'मुलीला घेऊन एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये फिरत होतो'; दलित मुलीचा बलात्कारानंतर मृत्यू, नातेवाईकांचा रुग्णालयावर आरोप

    • Author, सीटू तिवारी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये दहा वर्षांच्या एका दलित मुलीवर बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे. पाटणामध्ये उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला.

पाटणातल्या पीएमसीएच रुग्णालयाच्या प्रशासनावर उपचारादरम्यान निष्काळजीपणा केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळेच या मुलीचा जीव गेला असं त्यांचं म्हणणं आहे.

मुलीला वाचवण्याचे शक्य ते सगळे प्रयत्न केल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे.

या घटनेनंतर बिहारमधील विरोधी पक्षांनी कायदा आणि सुव्यवस्था आणि रुग्णालय प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. अशी अव्यवस्था असेल तर रुग्णालयाच्या नावाखाली बनवल्या जाणाऱ्या मोठमोठ्या इमारतींचा काय फायदा असं राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते विचारत आहेत.

सत्ताधारी जनता दल युनायडेट (जेडीयू) आणि भारतीय जनता पक्षाने (भाजप) ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं.

या घटनेची दखल राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्ष्या विजया किशोर रहाटकर यांनी बिहारचे मुख्य सचिव आणि पोलिस महानिरीक्षक यांना घटनेची गंभीर आणि निष्पक्ष तपासणी केली जावी याचे निर्देश दिले आहेत.

या घटनेबाबत रुग्णालयातल्या अधिकाऱ्यांची आणि पोलिसांचीही चौकशी करावी असं सांगण्यात आलं आहे.

ओळखीचाच आरोपी

26 मे ला मुज्जफ्फरपूरमध्ये एका दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचं समोर आलं. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी रोहित कुमार सहनी याला अटक केली.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा आरोपी मुलीच्या मावशीच्या घराजवळ राहतो. त्यामुळे तो मुलीला पहिल्यापासून ओळखत होता.

मुलीच्या काकांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "सकाळी 10 वाजता मुलगी तिच्या घराबाहेर खेळत होती. तेव्हा मावशीच्या घरी नेतो असं सांगून रोहित तिला सायकलवर बसवून घेऊन गेला.

पण त्यानं तिला रस्त्यापासून जवळपास 150 मीटर दूर एका शेताजवळ नेलं आणि तिथं तिच्यावर बलात्कार केला. मुलीला मारण्याच्या इराद्यानं त्यानं तिच्या शरीरावर अनेक वार केले."

खूप वेळ झाला तरी मुलगी घरी आली नाही असं लक्षात आलं तेव्हा शोधाशोध सुरू झाली.

त्यांचं म्हणणं आहे, "आम्ही रोहितला पकडलं आणि विचारलं. पण त्यानं काही सांगितलं नाही. आम्ही पोलिसांना फोन केला आणि रोहितला पोलिस ठाण्यात घेऊन गेलो. पण तो काही सांगत नव्हता."

तेव्हाच मुलगी जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेली असल्याचा आम्हाला फोन आला. मुलीला घेऊन ते पहिले स्थानिक रुग्णालयात गेले. तिथून मुजफ्फरपूरच्या एसकेएमसीएच रुग्णालयात जायला सांगितलं."

तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या या मुलीच्या वडिलांचा काही वर्षांपुर्वीच मृत्यू झाला होता. तिची आई मजुरी करून तीन मुलाचं पालनपोषण करत होती.

पोलिसांनी काय सांगितलं?

बीबीसीने या प्रकरणी मुजफ्फरपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विद्या सागर यांच्याशी संवाद साधला.

एसपी विद्या सागर यांनी सांगितलं, "या प्रकरणात दहा दिवसांत आरोपपत्र तयार करून वेगानं ट्रायल व्हावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत. घटनास्थळी मुलीच्या फ्रॉकसह अनेक पुरावे मिळाले आहेत आणि आम्ही वैज्ञानिक पुरावे मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत."

मुजफ्फरपूरच्या श्रीकृष्ण मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये (एसकेएमसीएच) पीकू (पेडियाट्रिक इंटेसिव केयर युनीट) विभागात आयसीयूमध्ये मुलीला भरती करण्यात आलं होतं.

एसकेएमसीएच्या वैद्यकीय अधीक्षक कुमारी विभा बीबीसीशी बोलताना म्हणाल्या, "मुलीसोबत वाईट कृत्य करण्यात आलं आहे. तिच्या गळ्यावर आणि छातीवर जखमा होत्या. छातीवरच्या जखमा तितक्या खोल नव्हत्या. पण गळ्यावरचा घाव अतिशय गंभीर होता. मुलीची परिस्थिती स्थिर झाली होती. तिच्या श्वासनलिकेची रिकन्स्ट्रक्शन सर्जरी करण्याची गरज होती."

श्वासनलिकेच्या सर्जरीची सुविधा एसकेएमसीएचमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे प्रशासनाने पाटणामध्ये एम्सच्या कान-नाक-घसा विभागाशी संपर्क साधला.

कुमारी विभा पुढे सांगतात, "तिथल्या रिकन्स्ट्रक्शन सर्जरी करणाऱ्या डॉक्टर सुट्टीवर होत्या. अशात आम्ही मुलीला 31 मेला पाटण्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये पाठवलं. तिथं ती रात्रभर जिवंत होती."

'आम्हाला पळवून लावत होते'

31 मे ला डॉक्टरांच्या सांगण्यावरून कुटुंबीय मुलीला घेऊन पटनामध्ये पीएमसीएचला घेऊन गेले.

