म्हणाला, "मी दुबईत 25 वर्षांपासून राहतो आहे. दुबई माझी आहे...तुम्हाला माझी तक्रार करता येणं शक्य नाही...दूतावास म्हणजे मी आणि मी म्हणजे दूतावास आहे."
"मोनिका ही काही मरणारी पहिलीच महिला नाही आणि ती शेवटची देखील नसेल," असं म्वेसिग्वा पुढे म्हणाला, असं मायकलनं सांगितलं.
मिया आणि केइरा दोघीही स्वतंत्रपणे म्हणतात की त्या या संभाषणाच्या साक्षीदार आहेत. त्या दोघींनी त्यात काय बोललं गेलं याला पुष्टी दिली. आम्ही जेव्हा म्वेसिग्वाला विचारलं की या शब्दांचा अर्थ काय आहे. त्यावर त्यानं असं काही म्हटल्याचं नाकारलं.
मोनिकसारखीच कहाणी असणारी युगांडाची कायला
मोनिकच्या मृत्यूचं तिच्याच परिसरात राहणाऱ्या कायला बिरुंगी या युगांडातील महिलेशी साम्य आहे. कायला बिरुंगीचादेखील 2021 मध्ये दुबईतील एका उंच इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता.
आमच्याकडे असे पुरावे आहेत की ज्यातून असं दिसतं की ती चार्ल्स म्वेसिग्वानं घडवून आणली होती.
कायलाच्या कुटुंबानं तिच्या घरमालकाचा फोन नंबर आम्हाला दिला. प्रत्यक्षात तो म्वेसिग्वाचाच एक फोन नंबर निघाला. ट्रॉयनंदेखील याची खातरजमा केली की म्वेसिग्वा हाच ते अपार्टमेंट हाताळत होता. या तपासात आम्ही ज्या इतर चार महिलांशी बोललो, त्यांनीदेखील हेच सांगितलं.

फोटो स्रोत, Instagram
कायलाच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे की त्यांनी - मोनिकच्या कुटुंबाप्रमाणेच - कायलाच्या मृत्यूशी दारू आणि अंमली पदार्थांचा संबंध जोडल्याचं ऐकलं होतं. मात्र बीबीसीनं पाहिलेल्या टॉक्सिकोलॉजी रिपोर्टमध्ये दिसून आलं की तिच्या मृत्यूच्या वेळेस तिच्या शरीरात यातील कशाचाही अंश नव्हता.
कायलाचं कुटुंब तिचा मृतदेह मायदेशी परत आणू शकले नाहीत आणि तो दफनही करू शकले नाहीत. मोनिकचे अवशेष कधीच परत आले नाहीत.
आमच्या तपासात आढळलं की 'अज्ञात' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुबईच्या अल कुसैस दफनभूमीत कायलाला बहुधा दफन करण्यात आलं असावं. त्या दफनभूमीत चिन्ह किंवा खुणा नसलेल्या कबरींच्या रांगाच रांगा आहेत. सर्वसाधारणपणे त्या अशा स्थलांतरितांच्या असल्याचं मानलं जातं ज्यांचं कुटुंब त्यांचे मृतदेह परत मायदेशी नेऊ शकत नव्हतं.
युगांडाच्या बेरोजगारीत आणि गरिबीत दडलंय वेश्याव्यवसायाचं मूळ
मोनिका आणि कायला या युगांडा ते आखाती देशांना जोडणाऱ्या एका व्यापक अनधिकृत नेटवर्कचा भाग होत्या.
युगांडा तरुणांमधील वाढत चाललेल्या बेरोजगारीशी संघर्ष करतो आहे. अशावेळी काम किंवा रोजगाराच्या शोधात परदेशात - मुख्यत: आखाती देशांमध्ये - स्थलांतर करणं हा एक मोठा उद्योग झाला आहे.
युगांडाला या उद्योगातून दरवर्षी तब्बल 1.2 अब्ज डॉलरचा (88.5 कोटी पौंड) महसूल कराद्वारे मिळतो.
मात्र या संधी धोकादायक देखील ठरू शकतात.

मरियम मविझा या युगांडातील एक कार्यकर्त्या आहेत. त्या शोषणाविरोधात लढतात. त्या म्हणतात की आखाती देशांमधून 700 हून अधिक जणांची सुटका करण्यास त्यांनी मदत केली आहे.
"आमच्याकडे अशी प्रकरणं येतात की ज्यात लोकांना सुपरमार्केटमध्ये नोकरी देण्याचं आश्वासन दिलं जातं. मात्र प्रत्यक्षात त्या मुलीला वेश्या म्हणून विकलं जाते," असं त्यांनी आम्हाला सांगितलं.
मोनिकच्या कुटुंबाच्या दु:खात आता भीतीची देखील भर पडली आहे. जर यासंदर्भात काहीच करण्यात आलं नाही तर इतर कुटुंबांनादेखील त्यांच्यासारख्याच दु:खाला सामोरं जाण्याची वेळ येऊ शकते अशी भीती त्यांना वाटते.
"आपण सर्वजण मोनिकच्या मृत्यूकडे पाहत आहोत. मात्र तिथे जिवंत असलेल्या मुलींसाठी कोण आहे? त्या अजूनही तिथे आहेत. त्या अजूनही यातना सहन करत आहेत," असं मोनिकचा नातेवाईक असलेला मायकल आम्हाला म्हणाला.
मेस्विग्वाने फेटाळले आरोप, दुबई पोलिसांनी दिला नाही प्रतिसाद
बीबीसीनं चार्ल्स 'ॲबे' म्वेसिग्वाला या तपासात लावण्यात आलेल्या सर्व आरोपांबाबत उत्तर देण्यास सांगितलं. मात्र त्यानं बेकायदेशीररीत्या वेश्याव्यवसायाचं नेटवर्क चालवत असल्याचं नाकारलं.
तो म्हणाला: "हे सर्व आरोप खोटे आहेत."
म्वेसिग्वा म्हणाला, "मी तुम्हाला सांगितलं होतं की मी फक्त एक पार्टी करणारा व्यक्ती आहे. मी श्रीमंत लोकांना, मोठा खर्च करणाऱ्यांना आमंत्रण देतो. त्यातून अनेक मुली माझ्याकडे येतात. त्यामुळे मी अनेक मुलींना ओळखतो, बस इतकंच."
तो पुढे म्हणाला, "मोनिकचा मृत्यू झाला तेव्हा तिचा पासपोर्ट तिच्याकडेच होता. म्हणजेच तिला घेऊन जाण्यासाठी कोणीही तिच्याकडे पैसे मागत नव्हतं. तिचा मृत्यू होण्याआधी, चार ते पाच आठवड्यांहून अधिक दिवसांपासून मी तिला पाहिलं नव्हतं."
"मी मोनिक आणि कायला या दोघींना ओळखत होतो. त्या दोघीही वेगवेगळ्या घरमालकांकडे भाड्यानं राहत होत्या. जर त्या राहत असलेल्या फ्लॅटमधील कोणालाही किंवा त्यांच्या घरमालकांपैकी कोणालाही अटक झाली नसेल तर त्यामागे काहीतरी कारण असेल."
"दोन्ही प्रकरणांचा तपास दुबई पोलिसांनी केला आहे. ते कदाचित तुम्हाला मदत करू शकतील."
बीबीसीनं अल बर्शा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून मोनिक करुंगी आणि कायला बिरुंगी या दोघींच्या फाईल्स दाखवण्याची विनंती केली.
त्यांनी या विनंतीला प्रतिसाद दिला नाही किंवा मोनिक आणि कायला यांच्या मृत्यूचा योग्य तपास झाला नसल्याच्या आरोपांनादेखील प्रतिसाद दिला नाही.
बीबीसीला मोनिक करुंगीचा टॉक्सिकोलॉजी रिपोर्ट पाहता आला नाही. तसंच तिचा मृत्यू झाला तेव्हा ती ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होती, त्या अपार्टमेंटच्या मालकाशीही बीबीसीला बोलता आलं नाही.
या तपासात भर घालण्यासाठी तुमच्याकडे कोणतीही माहिती असल्यास कृपया [email protected] या मेल आयडीवर संपर्क साधा.
लैंगिक शोषणानंतर किंवा निराशेच्या भावना असल्यावर त्याविषयी माहिती देणाऱ्या किंवा आधार देणाऱ्या संस्थांची माहिती bbc.co.uk/actionline वर उपलब्ध आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











