'मी आता माझ्या मुलीजवळ मिरची पावडर आणि स्प्रे देऊन ठेवणार आहे'

    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"मी स्वतः बदलापूरमध्ये लहानाची मोठे झाले. मी इथंच शिकले. पण कधीही इतकी भीती वाटली नाही. या घटनेनंतर आता भयंकर काळजी वाटायला लागली आहे. मुलांना शाळेत पाठवायचं की नाही, असा विचार डोक्यात येतो.

"शाळेत मावशी असल्या तरी त्या मुलांना कुठपर्यंत सांभाळतील. हा माणूस वाईट, तो माणूस वाईट, किती वाईट शिकवायचं मुलांना? आता असं वाटतं ऑनलाइन शिक्षणच बरं होतं. निदान आपली मुलं आपल्या डोळ्यासमोर शिकत होती.

"मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटतेय. आजकाल माणसांवर विश्वासच राहिला नाही. मी आता माझ्या मुलीजवळ मिरची पावडर आणि स्प्रे देऊन ठेवणार आहे."

बदलापूरमधल्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडल्यानंतर, बदलापूरमधील एक घाबरलेली आई बीबीसी मराठीशी बोलताना आपल्या मनातली भीती व्यक्त करत होती.

आचल (बदललेलं नाव) यांचं माहेर आणि सासर दोन्ही बदलापूरचं आहे. त्यांचं शिक्षणही बदलापूरमधूनच झालं. आता मुलंही बदलापुरातच शिकतात. त्यांना 12 वर्षांची एक मुलगी आणि 6 वर्षांचा एक मुलगा आहे.

दोन्ही मुलं वेगवेगळ्या शाळेत शिकतात. मुलीची शाळा सुरक्षित आहे. पण मुलाच्या शाळेत सुधारणा करण्याची गरज असल्याचं त्या सांगतात.

बदलापूरमधील नामांकित शाळेत लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानंतर त्यांच्या मनात इतकी भीती निर्माण झालीय की, त्यांनी आपल्या मुलीजवळ त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीतून मिरची पावडर आणि स्प्रे यांसारख्या गोष्टी देणार असल्याचं सांगितलं.

'मुलांना घराखाली खेळायला सोडायचीही भीती वाटते'

फक्त आचलच नाही, तर बदलापूरमधल्या अनेक पालकांच्या मनात ही भीती बसलीय.

बदलापूरमध्येच 12 वर्षांपासून राहणाऱ्या कल्पना (बदललेलं नाव) या सुद्धा त्यांची भीती बोलून दाखवतात.

बीबीसी मराठीसोबत बोलताना कल्पना म्हणाल्या की, "नामांकित आणि जुन्या शाळेत असं घडत असेल, तर आम्हाला भीती वाटणारच ना. आम्ही आमच्या मुलांना शाळेत घेऊन जाऊ, पण एकदा मुलांना शाळेत सोडल्यावर काय?

"आम्ही त्यांना 'गुड टच, बॅड टच' शिकवू. पण शाळेची यंत्रणाच बरोबर नसेल तर आम्ही पालकांनी काय करायचं? कोणतीही आई शाळेच्या गेटपर्यंत जाईल. पण आतमधली जबाबदारी शाळांनी घ्यायला हवी. मुलींना घरी यायला थोडासा उशीर झाला, तर जीव खाली-वर होतो. आपली मुलगी घरी का आली नसेल असं वाटतं. मुलांना घराच्या खाली खेळायला सुद्धा सोडायची भीती वाटते."

'कोवळ्या मनात बसलेली भीती कशी काढायची?'

कल्पना (बदलेलं नाव) यांना दोन मुली आहेत. एक मुलगी 6 वर्षांची असून पहिलीत शिकते, तर दुसरी मुलगी 8 वर्षांची आहे.

माझ्या दोन्ही मुली एकाच शाळेत शिकतात. त्यांच्या शाळेत वॉशरुमच्या बाहेर मावशीबाई असतात. तरीही या मावशीबाई पूर्णवेळ वॉशरुमसमोर असतात की नाही, यासाठी शाळेनं सीसीटीव्ही कॅमेरे लावायला पाहिजे, असं कल्पना यांना वाटतं.

त्या म्हणतात, मुलं किती वेळ वॉशरुममध्ये असतात, त्यांना उशीर झाला तर या मावशीबाईंनी वॉशरुममध्ये जाऊन तपासायला हवं.

आमची मुलं सुरक्षित आहेत याची खात्री शाळांनी आम्हाला द्यायला हवी, अशी मागणी त्या करतात.

शाळेकडेही त्यांनी अशाप्रकारची मागणी केली आहे. शाळा या मागण्या मान्य करेल असं त्यांना वाटतं.

आचल यांनीही यापूर्वीच मुलाच्या शाळेला पत्र लिहून वॉशरुमबाहेर पूर्णवेळ मावशीबाई ठेवण्याची मागणी केली होती. कारण मुलं वॉशरुममध्ये मस्ती करत होते. वॉशरुमचा दरवाजा लावून एकमेकांना कोंडत होते. पण त्यावेळी शाळेनं आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचं त्या सांगतात.

मात्र, आता बदलापूर लैंगिक अत्याचाराची घटना घडताच मागण्या मान्य झाल्याचे मेसेज शाळेकडून प्राप्त झाले आहेत.

