दिएगो गार्सिया : हिंदी महासागरातील 'या' गूढ बेटावर कुणालाही प्रवेश का मिळत नाही?

    • Author, अ‍ॅलिस कडी
    • Role, बीबीसी न्यूज

अमेरिकेच्या लष्करी शक्तीची, जगभरातील लष्करी तळांची नेहमीच चर्चा होत असते. मात्र त्यांचे काही लष्करी तळ अतिशय गुप्त स्वरुपाचे आहेत. त्याविषयी जगाला फारसं किंवा अजिबातच माहित नसतं.

दिएगो गार्सिया या हिंदी महासागरातील बेटावरील अमेरिका आणि युकेचा संयुक्त लष्करी तळ असाच अत्यंत गोपनीय तळ आहे. एका न्यायालयीन खटल्यासंदर्भात बीबीसीची पत्रकार तिथे अलीकडेच जाऊन आली, त्याविषयी...

दिएगो गार्सिया (Diego Garcia), हे हिंदी महासागरातील हे दुर्गम बेट आहे. निळ्याशार पारदर्शक पाण्यानं वेढलेलं हे बेट गर्द, हिरवी झाडी आणि पांढऱ्या स्वच्छ वाळूचे समुद्र किनाऱ्यांचं नंदनवन आहे.

बेटाचं हे सर्व वर्णन वाचून हे एखादं पर्यटन स्थळ असावं असं वाटतं. मात्र हे पर्यटन स्थळ अजिबात नाही. किंबहुना बहुतांश नागरिकांना तिथे जाण्याची परवानगीच नाही.

अमेरिका आणि युके यांचा अत्यंत गुप्त असा संयुक्त लष्करी किंवा सागरी तळ असलेल्या या जागेविषयी कित्येक दशकांपासून अफवा आणि गूढ यांचं धुकं दाटलेलं आहे.

या बेटाचं हिंदी महासागरातील भौगोलिक स्थानही अत्यंत महत्त्वाचं आहे. मालदीवच्या दक्षिणेला आणि मॉरिशसच्या उत्तरेला हे बेट आहे. साधारणपणे मालदीव आणि मॉरिशस बेटांच्या मध्ये हे बेट आहे.

लंडनहून या बेटाचा कारभार चालतो. युके आणि मॉरिशस यांच्यात दीर्घकाळापासून चागोस बेटासंदर्भात वाद सुरू आहे. दिएगो गार्सिया (Diego Garcia) बेट त्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये या वादासंदर्भातील वाटाघाटींना वेग आला आहे.

नुकताच युके प्रशासनानं या बेटांना सार्वभौमत्व प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

एऱ्हवी कोणालाही या बेटावर जाणं दुरापास्त आहे. पण या महिन्याच्या सुरुवातीला बीबीसीला या बेटावर प्रवेशाची अभूतपूर्व संधी मिळाली.

"हा शत्रू आहे," असं एका खासगी सुरक्षा अधिकाऱ्यानं गमतीनं म्हटलं. दिएगो गार्सियात एका रात्री माझ्या खोलीवर मी परतल्यावर त्यानं हा जोक केला. त्याच्याकडं असलेल्या यादीत माझं नाव पिवळ्या रंगानं हायलाइट करण्यात आलेलं होतं.

या बेटावर प्रवेश मिळावा यासाठी बीबीसीनं अनेक महिने प्रयत्न केला होता.

चागोस आर्किपेलागो (Chagos Archipelago) हा हिंदी महासागरात भारतीय उपखंडाच्या दक्षिण टोकापासून जवळपास 1,600 किमी तर मालदिवच्या दक्षिणेला साधारण 500 किलोमीटर अंतरावर असलेला 60 हून अधिक बेटांचा समूह आहे. दिएगो गार्सिया हे त्यामधील सर्वात मोठं बेट आहे.

जर हे बेट एक गुप्त लष्करी तळ असेल आणि तिथे कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाला जाण्याची परवानगी नाही तर मग आम्हाला दिएगो गार्सियावर का जायचं होतं? हा प्रश्न यानिमित्तानं उभा राहतो.

दिएगो गार्सिया वरील श्रीलंकन तामिळींचा खटला

आम्हाला तिथे जायचं होतं ते श्रीलंकन तमिळींना दिल्या जात असलेल्या वागणुकीबाबतच्या एका ऐतिहासिक न्यायालयीन खटल्याचं कव्हरेज करण्यासाठी. या बेटावर सर्वात आधी आल्याचा या लोकांचा दावा आहे.

मात्र आता तीन वर्षांपासून ते तिथं अडकले आहेत. त्यांच्या भवितव्यासंदर्भात अत्यंत गुंतागुंतीचा कायदेशीर लढा झाला. या श्रीलंकन तामिळींना बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्यात आलं आहे की नाही याबाबतचा न्यायालयाचा निकाल लवकरच येणार आहे.

या क्षणापर्यंत तरी आम्हाला लांबूनचं याचं वार्तांकन करावं लागत होतं.

