अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ओढणाऱ्या 'मॅडम' - BBC च्या तपासातून हादरवणारं वास्तव समोर

न्याम्बुरा (डावीकडे) आणि चेप्टू (उजवीकडे) यांनी बीबीसीच्या गुप्त तपासकर्त्यांना सांगितलं की वाहतुकीचं केंद्र असलेल्या माई माहिउ शहरात त्यांनी अल्पवयीन मुलींना कशाप्रकारे वेश्याव्यवसायात आणलं.
फोटो कॅप्शन, न्याम्बुरा (डावीकडे) आणि चेप्टू (उजवीकडे) यांनी बीबीसीच्या गुप्त तपासकर्त्यांना सांगितलं की वाहतुकीचं केंद्र असलेल्या माई माहिउ शहरात त्यांनी अल्पवयीन मुलींना कशाप्रकारे वेश्याव्यवसायात आणलं.
    • Author, न्जेरी म्वांगी
    • Role, बीबीसी आफ्रिका आय
    • Reporting from, माई महिउमधून
    • Author, टॅमासिन फोर्ड
    • Role, बीबीसी आफ्रिका आय

'बीबीसी आफ्रिका आय'नं केनियात केलेल्या तपासातून खळबळजनक गोष्टी समोर आल्या आहेत. या तपासातून समोर आलं की, केनियातील महिला 13 वर्षांच्या मुलींना कशाप्रकारे वेश्याव्यवसायात ओढत आहेत. या महिलांना 'मॅडम्स' म्हणून ओळखलं जातं.

केनियाच्या रिफ्ट खोऱ्यातील माई माहिउ हे दळणवळणाच्या दृष्टीनं महत्त्वाचं शहर आहे. तिथे ट्रक, लॉरींची रस्त्यांवरून दिवसरात्र वर्दळ सुरू असते. तिथून युगांडा, रवांडा, दक्षिण सुदान आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशांमध्ये माल आणि लोकांची वाहतूक सुरू असते.

केनियाची राजधानी असलेल्या नैरोबीच्या पूर्वेला 50 किमी (31 मैल) अंतरावर असलेलं हे शहर वाहतुकीचं प्रमुख केंद्र आहे. माई माहिउ शहर वेश्याव्यवसायासाठी ओळखलं जातं. मात्र इतकंच नाही, तर तिथे मुलांचं लैंगिक शोषणदेखील होतं आहे.

बीबीसीचा गुप्त तपास

बीबीसीच्या गुप्तपणे तपास करणाऱ्या दोन तपासकर्त्या सेक्स वर्कर असल्याचं दाखवून 'मॅडम कसं व्हायचं' हे जाणून घेऊ पाहत होत्या. त्यासाठी त्यांनी या शहरातील सेक्स व्यापारात शिरकाव करण्यासाठी या वर्षाच्या सुरुवातीला काही महिने घालवले.

त्यांनी गुप्तपणे केलेल्या चित्रीकरणातून दोन वेगवेगळ्या महिला समोर आल्या. या महिला म्हणतात की, त्यांना माहित आहे की हे बेकायदेशीर आहे. त्यानंतर त्यांनी या तपास करणाऱ्यांना सेक्स व्यवसायातील अल्पवयीन मुलींची ओळख करून दिली.

मार्च महिन्यात बीबीसीनं त्यांच्या हाती आलेले सर्व पुरावे केनियातील पोलिसांना दिले. बीबीसीला वाटतं की, तेव्हापासून या 'मॅडम्स'नी त्यांचं ठिकाण बदललं आहे.

पोलीस म्हणाले की, बीबीसीनं चित्रीकरण केलेल्या महिला आणि अल्पवयीन मुलीं त्यांना सापडल्या नाहीत. आजपर्यंत तिथे कोणालाही अटक झालेली नाही.

केनियामध्ये गुन्ह्यासाठी दोषी ठरवलं जाणं दुर्मिळ आहे. खटला यशस्वीरित्या चालवला जाण्यासाठी पोलिसांना मुलांची साक्ष आवश्यक असते. अनेकदा असुरक्षित असलेल्या अल्पवयीन मुली साक्ष देण्यास खूप घाबरतात.

