नाना पाटेकर जेव्हा विजया मेहतांबाबत म्हणाले होते, 'त्यांचे बोट धरून आम्ही चालायला शिकलो'

    • Author, सिद्धनाथ गानू
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

(मराठी नाट्यसृष्टीतील एक मोठं नाव म्हणजे विजया मेहता. अनेक दिग्गजांनी त्यांच्याकडून नाटकाचे धडे घेतले आहेत. त्यामुळे त्यांना चालतं बोलतं विद्यापीठ म्हटलं जातं. आज (4 नोव्हेंबर) विजया मेहता यांचा जन्मदिन! त्यानिमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.)

"अपघात घडतच असतात, पण ते पकडणं हे आपल्या हातात असतं. मी ते पकडले..."

काही व्यक्ती या आपल्या क्षेत्रात शिखर गाठतात, पण शिखरावर एकासाठीच जागा असते. याउलट काहींचा प्रवास हा पाण्याच्या प्रवाहासारखा असतो. इतर अनेक लहान–सहान प्रवाहांना सामावून घेत ते एक विस्तृत रुप धारण करतात आणि पुढे येणाऱ्यांसाठी एक अक्षय्य स्रोत होऊन बसतात.

केवळ मराठीच नाही, तर भारतीय नाट्यसृष्टीला नवीन आयाम देणाऱ्या, आज प्रथितयश असलेल्या अनेक कलाकारांना रंगभूमीवरची धुळाक्षरं गिरवायला शिकवणाऱ्या आणि अभिनेत्री, दिग्दर्शिका, नाट्यप्रशिक्षक अशा अनेक रूपांतून दिसलेल्या विजया मेहता उर्फ 'बाई' यांची गणना दुसऱ्या प्रकारात करता येईल.

विजया मेहता म्हटलं की समोर येते ती खळखळून हसणारी मुद्रा, या चेहऱ्यावरचं हसू अभिनयाखेरीज कधी मावळलंच नसेल असा पाहणाऱ्याचा समज झाला तर नवल नाही. पण विजू जयवंत नंतर विजया खोटे आणि त्यानंतर विजया मेहता- त्यांचं आयुष्य अनेक आव्हानांनी भरलेलं होतं. त्याकडे वळूच, पण सुरुवात विजू जयवंतच्या रंगभूमीवरच्या एन्ट्रीपासून.

विजू जयवंतचं रंगभूमीवर पदार्पण

दत्तात्रेय जयवंत आणि भुराबाईंच्या पोटी बडोद्यात 1934 मध्ये विजयाचा जन्म झाला. भावापेक्षा अनेक वर्षांनी लहान असलेली 'विजू' घरात सगळ्यांची लाडकी 'बेबी'. त्यांचे वडील थिओसॉफिकल सोसायटीत ॲनी बेझंट यांचे सेक्रेटरी. त्या अगदी लहान असताना वडिलांचं निधन झालं.

एकत्र कुटुंबात आई 'बायजी'ने मोठ्या मायेने आणि शिस्तीने वाढवलेल्या विजूतला चिकित्सकपणा तरुण वयातच दिसायला लागला होता. रॉयिस्ट विचारसरणी, स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात गांधीजींची चळवळ, पुढे राष्ट्र सेवा दल अशी वैचारिक मशागत होत त्यांची बैठक पक्की होत होती.

विल्सन कॉलेजात राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र असे विषय घेऊन पदवीचा अभ्यासक्रम सुरू असताना नामांकित समीक्षक वा. ल. कुलकर्णी हे विजया जयवंत यांचे प्राध्यापक.

वाङ्मय मंडळाच्या कुठल्याशा कार्यक्रमात एका उताऱ्याचं चांगलं वाचन केल्यामुळे वा. ल. कुलकर्णी यांनी आपल्या विद्यार्थिनीला नाटकात काम करण्याची सूचना केली.

विजयाबाई ज्या 'अपघातां'बद्दल अनेकदा बोलतात, त्यातलाच हा एक सुरुवातीचा अपघात. भारतीय विद्या भवन, साहित्य संघ असं करत हा प्रवास पुढे बहरत जाणार होता.

अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि 'बाई'

आधी भारतीय विद्या भवन आणि नंतर मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाटकांमधून विजया जयवंत हे नाव झळकू लागलं. लवकरच या अभिनयाला आणखी पैलू पाडणाऱ्या गुरूचं आगमन व्हायचं होतं. ते गुरू होते इब्राहिम अल्काझी.