जवळच्या मुख्य बेटापासून दिएगो गार्सिया जवळपास 1,000 मैल (1,600 किमी) अंतरावर आहे. जगातील अत्यंत दुर्गम अशा बेटांमध्ये याचा समावेश होतो. या बेटावर जाण्यासाठी कोणत्याही कंपनीची विमानसेवा उपलब्ध नाही.

शिवाय सागरी मार्गानं पोहोचणंही सोपं नाही. या बेटावर जाण्यासाठी किंवा त्याच्या परिसरात जाण्यासाठी बोटीचा परवाना मिळणंही कठिण आहे. कारण फक्त आर्किपेलागो द्वीप समूहाच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या बेटांवर जाण्यासाठीच बोटींना परवाना दिली जाते.

साहजिकच तुम्हाला या बेटावर जायचं असेल तर त्यासाठी परवान्याची आवश्यकता असते. हा परवाना फक्त लष्कराशी संबंधित व्यक्तींना किंवा या बेटाचं प्रशासन चालवणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनाच दिला जातो. इथे जाण्यास पत्रकारांना पूर्वीपासूनच बंदी घालण्यात आली आहे.

दिएगो गार्सिया बेटावर अडकलेल्या श्रीलंकन तामिळींच्या खटल्याच्या सुनावणीला उपस्थित राहण्यास बीबीसीला प्रतिबंध करावा यासाठी युके सरकारच्या वकिलांनी कायदेशीर अडथळे, आव्हानं निर्माण केली.

त्यातही जेव्हा तिथल्या सर्वोच्च न्यायालयानं बीबीसीला उपस्थित राहण्याची परवानगी दिली तेव्हा अमेरिकेनं त्यावर आक्षेप घेतला.

अमेरिकेचं म्हणणं होतं की, खटल्याच्या सुनावणीसाठी या बेटावर जाऊ इच्छिणाऱ्यांना आम्ही अन्न, राहण्याची व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्था पुरवू शकत नाही. अगदी खटल्याचे न्यायमूर्ती आणि वकिलांनाही.

युके आणि अमेरिकन सरकारमध्ये याबाबत माहितीचे आदान प्रदान झाले. बीबीसीनं त्या नोट्स पाहिल्या.

यात दोन्ही सरकारनं म्हटलं आहे की, कोणत्याही प्रसारमाध्यमाला किंवा पत्रकाराला दिएगो गार्सियावर जाण्याची परवानगी देणं ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

"आधी चर्चा झाल्याप्रमाणं अमेरिकन सरकार युके सरकारच्या भूमिकेशी सहमत आहे की, पत्रकारांनी या खटल्याची सुनावणी लंडनहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाहावी हेच योग्य ठरेल. यामुळे तिथे निर्माण होणारा सुरक्षेचा धोका कमी होईल," असं अमेरिकन सरकारनं ब्रिटिश अधिकाऱ्यांना पाठवलेल्या एका नोटमध्ये म्हटलं आहे.

अखेर कडक निर्बंधासह मला या बेटावर पाच दिवस राहण्याची परवानगी देण्यात आली. हे निर्बंध फक्त न्यायालयात खटल्याची सुनावणी कव्हर करण्यासंदर्भात नव्हते. तर दिएगो गार्सिया बेटावरील माझ्या हालचाली आणि अगदी प्रत्यक्षात तिथे काय बंधनं आहेत याचं वार्तांकन करण्यावरसुद्धा बंदी होती.

परवान्यातील किरकोळ बदलांसाठीच्या विनंत्या देखील ब्रिटिश आणि अमेरिकन अधिकाऱ्यांनी फेटाळल्या होत्या.

अनेक अडचणींना तोंड देत पोहोचले बीबीसी पत्रकार

बीबीसीची टीम आणि सुनावणीसाठी जाणाऱ्या वकिलांना सुरक्षा पुरवण्यासाठी G4S या सुरक्षा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिएगो गार्सिया वर नेण्यात आलं.

बंधनं असली तरी, मी निरीक्षण करू शकत होते. त्या सर्वांचा उपयोग मला पृथ्वीवरील सर्वाधिक निर्बंध असलेल्या एका ठिकाणाची प्रतिमा तयार करण्यासाठी झाला.

विमान जवळ जात असताना 44 चौ. किमी क्षेत्रफळाचा विस्तार असलेल्या पायाच्या ठशाच्या आकाराच्या बेटावर नारळाची झाडं आणि घनदाट झाडी दिसत होती. या हिरवाई मध्ये पांढऱ्या रंगाच्या लष्करी इमारती किंवा बांधकामं दिसत होती.

हिंदी महासागरातील 60 बेटांचा समूह असलेल्या चागोस आर्किपेलागो किंवा ब्रिटिश इंडियन ओशन टेरिटरी (Biot)मधील दिएगो गार्सिया हे एक बेट आहे.

1965 साली ब्रिटिशांनी या द्विपसमूहाला मॉरिशसपासून वेगळं केलं आणि तिथे वसाहत तयार केली होती. पूर्व आफ्रिका आणि इंडोनेशिया यांच्या मधोमध हे बेट येतं.

