You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
किमान 1000 रुपये गुंतवणूक, दर तिमाहीला व्याज; निवृत्तीनंतर फायद्याची ठरणारी ही योजना काय आहे?
तुम्ही तुमच्या पहिल्या नोकरीपासून रिटायरमेंट प्लानिंग म्हणजे निवृत्तीनंतरची तजवीज करायला हवी, असं गुंतवणूक तज्ज्ञ सांगतात.
पण रिटायर झाल्यानंतरही तुम्ही गुंतवणुकीचे असे काही पर्याय निवडू शकता, ज्यामुळे तुम्हाला नियमित उत्पन्न मिळू शकतं.
यातलाच एक पर्याय - सीनियर सिटीझन्स सेव्हिंग स्कीम अर्थात ज्येष्ठ नागरिक बचत योजना.
ही एक सरकारी गुंतवणूक योजना आहे. यातल्या तरतुदी काय आहेत? कोण गुंतवणूक करू शकतं? फायदा किती आणि धोका किती? जाणून घेऊयात.
कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना आपण त्यातून परतावा किती मिळेल, गुंतवणूक किती सुरक्षित आहे आणि टॅक्स बेनिफिट मिळणार आहे का, हे पाहतो.
निवृत्त झाल्यानंतर बहुतेक गुंतवणूकदारांची जोखीम घ्यायची इच्छा - क्षमता कमी होते. अशावेळी गुंतवणुकीसाठीचे काही सुरक्षित मार्ग शोधले जातात.
यातलाच एक पर्याय - सीनियर सिटीझन्स सेव्हिंग स्कीम (SCSS).
SCSS मध्ये कोण गुंतवणूक करू शकतं?
मग या योजनेमध्ये कोण गुंतवणूक करू शकतं? तर 60 वर्षांवरील कोणीही भारतीय नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतात.
यासोबतच तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करताय त्या कंपनीने दिलेली निवृत्ती योजना स्वीकारत निवृत्त झालेल्या व्यक्तींना, स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) किंवा स्पेशल व्हीआरएसद्वारे निवृत्त झालेल्या 55 वर्षांवरील पण 60 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या व्यक्तींनाही या योजनेत सहभागी होता येतं.
संरक्षण दलांमधून निवृत्त झालेल्या 50 वर्षांवरील अधिकाऱ्यांनाही काही अटींची पूर्तता करत या योजनेत गुंतवणूक करता येते.
तुम्ही वैयक्तिकरित्या तुमच्या जोडीदारासोबत मिळून संयुक्त खाते उघडू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचे फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, जन्मदाखला अशी डॉक्युमेंट्स लागतील.
खातं कुठे उघडता येईल?
कोणत्याही शेड्यूल्ड बँकेत किंवा पोस्ट ऑफिसात या योजनेचं खातं उघडता येईल. खातं उघडल्यापासून पुढची 5 वर्षं याची मुदत असेल आणि त्यानंतर 3 वर्षांसाठी हा कालावधी वाढवता येईल. काही ठराविक कारणांमुळेच हे खातं गुंतवणूकदाराला कालावधीपूर्व - प्रीमॅच्युअर बंद करता येईल.
सिनीयर सिटीझन्स सेव्हिंग स्कीममध्ये किती गुंतवणूक करता येते?
या योजनेत तुम्हाला किमान 1000 रुपये गुंतवावे लागतील. तुम्ही जास्तीत जास्त 30,00,000 रुपये गुंतवता येतील.
या योजनेत गुंतवणूकदाराला दर तिमाहीला व्याज दिलं जातं आणि सरकारकडून दर तिमाहीसाठीचे व्याजदर जाहीर केले जातात.
योजनेत काही करसवलत मिळते का?
सिनीयर सिटीझन्स सेव्हिंग स्कीममधल्या ठेवीवर गुंतवणूकदाराला मिळालेलं व्याज हे करपात्र असतं. पण इन्कम टॅक्सच्या सेक्शन 80 सी अंतर्गत ज्येष्ठ नागरिक रु.1,50,000 पर्यंतचा टॅक्स बेनिफिट घेऊ शकतात.
मुदत पूर्ण होण्याआधीच खातं बंद करता येतं का?
खातं उघडताना भरलेली रक्कम 5 वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर तुम्हाला मिळेल. जर तुम्ही खात्याचा कालावधी 3 वर्षांनी वाढवलात तर ही रक्कम तुम्हाला 8 वर्षांनी मिळेल.
पण 5 वर्षांचा काळ पूर्ण होण्याआधीच हे खातं बंद करता येतं का? तर यासाठी काही अटी घालण्यात आलेल्या आहेत.
म्हणजे खातं उघडल्याला एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जर ते बंद करायचं असेल, तर तुम्ही भरलेल्या रक्कमेवर मिळणारं व्याज कापून घेतलं जाईल आणि उर्वरित रक्कम तुम्हाला परत दिली जाईल.
एक वर्षानंतर पण दोन वर्षं पूर्ण होण्याआधी जर खातं बंद केलं तर मग भरलेल्या रक्कमेच्या 1.5 टक्के पैसे कापले जातील आणि उरलेली रक्कम भरत मिळेल.
या योजनेचं खातं उघडल्याच्या दोन वर्षांनंतर ते बंद करण्यात आलं, तर रक्कमेच्या 1 टक्के पैसे कापून उरलेली ठेव परत मिळेल.
ही योजना किती सुरक्षित आहे?
ज्येष्ठ नागरिक बचत योजना हा सरकारच्या रिटायरमेंट बेनिफिट प्रोग्रामचा भाग आहे. यावरच्या ठेवींवरचं व्याज सरकारकडून ठरवलं जातं आणि भरण्यात आलेले पैसे 100 टक्के सुरक्षित असतात असंही सरकार म्हणतं.
निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळणवण्यासाठीचा एक मार्ग म्हणून याकडे पाहता येईल कारण यामध्ये दर तीन महिन्यांनी गुंतवणूकदाराला व्याज दिलं जातं.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
समजा तुम्ही सिंगल अकाऊंट उघडलंत आणि त्यात 30 लाख भरलेत.
सध्याचा व्याजदर आहे 8.2 टक्के
योजनेचा कालावधी 5 वर्षं
यानुसार तुम्हाला दर तिमाहीला व्याज मिळेल : रु.61,500
दरवर्षी एकूण व्याज मिळेल : रु 2,46,000
5 वर्षांत मिळणारं एकूण व्याज : रु.12,30,000
थोडक्यात पहायचं झालं तर या योजनेची जमेची बाजू म्हणजे तुलनेने अधिक सुरक्षितता. व्याज दर 3 महिन्यांनी मिळत राहतं. इतर अनेक योजनांच्या तुलनेत व्याजदर चांगले असतात, अर्थात काही बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सना सिनीयर सिटीझन्ससाठी यापेक्षा अधिकही दर दिले जातात. या एफडीसाठी कमी-जास्त कालावधी तुम्ही तुमच्या प्राधान्यानुसार निवडू शकता.
योजनेला 5 वर्षांचा लॉक-इन आहे, पण काही रक्कम कापली जाऊन पैसे परत मिळण्याचा पर्याय आहे. दीड लाखांपर्यंतच्या व्याजावर करसवलत मिळत असली, तरी पीपीएफप्रमाणे या योजनेत मिळणारं सगळं व्याज करमुक्त नाही.
(ही फक्त माहिती आहे. गुंतवणुकीचे निर्णय गुंतवणूक सल्लागारांच्या सूचनांनुसार घ्यावेत.)