अंधारात रस्त्यावर चित्रित केलेल्या बीबीसीच्या काहीशा अस्पष्ट फुटेजमध्ये एक महिला दिसते. ती स्वत:ला न्याम्बुरा म्हणते. ती हसत म्हणते, "ती अजूनही मुलं आहेत. त्यामुळे फक्त मिठाई देऊन त्यांची फसवणूक करणं सोपं आहे."

न्याम्बुरा म्हणाली की, "माई माहिउमध्ये वेश्याव्यवसाय हा एखाद्या नगदी पिकासारखा आहे. या वेश्याव्यवसायाला ट्रकचालकांकडून चालना मिळते. अशाप्रकारे आम्हाला फायदा होतो. माई माहिउमध्ये ही अगदी सामान्य गोष्ट झाली आहे."

ती पुढे म्हणाली की तिला एक 13 वर्षांची मुलगी होती. तीसुद्धा सहा महिन्यांपासून सेक्स वर्कर म्हणून काम करत होती.

"अल्पवयीन मुलींना हाताळणं खूपच धोकादायक असतं. तुम्ही त्यांना उघडपणे शहरात आणू शकत नाही. मी फक्त रात्रीच्या वेळेस त्यांना अतिशय गुप्तपणे बाहेर काढते," असं न्याम्बुरा म्हणाली.

कायद्यानं बंदी, मात्र जोरात सुरू असलेला वेश्याव्यवसाय

केनियातील राष्ट्रीय कायद्यानुसार, एखाद्या प्रौढ व्यक्तीनं संमतीनं वेश्याव्यवसाय करण्यास स्पष्टपणे गुन्हेगारी कृत्य ठरवलेलं नाही. मात्र अनेक महानगरपालिकांनी त्यावर कायद्यानं बंदी घातली आहे.

अर्थात नाकुरू काउंटीचा भाग असलेल्या माई माहिउमध्ये मात्र यावर बंदी घातलेली नाही.

केनियातील दंड संहितेनुसार, वेश्याव्यवसायातून मिळणाऱ्या कमाईवर जगणं बेकायदेशीर आहे. मग ते सेक्स वर्कर म्हणून असो किंवा वेश्याव्यवसाय घडवून आणणारी किंवा त्यातून नफा कमावणारी थर्ड पार्टी म्हणून काम करणं असो.

18 वर्षांखालील अल्पवयीन मुलं किंवा मुलींची तस्करी केल्यास किंवा विक्री केल्यास 10 वर्षांपासून ते जन्मठेपेपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षेची तिथे तरतूद आहे.

माई माहिउ हे केनियातील नाकूरू काउंटीतील शहर वाहतुकीचं महत्त्वाचं केंद्र असून तिथून अनेक ट्रक केनियाच्या पश्चिम भागात जातात
फोटो कॅप्शन, माई माहिउ हे केनियातील नाकूरू काउंटीतील शहर वाहतुकीचं महत्त्वाचं केंद्र असून तिथून अनेक ट्रक केनियाच्या पश्चिम भागात जातात

बीबीसीनं जेव्हा न्याम्बुराला विचारलं की ग्राहक कंडोमचा वापर करतात का? त्यावर तिनं उत्तर दिलं की सहसा मुलींना संरक्षण मिळावं याची ती खातरजमा करते, मात्र काही विचित्र ग्राहक तसं करत नाहीत.

"काही मुलींना अधिक कमाई करायची असते (त्यामुळे ते कंडोमचा वापर करत नाहीत). तर काहींना (त्याचा वापर न करण्यास) भाग पाडलं जातं," असं ती म्हणाली.

तिला आणखी एकदा भेटल्यावर, ती गुप्तपणे तपास करणाऱ्यांना एका घरात घेऊन गेली. तिथे तीन अल्पवयीन मुली अंग चोरून, हातपाय जवळ घेऊन एका सोफ्यावर बसल्या होत्या. तर आणखी एक मुलगी एका कडक पाठ असलेल्या खुर्चीवर बसली होती.

न्याम्बुरानं तपास करणाऱ्यांना त्या घरात नेलं आणि ती त्या खोलीतून निघून गेली. तिने तपास करणाऱ्यांना या मुलींशी एकट्यानं बोलण्याची संधी दिली.

त्या मुलींनी सांगितलं की, लैंगिक संबंधांसाठी दररोज त्यांच्यावर वारंवार अत्याचार केले जातात.