राखाडी रंगाच्या लष्करी विमानाच्या बाजूनं धावपट्टीवर उतरताना तिथे एका हँगरवरील (विमानांना संरक्षण पुरवणारं बांधकाम किंवा छत) एक चिन्ह तुमचं स्वागत करते. त्यावर अमेरिकन आणि ब्रिटिश राष्ट्रध्वजांच्या वरच्या बाजूला लिहिलं होतं "Diego Garcia. Footprint of Freedom"(दिएगो गार्सिया. स्वातंत्र्याचा ठसा).

बेटावर असलेल्या स्वातंत्र्याच्या संदर्भातील अनेक प्रतिकांपैकी ते पहिलं होतं. 1970 च्या दशकाच्या सुरूवातीपासून युके-अमेरिकेचा हा लष्करी तळ इथं आहे. साहजिकच युके आणि अमेरिकेच्या नौदलाचं इथं अस्तित्व आहे.

दिएगो गार्सिया वरील परिस्थिती, अमेरिकेचा प्रभाव

हे बेट अमेरिकेला भाडेकरारावर देण्यासाठीच्या करारावर 1966 मध्ये सह्या झाल्या. सुरूवातीला ते फक्त 50 वर्षांसाठीच दिलं गेलं होतं. त्यात आणखी 20 वर्षांची मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता होती. करारासंदर्भात बदल झाला आणि आता तो 2036 पर्यंत असणार आहे.

विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेतून आणि त्याच्यापलीकडे मी जात असताना, अमेरिका आणि युकेमधील वर्चस्वाची चढाओढ दिसत होती.

विमानतळाच्या टर्मिनलवरील एका दरवाजावर ब्रिटिशांचा युनियन जॅक रंगवलेला आहे आणि भिंतीवर विन्स्टन चर्चिलसह इतर महत्त्वाच्या ब्रिटिश लोकांचे फोटो टांगलेले आहेत.

बेटांवर मला ब्रिटिश पोलिसांच्या कार दिसल्या. ब्रिट क्लब नावाचा एक नाईटक्लब दिसला, त्यावर बुलडॉगचा लोगो होता. त्यानंतर आम्ही ब्रिटानिया वे आणि चर्चिल रोड या रस्त्यांवरून पुढे गेलो.

इथल्या कार अमेरिकेप्रमाणे उजव्या बाजूला चालवतात. अमेरिकेत स्कूल बस असतात तशा चमकदार पिवळ्या रंगाच्या बसमधून आम्हाला नेण्यात आलं.

अमेरिकन डॉलर हेच दिएगो गार्सिया बेटावरील चलन आहे. तिथले वीजेचे सॉकेस्टस अमेरिकन आहेत.

आम्हाला पाच दिवस जे अन्न देण्यात आलं त्यात टॅटर टॉट्स आणि ब्रिटिश स्कोन्सप्रमाणे असणाऱ्या अमेरिकन बिस्किटचा समावेश होता.

टॅटर टोट्स हे किसलेले आणि तळलेले छोट्या आकारातील गोलाकार बटाटे असतात. अनेकदा साइड डिश म्हणून याचा वापर केला जातो.

या बेटाचं प्रशासन जरी लंडनहून चालवलं जात असलं तरी तिथे असणारे बहुतांश कर्मचारी आणि साधनसंपत्ती ही अमेरिकेच्या नियंत्रणाखाली आहे.

दिएगो गार्सियावर प्रवेश मिळवण्यासाठी बीबीसी प्रयत्न करत असताना, युकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित प्रश्न अमेरिकेच्या कर्मचाऱ्यांकडे दिले होते.

या उन्हाळ्यात जेव्हा दिएगो गार्सियावर न्यायालयीन सुनावणी अमेरिकेनं रोखली, तेव्हा युकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं होतं की, तुम्हाला "दिएगो गार्सिया वर प्रवेश देण्याची परवानगी देण्याचे अधिकार" युके कडे नाही.

"अमेरिकेची संरक्षण क्षेत्राशी संबंधित माहिती गोपनीय आहे. त्यांनी आम्हाला दाखवून दिलं की या जागेवर त्यांचं नियंत्रण आहे," असं त्यांनी परराष्ट्र कार्यालयातील सहकाऱ्याला पाठवलेल्या ईमेलमध्ये लिहिलं होतं.

ब्रिटिश इंडियन ओशन टेरिटरी (Biot)च्या प्रभारी आयुक्तानं आम्हाला सांगितलं होतं की, हा भूप्रदेश ब्रिटिश असूनही अमेरिका-युके मध्ये झालेल्या कराराच्या अटींनुसार अमेरिकेनं बांधलेल्या लष्करी तळ किंवा सुविधेच्या कोणत्याही भागात प्रवेश देण्यासाठी "अमेरिकन अधिकाऱ्यांना सक्ती करणं किंवा भाग पाडणं" त्यांना शक्य नाही.

