घशात गोळी अडकून 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; लहान मुलांना औषधं देताना काय काळजी घ्यावी?

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सिराज
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

तापासाठी डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधाची गोळी घशात अडकल्यानं गुदमरून एका 4 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना तमिळनाडूतल्या तिरुवल्लूर जिल्ह्यातल्या तिरुथानी शहरात घडली.

तिरुथानी जवळच्या पी. आर. पल्लीकुपम नावाच्या एका गावात राहणाऱ्या एका जोडप्याच्या 4 वर्षांच्या मुलाला सर्दी-तापाचा त्रास होत होता. त्यावर उपचार करण्यासाठी त्याला सोमवारी (18 ऑगस्ट) सकाळी तिरूथानीतल्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं.

डॉक्टरांनी लहानग्यासाठी काही गोळ्या-औषधं लिहून दिली. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे रात्री झोपताना पालकांनी मुलाला औषधं दिली. त्यात एक गोळीही होती.

मुलानं ती गोळी गिळली तेव्हा ती त्याच्या घशातच अडकली आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. लगेचच त्याला पुन्हा तिरुथानी सरकारी रुग्णालयात भरती केलं गेलं.

मात्र, तिथल्या डॉक्टरांनी त्याची तपासणी करताच त्याचा मृत्यू झाला असल्याचं घोषित केलं. या प्रकरणाची नोंद पोलिसांनीही करून घेतली आहे.

लहान मुलांना औषध, गोळ्या देताना नेमकी कोणती काळजी घ्यायची? हेच प्रौढ, विशेषतः वयस्कर लोकांच्या बाबतीतही होऊ शकतं का?

मुलांना गोळ्या द्याव्यात का?

"एखादी लहान वस्तू किंवा एखाद्या खाद्यपदार्थही 5 वर्षांखालील मुलांच्या घशात अडकू शकतो. त्याने श्वासनलिका दाबली गेली, तर फुप्फुसांना आणि मेंदूला ऑक्सिजन कमी पडू लागतो.

4 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मेंदूला ऑक्सिजन मिळाला नाही, तर त्याने ब्रेन डॅमेज किंवा मृत्यूही होऊ शकतो," अशी माहिती अमेरिकन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स या संस्थेकडून देण्यात आली आहे.

लहान मुलांसाठी लिहून दिलेल्या गोळ्या बहुतेक वेळा पाण्यात विरघळणाऱ्या असतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लहान मुलांसाठी लिहून दिलेल्या गोळ्या बहुतेक वेळा पाण्यात विरघळणाऱ्या असतात.

तर, हार्वर्ड मेडिकल स्कूलने दिलेल्या माहितीनुसार, "गोळी गिळणं हे फक्त लहान मुलांसाठीच नाही, तर काही प्रौढांसाठीही अवघड असतं. त्याने एक तृतियांश लोकांना उलटी, मळमळ आणि श्वास कमी पडणे असे त्रास होतात."

याविषयी बीबीसी तमिळने इरोडमधल्या डॉ. अरुण कुमार या बालरोगतज्ज्ञांशी चर्चा केली. ते म्हणाले की, लहान मुलांना दिली जाणारी अनेक औषधं ही गोळ्यांच्या स्वरुपातच उपलब्ध असतात. त्यासाठी सिरपचा पर्यायही उपलब्ध नसतो. त्यामुळे अनेकदा लहान मुलांना डॉक्टर गोळ्या लिहून देतात.

"पण पालकांनी शक्यतो 6 वर्षांखालील मुलांना औषधांच्या संपूर्ण गोळ्या देणं टाळावं. त्या गोळ्यांची पावडर करून पाण्यात मिसळून देणं जास्त योग्य ठरेल. मुलांसाठी लिहून दिलेल्या गोळ्या बहुतेक वेळा पाण्यात विरघळणाऱ्याच असतात," असं त्यांनी पुढे सांगितलं.

दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने डॉक्टर अनेकदा लहान मुलांसाठी गोळ्या लिहून देतात, असं डॉ. अरूण कुमार सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने डॉक्टर अनेकदा लहान मुलांसाठी गोळ्या लिहून देतात, असं डॉ. अरुण कुमार सांगतात.

गोळ्या द्यायच्याच असतील तर त्या गिळताना सोबत थोडं पाणी प्यायला हवं. पण, डॉ. अरुण सांगतात, "लहान मुलांना ते सहजपणे करता येत नाही. त्यामुळे गोळ्यांची पावडर करूनच त्यांना द्यावी."

"गोळ्या लहान मुलांना कशा द्यायच्या याच्या सूचना डॉक्टरांकडून दिल्या जातातच. पण शेवटी ही जास्तीतजास्त काळजी पालकांनाच घ्यावी लागेल," डॉ. अरुण म्हणाले.

लहान मुलांना गोळ्यांची पावडर करून पाण्यातून दिल्यानं घशात अडकून मृत्यू होण्याचा धोका कमी असतो, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेनंही दिला आहे.

प्रौढांनीही काळजी घ्यायला हवी?

"गोळी गिळताना मोठ्या माणसांनाही त्रास होतो. विशेषतः 65 वर्षांच्या वयस्कर लोकांना. वय वाढेल तसं माणसाला जास्त गोळ्या घ्याव्या लागतात. त्यामुळे घशात गोळी अडकून एखाद्या वयस्कर माणसाचा मृत्यू होण्याचा धोकाही जास्त असतो," असं हार्वर्ड मेडिकल स्कूल या संस्थेच्या वेबसाईटवर लिहिलेल्या एका लेखात म्हटलंय.

मळमळ, उलटी आणि श्वास घ्यायला त्रास होणं अशी लक्षणं जाणवतात म्हणून अनेकदा प्रौढ लोकं गोळ्या घेण्याचंच थांबवतात. त्याने त्यांची तब्येत आणखी खालावते.

प्रत्येकवेळी संपूर्ण गोळी गिळणं गरजेचं नसतं, असं डॉ. अरूण कुमार सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रत्येकवेळी संपूर्ण गोळी गिळणं गरजेचं नसतं, असं डॉ. अरुण कुमार सांगतात.

गोळीचा आकार कसा आहे, ती किती मोठी आहे, तिचा पोत कसा आहे आणि चव कशी आहे यावरूनही ती गिळायला किती अवघड ते ठरतं, असंही हार्वर्डच्या या लेखात पुढे म्हटलंय.

मेटफॉर्मिनसारख्या मधुमेहावर नेहमी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या आकाराच्या गोळ्या गिळायला फार अवघड जातात. पण अमेरिकेतील 1.95 कोटी लोकांना या गोळ्या घ्याव्या लागतात.

"वृद्ध लोकांना गोळ्या देतानाही काळजी घेतली पाहिजे. त्यांना गोळ्या देतानाही पाण्यात विरघळवूनच द्यायला हव्यात.

नेहमी गोळ्या गिळण्याचीच गरज असते असं नाही. कॅप्सुल असल्या तरी त्या तोडून पाण्यात विरघळवता येतात," डॉ. अरुण कुमार सांगतात.

घशात काही अडकलं तर काय करावं?

"घशात काही अडकलं आणि श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर लगेचच 'हेमलिच मेन्यूव्हर' म्हणजे 'श्वासरोध निवारण' हे प्रथमोपचार करायला हवेत," डॉ. अरुण कुमार सांगतात. हे लहान मुलांसोबतच मोठ्या माणसांनाही लागू होतं, असं त्यांनी सांगितलं.

सहसा, एखाद्याच्या घशात काही अडकलं, तर आपण त्याच्या पाठीवर जोरजोराने थोपटायला सुरुवात करतो. पण त्याचा काहीही उपयोग होत नाही, असं एका अभ्यासातूनही समोर आलं आहे. श्वासरोध निवारणाची प्रक्रिया करुनच घशात अडकलेली गोष्ट खाली सरकू शकते.

‘हेमलिच मेन्यूव्हर’ या प्रथोमोपचार पद्धतीचा शोध 1974 मध्ये लागला होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 'हेमलिच मेन्यूव्हर' या प्रथमोपचार पद्धतीचा शोध 1974 मध्ये लागला होता.

1974 साली या प्रक्रियेचा शोध लागला. त्याआधी म्हणजे 1960 पर्यंत अन्न, एखादं खेळणं किंवा एखादी वस्तू घशात अडकल्यानं गुदमरून मृत्यू होणं, हे अमेरिकेतलं अपघाती मृत्यूंमधलं सहावं मोठं कारण होतं.

पण हे प्रथमोपचार एक वर्षाखालील मुलांवर, गुदमरल्यानं शुद्ध हरपलेल्यांवर आणि गरोदर महिलांवर करू नयेत, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

एखाद्याच्या घशात काही अडकलं, तर तो माणूस दोन्ही हातांनी स्वतःचाच गळा धरतो. अशा माणसाला श्वास घेता येत नाही, खोकण्याचा प्रयत्न करूनही खोकता येत नाही किंवा बोलताही येत नाही.

असा माणूस आसपास दिसला तर लगेचच श्वासरोध निवारणाची प्रक्रिया करायला हवी.

गोळीचा आकार कसा आहे, ती किती मोठी आहे, तिचा पोत कसा आहे आणि चव कशी आहे यावरूनही ती गिळायला किती अवघड ते ठरतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गोळीचा आकार कसा आहे, ती किती मोठी आहे, तिचा पोत कसा आहे आणि चव कशी आहे यावरूनही ती गिळायला किती अवघड ते ठरतं.

"यात आपल्याला ज्या माणसाला त्रास होत आहे त्याच्या मागे उभं रहावं लागेल. आपले दोन्ही हात त्या माणसाच्या कमरेभोवती घट्टं पकडावेत. आपल्या दोन्ही हाताची मनगटं त्या माणसाच्या बेंबीच्या वर रेषेत, दोन्ही बरगड्यांच्या मध्ये असायला हवीत.

या स्थितीत आल्यानंतर हाताच्या जोरानं शरीर आतमध्ये आणि वरच्या बाजूला जोरात दाबायला हवं. असं 5 किंवा 6 वेळा करायला लागेल," डॉ. अरुण कुमार म्हणाले.

या नंतरही घशात अडकलेली गोष्ट बाहेर आली नाही, तर वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी तातडीचे प्रयत्न करावेत, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

एक वर्षांपेक्षा लहान मुलाच्या घशात काही अडकलं, तर बाळाला मांडीवर पोट खालच्या बाजूला जाईल अशा पद्धतीने झोपवून त्याच्या पाठीवर थोपटायला हवं.

"हे प्रथोमोपचार कसे करायचे याचं प्रशिक्षण अनेक संस्था देतात. खरंतर सगळ्याच लोकांना ते शिकवायला हवं. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे," अरुण कुमार म्हणाले.

'गोळ्या खायची जबरदस्ती करू नका'

"गोळ्यांची पावडर केली असो वा नसो, गोळ्या खायची जबरदस्ती कधीही मुलांवर करू नका," असं चेन्नईच्या एका खासगी रुग्णालयात वरिष्ठ सल्लागार म्हणून काम करणाऱ्या बालरोगतज्ज्ञ डॉ. रेवती सांगतात.

"त्यानं मूल घाबरून जाईल. अशावेळी त्याच्या घशात गोळी अडकण्याची शक्यता जास्त असते," असं त्या नमूद करतात.

गोळी विरघळवलेलं पाणी मुलांचं नाक दाबून त्यांच्या तोंडात ओतणं हे धोकादायक आहे असं डॉ. रेवती सांगतात.
फोटो कॅप्शन, गोळी विरघळवलेलं पाणी मुलांचं नाक दाबून त्यांच्या तोंडात ओतणं, हे धोकादायक आहे असं डॉ. रेवती सांगतात.

मुलांना शांत करून गोळ्या खाण्याची सवय लावण्याचा सल्ला त्या देतात.

"काही पालक गोळ्या पाण्यात विरघळवतात आणि मुलाचं नाक बंद करून ते पाणी त्याच्या तोंडात ओततात. हे अत्यंत चुकीचं आणि धोकादायक आहे," असं डॉ. रेवती म्हणाल्या.

लहान मुलांच्या श्वासनलिका फार रुंद असतात. त्यामुळे तिथे गोष्टी सहजपणे अडकतात.

"6 वर्षांपेक्षा लहान मूल असेल, तर गोळ्या पाण्यात विरघळूनच द्यायला हव्यात. 6 ते 10 वर्षांचं मूल असेल तर त्याचे तुकडे करून पाणी किंवा दह्यासोबत गोळ्या देता येतील. डॉक्टरांनीही चावता येणाऱ्या गोळ्या लिहून द्याव्यात.

10 वर्षांपेक्षा मोठं मूल असेल, तर त्यांना गोळ्या पाण्यासोबत गिळायला सांगता येऊ शकतं. पण तेव्हाही काळजी घेण्याची गरज आहेच," डॉ. रेवती यांनी नमूद केलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)