इब्राहिम अल्काझी हे 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'चे संस्थापक. एक वर्ष अल्काझींकडे प्रशिक्षण घेत असताना मराठी नाटकात काम करायचं नाही, असा त्यांचा दंडक. पण या एका वर्षात एक अभिनेत्री आणि एक दिग्दर्शक म्हणून विजया जयवंतांच्या व्यक्तिमत्वाला पैलू पडत होते. अल्काझींची तालमीची पद्धत, त्यातली शिस्त, या सगळ्याचा प्रभाव विजयाबाईंवर आजतागायत राहिलाय.

अल्काझींकडून एक वर्ष शिकून आल्यानंतर त्यांनी पुन्हा साहित्य संघाच्या नाटकांमध्ये कामं करायला सुरुवात केली. अशातच नाट्यक्षेत्रासंबंधी एका सरकारी शिष्यवृत्तीसाठी त्यांचं नाव सुचवलं गेलं आणि आणखी दोन गुरुंशी त्यांची गाठ पडली.

इंडियन ॲकॅडमी ऑफ ड्रामॅटिक आर्ट्स (IADA) या संस्थेत दोन वर्षांचा नाट्यअभ्यासक्रम त्यांनी अदी मर्झबान आणि दुर्गाबाई खोटे या दोघांकडे सुरू केला. हे दोघे विजू जयवंतांच्या कारकीर्दीत आणि वैयक्तिक आयुष्यातही महत्त्वाची भूमिका बजावणार होते.

आयएडीएच्या पहिल्या वर्षात अभिनयावर भर होता. चेहऱ्याला रंग लागलेल्या आणि प्रेक्षकांची दाद आणि टाळ्या मिळवलेल्या कुणाही व्यक्तीला आपण सतत पडद्यासमोर असावं असं वाटलं, तर त्यात वावगं काही नाही. पण विजू जयवंत हे पात्र केवळ अभिनेत्रीची भूमिका वठवून थांबणारं नव्हतं.

दुसऱ्या वर्षी त्यांनी दिग्दर्शनाकडेही वळावं, असं दुर्गाबाई खोटेंनी त्यांना सुचवलं. या कामात अधिक वेळ खर्चावा लागतो. त्यामुळे घरची परवानगी घेऊन मगच सुरुवात कर, असाही सल्ला दुर्गाबाईंनी 'विजू'ला दिला.

अदी मर्झबान यांनी दिलेला एक धडा विजयाबाईंनी आपल्या 'झिम्मा' या आत्मचरित्रात लिहिलाय, "नाटकाचा प्रयोग लोकांपुढे मांडण्याचं काम नटाचं. नाटकाचा आशय घेऊन तो भरारी घेतो. विंगेत उभं राहून दिग्दर्शक आपल्या नटाची भरारी पाहात असतो. नट-दिग्दर्शकाचं नातं हे असं असतं. ते लक्षात ठेवायचं. म्हणजे तुझे नट रंगमंचावर कळसूत्री बाहुल्यांसारखे वावरणार नाहीत. दिग्दर्शक जितका संवेदनशील तेवढ्या मुक्त आणि उंच भराऱ्या त्याच्या नटांच्या."

या तत्त्वाचा अंगीकार विजया मेहतांच्या शैलीत दिसतो.

दूरदर्शनच्या 'थिएटर डिरेक्टर्स ॲट वर्क' या कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटलं होतं, "प्रयोग हा अभिनेता आणि अभिनेत्रीचा असतो, दिग्दर्शकाचा नाही आणि लेखकाचाही नाही. यासाठी मी एक करते, पात्र आणि अभिनेता यांचा पूर्ण मेळ झाला पाहिजे, यात मी गाईड करू शकते, पण हे प्रत्यक्षात त्यांनाच करायचं असतं."

"मी खूप इम्प्रोव्हायझेशन्स करते, ज्यातून त्यांना हे पात्र चालेल कसं, बोलेल कसं हे कळू शकेल. हे त्यांनाच करावं लागेल, त्याशिवाय तो शोध कसा लागणार?"