अलीकडच्या वर्षांमध्ये या बेटावरील व्यवस्थेपोटी युकेला लाखो पौंड खर्च करावे लागत आहेत. यातील बराचशा खर्चाचं "स्थलांतरितांसाठीचा खर्च" अशी नोंद केलेली आहे.

जुलै महिन्यात श्रीलंकन तमिळांसंदर्भात बीबीसी आणि युकेच्या परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या संभाषणात इशारा देण्यात आला होता. त्यानुसार, "तेथील खर्च वाढतो आहे आणि ताज्या अंदाजानुसार तिथला वार्षिक खर्च 5 कोटी पौंड असेल," असं म्हटलं होतं.

या बेटावरील वातावरण निवांत आहे. सैनिक आणि कंत्राटदार मोटरसायकलवरून माझ्या मागे येत होते. लोक दुपारच्या वेळेस टेनिस आणि विंडसर्फिंग करत असलेले मला दिसले.

एका सिनेमागृहात एलियन आणि बॉर्डरलँड्स हे चित्रपट सुरू असल्याची जाहिरात दिसत होती. तिथं एक बॉलिंग अॅली आणि गिफ्ट शॉप असलेलं एक संग्रहालयही होतं. पण अर्थात त्याच्या आत मला प्रवेश मिळाला नाही.

जेक्स प्लेस नावाचं एक फास्ट फूड मिळणारं ठिकाण आम्ही ओलांडलं. त्यानंतर आमच्यासमोर समुद्राला लागून असलेला एक निसर्गरम्य परिसर होता.

तिथं लिहिलं होतं, "ये ओल्डी स्विमिंग होल अँड पिकनिक एरिया." त्याचबरोबर दिएगो गार्सिया ब्रॅंडिंग असलेले टी शर्ट्स आणि मग्स या बेटावर विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

मात्र, हे बेट म्हणजे एक संवेदनशील लष्करी तळ असल्याची आठवण सतत करून दिली जाते. पहाटे लष्करी कवायती ऐकू येतात. आमच्या निवासस्थानाजवळ एक कुंपण असलेली इमारत होती, ती लष्कराचं शस्त्रागार आहे.

न्यायालयाच्या हालचालींवर, कारवाईवर अमेरिकन आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांचं बारकाईनं लक्ष असतं.

हे बेट म्हणजे निसर्ग सौंदर्याचा खजिना आहे. हिरव्यागर्द झाडींपासून ते पांढऱ्या समुद्र किनाऱ्यापर्यंत इथे निसर्ग सौंदर्याची उधळण केलेली आहे.

याशिवाय कोकोनट क्रॅब (खेकड्याची विशिष्ट प्रजाती) या जगातील सर्वात मोठ्या स्थलीय आर्थ्रोपॉडचं हे निवासस्थान आहे. इथल्या समुद्रात शार्कचा धोका असल्याचा इशारा लष्कराचे कर्मचारी आणि सैनिक देतात.

ब्रिटिश इंडियन ओशन टेरिटरी (Biot)च्या बेवसाईटवर म्हटलं आहे की, "युके आणि त्याच्या परदेशातील भूभागावरील सर्वात मोठी सागरी जैवविविधता तसंच स्वच्छ समुद्र आणि जगातील सर्वात आरोग्यदायी रिफ सिस्टम दिएगो गार्सियावर असल्याचा अभिमान आहे."

दिएगो गार्सिया चा कटू भूतकाळ

मात्र या बेटाच्या क्रूर भूतकाळाची चिन्हं देखील इथं दिसतात.

चागोस बेटांवर दिएगो गार्सिया सर्वात दक्षिणेला आहे. युकेनं कधीकाळी ब्रिटिशांची वसाहत असलेल्या मॉरिशसकडून चागोस बेटांचा ताबा घेतला. तेव्हा त्यांनी या बेटावर लष्करी तळ तयार करण्यासाठी इथल्या 1,000 हून अधिक लोकांना तातडीनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

मादागास्कर आणि मोझांबिकमधून गुलाम केलेल्या लोकांना ब्रिटिश आणि फ्रेंच राजवटीत नारळाच्या लागवडीवर काम करण्यासाठी आणलं. त्यानंतरच्या शतकांमध्ये या लोकांनी त्यांची स्वत:ची भाषा, संगीत आणि संस्कृती विकसित केली.

बेटाच्या पूर्वेकडे मला पूर्वी लावलेली झाडं पाहायला मिळाली. या भागात इमारतींची दूरवस्था झाली आहे. या भल्या मोठ्या वृक्षलागवडीच्या पुढं एका व्यवस्थापकाच्या घराबाहेर एक पाटी आहे. त्यावर लिहिलं आहे, "धोक्याची असुरक्षित जागा. प्रवेश करू नका. आदेशावरून: ब्रिट प्रतिनिधी."

वृक्षांची लागवड केलेल्या भागात असणाऱ्या चर्चमध्ये फ्रेंच भाषेत खाली लिहिलं होतं, "आपल्या चागोसियन बंधू आणि भगिनींसाठी प्रार्थना करूया."

जंगली गाढव अजूनही या भागात फिरत आहेत. डेव्हिड वाइन हे 'आयलँड ऑफ शेम: द सिक्रेट हिस्ट्री ऑफ द यूएस मिलिटरी बेस ऑन दिएगो गार्सिया' या पुस्तकाचे लेखक आहेत.

ते याचं वर्णन "तिथं एकेकाळी असलेल्या समाजाचे 200 वर्ष जुने अवशेष" असं करतात.

1966 च्या परराष्ट्र कार्यालयातील एका उल्लेखानुसार, "त्यांचा हेतू कायमस्वरुपी अशी जागा मिळवणं ज्यावर त्यांच्या आणि पक्ष्यांच्या शिवाय दुसरं कोणीही (स्थानिकही नाही) राहणार नाही."

एका ब्रिटिश राजनयिक अधिकाऱ्यानं सांगितलं की, "या बेटांवर काही मोजक्या लोकांचं वास्तव्य होतं. त्यात आपण मूळचे कुठले माहिती नसलेले आणि मॉरिशसला जाण्याची इच्छा असलेले यांचा समावेश होता."

आणखी एका सरकारी दस्तावेजात म्हटलं होतं की, या बेटांची निवड "फक्त त्यांचं व्यूहरचनात्मक भौगोलिक स्थान पाहून करण्यात आली नव्हती तर त्याचबरोबर तिथं कोणीही मूळ रहिवासी नव्हते म्हणूनही करण्यात आली होती."

वाइन म्हणतात की "ज्या काळात वसाहतवादाविरुद्धच्या चळवळी सुरू होत होत्या आणि वेगानं वाढत होत्या" त्यावेली या योजना समोर आल्या होत्या. तेव्हा अमेरिकेला जगभरातील लष्करी तळं गमावण्याची चिंता वाटत होती.

तेव्हा ज्या अनेक बेटांचा विचार करण्यात आला होता त्यात दिएगो गार्सिया हे एक होतं. मात्र तुलनेनं कमी लोकसंख्या आणि हिंदी महासागराच्या मध्यभागी असलेलं मोक्याचं स्थान यामुळं लष्करी तळाच्या दृष्टीकोनातून दिएगो गार्सिया बेट पहिल्या पसंतीचे ठरलं, असं ते म्हणाले.

"युकेची दिएगो गार्सियावरील उपस्थिती नाममात्र किंवा माफक स्वरुपाची असली" तरी त्यांच्यासाठी ही अमेरिकेबरोबर घनिष्ठ लष्करी संबंध राखण्याची संधी होती. शिवाय यातून त्यांना आर्थिक लाभही मिळणार होता, असं वाइन यांनी पुढे सांगितलं.

अमेरिकेकडून युके पोलॅरिस आण्विक क्षेपणास्त्रे विकत घेणार होतं. या बेटांच्या संदर्भातील गुप्त व्यवहाराचा भाग म्हणून अमेरिका युकेला या क्षेपणास्त्रांच्या किंमतीवर 1.4 कोटी डॉलर्सची सूट देण्यास तयार झालं होतं.

1967 मध्ये चागोस बेटांवरील सर्व रहिवाशांना तिथून बाहेर काढण्यास सुरूवात झाली. अगदी कुत्र्यांसारख्या पाळीव प्राण्यांनाही पकडून मारण्यात आलं. चागोस बेटांवरील रहिवाशांना मालवाहू जहाजांवरून मॉरिशसला किंवा सेशेल्स बेटांवर नेण्यात आल्याची वर्णनं आहेत.

2002 मध्ये युकेनं काही चागोसियन्सना (चागोस बेटांवरील रहिवासी) नागरिकत्व दिलं आणि त्यातील बरेचजण युकेमध्ये राहण्यास आले.

काही वर्षांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर दिलेल्या साक्षीमध्ये चागोसियन लिसेबी एलिसे म्हणाल्या होत्या की, आर्किपेलगा द्वीप समूहातून हकालपट्टी होण्यापूर्वी तेथील लोक "आनंदी जीवन" जगत होते. त्यांना "कशाचीही कमतरता नव्हती."

त्या पुढे म्हणाल्या की, "एक दिवस बेटावरील प्रशासकानं आम्हाला सांगितलं की, आमचंच बेट आम्हाला सोडावं लागेल. आमची घरं सोडून इथून जावं लागेल. स्वत:चं घर आणि बेट सोडून जावं लागणार असल्यामुळे बेटावरील सर्व रहिवासी अतिशय दु:खी होते."

"मात्र, आमच्यासमोर पर्याय नव्हता. आम्हाला बेट का सोडावं लागणार आहे याचं कोणतंही कारण त्यांनी आम्हाला दिलं नाही. ज्या बेटावर जन्म झाला, त्या बेटांवरून जनावरांसारखं मुळासकट उखडून फेकलेलं कोणालाही आवडणार नाही."

