'मुलं पायावर उभी होईपर्यंत वेश्या व्यवसाय करणारच', अमळनेरची 'हरदासींची वस्ती' का आहे चर्चेत?

या वस्तीत असलेल्या वेश्यालयाला रोषणाई नाही किंवा रस्त्यावर 'गिऱ्हाईक' घेऊन येण्यासाठी कोणी दलालही दिसत नाही.

फोटो स्रोत, Abhijeet Tangade

फोटो कॅप्शन, या वस्तीत असलेल्या वेश्यालयाला रोषणाई नाही किंवा रस्त्यावर 'गिऱ्हाईक' घेऊन येण्यासाठी कोणी दलालही दिसत नाही.
    • Author, संजना खंडारे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

इथं कुणी खिडकीतून किंवा दारात उभं राहून इशारे, हातवारे किंवा आवाज देऊन पुरुषांना बोलवत नाही. तसंच कुणी तोकडे कपडेही घातलेले नसतात. एवढंच काय, पण या वस्तीत शिरल्यावर इथं वेश्याव्यवसाय चालतो, याचा संशयही कुणाला येणार नाही. अगदी फिल्मी स्टाईल वेश्यालयांप्रमाणे रोषणाई किंवा दलालही दिसत नाहीत.

ही वस्ती म्हणजे जळगावच्या अमळनेरमधील गांधीलपुरा.

इतर वस्त्यांप्रमाणेच अमळनेर तालुक्यातली ही मुस्लीमबहुल भागातली शांत वस्ती. इथला इतिहासही 150 वर्षांहून अधिकचा.

पण सध्या इथल्या 100 हून अधिक वेश्यांसमोर एक संकट उभं ठाकलं आहे. डोक्यावरचं छप्पर हिरावण्याची भीती त्यांना आहे.

जवळपास 15 वर्षांपासून या दहशतीत इथल्या वेश्या आहेत. पण यांना विरोध करणारे किंवा इथून घालवण्यासाठी प्रयत्न करणारे लोक कोण आहेत? नेमके हे संपूर्ण प्रकरण काय आहे, हे आपण जाणून घेऊयात.

(या वृत्तांकनातील महिलांची नावं बदललेली आहेत.)

कविता या 34 वर्षीय महिलाही याठिकाणी वेश्या व्यवसाय करतात. त्यांना दोन मुली आहेत.

त्यांच्या अडचणींबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, "या वस्तीमुळे येथे राहणाऱ्या लोकांच्या मुलींची लग्न होत नसल्याचं लोक सांगतात. पण प्रत्यक्षात त्यांच्या मुलींना दोन-दोन लेकरं झालीत. मग ते खोटे आरोप का करतात? गिऱ्हाईकं आमच्याकडं येऊ नये म्हणून, त्यांना अडवून मारहाण करतात, त्यांची लूट करतात."

"काही दिवसांपासून भीतीमुळं कस्टमर येत नाहीत. आमच्याबद्दल नको त्या अफवा पसरवल्या जात आहेत. आमचं इतकंच म्हणणं आहे की, तुमच्यासारखंच आम्हाला शांततेत जगू द्या. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून काम करत आहोत. त्यामुळं आम्ही ते बंद नाही करणार," असं कविता त्यांची कैफियत मांडताना बोलत होत्या.

फोटो कॅप्शन - ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या अमळनेर शहरातील 'गांधीलपुरा वेश्यावस्ती'

फोटो स्रोत, Abhijeet Tangade

फोटो कॅप्शन, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या अमळनेर शहरातील 'गांधीलपुरा वेश्यावस्ती'

अमिनाही इथं वेश्या व्यवसाय करणाऱ्यांपैकीच एक.

त्या म्हणाल्या की, "आम्ही कित्येक वर्षांपासून इथं वेश्याव्यवसाय करतोय. आतापर्यंत कोणाला अडचण नव्हती. आता काय अडचण आहे? आमच्यामुळे त्यांच्या लेकरा-बाळांची लग्न होत नाहीत, असं ते म्हणतात. मग आमच्या लेकरांची लग्न कशी होतात?"

"वेश्यांच्या मुलींची लग्न होतात, आमच्या मुली शिकतात, मग त्यांच्या मुली का घरात बसून आहेत? माझ्या भावाच्या मुलीने याच वस्तीत शिक्षण घेतलं. आता ती अमरावतीला आयटीआय करतेय. दुसऱ्या भावाची मुलगी नाशिकमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. एका बहिणीचा मुलगा गोव्यात हॉटेल मॅनेजमेंट शिकतोय.

आम्ही घसा ओरडून ओरडून सांगतोय की, वेश्याव्यवसायातील आमची ही शेवटची पिढी असेल. जोपर्यंत आमची मुलं त्यांच्या पायावर उभी होत नाहीत, तोपर्यंतच आम्ही हा व्यवसाय करणार आहोत. कारण, या व्यवसायाशिवाय आम्हाला दुसरा पर्याय उपलब्ध नाही," असं अमिना कळकळीनं सांगत होत्या.

गावाबाहेरचं वेश्यालय आता शहराच्या मध्यभागी

अमळनेर तालुका अनेक कारणांमुळे ओळखला जातो. इथं साने गुरुजी अनेक वर्षे वास्तव्यास होते. स्वातंत्र्यवीर नाना पाटील, स्वातंत्र्यलढ्यातील रणरागिणी लीलाताई पाटील यांच्यासह अमळनेरमधील अनेकांनी स्वातंत्र्य संग्रामात योगदान दिलं.

'विप्रो' या जागतिक कंपनीची सुरुवात अमळनेरमधूनच झाली. अमळनेरमधील शैक्षणिक संस्था आणि नामांकित कॉलेजमुळे 1970 ते 2010 च्या दरम्यान आजूबाजूच्या तालुक्यातून अनेक विद्यार्थी येथे शिक्षणासाठी आले.

संत सखाराम महाराज यात्रा उत्सव हा अमळनेरमधील सर्वात मोठा यात्रा उत्सव असतो. याच शहरात प्रसिद्ध मंगळ ग्रह मंदिर आहे. या मंदिरात देशभरातून भाविक येतात.

अशी अनेक अंगांनी अमळनेरची ओळख आहे. मात्र, या सगळ्यांमध्ये एक ओळख प्रकर्षाने समोर येते. ती म्हणजे अमळनेरमधील सर्वात मोठी, शहराच्या मधोमध असलेली 'वेश्यावस्ती'.

फोटो कॅप्शन : ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या अमळनेर शहरातील गांधीलपुरा वेश्यावस्ती परिसर

फोटो स्रोत, Abhijeet Tangade

फोटो कॅप्शन, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या अमळनेर शहरातील गांधीलपुरा वेश्यावस्ती परिसर

अमळनेर तालुक्यातल्या गांधीलपुरा भागातली वेश्यांची ही वस्ती सध्या ज्वलंत प्रश्न बनला आहे.

तब्बल 150 वर्षांचा इतिहास असलेली ही वस्ती यापूर्वी लोकांच्या डोळ्यांमध्ये खुपत नव्हती. त्याचं कारण म्हणजे ही वस्ती पूर्वी शहराच्या बाहेर होती.

पण शहराचा विस्तार होत गेला आणि ही वस्ती आता शहराच्या मध्यभागी आली आहे. वस्ती तिच्याच जागी आहे, शहर आजुबाजूने वाढलंय.

'हरदासी' समुदायाचा इतिहास

वेश्या अशी ओळख असलेल्या या महिलांना परंपरेनुसार 'हरदासी' म्‍हणतात. मुस्लीमधर्मीय 'हरदासी' समुदायातील बहुतांश महिला आहेत.

अमळनेर तालुक्यातल्या पाचोऱ्यात माहिजी देवी यात्रोत्सव प्रसिद्ध आहे. माहिजी या दैवताची जत्रा साधारण 1400 च्या सुमारास माहेजी गावात सुरू झाली, असं म्हटलं जातं.

