विशाळगड हिंसाचार : पडकी घरं, ठप्प व्यवहार ते कोर्टाच्या फेऱ्या; वर्षभरानंतर काय स्थिती? - ग्राऊंड रिपोर्ट

- Author, प्राची कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी
घाटातला रस्ता पार करत गजापूरकडे जायला लागलं की, रस्त्यावर एक अस्वस्थ शांतता जाणवायला लागते. खरंतर पावसाळ्याचा हा काळ या परिसरात ट्रेकर्स आणि भटकंतीसाठी येणार्या लोकांचा. पण पावनखिंडीकडे नेहमी दिसणारी गर्दीही नजरेस पडत नाही.
पुढे मुसलमानवाडीत कुलूपबंद घरं आपलं स्वागत करतात. विशाळगडाकडे जाणारा रस्ता सुरू होतो तो या मुसलमानवाडीनंतर. रस्ता संपतो तिथे दिसतात, पाडलेल्या टपऱ्या आणि दुकानं.
ती पार केली की, एका कोपऱ्यात पोलिसांची टेबल खुर्च्या टाकून तयार केलेली चौकीवजा जागा.
इथं आधारकार्ड किंवा ओळखपत्र दाखवून नोंद केली की, त्यानंतरच विशाळगडावर जाण्याची परवानगी मिळते. तीही त्यांनी सांगितलेल्या वेळेतच.
विशाळगड हिंसाचारानंतर या भागातल्या बदलेल्या वातावरणाचं हे चित्रं.
14 जुलै 2024 ला संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावरचं अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम काढली. अनेक तरुणांसह ते विशाळगडावर दाखल झाले.
पण अतिक्रमणांविरोधात काढलेल्या या मोर्चाला हिंसक वळण लागलं आणि त्यानंतर गजापूरच्या मुसलमानवाडीवर जमावाने हल्ला चढवला. घराघरात शिरत नासधूस केली.
अनेक जणांनी घरातून पळून जात परिसरातील जंगलात दिवसभर आसरा घेतला. यातल्या जमावाने घरातल्या वस्तूंची तोडफोड केली होतीच. पण त्या बरोबरच अन्नधान्य पुन्हा वापरता येऊ नये म्हणून त्यातही काचा फोडल्या होत्या. तोडफोडीतून लहान मुलांची खेळणीही वाचली नव्हती.
या घटनेला वर्ष होत असताना विस्कळीत झालेलं जनजीवन अजूनही पूर्वपदावर आल्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत.
विशाळगडावरची गर्दी आणि अतिक्रमण ठरलेल्या पडक्या इमारती त्याचीच साक्ष सांगतात. यातलंच एक घर आहे मुस्कान मुजावरचं.

दर्ग्यापासून डावीकडून गेलं, की हे दुमजली पडकं घर दिसतं. ती जेव्हा अर्धवट पाडलेल्या या घरासमोर उभी रहाते, तेव्हा जगण्याचा गेल्या वर्षभरातला झगडा तिच्या समोर उभा राहतो.
ही इमारत म्हणजे मुस्कानच्या कुटुंबातल्या काही लोकांचं रहातं घर आणि लोकांना राहण्यासाठी देण्याच्या खोल्या होत्या. तपासणीत त्या अतिक्रमण ठरल्या.
विशाळगडावर हिंसाचार झाला त्याच दिवशी तिच्या वडिलांचा आजारपणाने मृत्यू झाला. एकीकडे कमावते वडील गेले, दुसरीकडे उदरनिर्वाहाचं साधनही. गेलं वर्षभर एकीकडे शिक्षणाची धडपड दुसरीकडे जगण्याचे प्रश्न अशा दुहेरी संकटात त्यांचं कुटुंब सापडलं आहे.

मुस्कान सांगते, "हिंसाचार झाला तेव्हा माझ्या वडिलांची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे आम्ही सगळेच कोल्हापुरात दवाखान्यात होतो. त्याच दिवशी वडील गेले. वडिलांच्या मृत्यूला तीन दिवस झाले होते, तेव्हाच प्रशासनाकडून ही अतिक्रमण कारवाई करण्यात आली. यात आमची इमारत तोडली गेली. वरपासून खालपर्यंत जेवढी प्रॉपर्टी होती ती सगळी तोडली."
मुस्कानच्या घरी तिची आई मोठा भाऊ आणि वहिनी राहतात. तिच्या दोन मोठ्या बहिणींची लग्न झाली आहेत. मुस्कान कायद्याचं शिक्षण घेत आहे. पण परिस्थिती मुळे आता कसं जगायचं असा सवाल विचारण्याची वेळ तिच्यावर आणि तिच्या कुटुंबावर आली आहे.
सुरुवातीला आलेली मदत, धान्याचे कीट आणि त्यानंतर नातेवाईकांकडून मदत घेत गेलं वर्षभर उदरनिर्वाह केल्याचं ती सांगते.
विशाळगडावरच्या जवळपास प्रत्येकाचीच परिस्थिती अशीच असल्याचं मुबारक मुजावर सांगतात. दर्ग्याच्या शेजारी असणारं त्यांचं दुकान ते आता लोक दिसले तरच उघडतात.
नारळ, फुलं विकण्याच्या त्यांच्या व्यवसायातून पूर्वी त्यांच्या कुटुंबाचं नीट भागायचं. पण आता येणार्यांची संख्या रोडावली त्याचा थेट परिणाम व्यवसायावर झालेला दिसतो.
मुबारक मुजावर सांगतात की, "हिंसाचार झाला तेव्हा दगडफेक झाली होती. तेव्हा पोलिसांनी लोकांना हाकललं आणि त्यानंतर कर्फ्यू लावला. तो कर्फ्यू अजूनही सुरुच आहे. एकावेळी फक्त पाच ते दहा जणांना वर सोडलं जात आहे. त्यामुळे 90 ते 95 टक्के उत्पन्न घटलं आहे. आमच्यावर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे."

जी दुकानं उघडी दिसतात त्यात एक तर ग्राहकाची वाट पाहत बसलेले दुकानदार असतात किंवा मग जे भाविक पोहोचले आहेत, त्यांच्या मागे लागत खरेदी करण्यासाठी विनंती करण्याची झुंबड उडते.
सरकारी आकडेवारीनुसार, विशाळगडावर आता दिवसाकाठी साधारण 400 लोक जातात. या प्रत्येकाची नोंद आणि तपासणी पोलिसांच्या डायरीत होते. विशाळगडावर आता मांसाहारालाही बंदी घालण्यात आली आहे.
पालकमंत्री काय म्हणाले?
कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर सरकारच्या वतीने बाजू मांडताना म्हणाले, "ती एक दुर्दैवी घटना होती. पण त्यानंतर लोकप्रशासनासह, लोकप्रतिनिधींनी, स्थानिकांनी योग्य असा समन्वय निर्माण केलेला आहे. लोकांमध्ये विश्वासार्हता निर्माण झालेली आहे. लोक समजून घेताहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं, आपलं दैनंदिन कामकाज अधिक चांगल्या पद्धतीनं पार पाडत आहेत."
संपूर्ण वाद काय?
विशाळगडावर दिलेल्या माहितीनुसार, राजा भोज दुसरा याने विशाळगड उर्फ खेळणा हा किल्ला उभारला. 1659 मध्ये छत्रपती शिवरायांनी आदिलशहाच्या ताब्यातील पन्हाळगडासोबत हा खेळणा काबीज केला आणि त्याचे नाव बदलून विशाळगड असं नामकरण केलं.
छत्रपती शिवरायांनंतर संभाजीराजेंनी याच ठिकाणाहून राजकारणाची सूत्र हलवली आणि राजाराम महाराजांच्या काळात हा मराठ्यांच्या हालचालींचे केंद्रबिंदु झाला. राजाराम महाराजांच्या पत्नी ताराबाई यांनी विशाळगडाला राजधानीचे ठिकाण बनवल्याचाही उल्लेख इथे आढळतो.

याच गडावर हजरत सय्यद मलिक रिहान मीरा साहेब दर्गा आहे. मुजावर कुटुंबीयांकडे या दर्ग्याची जबाबदारी आहे. या दर्ग्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आणि त्याच्या बरोबरीने अनेक व्यवसायही इथं उभे राहीले.
यात दर्ग्यासाठी येणाऱ्या लोकांना फुले, चादर अशा वस्तूंची विक्री होत होतीच. मात्र त्याच्या ठिकाणामुळे अनेक जण इथं मुक्कामासाठीही येत होते. त्यामुळे त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी हॉटेल सदृश्य ठिकाणं, खाण्या पिण्याची ठिकाणं इथं उभी राहिली. त्यात इथं बळी देखील दिला जात असल्याने मांसाहार मिळणंही सुरु झालं.
महाराष्ट्रासह कर्नाटकातूनही येणार्या भाविकामुळे दर्ग्यावरची गर्दी वाढत गेली. आणि त्यातून उभ्या राहिलेल्या दुकानं आणि इतर व्यवसायांमुळे अतिक्रमण झाल्याचा मुद्दा पुढे आला. गेली अनेक वर्ष हा वाद कायम आहे. आणि सध्या हायकोर्टात याविषयी खटलाही सुरु आहे.
दरम्यान आलेल्या एका निकालाचा आधार घेत हिंदुत्ववादी संघटनांनी ही अतिक्रमणं हटवण्याची मागणी केली. याच काळात संभाजीराजे छत्रपती यांनीही मोर्चाची घोषणा केली. पण मोर्चाला हिंसक वळण लागलं.
गजापूरमधल्या रहिवासी लोकांचं स्थलांतर
हिंसाचार झाला तो विशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापूर मधल्या मुसलमान वाडीत देखील. विशाळगडावरच्या लोकांसाठी जगण्याचे प्रश्न गडद होत असतानाच ज्यांनी हिंसाचार अनुभवला त्या विशाळगडच्या पायथ्याशी असणार्या गजापूर मधल्या मुसलमानवाडीत तर आता लोकही नजरेस पडत नाहीत. व्यवसायावर परिणाम झाल्याने आणि भीती मुळे बहुतांश लोक सोडून गेल्याचं इथले रहिवासी
मुसलमानवाडीतले रहिवासी फुरकानअली अब्दुल्ला कागदी हे इथं उरलेल्या काही कुटुंबांपैकी एक. त्यांच्या वयस्क आई वडिलांसह त्यांचं कुटुंब इथं रहातं. तर पलीकडे ज्यांचं घर जाळलं गेलं होतं त्या रेश्मा प्रभुलकर आणि त्यांची सासू रहाते. प्रभुलकरांचं घर उभं राहिलं असलं तरी भीतीची छाया त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही दिसते. दारात हिंसाचाराच्या वेळी फोडलेलं वाहन उभं आहे. मात्र या घटनेविषयी बोलायला त्या नकार देतात.

कागदी जपून शब्दांची निवड करत बोलायला तयार झाले. त्यांचा लहान मुलांच्या खेळण्यांचा व्यवसाय आहे. विशाळगडावरच त्यांचं दुकान आहे. पण लोक येत नसल्याने दुकान उघडण्यासाठी ते फारसं जात नाहीत. ज्या दिवशी हिंसाचार झाला तेव्हा फुरकानअली कागदी हे मस्जिद मध्ये होते. घरात मोर्चात आलेल्याच काही लोकांनी वडीलांना लहान मुलांसह कुटुंबाला घेऊन आत जायला सांगितल्याने आपण वाचल्याचं ते सांगतात. त्यांच्याही घराचं नुकसान या हल्ल्यात झालं.
कागदी सांगतात " आमचा खेळण्यांचा व्यवसाय आता शंभर टक्क्यांवरून दहा टक्क्यांवर आला आहे. येणार्या भाविकांवर आमचा व्यवसाय अवलंबून होता. आता आम्ही खूप अडचणीत आहोत. माझ्या पाठीमागे १० जणांचं कुटुंब आहे. आई वडीलांच्या औषधांना महिन्या काठी तीन साडेतीन हजार रुपये लागतात. कसं उभं रहायचं हा प्रश्न आहे."
कागदी सांगतात की वाडीतले ८० टक्के लोक संधीच्या शोधात बाहेरगावी निघून गेले आहेत. अनेक घरांना आता नुसती कुलूपं आहेत. तर काही घरांबाहेर लोखंडी गेट आणि मोठी कंपाऊंड उभारलेली दिसतात.
संघटनांची भूमिका
वर्षभरानंतर एकीकडे अतिक्रमणांचा मुद्दा तर दुसरीकडे हिंसाचारानंतरच्या केसेस यात दोन्ही कडच्या लोकांचे कोर्टाचे खेटे सुरु आहेत. नुकतंच याविषयी कोल्हापूरातील काही संघटनांनी सर्वेक्षण केलं. त्यात या हिंसाचाराचा परिणाम मुस्लिम कुटुंबांसोबतच इतर स्थानिकांवरही झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं.
कोल्हापूरातील कार्यकर्त्या रेहाना मुरसल बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या, "या परिसरात जवळपास 32 वाड्या आहेत. तिथे रोजगार नाही. पूर्ण व्यवहार ठप्प झाले आहेत. संध्याकाळी 5 पर्यंतच लोकांना प्रवेश दिला जातो.
"गजापूरमध्ये बुद्धवाडी आणि इतर ज्या वाड्या आहेत, त्यांच्याशी आम्ही संवाद साधला होता. त्यांच्याकडून शिकेकाई तमालपत्र अशा वस्तूंची विक्री केली जात होती. लोक ते श्रद्धेने घेऊन जात होते. हा संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून मलकापूर आंबा अशा आजूबाजूच्या गावांमधून जो व्यवहार होत होता तो देखील बंद पडला आहे. लोक म्हणतात आम्ही फक्त जिवंत आहोत पण भुकेने तुम्ही आम्हांला मारुनच टाकताय."

एकीकडे अतिक्रमांणांचं प्रकरण कोर्टात सुरु आहे तर दुसरीकडे हिंसाचाराच्या केसेस. हिंसाचारानंतर पोलिसांनी शाहुवाडी पोलिस स्थानकात पाच वेगवेगळ्या एफआयआर नोंदल्या आहेत. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून मात्र आता अतिक्रमणाच्या मुद्द्यासह प्रशासनावरही कारवाईची मागणी होते आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना सकल हिंदू समाजाचे कुंदन पाटील म्हणाले, "आम्ही पहाणी केली त्यात आढळलं की 158 कुटुंबांपैकी फक्त 8 कुटुंब हिंदू होती. बाकी मुस्लिम होते. यापैकी 65 स्थानिक नव्हते. ते अतिक्रमण करुन इथं व्यवसाय करत होते. त्यांना जर व्यवसायाची संधी हवी आहे तर ती पुणे, कोल्हापूर अशा ठिकाणी देखील शोधता आली असती.
"विशाळगडासारख्या ठिकाणी त्यांनी व्यवसायाची संधी शोधणं चुकीचं आहे. त्या अतिक्रणांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं. प्रशासन देखील तितकंच जबाबदार आहे. तिथे 128 अतिक्रमणं झाली तेव्हा तत्कालीन प्रशासन झोपा काढत होतं का?
"तहसिलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांवर यासाठी कारवाई होणं आवश्यक आहे. रोजगाराचा प्रश्न आहे तर आजूबाजूला शेती आहे. जे मुळचे तिथले नाहीत त्यांनी इतर ठिकाणी जाऊन रोजगाराच्या संधी शोधायला पाहिजे. महाराष्ट्र एकमेवच असं ठिकाण आहे जिथे ऐतिहासिक वास्तूंच्या बाबत आपल्या मनामध्ये तितकी आस्था नाही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)