आपल्याच मूळ बेटांवर, जमिनीवर परतण्यासाठी चागोसियन लोकांनी अनेक वर्षे संघर्ष केला आहे.

1968 मध्ये मॉरिशस युकेपासून स्वातंत्र्य मिळाले. चागोस बेटं आमची आहेत अशी मॉरिशसची भूमिका आणि मागणी आहे. इतकंच काय संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वोच्च न्यायालयानं देखील निर्णय दिला आहे की युकेचं या बेटांवरील प्रशासन ही "बेकायदेशीर" गोष्ट आहे आणि ती संपली पाहिजे.

त्या निकालात म्हटलं आहे की, युकेचं वसाहतीकरण संपण्यासाठी चागोस बेटं मॉरिशसच्या ताब्यात दिली पाहिजेत.

कारण बाकीची इतर बेटं किंवा प्रदेशातील ब्रिटिशांच्या वसाहती संपल्या आहेत.

क्लाइव्ह बाल्डविन ह्युमन राईट्स वॉचमध्ये वरिष्ठ कायदा सल्लागार आहेत.

युके आणि अमेरिकेच्या चागोस बेटांसंदर्भातील धोरणाबद्दल ते म्हणतात की, "युके आणि अमेरिकेकडून चागोसियन लोकांचं जबरदस्तीनं करण्यात आलेलं विस्थापन, वंशाच्या आधारे करण्यात आलेला त्यांचा छळ आणि त्यांना मायदेशी परतण्यापासून रोखणं या गोष्टी म्हणजे मानवतेविरुद्ध केलेला गुन्हा आहेत."

"कोणतंही सरकार किंवा राजवटीकडून केले जाणारे हे सर्वात गंभीर गुन्हे आहेत. जोपर्यंत चागोसियन लोकांना त्यांच्या घरी परतण्यास प्रतिबंध केला जातो आहे तोपर्यंत तो सतत सुरू असलेला वसाहतवादी गुन्हा आहे," असं ते पुढे म्हणतात.

युके सरकारनं यापूर्वी म्हटलं आहे की या बेटांवरील त्यांच्या हक्काबद्दल किंवा दाव्याबद्दल त्यांना "कोणतीही शंका" नाही. "1814 पासून सातत्यानं ही बेटं ब्रिटिश सार्वभौमत्वाखाली आहेत."

मात्र 2022 मध्ये या बेटांच्या भवितव्यासंदर्भात मॉरिशसबरोबर वाटाघाटी सुरू करण्यास युके सरकार तयार झालं होतं. त्यावेळेस युकेचे तत्कालीन परराष्ट्र सचिव जेम्स क्लेवर्ली म्हणाले होते की त्यांना "सर्व प्रलंबित विषय सोडवायचे आहेत."

गेल्या महिन्याच्या सुरूवातीला युके सरकारनं असं जाहीर केलं की युकेचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे चीफ ऑफ स्टाफ जोनाथन पॉवेल, ज्यांनी उत्तर आयर्लंडमध्ये गूड फ्रायडे करारा संदर्भात वाटाघाटी करण्यात मध्यवर्ती भूमिका बजावली होती, त्यांची नियुक्ती चागोस बेटांबाबत मॉरिशसची वाटाघाटी करण्यासाठी करण्यात आली आहे.

नवे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांनी आधीच्या सरकारांवर चागोस बेटांसंदर्भातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या विविध संस्थाच्या मतांकडे दुर्लक्ष केल्याची टीका केली होती.

लॅमी म्हणाले की, "युके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे हितसंबंधांचे रक्षण करणाऱ्या समझोत्यापर्यंत पोहोचण्यासाठी युके सरकार प्रयत्न करतं आहे."

त्याचबरोबर डेव्हिड लॅमी यांनी "युके आणि अमेरिकेचा संयुक्त लष्करी तळ दीर्घकालीन, सुरक्षित आणि प्रभावीरित्या कार्यान्वित राहावा याचं संरक्षण करण्यासाठीच्या आवश्यकतेवर भर दिला."

लष्करी तळ म्हणून दिएगो गार्सिया चं महत्त्व

मॅथ्यू सॅव्हिल युकेच्या रुसी या आघाडीच्या संरक्षण क्षेत्राशी निगडीत थिंक टँकचे मिलिटरी सायन्स संचालक आहेत. मॅथ्यू म्हणतात, दिएगो गार्सिया बेटावरील लष्करी तळ "प्रचंड महत्त्वाचा" आहे.

यामागचं कारण देताना त्यांनी सांगितलं की, "या बेटांचं हिंदी महासागरातील भौगोलिक स्थान आणि तिथे असणारं बंदर, साठा आणि हवाईपट्टी या लष्करी सुविधांमुळे हा तळ अत्यंत महत्त्वाचा ठरतो."

दिएगो गार्सिया बेटांपासून युकेचा सर्वात जवळचा तळ जवळपास 3,400 किमी (2,100 मैल) अंतरावर आहे तर अमेरिकेचा सर्वात जवळचा तळ जवळपास 4,800 किमी (3,000 मैल) अंतरावर आहे.