एकेकाळी या गावात माहेजी जत्रा तब्बल 6 महिने चालत असे. जत्रेत डफ वाजवणं, गायन, नृत्य अशा विविध कला सादर व्हायच्या. इसवीसन 1700 ते 1800 दरम्यान 'हरदासी' समुदाय जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात आलेले आढळतात. या समुदायातील मुली यात्रेत गाणी-नृत्य सादर करायच्या.

फोटो कॅप्शन - समाज जरी या महिलांना वेश्‍या म्‍हणून ओळखत असला, तरी त्‍यांची परंपरा मात्र त्‍यांना 'हरदासी' म्‍हणून संबोधते.

फोटो स्रोत, Abhijeet Tangade

फोटो कॅप्शन, समाज जरी या महिलांना वेश्‍या म्‍हणून ओळखत असला, तरी त्‍यांची परंपरा मात्र त्‍यांना 'हरदासी' म्‍हणून संबोधते.

माहिजी गावात त्यांची मोठी वस्‍ती असल्यानं 'हरदासींचं गाव' म्‍हणूनही ते पूर्वी ओळखलं जायचं.

काळ बदलत गेला तसे मनोरंजनाचे अनेक पर्याय अस्तित्वात आले. हरदासी समाजाच्या मुलींची 'मुजरा' नृत्याची संस्कृती जुनी झाली. त्यामुळं उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांना भेडसावू लागला.

पूर्वीच्या कामातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळं चांगल्या जीवनशैलीची सवय लागली होती. गरजा वाढल्या होत्या त्यामुळं परिस्थिती कठीण बनली. अखेर या समाजानं रोजगारासाठी (देहविक्री) सुरू केली. विरोधामुळं त्यांना माहिजी गावही सोडावं लागलं.

त्यामुळं काहीजण रेल्‍वेचं गाव म्‍हणून अमळनेरला स्‍थायिक झाले. तिथं त्यांचा व्यवसाय चालू लागल्यानं त्यांची संख्या वाढली. पुढं गांधीलपुरा भागात त्यांची मोठी वस्ती तयार झाली.

गांधीलपुऱ्यातील वेश्यालयाचा इतिहास

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

साधारण 200 वर्षापूर्वी गमीर शेख आणि समीर शेख हे दोन भाऊ कुटुंबासह पाचोरा तालुक्यातून एका पारसी दारु विक्रेत्यासोबत अमळनेरला आले. त्यांना 7 मुली होत्या. पारसी व्यापाऱ्याने त्यांना गावाबाहेर स्मशानभूमीजवळ राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली.

त्यांच्या सात मुलींपैकी दोघी मुजरा करून पैसे कमवायच्या. तर इतर पाच जणींनी वेश्या व्यवसाय सुरू केला. हे शेख कुटुंब हरदासी परंपरेतील होतं.

समाजाच्‍या मूळ प्रवाहापासून शेकडो मैल दूर असलेल्‍या या वर्गाला ना शिक्षणाचा गंध होता, ना जगात होत असलेल्‍या बदलांचा.

मुलगी जन्‍माला आली तर ती वेश्याव्यवसाय करणार आणि मुलगा जन्माला तर त्याचं लग्न करून देणार, मग त्याची बायको पडद्यामागे राहून घरातल्यांची सगळी कामं करणार, हेच चालत आलेलं.

दोन कुटुंबापासून सुरू झालेल्या या वस्तीत आता जवळपास 60 ते 70 कुटुंबं आहेत. हरदासी समुदायातील पाचवी पिढी इथं वेश्या व्यवसायात आहे.

विशेष म्हणजे या वेश्यावस्तीतील 70 ते 80 मुलींची लग्नं झाली आहेत. नवीन पिढी शिक्षणाकडं वळली आहे. याच वेश्यांच्या काही मुली वैद्यकीय शिक्षण घेत आहेत, तर कोणी नोकरी करत आहेत.