"काहीवेळा आम्हाला अनेकजणांबरोबर सेक्स करावा लागतो. ग्राहक आम्हाला अकल्पनीय गोष्टी करण्यास भाग पाडतात," असं एका मुलीनं सांगितलं.

केनियात नेमक्या किती सेक्स वर्कर आहेत?

केनियातील वेश्याव्यवसायात नेमकं किती मुलांना काम करण्यास भाग पाडलं जातं, याबद्दलची ताजी आकडेवारी उपलब्ध नाही.

2012 मध्ये केनियातील मानवाधिकारांवरील अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालात ही संख्या 30,000 असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

केनिया सरकार आणि 'इरॅडिकेट चाईल्ड प्रॉस्टिट्यूशन इन केनिया' या स्वयंसेवी संस्थेकडून ही आकडेवारी घेण्यात आली होती. ही संस्था आता बंद पडली आहे.

यासंदर्भात झालेल्या इतर अभ्यासांमध्ये केनियातील विशिष्ट भागांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं होतं. विशेषकरून केनियातील किनारपट्टीच्या भागात, जो पर्यटकांसाठीच्या रिसॉर्ट्ससाठी ओळखला जातो.

रात्रीच्या वेळी सुमारे 50 हजार लोकसंख्या असलेलं हे शहर पुन्हा जिवंत होतं आणि ते देह व्यापारात गढून जातं.
फोटो कॅप्शन, रात्रीच्या वेळी सुमारे 50 हजार लोकसंख्या असलेलं हे शहर पुन्हा जिवंत होतं आणि ते देह व्यापारात गढून जातं.

ग्लोबल फंड टू एंड मॉडर्न स्लेव्हरी या स्वयंसेवी संस्थेच्या 2022 मधील एका अहवालात, केनियातील किलिफि आणि क्वाले काउंटीमध्ये जवळपास 2,500 मुलांना सेक्स वर्कर म्हणून काम करण्यास भाग पाडण्यात आल्याचं समोर आलं होतं.

गुप्त तपास करणाऱ्या बीबीसीच्या दुसऱ्या रिपोर्टरनं एका महिलेचा विश्वास संपादन केला. ही महिला स्वत:ला चेप्टू म्हणवत होती. या तपास करणाऱ्या महिलेनं त्या महिलेची अनेकदा भेट घेतली.

तिनं सांगितलं की अल्पवयीन मुलींची विक्री करून ती "उदरनिर्वाह चालवू शकते आणि आरामात राहू शकते."

"अशा प्रकारचा व्यवसाय अतिशय गुप्तपणे करावा लागतो, कारण तो बेकायदेशीर आहे," असं ती म्हणाली.

"जर कोणी मला सांगितलं की त्यांना अल्पवयीन मुलगी हवी आहे, तर मी त्यांना पैसे देण्यास सांगते. आमच्याकडे नियमित स्वरुपाचे सेक्स वर्कर देखील आहेत, जे नेहमीच त्यांच्यासाठी परत येतात," असं ती पुढे म्हणाली.

'मला कंडोमशिवाय सेक्स करावाच लागतो, पर्याय नाही'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

चार अल्पवयीन मुलींची भेट घडवून आणण्यासाठी चेप्टू या गुप्त तपासकर्त्याला एका क्लबमध्ये घेऊन गेली. त्यातील सर्वात लहान मुलीनं सांगितलं की 13 वर्षांची होती. तर बाकींच्यानी सांगितलं की त्या 15 वर्षांच्या आहेत.

तिनं या अल्पवयीन मुलींच्या जोरावर मिळणाऱ्या कमाईबद्दल उघडपणे सांगितलं. ती म्हणाली की या मुलींकडून मिळणाऱ्या प्रत्येक 3,000 केनियन शिलिंग्समागे (23 डॉलर; 17 पौंड), तिचा वाटा 2,500 शिलिंग्सचा (19 डॉलर; 14 पौंड) असतो.

माई माहिउमधील एका घरात झालेल्या आणखी एका भेटीत, चेप्टूनं बीबीसीच्या तपासकर्त्याला दोन अल्पवयीन मुलींशी एकट्यानं बोलण्याची संधी दिली.

त्यातील एका अल्पवयीन मुलीनं सांगितलं की तिला दररोज सरासरी पाच पुरुषांबरोबर सेक्स करावा लागतो.