विजयाबाई आणि विजय तेंडुलकर या जोडीने अनेक दर्जेदार नाटकं दिली. यातलं पहिलं नाटक होतं कुमारी मातांचा नाजूक विषय हाताळणारं 'श्रीमंत'. राज्य नाट्यस्पर्धेसाठी 21 वर्षांची विजया आपल्यापेक्षा वयाने मोठ्या संचाला दिग्दर्शित करणार होती.

संचातले अनेक जण त्यांना 'विजू' म्हणूनच संबोधायचे. विजय तेंडुलकरांनी मात्र 'विजू' ऐवजी 'बाई' असं आदरार्थी संबोधन वापरलं आणि हे बिरुद कायमचं त्यांच्यासोबत राहिलं.

विजया जयवंत ते विजया खोटे

आयएडीएमध्ये दुर्गा खोटेंकडे विजया जयवंतचं प्रशिक्षण सुरू असतानाच घरून लग्नाचा आग्रह सुरू होताच. एखाद्या व्यक्तीची औपचारिक भेट घेऊन आयुष्य एकत्र घालवण्याचा निर्णय कसा घ्यायचा असा विजयाबाईंना प्रश्न पडला होता. दुर्गा खोटेंनी इथे एक उपाय सुचवला.

त्यांचा मुलगा हरीन याला विजयाने अनौपचारिकपणे भेटावं, दोघांनी मनमोकळेपणानं बोलावं; त्यातून पुढे काही झालं तर ठीक, नाही झालं तरी ठीक.

विजया आणि हरीन यांची मुंबईत भेट झाली, मनमोकळ्या गप्पा झाल्या आणि 'विजया जयवंत'ची 'विजया खोटे' झाली. गुरुबरोबरच दुर्गाबाईंनी सासूचीही जागा घेतली.

टेल्कोमध्ये बड्या हुद्द्यावर असलेल्या हरीन यांच्यासोबत लग्न केल्यानंतर विजया खोटे जमशेटपूरला गेल्या. तिथे असलेल्या मराठी जनांना एकत्र करून त्यांनी नाटकही बसवलं. पण केवळ हौसेखातर काहीतरी करणं त्यांना मानवणारं नव्हतं.

आपण नाट्यवर्तुळ सोडून इथे काय करतोय, हा प्रश्न विजयाबाईंना सतत सलत होता. 'झिम्मा' मध्ये विजयाबाईंनी याबाबत सविस्तर वर्णन केलंय.

जमशेटपुरात मन रमत नाही आणि तब्येत खालावते हे लक्षात आल्यानंतर पती हरीन आणि सासू दुर्गाबाईंनी त्यांच्या मुंबईच्या परतीची तयारी सुरू केली. चार महिन्यांच्या गरोदर असलेल्या विजयाबाईंनी मुंबईत परतताच टागोर महोत्सव आणि इतर नाटकांची तयारी सुरू केली. 'रंगायन'पर्वाची ही पायाभरणी होती.

नाट्यनिर्मितीचा 'रेनेसॉ' – रंगायन

कुठेतरी एकत्र काम करणाऱ्या समविचारी मंडळींनी 'आपण एकत्रितपणे काहीतरी उभं केलं पाहिजे' असं म्हणणं ही गोष्ट तशी फारच 'क्लिशे'.

मराठी नाट्यवर्तुळातही या चर्चा अनेकदा झडत आल्या आहेत. पण एकत्र येऊन काही उभं करायचं तर त्यामागची वैचारिक बैठक स्पष्ट असली पाहिजे असा बाईंचा आग्रह.

1960 साली 'रंगायन' ची औपचारिक स्थापना झाली. संपादक आणि समीक्षक श्री. पु. भागवत यांनी अध्यक्षपद स्वीकारलं. मुंबईतल्या ज्या भुलाभाई इन्स्टिट्यूटमध्ये तरुणपणीची 'विजू' नाटकाचे धडे गिरवत होती, तिथूनच आता विजया खोटे एका नाट्यसंस्थेची सुरुवात करत होत्या. प्रयोगशीलता, नाविन्य आणि सामाजिक बांधिलकी ही मूल्यं रंगायनसाठी महत्त्वाची होती.