मॅथ्यू सांगतात की, फक्त लष्करी तळ म्हणूनच नव्हे तर दिएगो गार्सिया बेट "अवकाशातील देखरेख आणि अवकाश निरीक्षण करण्यासाठी क्षमता यासाठी देखील महत्त्वाचं आहे."

9/11 च्या अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानवर हल्ला चढवला होता. याला अमेरिकेनं 'वॉर ऑन टेरर' असं म्हटलं होतं.

त्यावेळेस अफगाणिस्तानवर सुरुवातीचे हवाई हल्ले करण्यासाठी अमेरिकेतून उड्डाण भरणाऱ्या अमेरिकेच्या B-2 बॉम्बर विमानांना पुन्हा इंधन भरण्यासाठी दिएगो गार्सिया तून कार्यरत असणाऱ्या टँकर्सचा (कच्चे तेल किंवा इंधन वाहून नेणारी भलीमोठी जहाजं) वापर करण्यात आला होता.

या 'वॉर ऑन टेरर' म्हणजे दहशतवादाविरोधातील युद्धात नंतरच्या काळात अमेरिकेनं थेट दिएगो गार्सिया बेटावरूनही अफगाणिस्तान आणि इराकवर हवाई हल्ले करण्यासाठी लढाऊ विमानं पाठवली होती.

मॅथ्यू सॅव्हिल पुढे सांगतात की, दिएगो गार्सिया बेटावरील लष्करी तळाचं आणखी एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्यं आहे. ते म्हणजे, टॉमहॉक क्षेपणास्त्रांसारख्या शस्त्रास्त्रांचा "पाणबुडीवर पुन्हा साठा करण्यासाठी (रीलोड) जगभरात असलेल्या अत्यंत मर्यादित ठिकाणांपैकी हे एक ठिकाण आहे."

ते पुढे सांगतात की, आकस्मिकरित्या उद्भवणाऱ्या संकटांना किंवा परिस्थितीला तोंड देताना सज्ज राहण्यासाठी अमेरिकेनं दिएगो गार्सिया बेटावर मोठ्या प्रमाणात उपकरणं आणि शस्त्रास्त्रांचा साठा ठेवला आहे.

प्रचंड गुप्तता राखलेला लष्करी तळ

वॉल्टर लॅडविग तृतीय हे लंडनच्या किंग्स कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचे वरिष्ठ प्राध्यापक आहेत. हा तळ, लष्करीदृष्ट्या "अनेक महत्त्वाच्या गोष्टींची पूर्तता करतो", याच्याशी ते सहमत आहे.

मात्र "या ठिकाणी जी गुप्तता पाळली जाते ती आपण इतर ठिकाणी पाहतो त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक आहे, असं दिसतं," असंही त्यांचं मत आहे.

"तिथे कोणालाही प्रवेश देण्याबाबत किंवा तिथल्या प्रवेशावरील नियंत्रणावर प्रचंड लक्ष देण्यात येतं. यावरून सार्वजनिकरित्या आपल्याला तिथल्या सुविधा, उपकरणं, क्षमता आणि युनिट्सची जी माहिती आहे, त्यापलीकडे तिथे अनेक गोष्टी असाव्यात," असं वॉल्टर म्हणतात.

मी या बेटावर असताना, मला एक लाल रंगाचा व्हिजिटर पास नेहमीच घालावा लागायचा. त्याचबरोबर पूर्णवेळ माझ्यावर अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवलं जात होतं. मी जिथे राहत होते त्या जागेवर 24 तास सैनिक तैनात असायचे.

मी जेव्हा तिथून बाहेर पडायचे तेव्हा ते त्याची नोंद ठेवायचे. मी परतल्यावर देखील ते त्या गोष्टीची नोंद ठेवत असत. जाताना आणि येताना माझ्यासोबत देखील सैनिक असायचे.

1980 च्या दशकाच्या मध्यावर ब्रिटिश पत्रकार सायमन विंचेस्टर यांनी बेटाच्या जवळ आपली बोट अडचणीत आली आहे असं भासवलं होतं. साधारण दोन दिवस ते बेटाजवळच्या खाडीत राहिले होते.

त्यानंतर ते दिएगो गार्सिया बेटार पोहोचण्यात यशस्वी झाले होते. मात्र त्यानंतर तेथील सैनिकांनी त्यांना निघून जाण्यास सांगितलं. त्यांना सांगण्यात आलं होतं की, "इथून दूर जा आणि पुन्हा परत येऊ नका."

तिथले ब्रिटिश अधिकारी कठोर असल्याचं आठवत असल्याचं ते म्हणाले होते. पण बेट विलक्षण सुंदर असल्याचंही ते म्हणाले होते.