मुलीचे काका बीबीसीशी बोलताना म्हणाले, "आम्ही मुलीला घेऊन एक वाजल्यानंतर पोहोचलो होतो, पण हे लोक आम्हाला चार तास टाळत होते. मुलीला कधी या वॉर्डमध्ये तर कधी त्या वॉर्डमध्ये हलवणं सुरू होतं."

"एसकेएमसीएचमध्ये मुलीला नीट ठेवलं होतं. पण पाटण्यातल्या रुग्णालयातली व्यवस्था अजिबात चांगली नव्हती. माझी मुलगी रात्रभर त्रासात होती. आम्ही बघायला गेलो तर गार्ड आम्हाला पळवून लावत होते. सकाळी पाहिलं तेव्हा तिच्या गळ्यातून आणि तोंडातून रक्त येत होतं आणि माझी मुलगी दगावली."

या प्रकरणाबाबत पीएमसीएच रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आय एस ठाकूर यांच्याशीही बीबीसीने चर्चा केली.

त्यांनी म्हटलं, "31 मेला मी सुट्टीवर होतो. माझ्याजागी डॉ. अभिजीत कुमार काम करत होते. पण रुग्णाची नोंद दुपारी 1 वाजून 23 मिनिटांनी झालेली दिसते आणि 3 वाजून 36 मिनिटांनी तिला स्त्रीरोग विभागात भरती करण्यात आलं होतं."

भरती करण्यात उशीर का झाला असं विचारलं असता ते म्हणाले, "मुजफ्फरनगरमध्ये मुलगी लहान मुलांच्या विभागात भरती असल्याने इथेही पहिल्यांदा तिला शिशुरोग विभागात नेलं गेलं. तिथून डॉक्टरांनी पाहिल्यावर तिला कान, नाक आणि घसा विभागात पाठवलं गेलं.

आमच्याकडे कान-नाक-घसा विभागासाठी आयसीयू नसल्यामुळे तिला स्त्रीरोग विभागाच्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं. प्रत्येक ठिकाणी डॉक्टर तिला पहात होते.

मुलगी ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट सिस्टिम असलेल्या रुग्णवाहिकेमध्ये होती. ते एकप्रकारचं छोटं रुग्णालयच असतं. तिला बेड मिळाला नाही या आरोपात काही तथ्य नाही."

पण पीएमसीएच प्रशासनाला मुलीला तिथं रेफर केल्याची माहिती दिली गेली नव्हती का?

आय एस ठाकूर म्हणतात, "एसकेएमसीएचकडून आमच्याकडे कोणतीही माहिती पोहोचली नाही. मुलीची परिस्थिती अत्यंत नाजूक होती. तिची तब्येत संध्याकाळी 6 वाजून 15 मिनिटांनंतर आणखीनच खालावू लागली. आम्ही रात्रभर प्रयत्न केले. पण मुलगी वाचू शकली नाही."

घटनेबद्दल लोकांमध्ये नाराजी

सोशल मीडियापासून राजकीय गल्लीबोळात राज्यातली कायदे व्यवस्था आणि रुग्णालयात मिळणाऱ्या उपचारांबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

31 मे ला मुलीला भरती करण्यात उशीर झाला तेव्हा काँग्रेसचे कार्यकर्तेही रुग्णालयात आले होते. आरजेडीसह डाव्या विचारसरणीच्या अनेक पक्षांंनी या घटनेवरून सरकारवर टीका केली आहे.

कांँग्रेसचे प्रवक्ते शरवत जहां फातिमा यांनी मुजफ्फरपूरमध्येच या मुलीची भेट घेतली होती.

ते म्हणतात, "एयरलिफ्टच्या माध्यमातून मुलीला मोठ्या रुग्णालयात हलवून तिच्यावर उपचार करण्यात यावेत अशी आमची मागणी होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 आणि 30 मे ला बिहारमध्ये येणार असल्यानं मुलीला हलवण्यात आलं नाही."

भाजपच्या प्रवक्त्या अनामिका सिंह पटेल यांनी सरकारची बाजू मांडताना म्हटलं की, "मुलीचा मृृत्यू होणं दुर्दैवी आहे. पण मी स्वतः एक रुग्णालय चालवते. रुग्णालयात बेड मिळणं ही एक प्रक्रिया आहे ज्यात वेळ लागतो. आमचं सरकार जबाबदारीनं काम करतं."

जेडीयूच्या प्रवक्त्या अंजुम आरा म्हणाल्या, "ही घटना दुर्दैवी आहे. आरोपी अटक झाला आहे. या घटनेची तपासणी केली जात आहे आणि यात दोषी सापडणाऱ्यांवर कायद्याने कारवाई केली जाईल."

आरजेडी पक्षाच्या हँडलवरून एक्सवर बिहारे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला गेला. "भरती होण्यासाठी पीएमसीएचच्या बाहेर मुलीनं कित्येक तास वाट पाहिली. पण संवेदना हरवलेली व्यवस्था जराही हलली नाही. कुर्सी बाबू, चहुबाजूंनी अव्यवस्था, भ्रष्टाचार, दुर्व्यवहार, अभाव आणि संवेदनहिनता पसरली असेल तर रुग्णालयाच्या नावाखाली मोठ्या मोठ्या इमारती बांधण्याचा काय फायदा?"

याआधीही बिहारमधून सरकारी रुग्णालयात चांगली व्यवस्था नसल्याच्या बातम्या आल्या आहेत. अलिकडेच एनएमसीएच या पाटणामधल्या एका सरकारी रुग्णालयात रुग्णाच्या पायाची बोटं उंदरानं कुरतडली होती.

एनएमसीएचमधे झालेली ही पहिली घटना नाही. याआधी नोव्हेंबर 2024 मध्ये एका मृतदेहाचे डोळे गायब झाले होते. ही घटना समोर आल्यानंतरही उंदराने डोळे कुरतडले असंच सांगण्यात आलं होतं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.