'रंगायन'ची वेगवेगळी वलयं, प्रत्येक वलयाकडे वेगवेगळी जबाबदारी. सर्वांत मोठं वलय एक हजार सभासद प्रेक्षकांचं. वार्षिक 10 रुपये वर्गणी देऊन झालेले सभासद. वर्षात कमीत कमी सहा ते आठ कार्यक्रम, याची रुपरेषा आखून, त्याबरहुकुम पार पाडण्याची जबाबदारी वेगवेगळ्या वर्तुळातल्या लोकांवर. प्रत्येक सभासदाच्या मताला, सूचनांना समान मूल्य असावं ही मूळ धारणा.

मराठी नाट्यसृष्टीतल्या या काळाला बाई 'रेनेसॉ' म्हणजे पुनरुज्जीवनाचा काळ मानतात आणि त्याबद्दल अनेकदा भरभरून बोलतात.

रंगायनने केलेल्या नाटकांमध्ये केवळ विषयाचंच नाही तर शैली आणि प्रयोगातही वैविध्य होतं. 1970 पर्यंत रंगायन सुरू होती. 1970 मध्ये संस्थेच्या सभासदांमध्ये टोकाचे मतभेद झाले आणि संस्था फुटली. 1972 साली रंगायन औपचारिकपणे बंद झाली. अनेक वर्षांनंतर एका मुलाखतीत रंगायनबद्दल बोलताना विजया मेहतांनी म्हटलं होतं, "ज्यात जीव आहे, स्पंदन आहे, जी संस्था नाही चळवळ आहे तिचा जन्म होतो, शिखर गाठते आणि ती लयाला जाते. म्हणूनच रंगायनने जसं आपलं उद्दिष्ट साध्य केलं ती लयाला गेली."

वैयक्तिक आयुष्यातल्या अत्यंत संवेदनशील टप्प्यावर रंगायनचं प्रकरण संपत होतं, पण हा अनुभव पुढे जाऊन त्यांना आणखी काही ठिकाणी कामी येणार होता.

विजया खोटे ते विजया मेहता

हरीन खोटे यांच्याबरोबर संसार थाटून पाच वर्षंही झाली नसतील, अशात हरीन यांचा वयाच्या छत्तीसाव्या वर्षी अकस्मात मृत्यू झाला. पदरात दोन लहान मुलं असताना विजयाबाईंना वैधव्य आलं. पतीचं जग सोडणं आणि आपल्या हाताने उभ्या केलेल्या संस्थेचा लय अशा दोन्ही गोष्टी पाठोपाठ घडत होत्या.

या सगळ्यातून मार्ग काढताना 'अ टच ऑफ ब्राईटनेस' नावाच्या इंग्रजी नाटकाचा प्रस्ताव त्यांच्याकडे आला. हे नाटक लंडनच्या नाट्यमहोत्सवात व्हायचं होतं. काहीतरी नवीन शिकायला मिळेल म्हणून विजयाबाईंनी हे नाटक स्वीकारलं.

याच्या तालमींच्या वेळी त्यांची भेट झाली फरोख मेहतांशी. वेश्यावस्तीतल्या कथानकावर बेतलेलं हे नाटक लंडनला जाऊ शकलं नाही. हा भारतीय संस्कृतीचा घोर अपमान आहे, असं म्हणत महाराष्ट्र सरकारने सर्व कलाकारांचे पासपोर्ट रद्द करण्याचं फर्मान काढल्याचं विजयाबाई 'झिम्मा'मध्ये लिहितात.

एक दार बंद झालं होतं, पण फरोख यांची ओळख या कृष्णमेघाची चंदेरी किनार होती. 'कॅडबरी' कंपनीत मोठ्या पदावर काम करणाऱ्या फरोख यांना मुलांचा लळा.

विजयाबाईंच्या दोन्ही मुलांशी त्यांचा स्नेह जुळला आणि हळूहळू मुलांनी त्यांना आपल्या वडिलांची जागा दिली आणि विजया खोटेंच्या विजया मेहता झाल्या.

कामानिमित्ताने फरोख यांना दोन वर्षांसाठी सहपरिवार लंडनला जाण्याचा योग आला. आंतरराष्ट्रीय नाटकांशी परिचय आणि प्रयोगाचं विजया मेहतांचं स्वप्न अशाप्रकारे सत्यात उतरत होतं.