वेश्यावस्तीतील एक खोली

फोटो स्रोत, Abhijeet Tangade

फोटो कॅप्शन, वेश्यावस्तीतील एक खोली

इथं 'शकीला मंजिल' नावाच्या एका घरात एक वृद्ध महिला अंथरुणाला खिळलेली होती. वय सत्तरी पार असेल. त्यांची मुलगी स्वयंपाक करत होती.

घराची रचना पाहता, खाली कुंटणखाना आणि वरच्या मजल्यावर कुटुंबातील इतर सदस्यांची राहण्याची व्यवस्था.

वेश्या व्यवसाय चालतो ती खोली 10x10 आकाराची. तिथं एक पलंग, फॅन आणि बाजूला एक पाण्याची भरलेली बादली. इथं वस्तीतील प्रत्येक घरात अशा एक-दोन खोल्या आहेत.

वेश्या वस्तीबाबतचा वाद काय?

इथल्या वेश्यांना वस्तीतून बाहेर हाकलण्याबाबतचा नेमका काय वाद सुरू आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्यावेळी ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर अनेकजणी पुढे आल्या. सत्तरीच्या फातिमा आजीने सगळ्यात आधी बोलायला सुरुवात केली.

"आम्हाला वस्तीतून हाकलून देण्यासाठी पद्धतशीर राजकारण सुरू आहे. अनेक दशकं आम्ही इथे राहत असल्यानं, आमच्या मालकीची घरं बांधली आहेत."

"याच वस्तीत एक जुनं चित्रपटगृह होतं. कालांतराने ते बंद पडलं. एका व्यक्तीनं ती जागा विकत घेऊन भंगारचा व्यवसाय सुरू केला. हळू-हळू तो व्यवसाय वाढायला लागला आणि जागा कमी पडू लागली म्हणून त्याची नजर आमच्या वस्तीवर गेली."

खाली कुंटणखाना चालतो आणि वरच्या मजल्यावर कुटुंब राहतं.

फोटो स्रोत, Abhijeet Tangade

फोटो कॅप्शन, खाली कुंटणखाना चालतो आणि वरच्या मजल्यावर कुटुंब राहतं.

"कुदरत अली खान असं त्या व्यापाऱ्याचं नाव. त्यानं आमची छळवणूक करण्याची एकही संधी सोडली नाही. आमचा व्यवसाय बंद करावा किंवा दुसरीकडे वस्ती हलवावी यासाठी त्याने पद्धतशीरपणे मोहीम सुरू केली. आजूबाजूच्या लोकांना भडकावत आहे."

"आमच्या विरुद्ध मॅसेजेस, पोस्टर बनवून व्हाट्सअप ग्रुपवर फॉरवर्ड करणं, आमच्या विरोधात मोर्चे काढणं, खोटे आरोप करून पोलीस स्टेशनमध्ये आमच्याविरोधात तक्रारी देणं, अशा सगळ्या गोष्टींमुळे गेल्या काही वर्षांपासून आम्ही त्रस्त आहोत," असं फातिमा म्हणाल्या.

'कब्रस्तानमध्येही जागा मिळू देणार नाही'

30 वर्षां मुनीबाचा जन्म याच वेश्यावस्तीतला. वेश्या व्यवसाय कधी सुरू केला, हेही आता तिला आठवत नाही. एक भयानक आठवण तिनं सांगितली.

"वडील वारले आणि चाळीसाव्या दिवशी कार्यक्रम होता. आमच्या परंपरेत बारावा-तेरावा हा चाळीसाव्या दिवशी होत असतो. त्याच्यासाठी आम्हाला आमच्या समाजातूनच भांडी आणून त्यात स्वयंपाक बनवावा लागतो.

आम्ही जेव्हा भांडी मागायला गेलो तेव्हा इथल्या मशिदीचे रियाझ मौलाना आणि कुदरत अली खान यांनी मशिदीतून भांडे नेण्यास मनाई केली."