त्यानंतर दोन दशकांहून अधिक कालावधीनंतर टाइम मासिकाच्या पत्रकारानं तिथे 90 मिनिटे किंवा त्याहून अधिक काळ घालवला होता. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे विमान तिथे इंधन भरण्यासाठी थांबले असताना त्याला ही संधी मिळाली होती.

दिएगो गार्सिया चा गुप्त कारवायांसाठी वापर

दिएगो गार्सिया बेटाच्या वापराबद्दल अनेक अफवा आहेत.

सीआयए ही अमेरिकेची गुप्तहेर संस्था या बेटाचा वापर एक गुप्त ठिकाण म्हणून करते. या तळाचा वापर संशयित दहशतवाद्यांना ठेवण्यासाठी आणि त्यांची चौकशी करण्यासाठी केला जातो, या अफवेचाही त्यात समावेश आहे.

2008 मध्ये युके सरकारनं संशयित दहशतवाद्यांना घेऊन जाणारी विमानं 2002 मध्ये या बेटावर उतरली होती. याला दुजोरा दिला होता.

तत्कालीन परराष्ट्र सचिव डेव्हिड मिलिबँड यांनी संसदेत सांगितलं होतं की, "अटक करून विमानातून नेण्यात येणाऱ्यांपैकी कोणीही विमानातून खाली उतरलं नाही. अमेरिकन सरकारनं आम्हाला आश्वासन दिलं होतं की, दिएगो गार्सियाच्या कोणत्याही बेटावर अमेरिकेतील कोणत्याही आरोपीला अटकेत ठेवण्यात आलेलं नाही."

"अमेरिकेतील तपासांमध्ये अशी कोणतीही माहिती मिळत नाही की, दिएगो गार्सिया किंवा इतर कोणत्याही परदेशातील ठिकाणी किंवा तेव्हापासून युकेच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला अशा गुप्त ठिकाणी ठेवण्यात आलं होतं."

त्याच दिवशी सीआयएचे माजी संचालक मायकल हेडन म्हणाले होते की, या प्रकारे विमानातून दिएगो गार्सियावर काही व्यक्तींना नेण्यात आल्याची माहिती युकेला "चांगल्या भावनेनं, विश्वासानं" देण्यात आली होती. बोलण्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं ते म्हणाले होते.

दिएगो गार्सियावर सीआयएचा गुप्त तळ आहे ही वृत्तं फेटाळताना हेडन म्हणाले होते की, "या व्यक्तींपैकी कोणीही सीआयएच्या अत्यंत महत्त्वाच्या दहशतवादी चौकशी कार्यक्रमाचा कधीही भाग नव्हता."

"यातील एकाला शेवटी ग्वांटानामो मध्ये पाठवण्यात आलं होतं. तर आणखी एकाला त्याच्या मायदेशी परत पाठवण्यात आलं होतं. यापेक्षा अधिक काहीही नाही."

त्यानंतर अनेक वर्षांनी अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री कॉलिन पॉवेल यांचे चीफ ऑफ स्टाफ राहिलेले लॉरेन्स विल्करसन यांनी वाइस न्यूजला सांगितलं होतं की, दिएगो गार्सिया चा वापर 'संशयितांना तात्पुरतं ठेवण्यासाठी आणि वेळोवेळी त्यांची चौकशी करण्यासाठी केला गेला होता', अशी माहिती त्यांना सुत्रांकडून मिळाली होती.

दिएगो गार्सियातील कोणत्याही संवदेनशील किंवा गुप्त अशा लष्करी परिसरात जाण्याची मला परवानगी देण्यात आली नाही.

मी जेव्हा या बेटावरील निवासस्थान सोडलं तेव्हा मला एक ईमेल आला. त्यात माझ्या या वास्तव्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले होते आणि त्याबद्दल माझं मत विचारण्यात आलं होतं.

त्यात म्हटलं होतं की, "प्रत्येक पाहुण्याला इथे उत्तम आणि आरामदायी अनुभव यावा अशी आमची इच्छा आहे."

विमानाद्वारे तिथून बाहेर पडण्यापूर्वी माझ्या पासपोर्टवर तिथल्या कोट ऑफ आर्म्सचा शिक्का मारण्यात आला होता. त्यावरील ब्रीदवाक्य आहे, "इन ट्युटेला नोस्ट्रा लिमुरिया".

त्याचा अर्थ, "लिमुरिया हा आमच्याकडे आहे." याचा संदर्भ हिंदी महासागरातील एका हरवलेल्या पौराणिक खंडाशी आहे.

ज्या बेटाची कायदेशीर स्थिती संशयास्पद आहे, त्याच्यासाठी अस्तित्वात नसलेला खंड योग्य प्रतिक वाटतो आणि चागोसियन लोकांना इथून हद्दपार केल्यानंतर काही लोकांना ते पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

या बेटावरील श्रीलंकन तामिळींना देण्यात आलेल्या वागणुकी संदर्भातील न्यायालयीन खटल्याचा निकाल लवकरच अपेक्षित आहेत आणि योग्य वेळी बीबीसी त्या खटल्याचं वृत्त देईल.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमच प्रकाशन.