बेबी शार्क : युट्युबवर या गाण्याला 16 अब्ज व्ह्यूज कसे मिळाले? यात असं काय आहे?

बेबी शार्क

फोटो स्रोत, Pinkfong/Youtube

    • Author, केली एनजी
    • Role, बीबीसी न्यूज

ज्यांची मुलं अगदी लहान आहेत, अशा पालकांनी 'बेबी शार्क डू...डू... डू...' ऐकलं नाही असं सांगितलं तर ते कुणालाच पटणार नाही. या गाण्याचे किती व्ह्यूज असतील युट्यूबवर? 16 बिलियन. म्हणजेच 16 अब्ज वेळा हे गाणं युट्यूबवर पाहिलं गेलं आहे.

एकदा का हे गाणं कानावर पडलं आणि ते तुम्ही गुणगुणलं नाही असं होऊ शकत नाही.

तर युट्यूबवर सर्वाधिक वेळा पाहिल्या गेलेल्या या गाण्याचा वाद कोर्टात पोहचला होता आणि आता त्याचा निकाल लागला आहे.

डेस्पासिटो, शेप ऑफ यू अशा युट्यूबवर गाजलेल्या अनेक गाण्यांना मागे टाकत लहान मुलांच्या या गाण्याने म्हणजेच बालगीताने युट्यूबवर पहिला क्रमांक पटकावला आणि अद्यापही तो अबाधितच आहे.

या प्रसिद्ध गाण्यावर कॉपीराइट हक्क उल्लंघनाचा आरोप झाला. 6 वर्षांपासून हा वाद सुरू होता त्याचा नुकताच निकाल आहे.

'पिंकफाँग' कंपनीने या गाण्याची निर्मिती केली आहे. या कंपनीने आपले गाणे चोरले असा आरोप एका अमेरिकन संगीतकाराने केला आणि हा वाद कोर्टात गेला.

दक्षिण कोरियाच्या सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की, ज्या संगीतकाराने गाणे चोरीचा आरोप केला आहे, ते सिद्ध होऊ शकलेलं नाही.

परिणामी, बेबी शार्क हे गाणे बनवणाऱ्या पिंकफाँग कंपनीने कॉपीराईट हक्कांचे उल्लंघन केले नाही, असा निर्वाळा कोर्टाने दिला.

हे 'कॅची' गाणे चोरीचे नाही असे दक्षिण कोरियाच्या सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर 6 वर्षं चाललेल्या या न्यायालयीन लढाईला पूर्णविराम मिळाला आहे.

बेबी शार्क

फोटो स्रोत, Getty Images

लोकप्रिय बालगीताच्या अनेक आवृत्त्या

दोन कनिष्ठ न्यायालयांनी दिलेल्या निकालांना दक्षिण कोरियाच्या सुप्रीम कोर्टाने कायम ठेवल्यानंतर 'पिंकफाँग' कंपनीला दिलासा मिळाला.

ज्या गाण्यासाठी हा वाद झाला ते गाणे कसे होते हे आपण पाहू.

'बेबी शार्क' हे गाणे अमेरिकेत बालगीत म्हणून लोकप्रिय आहे. हे एक लोकगीत आहे आणि अनेक वर्षांपासून ते अमेरिकेतील लहान मुलं गातात.

या गाण्याच्या विविध गायकांनी गायलेल्या अनेक आवृत्त्या उपलब्ध आहेत.

पिंकफाँगने तयार केलेल्या गाण्यातील व्यक्तिरेखांच्या प्रतिकृती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पिंकफाँगचा ब्रँड लोगो आणि त्यांच्या गाण्यातील व्यक्तिरेखांच्या प्रतिकृती

जोनाथन राइट या अमेरिकन संगीतकाराने त्यांचे 'बेबी शार्क' गाणे 2011 मध्ये रिलीज केले होते. तर 'पिंकफाँग'चे बेबी शार्क गाणे 2016 मध्ये रिलीज झाले.

या गाण्यावर आपला हक्क आहे असे सांगताना जोनाथन राइट यांनी म्हटले की या 'चालीची व्याख्या करण्याचा अधिकार माझ्याकडे अबाधित आहे.'

पण पिंकफाँगने त्याच्या प्रत्युत्तरात म्हटले की त्यांचे गाणे लोकगीताच्याच मूळ चालीवर आहे. हे लोकगीत सार्वजनिक व्यासपीठांवर, जनमानसांत आधीपासूनच उपलब्ध असल्या कारणाने हे कॉपीराइट हक्काचे उल्लंघन ठरत नाही.

कोर्टाने हा निर्णय दिला की राइट यांच्या चालीत आणि मूळ लोकगीतामध्ये एवढा बदल झालेला नाही की सदर कलाकृती ही जोनाथन राइट यांची मानण्यात येईल. त्यामुळे या राइट यांच्या गीताला स्वतंत्र कलाकृती मानता येणार नाही. याचाच अर्थ ते कॉपीराइट कायद्याच्या अंतर्गत जोनाथन राइट यांचे गीत मानता येणार नाही, असे कोर्टाने म्हटले.

'जगात युट्यूबवर सर्वाधिक व्ह्यूज असलेले गाणे'

पिंकफाँगच्या बेबी शार्कच्या लोकप्रियतेबद्दल वेगळं काही सांगण्याची गरज नाही. कारण युट्यूबर हे गाणे जेव्हापासून आले तेव्हापासून ते जगभरातील बाळ-गोपाळांमध्ये आवडीचे बनलेले आहे.

पिंकफाँगच्या या गाण्यात गोंडस मुलं नाचतात आणि गातात. हे गाणे जेव्हा लहान मुलं स्क्रीनवर पाहतात तेव्हा ते देखील आनंदाने नाचतात. नोव्हेंबर 2020मध्ये म्हणजेच कोरोनाच्या काळात हे गाणे लोकप्रिय बनले आणि त्यानंतर लगेच वर्षभराच्या काळातच युट्यूबवर या गाण्याचे 10 अब्ज व्ह्यूज आले. आता सध्या या गाण्याचे व्ह्यूज 16 अब्ज आहेत.

सेऊलच्या मॉलबाहेर बेबी शार्क गाण्यातील व्यक्तिरेखेची प्रतिकृती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सेऊलच्या मॉलबाहेर बेबी शार्क गाण्यातील व्यक्तिरेखेची प्रतिकृती

'बेबी शार्क'चा उगम नेमका कधीचा आहे याबद्दल विविध मतप्रवाह आहेत.

असं म्हटलं जातं की 1970 मध्ये अमेरिकेत हे गाणं उदयासला आलं आणि लहान मुलांसाठी असलेल्या उन्हाळी शिबिरांमध्ये ते लोकप्रिय बनलं.

एक मतप्रवाह असा देखील आहे की स्टिवन स्पिलबर्ग यांचा 'Jaws' नावाचा चित्रपट 1975 मध्ये आला होता. हा चित्रपट शार्कवर आधारित होता आणि जगभरात तिकिटबारीवर याने प्रचंड धुमाकूळ घातला होता. त्याच वेळी हे गाणे आले होते.

सध्या इंटरनेटवर या गाण्याच्या विविध आवृत्त्या उपलब्ध आहेत, पण ज्या प्रकारे 'पिंकफाँग'ने हे गाणे म्हणजे एक आनंदोत्सवच बनवले तसं आधी पाहायला मिळाले नव्हते.

आधीच्या काही आवृत्ती भीतिदायकही होत्या. एका आवृत्तीमध्ये तर सर्फिंग करणाऱ्याचा हातच शार्क खाऊन टाकल्याचे पाहायला मिळते तर एका गाण्यातला नायकच मरतो. पण पिंकफाँगचे गाणे हे अगदी लहानातला लहान मूल देखील आरामशीर पाहू शकते.

'जोनाथन राइट यांना का वाटले पिंकफाँगला कोर्टात खेचावे'

जोनाथन राइट, ज्याचे स्टेज नेम जॉनी ओन्ली आहे; त्याने या गाण्याची लहान मुलांना पाहता येण्यासारखी आवृत्ती 2011 मध्ये युट्यूबवर टाकली होती.

त्यात असे म्हटले आहे 'बेबी शार्क साँग नॉन डिसमेंबरमेंट व्हर्जन'. म्हणजे कुणाचा हात-पाय यात तुटत नाही.

जोनाथन यांच्या गाण्यात काही किशोरवयीन मुलं स्विमिंग पूलवर नाचत 'बेबी शार्क' हे गाणे गात आहेत. या गाण्यात स्वतः 'जॉनी ओन्ली' म्हणजेच जोनाथन राइट देखील आहे.

राइटने म्हटले की सुरुवातीला त्यांना वाटले की हे गाणे लोकगीत आहे आणि सार्वजनिक व्यासपीठांवर उपलब्ध असल्यामुळे 'पिंकफाँग' हे गाणे वापरू शकते.

पिंकफाँग कंपनीचे खेळणीचे स्टोअर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पिंकफाँग कंपनीचे खेळणीचे स्टोअर
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मग, पिंकफाँग या कंपनीला कोर्टात खेचण्याची कल्पना राइट यांना कशी सुचली? याचा किस्सा रंजक आहे.

दक्षिण कोरियातील विरोधी पक्ष 'पीपल पॉवर पार्टी'ने आपल्या प्रचारात 'बेबी शार्क'चा या गीताचा वापर केला. त्यावेळी पिंकफाँगने या राजकीय पक्षाला इशारा दिला की या गाण्याचा प्रचारात वापर थांबवा अन्यथा तुम्हाला कोर्टात खेचू.

त्यावरुन जोनाथन राइट यांना वाटले की आपण देखील मग पिंकफाँगला कोर्टात खेचू शकतो.

एका मुलाखतीत त्यांनी आपले विचार सांगितले.

'माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले की या घटनेचा अर्थ असा आहे की माझे गाणे देखील कॉपीराइट कायद्याअंतर्गत सुरक्षित आहे,' असे राइट यांनी कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनला 2019 साली म्हटले होते. त्यानंतर त्यांनी कोर्टाचे दार ठोठावले.

पिंकफाँगची गाण्याची आवृत्ती येण्याआधी अनेक आंतरराष्ट्रीय आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यात 'फ्रेंच बेब रिकन' आणि जर्मन क्लेनर हाय (लिटल शार्क) ही गाणी युरोपमध्ये 2007 सालीच प्रसिद्धीच्या झोतात आली होती.

पण कोणत्याच आवृत्तीला पिंकफाँगने जे यश मिळवले ते मिळवता आले नव्हते.

त्यानंतर अनेक संगीतकारांनी आपल्या लाइव्ह कार्यक्रमादरम्यान हे गाणे सादर केले. यात ब्लॅकपिंक, जोश ग्रॉबन या संगीतकारांचा समावेश आहे.

हे गाणे आतापर्यंत 100 हून अधिक भाषांमध्ये अनुवादित झाले असून त्यावर चित्रपट देखील आला आहे.

पिंकफाँगचे मार्केटिंग डायरेक्टर जेमी ओह यांनी 2018 मध्ये बीबीसीला म्हटले होते की आम्ही या गाण्याला नेक्स्ट जनरेशनसाठीचे के-पॉप म्हणतो.

हे गाणे इतके का प्रसिद्ध झाले?

हे गाणे इतके का लोकप्रिय झाले यावर 2018 मध्ये बीबीसीने एक शॉर्ट फिल्म बनवली होती. त्यात जेमी ओह यांनी म्हटले होते की 'आतापर्यंत बालगीतांबाबत एक धारणा होती की ती गीतं गोंडस असतात, अतिशय धीम्या स्वरात, चालीत असतात जेणेकरुन लहान मुलांना छान झोप लागते. पण बेबी शार्क हे अगदी त्या विरुद्ध आहे.'

"पिंकफाँगचे बेबी शार्क हे एक ट्रेंडी गाणे आहे. याची चाल उडती आहे आणि मजेशीर डान्स स्टेप्स आहेत. अॅनिमेशन देखील रंगबिरंगी आणि चमकदार आहे. हे पुढील पिढीसाठी के पॉप आहे असेच आम्हाला म्हणावेसे वाटते," असे जेमी ओह यांनी बीबीसीला म्हटले होते.

पिंकफाँग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, खेळणीचे स्टोअर

हे गाणे इतके का प्रसिद्ध आहे, हे सांगताना, संगीत शास्त्राच्या अभ्यासक जेडी ओ'रेगन यांनी बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीत म्हटले की 'ऐकायला हे अगदी निरर्थक गाणं वाटू शकतं पण हे संगीतच्या स्तरावर अतिशय कॅची आहे. विशेषतः यात हूक्स म्हणजेच ऐकताना तुम्ही खिळून जाल असं संगीत आहे.'

जेडी ओ'रेगन हे समजावून सांगताना स्वतः पियानोवर एक चाल वाजवून दाखवतात आणि त्या सांगतात "ही चाल ऐकायला मधुर वाटते. आणि आपल्या सर्वांची ओळखीची आहे. ही चाल ओळखीची वाटते. त्याच कॉर्ड्स बेबी शार्कमध्ये वापरल्या गेल्या आहेत पण एक नवा ट्विस्ट त्यात आपल्याला मिळतो. म्हणजे ओळखीचं तरीही काहीतरी वेगळं. या गाण्याच्या शेवटीला आणखी एक अद्भूत बदल होतो."

"हा बदल अतिशय महत्त्वपूर्ण आहे, या बदलाला संगीतकार 'ट्रक ड्रायव्हर key चेंज' असं म्हणतात. कारण जेव्हा ट्रक ड्रायव्हर गिअर बदलतात त्यानंतर त्या ट्रकची गती पूर्णतः वेगळी असते. अगदी त्याप्रमाणे. त्यामुळे जेव्हा कोरस शेवटी हे गाणे गात असतो तेव्हा ते गाणे अचानकपणे वरच्या पट्टीत जाते," असं जेडी सांगतात.

या गाण्यामुळे पिंकफाँग कंपनीला भरपूर फायदा झाला. त्यांनी यावर आधारित अनेक आवृत्त्या तयार केल्या. तसेच यावर त्यांनी एक चित्रपट देखील काढला आहे. त्यांची खेळणी प्रसिद्ध आहे, असे या डॉक्युमेंट्रीमध्ये म्हटले आहे.

"ज्या प्रमाणे ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार हे बालगीत लोकप्रिय आहे त्याप्रमाणे आम्हाला पिंकफाँगचे बेबी शार्क बनवायचे आहे," असे जेमी ओह या डॉक्युमेंट्रीच्या शेवटी म्हणतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)