आंतरराष्ट्रीय नाट्यानुभव आणि NCPA

इंग्लंडमध्ये त्यांची नवीन नाटकारांशी आणि नाटकांच्या नव्या शैलींशी ओळख झाली. मुंबईत असताना पाश्चात्य शैलींचा वापर करून मराठी नाटकात त्या नवे प्रयोग करत होत्या. पण लंडनमध्ये त्यांना त्यांची भारतीय ओळख नव्याने उमगली. ऑल्फ्रेड जेरी यांचं उबू रुआ हे नाटक भारतीय नाट्यशैलीत बसवण्याची असाईनमेंट त्यांना मिळाली. त्यांनी हे नाटक थेट तमाशाच्या शैलीत बसवलं.

ब्रेश्त या जर्मन नाटककाराचं 'देवाजीने करुणा केली' हे भाषांतरित नाटक बाईंनी एके काळी बसवलं होतं. पण तो प्रयोग जमला नसल्याचं त्यांचं मत होतं. त्यांची गाठ जेव्हा फ्रिट्झ बेनेव्हिट्झशी पडली तेव्हा ब्रेश्तची शैली मराठी रंगभूमीवर आणण्याचा दुसरा प्रयोग सुरू झाला. 'कॉकेशियन चॉक सर्कल' या जर्मन नाटकाचा चिं. त्र्यं. खानोलकर यांनी अनुवाद करून 'अजब न्याय वर्तुळाचा' जन्माला आलं.

1973 साली भारत आणि पूर्व जर्मनी म्हणजे जर्मन डेमोक्रॅटिक रिपब्लिक या दोन देशांमधल्या सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या कराराअंतर्गत या नाटकाचे जर्मनी आणि भारतात प्रयोग झाले. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रसंग.

जर्मनीतल्या पंधरा – सोळा प्रयोगांमध्ये तिथल्या प्रेक्षकांनी हे नाटक अक्षरशः डोक्यावर घेतलं. भास्कर चंदावरकर यांची संगीत योजना या नाटकात होती. वायमार इथे झालेल्या प्रयोगानंतरचा 'कर्टन कॉल' 15 मिनिटं चालला, अशी आठवण खुद्द विजयाबाईंनी सांगितली आहे. (रंगभूमीवरील प्रयोग संपल्यानंतर सर्व कलाकार पुन्हा स्टेजवर येऊन रसिकांना अभिवादन करतात आणि रसिक त्यांना दाद देतात याला कर्टन कॉल म्हटले जाते.)

1973 पासून त्या व्यावसायिक किंवा त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर 'लोकमान्य' रंगभूमीकडे वळल्या. मला उत्तर हवंय, जास्वंदी, अखेरचा सवाल, हमीदाबाईची कोठी अशी त्यांनी रंगभूमीवर आणलेली अनेक नाटकं गाजली.

यादरम्यान त्यांनी अनेक परदेश दौरेही केले. कालिदासाच्या 'शाकुंतल'चे जर्मन भाषेत, जर्मन कलाकारांसह प्रयोग झाले आणि तिथे हे नाटक डोक्यावर घेतलं गेलं. याखेरीज मुद्राराक्षस, हयवदन, नागमंडल अशी नाटकंही जर्मन रंगभूमीवर अवतरली. केवळ जर्मनीच नव्हे तर पोलंड, इंग्लंडमध्येही या नाटकांचे दौरे झाले.

1986 साली त्यांनी मराठी नाट्यपरिषदेचं अध्यक्षपद भूषवलं. 1988 ते 1992 हा चार वर्षांचा काळ राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या संचालक म्हणून काम केलं. 1993 साली मुंबईतल्या NCPA म्हणजे राष्ट्रीय संगीत नृत्य-नाट्य केंद्राची संचालकपदाची जबाबदारी उचलली.

विजया मेहता म्हटलं की चटकन नाट्यरंगभूमी डोळ्यापुढे येते. त्यांचं प्रमुख काम हे नाटकांसंबंधी असलं तरी इतर माध्यमांमध्येही त्यांनी तितकंच मोलाचं काम करून ठेवलं. हयवदन, शांकुतल, हवेली बुलंद थी, हमीदाबाई की कोठी या टेलिफिल्म्स केल्या. स्मृतिचित्रे, रावसाहेब, पेस्तनजी हे चित्रपट दिग्दर्शित केले.

बॅरिस्टर नाटकावर बेतलेला 'रावसाहेब' चित्रपटगृहात कधीच आला नाही पण त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. बॅरिस्टर नाटकात विक्रम गोखलेंनी भूमिका केली होती. ते खरंतर बाईंची पहिली पसंती नव्हते.

