You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रोजच्या वापरातील प्लास्टिकच आपल्या आजारांचं कारण ठरतंय का?
- Author, डेव्हिड कॉक्स
- Role, बीबीसी प्रतिनिधी
आपण रोज जे पाणी पितो, जी हवा श्वासात घेतो, त्यातून सूक्ष्म प्लास्टिकचे कण (मायक्रोप्लास्टिक) आपल्या शरीरात जातात.
हे कण इतके सूक्ष्म असतात की, आपल्याला ते दिसतही नाहीत, पण शरीरावर त्यांचे मोठे परिणाम होऊ शकतात, जसं की कर्करोग, दम्याचे झटके यांसारख्या गंभीर आजारांपर्यंत.
संशोधक आता याच प्लास्टिकमुळे होणाऱ्या आजारांवर आणि उपाययोजनांवर काम करत आहेत.
मायक्रोप्लास्टिकचे कण अगदी आपल्या हाडांमध्ये देखील सापडले आहेत. परंतु, याचा आपल्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो? आपल्या शरीरावर हे कसे परिणाम करत आहेत, याबद्दल आतापर्यंत आपल्याला काय माहीत आहे, ते सविस्तर जाणून घेऊया.
लंडनपासून उत्तरेस जेमतेम एक तासाच्या अंतरावर, हर्टफोर्डशायरमधील एका शांत भागात, शेतीवर चालणारे जगातील सर्वात जुने प्रयोग आजही सुरू आहेत.
हाडातही आढळले मायक्रोप्लास्टिक...
व्हिक्टोरियन काळातील जमीनदार आणि पुढे आधुनिक खतांचे जनक ठरलेले जॉन बेनेट लॉस यांनी हे प्रयोग सुरू केले. या प्रयोगांचा उद्देश गहू उत्पादन वाढवण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना तपासून पाहणे हा होता.
परंतु तेव्हा आधुनिक तंत्रज्ञान नव्हतं, त्यामुळे माहिती जमवण्यासाठी एकच मार्ग होता, शेतातून गव्हाचे दाणे, काड्या आणि माती याचे नमुने व्यवस्थित गोळा करून, ते सुकवून बाटल्यांमध्ये साठवणं.
1849 मध्ये जेव्हा हे प्रयोग सुरू झाले, तेव्हा लॉस यांना कल्पनाही नव्हती की, ही परंपरा पुढील 182 वर्षे टिकून राहील आणि एवढा मोठा नमुन्यांचा संग्रह तयार होईल.
आता हे सगळे नमुने हार्पेंडन येथील 'रॉथमस्टेड रिसर्च' या संशोधन केंद्रात जपून ठेवले आहेत. या संग्रहातून गेल्या दोन शतकांमध्ये मानवाच्या कृतीमुळे पृथ्वीवर झालेले अनेक बदल दिसतात.
'रॉथमस्टेड रिसर्च'मध्ये या संग्रहाची जबाबदारी सांभाळणारे अँडी मॅक्डोनाल्ड, ज्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रेमाने त्यांना 'बाटल्यांचे रक्षक' (किपर्स ऑफ द बॉटल्स) असं टोपणनाव दिलं आहे.
ते सांगतात की, 1940 आणि 1950 च्या दशकात गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये आण्विक शस्त्रांच्या चाचण्यांमुळे तयार झालेली किरणोत्सर्गी चिन्हं (रेडिओअॅक्टिव्ह ट्रेसेस) सापडतात. पण या जुन्या मातीच्या बाटल्यांमध्ये आणखी एक चिंताजनक गोष्ट आढळते, ती म्हणजे मायक्रोप्लास्टिकचा पहिला उदय किंवा पहिला थर.
एका प्रसिद्ध अंदाजानुसार, आपण दरवर्षी सुमारे 52,000 मायक्रोप्लास्टिकचे कण गिळू शकतो. या आकड्याला नंतर काही तज्ज्ञांनी पुन्हा तपासण्याची गरज आहे असं म्हटलं असलं, तरी एवढं नक्की की हे कण मोठ्या प्रमाणात आपल्या शरीरात जात आहेत.
हे मायक्रोप्लास्टिक आपण खाण्यापासून, पिण्याच्या पाण्यातून किंवा आपण श्वास घेतो त्या हवेमधूनही शरीरात जातात. त्यामुळे हे कण सर्वत्र पसरले आहेत. ते लाळ, रक्त, थुंकी, आईचे दूध अशा शरीरातील द्रवांमध्ये आणि यकृत, मूत्रपिंडं, प्लीहा, मेंदू आणि अगदी हाडांच्या आतही सापडले आहेत.
इतक्या ठिकाणी मायक्रोप्लास्टिक आढळल्यामुळे एक मोठा प्रश्न समोर येतो. हे प्लास्टिक आपल्या आरोग्यावर नेमकं काय परिणाम करत आहे?
रॉथमस्टेड रिसर्चमध्ये ठेवलेल्या नमुन्यांबाबत अँडी मॅक्डोनाल्ड सांगतात की, प्लास्टिकच्या वापरापूर्वी आणि नंतर यामध्ये स्पष्टपणे फरक दिसतो.
ते म्हणतात, "सामाजिक पातळीवर प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर 1920 च्या आसपास सुरू झाला, आणि 1960 नंतर त्यात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते.
थोडंफार प्लास्टिक हवेमार्फत मातीमध्ये गेलं असेल, आणि ट्रॅक्टरच्या टायर्समधून सुटलेले मायक्रोप्लास्टिक्सही मातीमध्ये मिसळले असेल, अशी कल्पना देखील सहज करता येते."
आज असं मानलं जातं की, सध्या जगभरातील माणसांमध्ये इतकं मायक्रोप्लास्टिक्स खाणं आणि श्वासात घेणं सुरू आहे, जितकं यापूर्वी कधीच झालं नव्हतं.
2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात वैज्ञानिकांनी सांगितलं की, 1990 पासून मायक्रोप्लास्टिक्स सेवनाचं प्रमाण सहा पटीनं वाढलं आहे. विशेषतः अमेरिका, चीन, मध्य पूर्व, उत्तर आफ्रिका आणि स्कँडिनेव्हियात.
मायक्रोप्लास्टिक्स आपल्या आरोग्यावर नेमकं काय परिणाम करतात, हे शोधणं खूप कठीण ठरतं. हे समजून घेण्यासाठी एक पद्धत आहे, जी वैद्यकीय क्षेत्रात 'ह्यूमन चॅलेंज ट्रायल' म्हणून ओळखली जाते.
ही पद्धत सहसा संसर्गजन्य रोगांमध्ये वापरली जाते. यात काही लोक स्वतःहून एखाद्या विषाणू किंवा जीवाणूचा संसर्ग करून घेतात, जेणेकरून वैज्ञानिकांना त्याचा मानवी शरीरावर होणारा परिणाम चांगल्या प्रकारे समजून घेता येईल.
'प्लास्टिकचा चहाचा कप आणि मायक्रोवेव्हमधील अन्न'
म्हणून 2025 च्या सुरुवातीला लंडनमधल्या एका प्रयोगशाळेत आठ धाडसी स्वयंसेवकांनी मायक्रोप्लास्टिक मिसळलेलं पाणी (द्रव) जाणूनबुजून प्यायलं. त्यासाठी त्यांना थोडे पैसेही देण्यात आले.
ही चाचणी 'माइंडेरू फाउंडेशन'ने स्पॉन्सर केली होती. पहिल्यांदाच प्लास्टिकसाठी अशी प्रयोगात्मक चाचणी घेण्यात आली. परंतु अद्याप त्याचे परिणाम जाहीर झालेले नाहीत.
इम्पीरियल कॉलेज लंडनमधील संशोधक आणि चाचणीचे नेतृत्त्व करणाऱ्या स्टेफनी राइट यांच्या मते, आपण दररोज आपल्या शरीरावर नकळत हेच प्रयोग करत असतो.
त्यांनी आणि त्यांच्या टीमने अशाच काही रोजच्या सवयींवर आधारित प्रयोग केले, जसं की प्लास्टिकच्या पिशवीतल्या टी बॅग्ज गरम पाण्यात भिजवणं किंवा प्लास्टिकच्या डब्यात अन्न/पाणी मायक्रोवेव्हमध्ये गरम करणं. नंतर त्या द्रवपदार्थाचं सेवन करून, शरीरावर त्याचा काय परिणाम होतो हे पाहण्याचा प्रयत्न केला.
"प्लास्टिक गरम केल्यावर किंवा गरम पाण्यात भिजवल्यावर त्यातून मायक्रोप्लास्टिक्स बाहेर पडण्याची शक्यता खूप जास्त असते," असं राइट म्हणतात.
"आपण रोज वापरत असलेल्या अनेक प्लास्टिकच्या वस्तूंमधून हे सूक्ष्म कण बाहेर पडतात. त्यामुळे आम्ही अशा काही परिस्थिती निवडल्या आणि पाहिलं की पोटातून हे मायक्रोप्लास्टिक्स शरीरात किती प्रमाणात शोषले जातात आणि रक्तात जातात का?"
हे तपासण्यासाठी राइट यांनी 10 तासांच्या कालावधीत वेगवेगळ्या वेळांना त्या स्वयंसेवकांच्या रक्ताचे नमुने तपासले. यावर्षी उशिरा हे संशोधन प्रसिद्ध होणार आहे.
त्यातून एक कप चहा प्यायल्यावर किंवा मायक्रोवेव्हमधील जेवण खाल्ल्यावर शरीरात किती मायक्रोप्लास्टिक शिरतं, ते रक्तात किती फिरतं आणि त्याचा आकार किती असतो याची ठोस माहिती मिळणार आहे.
राइट यांच्यादृष्टीने, अशी माहिती सामान्य माणसाच्या आरोग्यावर मायक्रोप्लास्टिकचा काय परिणाम होऊ शकतो, हे समजून घेण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल ठरेल.
त्या म्हणतात की, रक्तात पोहोचणाऱ्या मायक्रोप्लास्टिकच्या कणांचा आकार खूप छोटा असतो, असं त्यांना वाटतं. प्राण्यांवर आणि लॅबमध्ये केलेल्या प्रयोगांमधून काही माहिती मिळाली असली, तरीही एका निरोगी व्यक्तीवर मायक्रोप्लास्टिकचा नेमका काय परिणाम होतो, याबाबत अद्याप ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही.
"आपल्या शरीरात किती मायक्रोप्लास्टिक्स पुन्हा शोषले जातात हे जाणून घेणं गरजेचं आहे," असं राइट म्हणतात. "पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे हे कण शरीरात कुठं जातात? ते एकाच ठिकाणी साचून राहतात का? कारण शरीर त्यांना पूर्णपणे तोडू शकत नाही, याची शक्यता फारच कमी आहे.
त्यामुळे शरीरात जळजळ (इन्फ्लमेशन), ऊतींना (टिश्यू) दुखापत किंवा शरीराचं काम बिघडवणारे त्रास होऊ शकतात का, हे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे."
हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, कारण गेल्या वर्षभरात काही अशा संशोधनांचा निकाल समोर आला, ज्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
2024 च्या अखेरीस चीनमधल्या शास्त्रज्ञांना काही रुग्णांच्या हाडं आणि स्नायूंमध्ये मायक्रोप्लास्टिक्स आढळले. या रुग्णांनी कोपर, खांदा किंवा नितंब यांसारख्या सांध्यांवर शस्त्रक्रिया करून घेतले होते.
संशोधकांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, हाडं आणि स्नायूंमध्ये मायक्रोप्लास्टिक असल्याने एखाद्याची व्यायाम करण्याची ताकद कमी होऊ शकते. याशिवाय, इतर संशोधनांमध्येही असं दिसून आलं आहे की, काही विशिष्ट प्रकारचे मायक्रोप्लास्टिक्स हाडं आणि स्नायूंच्या पेशी वाढण्यात अडथळा आणू शकतात.
यानंतर 2024 च्या सुरुवातीला दुसऱ्या एका अभ्यासात इटलीतील शास्त्रज्ञांना काही लोकांच्या गळ्याजवळ असलेल्या मुख्य रक्तवाहिन्यांमध्ये (जे मेंदूकडे रक्त पोहोचवतात) मायक्रोप्लास्टिक आढळून आले.
हे लोक हृदयरोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात होते. शास्त्रज्ञांच्या मते, या मायक्रोप्लास्टिकमुळे आजार अधिक गंभीर होत होता. पुढील तीन वर्षांत, ज्यांच्या शरीरात या रक्तवाहिन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक्स होते, त्यांना स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका किंवा अचानक मृत्यूचा धोका साडेचारपट जास्त होता.
त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये एका नव्या अभ्यासात माणसांच्या मृतदेहांच्या मेंदूत मायक्रोप्लास्टिक्स सापडले. ज्यांना मृत्यूपूर्वी स्मृतिभ्रंश होता, त्यांच्या मेंदूत इतरांच्या तुलनेत दहा पट जास्त प्लास्टिक आढळले.
"आम्हाला मोठा धक्का बसला," असं या अभ्यासाचे नेतृत्व करणारे न्यू मेक्सिको विद्यापीठाचे विषशास्त्राचे(टॉक्सिकॉलॉजी) प्राध्यापक मॅथ्यू कॅम्पेन म्हणाले.
'मायक्रोप्लास्टिक शरीरातील पेशींना हळूहळू देतात त्रास'
मेंदूच्या बाबतीत, संशोधक मॅथ्यू कॅम्पेन यांचं सध्याचं मत आहे की, रक्तात फिरणारे अतिशय लहान प्लास्टिकचे कण मेंदूला लागणाऱ्या फॅट्स (लिपिड्स) सोबत शरीरात प्रवेश करू शकतात. हे फॅट्स मेंदूला ऊर्जा मिळवण्यासाठी लागतात आणि त्याच मार्गाने हे प्लास्टिकही मेंदूपर्यंत पोहोचतात.
कॅम्पेन सांगतात, "मेंदूमध्ये विशेषतः पांढऱ्या भागात (व्हाइट मॅटर) खूप चरबी असते, आणि ती प्लास्टिकसाठी एक आदर्श जागा असते."
ते पुढे म्हणतात, "मेंदूचं स्वच्छता यंत्र (क्लिअरन्स मेकॅनिज्म) फार हळूहळू काम करतं. त्यातच डिमेन्शिया असलेल्या लोकांमध्ये मेंदूचं संरक्षण करणारी भिंत (ब्लड ब्रेन बॅरियर) कमकुवत होते, त्यामुळे प्लास्टिकचं मेंदूपर्यंत जाणं आणखी सोपं होतं."
कॅम्पेन आणि इटालियन संशोधक असं म्हणतात की, डिमेन्शिया किंवा हृदयरोग हे फक्त मायक्रोप्लास्टिकमुळे होत नाहीत. पण हे सूक्ष्म प्लास्टिक शरीरात इतर त्रासांसोबत मिळून हळूहळू वाईट परिणाम करतात. म्हणजेच, हे प्लास्टिक थेट कारण नसून, आजार वाढवण्याचं एक कारण असू शकतं.