"आम्ही अमळनेरमध्ये कुठेही भांडे मागायला गेलो की, ते सांगायचे कुदरत अलीने मनाई केली आहे. शेवटी आम्ही एका केटरर्सवाल्याकडून भांडी आणली आणि त्यात स्वयंपाक केला. थोड्या वेळात त्यांची माणसं आली आणि आम्ही केलेला सगळा स्वयंपाक रस्त्यावर फेकला."

"कुदरत अली खान आम्हाला म्हणाले की, आता तर फक्त भांडी घेऊन जातोय, हे असंच सुरू ठेवलं, तर तुमच्या जनाज्यासाठी माणसंही येणार नाहीत. आम्ही तुम्हाला कब्रस्तानमध्येही जागा देणार नाही."

"तीन-चार महिने आमचा व्यवसाय बंद होता. नाईलाजाने आम्ही सर्वांनी धंदा परत सुरू केला. कारण, आम्हाला कोणीही एक रुपयाची मदत करायला तयार नाही. ऐन रमजानमध्ये आम्ही लेकरांना पाणी पाजून झोपवलं. ज्यांच्याकडून कर्ज घेतलं ते दारात येतात, आम्ही धंदा नाही करणार तर कर्ज कसं फेडणार? लेकरांना काय खाऊ घालणार", हे बोलताना मुनीबा रडत होत्या.

गांधीलपुरा येथील एक घर

फोटो स्रोत, Abhijeet Tangade

अमिना म्हणाल्या की, "मी 19 वर्षांची असताना वेश्याव्यवसायात आले. मला आता 25 वर्षांचा मुलगा आणि 12 वर्षांची मुलगी आहे. मुलगी सातवीत शिकते, तर मुलगा हॉटेलमध्ये काम करतो."

"आधी माझं घर व्यवस्थित चालायचं. पण 5 वर्षांपासून खूपच संघर्ष करावा लागतोय. आम्हाला हाकलून लावण्यासाठी पद्धतशीर राजकारण सुरू झालं आहे. इथं 150 वर्षांपासून वेश्याव्यवसाय चालतो. कुणी कधी त्रास दिला नाही. पण, 2016 पासून कुदरत अली खान यांनी आमचं जगणंच कठिण केलं आहे."

"आम्ही आमच्या हक्काच्या जागेवर राहतो. मग घरातून का आणि कुठे जायचं? प्रत्येकजण पोटापाण्यासाठी काही ना काही काम करत असतो. मग आमचं काम चुकीचं का? आम्हालाही कायदे माहीत आहेत. आमच्या वस्तीत 18 वर्षांखालील कोणतीच मुलगी हा व्यवसाय करत नाही."

स्वतःची बाजू मांडण्यासाठी पत्रकार परिषद

या महिलांच्या विरोधात स्थानिक दैनिकांमध्ये बातम्या देणं, मोर्चा काढण्याचं काम काही लोकं करत आहेत. गेली 10 वर्ष हे सुरू आहे. त्यामुळं स्वतःची बाजू मांडण्यासाठी या महिलांनी दोन वेळा वस्तीतच पत्रकार परिषद घेतली.

"आम्ही प्रांत अधिकाऱ्यांनाही बोलावलं होतं. इथं काहीही अवैध काम करत नाही हे आम्ही मांडलं. न्यायालयाकडून विरोध नाही, तर समाजातील काही लोकांकडून आम्हाला का विरोध होतो?" हा मुद्दा मांडल्याचं अमिना सांगतात.

आर्थिक अडचण आणि इतर गोष्टी लोकांसमोर मांडल्या. त्यामुळं लोक विचार करू लागले. आमची बाजू समोर आली, असंही त्या म्हणाल्या.

विरोध करणाऱ्यांचं म्हणणं काय?

गांधीलपुराच्या या वस्तीतील महिलां विरोध करणाऱ्या कुदरत अली खान यांनीही त्यांची बाजू स्पष्ट केली.