त्यांच्या अभिनयाच्या आणि दिग्दर्शनाच्या शैलीबद्दल बोलताना लोकसत्ताच्या 'आयडिया एक्सचेंज' कार्यक्रमात विक्रम गोखलेंनी जास्वंदी नाटकादरम्यानचा अनुभव सांगितला होता, "माझा प्रवेश नसायचा तेव्हा मी विंगेत उभं राहून बाई प्रत्येक वाक्याला काय करतात, त्यांच्याकडे वाक्य नाही तेव्हा काय करतात हे पाहायचो. त्या घडणाऱ्या गोष्टी कशा ऐकतायत, त्यावर कशी प्रतिक्रिया देतायत आणि मग कसा अभिनय करतायत हे मी शिकलो. त्यांनी कधीही खुर्चीतून उठून मी हे असं करून दाखवते, असं कर असं जगातल्या कुठल्याही विद्यार्थ्याला सांगितलं नाही."

स्मृतिचित्रेला उत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार, पेस्तनजी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार असे अनेक सन्मान त्यांना दिले गेले. 1975 साली त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार तसंच पद्मश्रीनेही गौरव केला गेला.

आपल्या आयुष्यात तीन बायकांचं मोठं योगदान आहे, असं त्या आवर्जून सांगतात. आई बायजी, पहिल्या सासू दुर्गाबाई खोटे आणि दुसऱ्या सासू बापाईजी. आई आणि सासूने मुलांचा सांभाळ, घरच्या जबाबदाऱ्या यात सतत मदत केल्याने आपण नाटकात झोकून देऊ शकलो, असं त्या मानतात. आईने शिस्त आणि नीटनेटकेपणा शिकवला. दुर्गाबाईंचे पतीही त्यांची मुलं लहान असताना वारले, पण तरीही न डगमगता त्यांनी काम सुरू ठेवलं.

हरीन खोटेंच्या निधनानंतर त्यांनी सूनेला कामासाठी प्रोत्साहनच दिलं. विजया खोटेंच्या विजया मेहता झाल्यानंतर सुरुवातीला काही काळ दुरावा – अबोला असला तरी पुढे पुन्हा जवळीक झाली.

फरोख मेहतांची आई बापाईजीने बाईंची दोन मुलं आणि धाकटी अनाहिता या सगळ्यांचा वेळोवेळी सांभाळ करत बाईंसाठी आंतरराष्ट्रीय – राष्ट्रीय जबाबदाऱ्या स्वीकारण्याचा मार्ग मोकळा केला. आपल्या यशात या तिघींचं आणि इतरही अनेकांचं असलेलं ऋण विजयाबाई वेळोवेळी न चुकता व्यक्त करतात.

विजया मेहतांना 'नाटकाचं चालतं बोलतं विद्यापीठ' असं अनेकदा म्हटलं जातं. आज कलाक्षेत्रातले अनेक दिग्गज एकेकाळी आपण विजयाबाईंकडे शिकलोय, हे अभिमानाने सांगतात.

2014 साली एका कार्यक्रमात नाना पाटेकरांनी म्हटलं होतं, "आपण नुकतेच उभे राहायला लागतो तेव्हा नेमकं आमच्या मुठीत बाईंचं बोट आलं. तो आधार वाटला, आम्हाला पडू नाही दिलं बाईंनी, बोट खाली वर करत आमचा तोल त्यांनी सांभाळला. पण आम्हाला वाटलं आम्ही चालतोय. पुन्हा दुसरा हात देऊन पांगुळगाडा केला नाही. ज्यावेळी लक्षात आलं ही मुलं छान चालायला लागलीयत, त्यावेळी अलगद बोट काढून घेतलं. पण आमची मूठ तशीच वळलेली होती."

वयाची नव्वदी गाठलेल्या विजयाबाईंची सतत काहीतरी नवीन शोधत राहण्याची भूमिका हे त्यांच्या प्रवासाचं गमक आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर, "मी विद्यार्थिनी आहे, नाटकामधल्या मॅजिकची, नाट्य नाट्य ज्याला लोक म्हणतात ते काय काय पद्धतीनी निर्माण होऊ शकतं. हे आजमावून पाहणं ही माझी मानसिक कसरत आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)