ब्रिटनमधील पोर्ट्समाउथ विद्यापीठाच्या पर्यावरण प्रदूषण विषयातील प्राध्यापक फे कुसेरो असं म्हणतात की, आपल्या शरीरात साचणारे मायक्रोप्लास्टिक हे एखाद्या घातक रसायनासारखं (जसं की एस्बेस्टॉस) थेट नुकसान करत नाहीत. परंतु, हे शरीरातल्या पेशींना हळूहळू त्रास देतात आणि आपल्या एकूण आरोग्यावर भार टाकतात. त्यामुळे आजार होण्याची शक्यता जास्त वाढते.
मायक्रोप्लास्टिकचा दीर्घकालीन आजारांशी संबंध जोडणं थोडं कठीण आहे. इतर गोष्टींसारखा, जसं की खूप लाल मांस (रेड मीट) खाणं किंवा सॅच्युरेटेड फॅट यांसारखे ठोस जोखमीचे घटक नसून, मायक्रोप्लास्टिक ही एक खूपच गुंतागुंतीची गोष्ट आहे.
उदाहरणार्थ, बाटलीबंद पाण्याच्या अभ्यासात असं दिसलं की एका लिटर पाण्यात 2,40,000 वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिकचे कण असतात. त्यात सात वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक आढळले. जसं की नायलॉनसारखं पॉलिअमाइड आणि पोलिस्टायरीन.
"प्लास्टिकचे खूप प्रकार आहेत. प्रत्येकाची रचना वेगळी असते आणि ते वेगवेगळ्या प्रकारे तुटून त्याचे छोटे-छोटे तुकडे होतात," असं ऑस्ट्रियातील युनिव्हर्सिटी ऑफ व्हिएन्नामधील फार्मास्युटिकल केमिस्ट्रीच्या असोसिएट प्रोफेसर व्हेरेना पिचलर सांगतात.
"मायक्रोप्लास्टिक हा शब्द खूप साधा आहे. तो या सगळ्याला पूर्णपणे समजावून सांगू शकत नाही."
पिचलर यांच्यासारख्या संशोधकांसाठी आणखी एक अडचण म्हणजे, प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोप्लास्टिक वेगवेगळ्या प्रकारे वागत असतील.
त्या सांगतात की, काही प्लास्टिक कण हे वातावरणातले विषारी घटक आणि जड धातू स्वतःमध्ये शोषून नेतात. काही प्लास्टिकमध्ये वापरलेले रसायनं शरीरातल्या हार्मोन्सच्या क्रियेशी हस्तक्षेप करू शकतात.
नॅनोप्लास्टिक हे मायक्रोप्लास्टिकपेक्षा अधिक सूक्ष्म असतात (एका मायक्रोमीटरपेक्षा लहान). हे इतके लहान असतात की, हे थेट पेशीच्या आतील भागात जाऊन साठू शकतात. त्यामुळे ते शरीराला अधिक हानिकारक असू शकतात.
काही मायक्रोप्लास्टिक कण असेही असतात जे जीवाणूंना औषधांचा परिणाम न होऊ देणाऱ्या 'अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स' जीनसाठी केंद्र बनतात. हे जीन मग जंतूंना, विषाणूंना, बुरशीला किंवा परजीवींना औषधं निष्फळ होण्याची ताकद देतात.
या विषयाचा अभ्यास करण्यासाठी प्रा. कुसेरो अंटार्क्टिकामध्ये एक प्रकल्प चालवत आहेत. तिथं क्रूझ जहाजांमधून समुद्रात सोडलं जाणारं सांडपाणी ते गोळा करत आहेत, आणि यामधून हे जाणून घेत आहेत की कोणत्या प्रकारचे मायक्रोप्लास्टिक असे धोकादायक जीन ठेवतात.
"हे काम अंटार्क्टिकामध्ये करणं विचित्र वाटू शकतं, पण तिथं अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स जीन फारच कमी प्रमाणात आढळतात," असं प्रा. कुसेरो म्हणतात. "म्हणूनच इथं अभ्यास करणं सोपं होतं, कारण इथं इतर गोष्टींचा अडथळा फारसा नसतो."