कुदरत अली भंगारचा व्यवसाय करतात.

"त्यांना वस्तीबाहेर काढण्यासाठी आम्ही अनेक मोर्चे काढले, पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी केल्या, हे सगळं खरं आहे. मात्र, त्या वस्तीवर मला ताबा मिळवायचा आहे, हा आरोप मी कधीच मान्य करणार नाही. त्या बायकांनी माझ्यावर हा खोटा आरोप केलाय," असं ते म्हणतात.

"आमच्या या वस्तीत फक्त त्या बायका राहत नाहीत, तर आम्हीही राहतो. आमच्या मुली, सुनांकडंही लोकं त्याच नजरेनं पाहतात. त्यामुळं या बायकांनी वस्ती खाली करावी किंवा इथला वेश्याव्यवसाय बंद करून दुसरीकडे सुरू करावा एवढीच आमची मागणी आहे," असं ते म्हणतात.

फोटो कॅप्शन - कुदरत अली खान आणि रियाझ मौलाना यांनी वेश्यालय हटवण्यासाठी काढलेला मोर्चा.

फोटो स्रोत, Abhijeet Tangade

फोटो कॅप्शन, कुदरत अली खान आणि रियाझ मौलाना यांनी वेश्यालय हटवण्यासाठी काढलेला मोर्चा.

कुदरत अली पुढे म्हणाले की, या बायकांनी धंदा बंद करावा कारण त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. त्या उगाच गरीब असल्याचं नाटक करतात. त्यांचं वाईट व्हावं अशी आमची जराही इच्छा नाही, फक्त त्या जे घाण काम करत आहेत ते त्यांनी बंद करावं.

वस्तीत असलेल्या मशिदीचे मौलाना रियाझ यांनीही वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या विरोधात भूमिका मांडली.

"त्या बायका खोटं बोलत आहेत. आम्हाला त्यांच्या राहण्यापासून, धंद्यापासून काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त आमच्या वस्तीतून त्यांनी निघून जावं किंवा हा धंदा बंद करावा.

याचा आमच्या मुलाबाळांवर परिणाम होत आहे. आम्ही गरीब लोकं आहोत, आम्ही काय त्यांना विरोध करणार, समाजाच्या चांगल्यासाठीच आम्ही हे सर्व करत आहोत," असं ते म्हणाले.

नव्या पर्वाला सुरुवात

1995 ते 2000 या काळात शारीरिक संबंधातून पसरणाऱ्या एचआयव्हीचा उद्रेक झाला होता. त्यावेळी एचआयव्ही बाधितांची जळगाव जिल्ह्यातील संख्या लक्षणीय होती. शासकीय एचआयव्ही एड्स प्रतिबंध कार्यक्रमांतर्गत 'आधार संस्था' मग वस्तीतल्या महिलांसाठी आरोग्य संवर्धनाचं काम करू लागली.

आधार संस्थेने आरोग्य कार्यक्रमांसोबत या महिलांना मानवी हक्क कायदेविषयक माहिती देण्यास सुरुवात केली. 2005 मध्ये स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या कुटुंबातील 63 मुलांना शाळेत दाखल करण्यात आले. यामुळे वस्तीत नवीन शैक्षणिक वारे वाहू लागले.

कधीही पुस्तकं न पाहिलेल्या मुलांनी शाळेचे अनुभव घेतले. मुलांसाठी गाडीची व्यवस्थाही करण्यात आली. तसेच मुलांना अभ्यासाची सवय लागावी म्हणून वस्तीत 'डे केअर सेंटर'ची सुरुवात झाली. धार्मिक शिक्षणासाठी 2006 मध्ये वस्तीत मदरसा सुरू करण्यात आला. त्याठिकाणी अनेक कार्यक्रम होऊ लागले.