जेव्हा तिला विचारलं की जर तिनं कंडोमशिवाय सेक्स करण्यास नकार दिला तर काय होतं. त्यावर ती म्हणाली की तिला पर्याय नाही.

"मला ते करावंच लागेल (कंडोमशिवाय सेक्स करावा लागेल). नाहीतर मला हाकलून देण्यात येईल. इथून पळून जाण्यासाठी मला कुठेही जागा किंवा पर्याय नाही. मी अनाथ आहे," असं ती अल्पवयीन मुलगी म्हणाली.

केनियातील सेक्स उद्योग हे एक गुंतागुंतीचं आणि अंधारमय, गढूळ जग आहे. तिथे पुरुष आणि महिला दोघेही अल्पवयीन मुलींच्या वेश्याव्यवसायाला चालना देण्यात गुंतले आहेत.

माई माहिउ शहरात किती मुलींना जबरदस्तीनं सेक्स वर्कर म्हणून काम करण्यास भाग पाडलं जातं, याची निश्चित संख्या माहित नाही. मात्र जवळपास 50,000 लोकसंख्या असलेल्या या छोट्या शहरात या सेक्स वर्करना शोधणं सोपं आहे.

सेक्स वर्करना नवं आयुष्य देणारी 'बेबी गर्ल'

एक माजी सेक्स वर्कर, 'बेबी गर्ल' म्हणून ओळखली जाते. ती आता लैंगिक शोषणातून पलायन केलेल्या मुलींना माई माहिउमध्ये आश्रय देते.

या 61 वर्षांच्या महिलेनं वेश्याव्यवसायात 40 वर्षे सेक्स वर्कर म्हणून काम केलं आहे. वयाच्या विशीत त्या रस्त्यावर आल्या होत्या. पतीकडून होत असलेल्या घरगुती हिंसाचारामुळे त्यांनी घरातून पळ काढला, त्यावेळेस त्या गरोदर होत्या आणि त्यांच्यासोबत त्यांची तीन लहान मुलं होती.

त्यांच्या घरासमोर असणाऱ्या एका पार्लरमध्ये असणाऱ्या त्यांच्या स्वयंपाकघरातील लाकडी टेबलाजवळ त्यांनी बीबीसीची ओळख चार तरुणींशी करून दिली. त्या लहान असताना माई माहिउमधील मॅडम्सनी त्यांना सेक्स वर्कर म्हणून काम करण्यास भाग पाडलं होतं.

लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या कामाचा भाग म्हणून बेबी गर्ल नाकूरू काउंटीतील लेक नैवाशाजवळच्या रस्त्यांवर कंडोमचं वाटप करतात.
फोटो कॅप्शन, लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या कामाचा भाग म्हणून बेबी गर्ल नाकूरू काउंटीतील लेक नैवाशाजवळच्या रस्त्यांवर कंडोमचं वाटप करतात.

प्रत्येक मुलीनं तुटलेल्या किंवा उदध्वस्त झालेल्या कुटुंबाची किंवा घरी होणाऱ्या छळाचीच कहाणी सांगितली. त्या छळातून सुटका करून घेण्यासाठी त्या माई माहिउमध्ये आल्या आणि इथे आल्यावर त्यांना पुन्हा हिंसक अत्याचाराला तोंड द्यावं लागलं.

मिशेलनं सांगितलं की ती 12 वर्षांची असताना एचआयव्हीमुळे तिनं तिचे पालक गमावले. मग तिला घरातून हाकलून देण्यात आलं, ती रस्त्यावर आली. तिथे तिची भेट एका पुरुषाशी झाली, ज्यानं तिला राहण्यासाठी जागा दिली आणि तिचं लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली.

"मला शिक्षण दिल्याबद्दल मला त्याला अक्षरश: पैसे द्यावे लागले. माझी सहन करण्याची मर्यादा संपली होती, मात्र माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता, माझं कोणीच नव्हतं," असं ती म्हणाली.

दोन वर्षांनी एका महिलेनं तिच्याशी संपर्क साधला. ती माई माहिउमधील मॅडम होती. मग या महिलेनं तिला सेक्स वर्कर म्हणून काम करण्यास भाग पाडलं.