याशिवायही शाळांनी आणखी काही गोष्टींचं पालन करायला हवं असं त्या सूचवतात.

त्या म्हणतात, "शिक्षकांच्या जशा मुलाखती घेतल्या जातात, तशाच मुलाखती शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्याही घेतल्या जाव्यात. इतर कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेऊन, ती व्यक्ती लहान मुलांना सांभाळू शकते की नाही, ते लहान मुलांसोबत राहू शकतात की नाही, या गोष्टी शाळांना तपासायला हव्या.

"सीसीटीव्ही कॅमेरे लावले तरी घटना घडल्यानंतर समजेल. पण घटनाच घडू नये म्हणून काहीतरी करायला हवं. नाहीतर असल्या गोष्टी घडल्यानंतर कोवळ्या मनावर झालेले वाईट परिणाम, त्यांच्या मनात बसलेली भीती आम्ही कशी काढायची?"

'मुलीकडे मिरची पावडर, स्प्रे देणार आहे'

बदलापूरमधील लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानंतर पालकांची चिंता आणखी वाढली आहे. त्यांनी जमेल त्या प्रकारे आपल्या मुलांना या घटनेबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केलाय.

आपल्या 12 वर्षाच्या मुलीना कसं समजावून सांगितलं, याबद्दल आचल सांगतात, "मुलीला कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडे जायचं नाही या गोष्टी आधीच सांगितल्या होत्या. पण आता या घटनेनंतर सांगितलं की, तुला कुठला माणूस त्रास देत असेल तर तिथे तू त्याला मारझोड कर, काहीही कर, पण या गोष्टी सहन करू नको. त्यानंतर जे काही होईल ते आम्ही पाहून घेऊ.

"आपली बदनामी होईल याचा विचार करायचा नाही. आता मुलीसोबत मी मिरची पावडर आणि स्प्रे देऊन ठेवणार आहे. ते कसं वापरायचं याचं प्रशिक्षणही तिला देणार आहे. कायद्यानं न्याय मिळायला उशीर होतो. त्यामुळे तिला आता ही शस्त्रं द्यावी लागणार आहेत. तसेच शाळेतही मुलांना प्रशिक्षण देण्याची मागणी आम्ही करणार आहे."

कल्पना सांगत होत्या की, "मम्मा त्या मुलीला शिक्षकाने मारलं. त्यामुळे ती जखमी झाली आणि दवाखान्यात नेलं ना? माझी पहिलीत शिकणारी मुलगी मला हे बोलत होती. मग तिला समजेल त्या भाषेत घटना काय आहे हे समजावून सांगितलं."

याशिवाय कल्पना यांनी त्यांच्या दोन्ही मुलींना समाजवाून सांगितलंय की, आपल्यासोबत असं कुणी वाईट वागल्यास काय करावं.

कल्पना यांनी त्यांच्या मुलींना सांगितलंय की, "असं कोणी केलं तर डोळ्यात बोटं घालून गुप्तांगावर लाथ मारायची आणि मोठमोठ्यानं आरडाओरडा करायचा. पण मुलांना कराटे प्रशिक्षण दिलं, सुरक्षेबद्दल सगळ्या गोष्टी सांगितल्या, तरी समोरच्या मोठ्या व्यक्तीसमोर चिमुकल्या मुलीची ताकद कशी पुरेल?"

ही भीती घेऊनच कल्पना पुढे म्हणतात की, शाळांनी-शिकवणी वर्गांनी आमच्या मुलांच्या सुरक्षेची हमी द्यायला हवी.

फक्त मुलींनाच नाहीतर मुलांनाही संस्कार देण्याची गरज असल्याचं कल्पना म्हणतात.

त्या म्हणतात, "आम्ही मुलींना सांगतो, 'असं वागायचं नाही', 'तसं वागायचं नाही'. तसंच मुलांच्या पालकांनीही त्यांच्या मुलांना संस्कार द्यायला पाहिजे. मुलींची मस्करी करू नकोस, त्यांच्या कपड्यांना हात लावू नकोस, त्यांची वेणी ओढू नकोस, काहीही बोलू नकोस अशा गोष्टी मुलांना लहानपणापासून सांगायला पाहिजे. मुलं घरात व्यवस्थित वागत असतीलही, पण बाहेर गेल्यानंतर मित्रांमध्ये कसे वागतात, याकडेही आई-वडिलांनी लक्ष द्यायला हवं. फक्त मुलींनाच शिकवून गोष्टी बदलणार नाहीत."

मात्र, या सगळ्या गोष्टी मी माझ्या 6 वर्षाच्या मुलाला शिकवत असल्याचं आचल सांगतात.

"कुठल्याही मुलीच्या अंगाला हात लावायचा नाही, मुलीच्या स्कर्टला, कपड्यांना हात लावायचा नाही, तुझ्या मैत्रिणीच्या कपड्यांना कोणी हात लावत असेल तर न घाबरता आरडाओरड करायचा आहे. जिथं आपण एकटं असतो तिथं अशा घटना घडू शकतात. त्यामुळे कुठंही एकटं जायचं नाही," असं समजावत आचल आपल्या मुलाला भविष्यात घडणाऱ्या घटनांपासून कसा बचाव करायचा यासाठी तयार करत आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन)