'मेरे दादा, मेरा भाई आर्मी में थे', तरीही बांगलादेशी असल्याचा आरोप, पुण्यातील मुस्लीम कुटुंबाचा उद्विग्न सवाल

मेरे दादा - मेरा भाई सब आर्मी मे थे. फी भी हमसे पुछा गया

फोटो स्रोत, Nitin Nagarkar/BBC

    • Author, प्राची कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"माझे आजोबा, माझा भाऊ सर्वजण भारतीय लष्करात होते. आमच्या तीन पिढ्यांनी देशाची सेवा केली. तरीही आम्हाला भारतीय आहोत हे सिद्ध करावं लागतंय.

रोहिंग्या आणि बांगलादेशी असल्याचा आरोप आमच्यावर करत मध्यरात्री घराबाहेर हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, घोषणाबाजी केली," इर्शाद अहमद उद्विग्न होत अशा प्रकारे भावना व्यक्त करत होते.

इर्शाद अहमद शेख आपल्या कुटुंबीयांबरोबर पुण्यातील चंदननगर परिसरात राहतात. हिंदुत्त्ववादी संघटनांनी केलेल्या या आरोपामुळे शेख कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. 'मेरे दादा, मेरा भाई सब आर्मी में थे. फिर भी हमसे ये पुछा गया...!,' असं व्यथित होऊन इर्शाद अहमद सांगत होते.

शेख कुटुंब मुळचं उत्तर प्रदेशातील, त्यांच्या तीन पिढ्यांनी भारतीय लष्करात देशसेवा बजावली आहे.

दरम्यान, पोलिसांनी शेख यांच्या घराबाहेर कोणता गोंधळ झालेला नाही. आम्ही त्यांची कागदपत्रं तपासली आहेत आणि पुढील प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितलं. तर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आम्ही घटनास्थळी उपस्थित होतो. परंतु, आम्ही कोणताही गोंधळ घातला नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

व्हीडिओ कॅप्शन, 'संशयित बांगलादेशी' पुण्यातील कारवाईवरुन वाद का?

मध्यरात्री जमावाची घोषणाबाजी अन् कागदपत्रांची मागणी

इर्शाद अहमद शेख यांचे पुतणे शमशाद शेख 'बीबीसी मराठी'शी बोलताना म्हणाले की, माझे आजोबा आणि काका भारतीय सैन्यदलात होते.

1971 च्या युद्धात माझे आजोबा आणि नंतर पाकिस्तानविरोधात झालेल्या कारगिल युद्धावेळी माझ्या काकांनी देशसेवा बजावली.

मध्यरात्री जमावाची घोषणाबाजी अन् कागदपत्रांची मागणी

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR/BBC

देशासाठी इतकं करूनही आम्हाला आमचं भारतीयत्व सिद्ध करण्यासाठी विचारलं गेलं. काही हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते मध्यरात्री आमच्या घराबाहेर जमा झाले आणि त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. आम्हाला आमची कागदपत्रं मागितली, असा आरोप शमशाद यांनी केला.

काही लोकांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या परिसरात काही मुस्लिम कुटुंब राहतात आणि ते रोहिंग्या किंवा बांगलादेशी असल्याचं सांगितलं. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली, असं सांगितलं जातं.

शमशाद शेख यांचे आजोबा

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, शमशाद शेख यांचे आजोबा

मध्यरात्री अचानक जमाव घराबाहेर आला आणि त्यांनी 'तुम्ही रोहिंग्या आहात, बांगलादेशी आहात' असं म्हणत आम्हाला कागदपत्रं दाखवायला भाग पाडल्याचा आरोप परिसरातील मुस्लिम कुटुंबांनीही केला आहे. त्यावेळी तिथं पोलिसही उपस्थित होते, असं या कुटुंबांनी म्हटलं आहे.

बजरंग दल आणि पोलीस म्हणतात, 'गोंधळ झालाच नाही'

दरम्यान, बजरंग दलाचे वडगाव शेरी परिसराचे संघटक सुरज पडवळे यांनी मात्र घटनास्थळी कोणताही गोंधळ झाला नसल्याचे म्हटले आहे.

या भागात बांगलादेशी लोक राहत असल्याचं आपल्याला स्थानिकांकडूनच समजलं होतं. त्यामुळे आम्ही लगेचच पोलिसांना याबाबत कळवलं, असा दावा पडवळे यांनी केला. त्याचबरोबर ज्यावेळी पोलीस तिथे गेले होते, तेव्हा आम्ही लांब उभे होतो. आम्ही कोणताही गोंधळ घातला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

शमशाद शेख यांचे काका

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, शमशाद शेख यांचे काका

'बीबीसी मराठी'ने या घटनेबाबत पोलिसांनाही विचारलं. यावर चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी शेख यांच्या कागदपत्रं तपासणीवेळी त्यांनी त्यांच्या कुटुंबातील कोणी सैन्यदलात असल्याचा उल्लेख केला नसल्याचं सांगितलं.

संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्या परिसरात बांगलादेशी लोक राहत असल्याची तक्रार आमच्याकडे केली होती. त्या तपासासाठी पोलिसांना तिथं पाठवण्यात आलं होतं.

शेख कुटुंबाची तक्रार पण अद्याप गुन्हा नोंद नाही

त्या पुढे म्हणाल्या की, काही संघटनांचे लोक तिथे उपस्थित असल्याचं आणि ते घोषणा देत असल्याचं लक्षात आल्यावर त्यांना मी त्वरीत घोषणा थांबवण्याच्या सूचना केल्या. ती लोकं घर दाखवण्यासाठी आली होती.

नंतर त्या मुस्लिम कुटुंबांना कागदपत्रं व्हेरिफिकेशनसाठी पोलीस ठाण्यात आणलं. त्यांच्याकडची सध्याची कागदपत्रं पाहिली. ते परराज्यातील आहेत. त्यामुळे त्यांच्या मूळ ठिकाणचे पत्ते मागितले होते.

शेख कुटुंबाची तक्रार पण अद्याप गुन्हा नोंद नाही

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR/BBC

तेथील स्थानिक पोलिसांकडून ते कुटुंबीय तिथलेच आहेत, याची आम्ही खात्री केलेली आहे, असंही वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढाकणे यांनी म्हटलं.

दरम्यान, शमशाद शेख यांनी जमावाने त्यांच्या घराबाहेर घातलेल्या गोंधळाप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी सखोल तपास करणार असल्याचं सांगितलं असलं तरी शेख कुटुंबीयांच्या तक्रारीवर अद्यापपर्यंत तरी गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)