मानवी विष्ठेत मोठ्याप्रमाणात मायक्रोप्लास्टिक
नेपल्समधील कॅम्पानिया लुईगी व्हॅनव्हिटेली विद्यापीठात अंतर्गत वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक आणि मायक्रोप्लास्टिकचे संशोधक असलेले राफाएल मारफेला असं म्हणतात की, मायक्रोप्लास्टिक आणि नॅनोप्लास्टिक यांमुळे माणसाचं वय लवकर (वृद्धत्व) वाढण्याची शक्यता आहे.
त्यांच्या मते, हे प्लास्टिक शरीरात वेगवेगळ्या प्रकारे नुकसान करत असावं. जसं की, रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता बिघडवणं, शरीरात कायमस्वरूपी सौम्य जळजळ निर्माण करणं आणि काही अवयवांमध्ये पेशींचं वागणं बदलून डीएनएला नुकसान करणारे अणू तयार करणं.
याच प्रकारची प्रतिक्रिया समुद्री पक्ष्यांमध्येही आढळली आहे, ज्यामुळे 'प्लास्टिकोसिस' नावाची स्थिती निर्माण झाली. मारफेला यांना अशीच प्रक्रिया माणसांमध्येही होत असावी, असं वाटतं.
हीच भावना व्हिएन्ना विद्यापीठातील प्राध्यापक पिचलर यांनाही व्यक्त केली. त्या मायक्रोप्लास्टिकच्या विषयाकडे आकृष्ट झाल्या. कारण काही अभ्यासांमध्ये मानवी विष्ठेत मोठ्या प्रमाणात मायक्रोप्लास्टिक आढळून आले होते.
त्यांना वाटतं की हे मायक्रोप्लास्टिक पचनसंस्थेत वाढणाऱ्या कर्करोगाच्या रुग्णसंख्येशी काहीतरी संबंध असू शकतो. त्यांचं नंतरचं संशोधन याच शक्यतेकडे इशारा करतं की, शरीरात साठणारे मायक्रोप्लास्टिक काही प्रमाणात कॅन्सरचा धोका वाढवत असावेत.
पिचलर सांगतात, "अनेक अभ्यासांमधून असं दिसतं की मायक्रोप्लास्टिकमुळे शरीरात सूज (इन्फ्लमेशन) वाढू शकते आणि ही बाब चिंताजनक आहे."
त्यांचं म्हणणं आहे की, जर ही सूज सतत राहिली किंवा प्लास्टिकच्या सतत संपर्कामुळे वाढत गेली, तर त्यामुळे शरीरात ट्यूमर होण्याची शक्यता वाढू शकते, आणि आजाराची तीव्रताही वाढू शकते.
मायक्रोप्लास्टिकचा कॅन्सरमध्ये थेट सहभाग आहे का, हे अजून स्पष्ट झालेलं नसलं, तरी सध्या उपलब्ध असलेले वैज्ञानिक अभ्यास आणि डेटाबेस यात दोघांमधील संबंधाची शक्यता नाकारता येत नाही.
राइट म्हणतात, "आपल्याकडून इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं प्लास्टिक शरीरात जातं की, त्यामुळं एखाद्या विशिष्ट आजाराचा आणि मायक्रोप्लास्टिकचं थेट नातं शोधणं अवघडच नाही, तर खूप खर्चिक आणि अशक्य देखील आहे."
उदाहरण म्हणून त्या सांगतात की, तंबाखूच्या धुरामुळे फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका वाढतो हे स्पष्टपणे दाखवता किंवा सांगता आलं आहे. परंतु, मायक्रोप्लास्टिकबाबत असं सांगणं कठीण आहे, कारण पर्यावरणात असलेले प्लास्टिकचे प्रकार जास्त आहेत.