लिलियनची नव्या आयुष्याची सुरुवात

लिलियन आता 19 वर्षांची आहे. ती खूप लहान असतानाच तिनं तिचे पालक गमावले होते. मग ती तिच्या एका काकाबरोबर राहत होती. त्यानं तिचं शॉवरखाली चित्रीकरण केलं आणि तिचे फोटो त्याच्या मित्रांना विकले. मग त्याचं रुपांतर लवकरच बलात्कारात झालं.

"तो माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता. मी तेव्हा फक्त 12 वर्षांची होते," असं लिलियन म्हणाली.

ती तिथून निसटली, मात्र एका ट्रक ड्रायव्हरनं तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. त्यानं लिलियनला माई माहिउला नेलं. इथे मिशेलप्रमाणे एका महिलेनं तिच्याशी संपर्क केला आणि तिला सेक्स वर्कर म्हणून काम करण्यास भाग पाडलं.

या तरुण महिलांचं छोटंसं आयुष्य हिंसाचार, अनास्था आणि शोषणानं भरलेलं आहे.

आता त्या बेबी गर्लकडे राहत आहेत. त्या नवीन कौशल्यं शिकत आहेत. दोन जणी फोटोग्राफीच्या स्टुडिओमध्ये शिकत आहेत तर दोन जणी ब्युटी सलूनमध्ये शिकत आहेत.

सेक्स वर्करच्या समुदायात बेबी गर्ल करत असलेल्या कामामध्ये देखील त्या तिला मदत करतात.

नाकूरू काउंटी ही केनियातील एचआयव्ही संसर्गाचा सर्वाधिक दर असणाऱ्या काउंटीपैकी एक आहे. बेबी गर्लला अमेरिकेच्या यूएसएआयडी या संस्थेकडून मदत मिळते. संरक्षण न घेता किंवा काळजी न घेता केलेल्या सेक्समुळे असणाऱ्या धोक्यांबद्दल लोकांना जागरुक करणं हे बेली गर्लचं मिशन आहे.

लेक नैवाशाजवळ कारागिता कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये बेबी गर्लचं कार्यालय आहे. तिथं त्या कंडोम वाटतात आणि मार्गदर्शन करतात.

ट्रम्प यांच्या नव्या धोरणाचा बेबी गर्लच्या कामाला मोठा फटका

मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यूएसएआयडी या अमेरिकन संस्थेला अमेरिकन सरकारकडून दिला जाणारा निधी थांबवण्याचा निर्णय घेतल्यामुळे, बेबी गर्लचं हे काम थांबवण्याच्या मार्गावर आहे.

"सप्टेंबर महिन्यापासून आम्ही बेरोजगार होऊ," असं त्यांनी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसला सांगितलं.

तसंच त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या तरुणी आणि अल्पवयीन मुलींची तिला किती काळजी वाटते, हे देखील त्यांनी सांगितलं.

"तुम्ही पाहू शकता की या मुली किती असुरक्षित आहेत. त्या स्वत:च्या जीवावर कशा काय जगतील? त्या अजूनही या सर्वातून सावरत आहेत," असं त्या म्हणाल्या.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यूएसएआयडी या अमेरिकन संस्थेला अमेरिकन सरकारकडून दिला जाणारा निधी थांबवण्याचा निर्णय घेतल्यामुळे, बेबी गर्लचं हे काम थांबवण्याच्या मार्गावर आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यूएसएआयडी या अमेरिकन संस्थेला अमेरिकन सरकारकडून दिला जाणारा निधी थांबवण्याचा निर्णय घेतल्यामुळे, बेबी गर्लचं हे काम थांबवण्याच्या मार्गावर आहे.

या तपासाच्या संदर्भात, अमेरिकन सरकारनं स्वयंसेवी संस्थाना दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये कपात केल्यानंतर होणाऱ्या परिणामांबद्दल बीबीसीनं संपर्क केल्यानंतर अमेरिकन सरकारनं कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शेवटी गेल्या महिन्यात यूएसएआयडी ही संस्था अधिकृतपणे बंद झाली.

सध्या तरी, लिलियननं फोटोग्राफी शिकवण्यावर आणि लैंगिक शोषणातून सावरण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे.

"मला आता भीती वाटत नाही. कारण माझ्यासाठी बेबी गर्ल आहे. ती आम्हाला भूतकाळातून बाहेर पडण्यासाठी मदत करते आहे," असं लिलियन म्हणाली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)