अधिकारी, पुढारी त्या निमित्ताने वस्तीत येऊ लागले आणि वस्तीतील महिलांना आपण समाजाचा एक भाग आहोत ही जाणीव होऊ लागली. अशा सर्व सकारात्मक वातावरणामुळं नवीन पिढीतील मुलींचं वेश्या व्यवसायात येणं थांबलं. 2010 ते 2025 या कालावधीत वस्तीतील 75 ते 80 मुलींची लग्नं झाली.

फोटो कॅप्शन - आधार संस्थेचे कार्यकर्ते. यांच्यामुळेच वेश्यावस्तीत नव्या पर्वाला सुरुवात झाली.

फोटो स्रोत, Abhijeet Tangade

फोटो कॅप्शन, आधार संस्थेचे कार्यकर्ते ज्यांच्यामुळे वेश्यावस्तीत नव्या पर्वाला सुरुवात झाली.

डॉ. भारती पाटील 'आधार' संस्थेच्या अध्यक्ष आहेत. गेल्या 25 वर्षांपासून त्या आधार संस्थेमध्ये काम करत आहेत.

त्या सांगतात, "आधार संस्थेमध्ये सुरुवातीपासून माता बालमृत्यू, कुपोषण यावर काम चालू होते. 2003 मध्ये आमच्या असं लक्षात आलं की, आम्ही ज्या भागात काम करत आहोत त्या भागात एचआयव्हीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. तेव्हा एचआयव्हीचा प्रश्न ऐरणीवर होता."

"एचआयव्हीग्रस्त जिल्हा म्हणून जळगाव हा महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर होता. एचआयव्ही हा सर्वात जास्त वेश्यावस्तीतून पसरतो. म्हणून आम्ही वेश्यावस्तीत काम करायचं ठरवलं. त्या वस्तीत सुरुवातीला निरोध वापरणं का गरजेचं आहे, या विषयातून बायकांपर्यंत पोहचायला सुरुवात केली."

"हळहळू वस्तीच्या परिस्थितीबद्दल कळू लागलं. शिक्षणाचा प्रभाव नव्हता, आरोग्याच्या समस्या होत्या. महिलांकडे स्वतःची ओळख दाखवण्यासाठी कोणतेही ओळखपत्र नव्हतं.

शासनाच्या कोणत्याच योजना त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या. तेव्हा त्या वस्तीतील एकेका मुद्द्यावर काम करायला आम्ही सुरुवात केली. आज 25 वर्षे झाली आम्ही त्यांच्यासोबत जोडलेलो आहोत."

'प्रियाला ब्युटिशियन बनायचं आहे'

कविताची मुलगी प्रिया ही नववीत शिकते. तिला मोठं होऊन मेकअप आर्टिस्ट आणि ब्युटिशियन बनायचंय. वयात आलेल्या प्रियाकडे कोणी वाकड्या नजरेने बघू नये म्हणून कवितानेही वेश्याव्यवसायातून काढता पाय घेतला आहे. त्यांनीही ब्युटीपार्लरचं प्रशिक्षण घेऊन वस्तीतच छोटंसं ब्युटीपार्लर सुरू केलं आहे.

प्रिया शाळेत मिळालेले तिचे मेडल दाखवतांना म्हणते, "मला संस्कृत शिकायला फार आवडतं. मी फुटबॉल, कबड्डी पण छान खेळते. विज्ञानात पण मला रस आहे.

पण आमच्या शाळेत मुलींना स्टेजवर बोलू दिलं जात नाही. बोलू दिलं असतं, तर मी गायनात सुद्धा बक्षीस मिळवलं असतं."

प्रियाची लहान बहीण चौथीत आहे. ती पण तिला शाळेत मिळालेले प्रमाणपत्र कपाटातून शोधून काढत होती.

ती म्हणते, "मला शिक्षक बनायचं आहे." तिला शिक्षक का बनायचं हे विचारल्यावर ती म्हणते, "माझा जन्म जेलमध्ये झाला ना, मम्मी म्हणते ती लोकं फार वाईट आहेत. म्हणून मला शिक्षक बनायचं आहे आणि चांगलं कसं वागायचं हे मी मुलांना शिकवेन."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.