त्या पुढं सांगतात, "प्रत्येक प्रकारच्या मायक्रोप्लास्टिकचा आजारांशी संबंध आहे का हे तपासायचं ठरवलं, तर शेकडो प्रयोग करावे लागतील. ते सध्या तरी शक्य वाटत नाही."
मारफेला यांना वाटतं की, मायक्रोप्लास्टिकचा धोका समजून घेण्यासाठी सगळ्यात व्यवहार्य मार्ग म्हणजे शरीर किती प्रमाणात मायक्रोप्लास्टिक सहन करू शकतं, त्याची मर्यादा (थ्रेशहोल्ड) शोधणं.
म्हणजेच, कितीपर्यंत प्लास्टिक शरीरात गेलं तर नुकसान होत नाही आणि किती झाल्यावर ते धोकादायक ठरतं, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
त्यांची टीम सध्या यावर काम करत आहे. ते 'व्हॅस्क्युलर ऑर्गनॉइड्स' वापरत आहेत. हे म्हणजे माणसाच्या पेशींपासून तयार केलेल्या रक्तवाहिन्यांसारख्या लहान 3D रचना आहेत, ज्या प्रयोगशाळेत पाळल्या जातात.
या कृत्रिम रक्तवाहिन्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या प्लास्टिक कणांना आणि वेगवेगळ्या मात्रांमध्ये संपर्कात आणून ते त्याचे परिणाम पाहत आहेत.
"अजूनही आमच्याकडे मायक्रोप्लास्टिक किती प्रमाणात शरीरात गेलं तर तोटा होतो, यासाठी नेमकी मर्यादा ठरलेली नाही," असं मारफेला सांगतात.
"परंतु, आता हळूहळू काही नमुने दिसू लागले आहेत. उदाहरणार्थ, प्राण्यांवर केलेल्या अभ्यासांमध्ये असं दिसलं की, जर शरीराच्या वजनानुसार रोज दर किलोमागे 10 ते 100 मायक्रोग्रॅम (म्हणजेच अगदी सूक्ष्म प्रमाणात) मायक्रोप्लास्टिक गेलं, तर शरीरात जळजळ आणि चयापचय प्रक्रियेत (मेटाबॉलिजम) काही बदल होऊ शकतात," असं ते सांगतात.
परंतु, मारफेला सांगतात की हा अभ्यास आत्तापर्यंत फक्त उंदरांवर झाला आहे, आणि त्याचे निष्कर्ष थेट माणसांवर लागू करता येणं कठीण आहे.
यामागचं कारण म्हणजे माणसांची आणि उंदरांच्या शरीराची कार्यपद्धती, पचन, शरीरातून बाहेर टाकण्याची प्रक्रिया आणि प्लास्टिकच्या संपर्काचे मार्ग हे सगळं खूप वेगळं असतं, असंही ते म्हणतात.
हवेतील प्लास्टिकचे सूक्ष्मकण हानिकारक
कुसेरो म्हणतात की, माणसाच्या शरीराची आतून तब्येत कशी आहे यावर मायक्रोप्लास्टिकचा परिणाम किती होईल हे ठरू शकतं. वयस्कर लोक किंवा ज्यांना आधीच काही आजार आहेत, त्यांना याचा धोका जास्त असू शकतो.
संशोधनात असं दिसून आलं आहे की, कर्करोगाच्या रुग्णांनी गिळलेले मायक्रोप्लास्टिक किंवा नॅनोप्लास्टिक हे उपचारांवर परिणाम करू शकतात. हे सूक्ष्म कण शरीरात औषधांच्या क्रियेला अडथळा आणू शकतात. उदा. औषधांच्या घटकांशी चिकटून राहतात आणि औषध गाठी (ट्यूमर) पर्यंत पोहोचणं कमी करतं.
पोर्ट्समाउथ विद्यापीठात प्रो. कुसेरो आणि त्यांचं पथक हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की, काही ठराविक प्रमाणात मायक्रोप्लास्टिक दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांसाठी जसं की दमा (अस्थमा) किंवा इतर श्वासाचे आजार अधिक धोकादायक ठरतात का.
"अस्थमाच्या रुग्णांसाठी हवामानाची गुणवत्ता खूप महत्त्वाची असते. खराब हवा ही अस्थमाचा अटॅक येण्याचं एक मोठं कारण आहे," असं कुसेरो म्हणतात.
"आणि जर हवेतील प्लास्टिकचे सूक्ष्मकण इतर कणांपेक्षा जास्त हानिकारक असतील, तर अशा कणांचा संपर्क कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केलाच पाहिजे."
हे करण्यासाठी, जेव्हा अस्थमाच्या रुग्णांचा त्रास वाढतो, तेव्हा त्यांच्या थुंकीमध्ये (फुफ्फुसातून व श्वसनमार्गातून बाहेर येणाऱ्या चिकट बलगममध्ये (श्लेष्मा)) मायक्रोप्लास्टिक किती प्रमाणात असतात, याचा अभ्यास कुसेरो करत आहेत.
त्या अशा रुग्णांच्या घरी जाऊन घरातील हवेच्या गुणवत्तेचे नमुने घेत आहेत, म्हणजे ते लोक नेमके कोणत्या प्रकारचे प्लास्टिकचे कण श्वासात घेत आहेत हे कळेल. नंतर हेच कण त्यांच्या पेशींवर काय परिणाम करतात, हेही प्रयोगशाळेत तपासत आहेत.
कुसेरो म्हणतात, "जर आपण हे पुरेशा लोकांसोबत करून पाहिलं, तर अस्थमा किंवा दीर्घकाळ चालणाऱ्या श्वासाचा आजार (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज) असलेल्या लोकांमध्ये काही सामान्य गोष्टी लक्षात येऊ शकतात.
मग आपण त्यांच्याशी बोलून त्यांना सांगू शकतो की, त्यांच्या घरात काय आहे आणि काही गोष्टींपासून ते कसं दूर राहू शकतात."
शेवटी, इतर मायक्रोप्लास्टिक संशोधकांप्रमाणेच कुसेरो यांनाही आशा आहे की त्यांच्याकडे पुरेसा डेटा जमा होईल, जेणेकरून त्या प्लास्टिक बनवणाऱ्या कंपन्यांशी बोलू शकतील आणि त्यांना त्यांचे प्लास्टिक सुरक्षित कसे करता येईल याबाबत सूचना देऊ शकतील.
उदाहरणार्थ, काही विशिष्ट प्रकारचं प्लास्टिक अस्थमाचा अटॅक वाढवत आहे असं दिसून येऊ शकतं, किंवा प्लास्टिकमधील काही रसायनं शरीरात जाऊन विषारी परिणाम घडवू शकतात, असं त्या म्हणतात.
"मायक्रोप्लास्टिक घरातल्या हवेतसुद्धा असतात, म्हणजे झोपेत असतानाही थोड्या प्रमाणात हे शरीरात जात असतात," असं कुसेरो सांगतात.
"म्हणूनच आम्हाला हे प्लास्टिक तयार करणाऱ्या कंपन्यांशी बोलायचं आहे. त्यांना काही विशिष्ट प्रकारचं प्लास्टिक बनवणं थांबवता येईल का, हे पाहायचं आहे?
उदाहरणार्थ, जेव्हा श्वसनाच्या आजारासाठी लोक हॉस्पिटलमध्ये जातात, तेव्हा त्यांना जे मास्क आणि ट्यूब दिले जातात, ते प्लास्टिकचे असतात. त्यामुळे असे काही पर्याय शोधता येतील का, जेणेकरून हे प्लास्टिक शरीरात जाणं थांबेल?"
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)