‘वडील वारल्यानंतर भाऊ हक्कसोड मागायला आला, पण मी वारसा हक्क मिळवून दाखवला’

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
“गावात चर्चा सुरू झाली, मुलीनं प्रॉपर्टी मागणं पाप असतं. आमच्याही बहिणी प्रॉपर्टी मागायला लागतील ही त्यांना भीती होती,” रुक्मिणी सांगत होत्या.
रुक्मिणी यांनी संघर्ष करुन माहेरच्या संपत्तीतला त्यांचा वाटा कसा मिळवला हे अनेक महिलांसाठी दिशादर्शक ठरत आहे, त्याचीच ही कहाणी.
47 वर्षांच्या रुक्मिणी नागापुरे बीडमध्ये राहतात. त्यांचं घर म्हणजे अगदीच पत्र्याचं शेड. पण आत पाऊल टाकताच समोर सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांचे फोटो दिसतात.
रुक्मिणी यांचं वयाच्या 13 व्या वर्षी लग्न झालं आणि 15 व्या वर्षी त्यांना पहिलं अपत्य झालं. आणि तीन वर्षांत तिसरं अपत्य झालं.
सगळं व्यवस्थित सुरू असताना 2011 मध्ये एक घटना घडली आणि रुक्मिणी यांचं आयुष्यच बदलून गेलं.
रुक्मिणी सांगतात, “2011 ला माझा मोठा मुलगा बारावीला आणि छोटा आठवीला होता. आम्ही पत्र्याच्या शेडमध्ये राहत होतो. परीक्षेमध्ये मुलांना अडथळा नको म्हणून आपण घर नंतर तयार करू, असं माझे मिस्टर म्हणाले, पत्र्याचंच शेड करायचं होतं.
"पण, 2011 साली 2 मे रोजी माझे मिस्टर काम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं.”
पतीच्या निधनानंतर कसोटीचा काळ
पतीच्या निधनानंतर रुक्मिणी यांची दुनियाच बदलली. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर, सगळ्या नातेवाईकांचे रंगरुप बदलले. 2016 मध्ये वडिलांचं निधन झालं आणि तेव्हाच भाऊ पहिल्यांदा भेटायला आला, असं रुक्मिणी सांगतात.
“2016 मध्ये माझ्या वडिलांचं निधन झालं. माझ्याकडे त्याचे काही पैसे होते. मी न बोलवता म्हणजे 2011 पासून 2016 पर्यंत मला गरज होती त्याची, तोपर्यंत तो उभा राहिला नाही. मी अगदी जमीनदोस्त होते. माझ्या डोक्यावर छतपण नव्हतं. बाहेरचे चार-दोन लोक मजुरी म्हणून आणले आणि शेड बांधून घेतलं. तरीही कुणी आलं नाही."

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc
“पण ज्यावेळेस वडील वारले त्यावेळेस त्याला कळलं की माझ्याकडे यायला पाहिजे. का तर तो हक्कसोड करण्यासाठी माझ्याकडे मदत मागत होता. त्याच्यावर सही कर म्हणून. पण मला त्यातलं तेव्हा काहीच समजत नव्हतं.
"मला फक्त एवढं वाटत होतं की, माझा त्याच्याकडे पैसा आहे, तेवढा त्यानं मला द्यावा. मग मी त्याला सही देईल,” रुक्मिणी पुढे सांगतात.
'आम्ही दोघी, आई जिवंत... तरीही'
त्यानंतर भावानं तलाठी आणि पोलीस पाटलच्या संगनमतानं सातबारा उताऱ्यावर वारस म्हणून स्वत:चं नाव लावून घेतल्याचं रुक्मिणी सांगतात.
“त्यानं तलाठी आणि पोलीस पाटलाच्या संगनमतानं एकट्याच्याच नावावर जमीन करुन घेतली. वारसा हक्कानी मी, माझी, बहीण, मुलगा म्हणून तो आणि माझी आई अशा चार जणांच्या नावे ती जमीन व्हायला पाहिजे होती. पण तशी झाली नाही.”
सातबारा उतारा पाहिल्यानंतर त्याच्यावर फक्त वारस म्हणून भावाचं नाव लागल्याचं रुक्मिणी यांना दिसून आलं आणि त्यांनी तलाठ्याला फोन लावला.

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc
“मी तलाठ्याला फोन याच्यासाठी लावला, कारण की, 2016 पासून मी संघटनेत काम करत होते. संघटनेत मी जेव्हा काम करायला लागले, तेव्हा मला संविधान माहिती झालं. संविधानामध्ये जी काही मूल्यं आहेत, म्हणजे सगळ्यांना समान अधिकार आहेत, हक्क आहेत ते कळालं. माझी स्वत:ची मला एक ओळख व्हायला लागली. आणि मग त्याच्यामधून मला सगळ्या गोष्टी कळायला लागल्या.
“मी तलाठ्याला फोनवर विचारलं की हे फक्त एकट्या भावाच्याच नावावर कसं काय केलं? आम्ही दोघी बहिणी आहोत, माझी आई अजून जिवंत आहे. मग तू कुठली कागदपत्रं त्याला जोडलेस? माझी आई तर जिवंत आहे, मृत्यूपत्र जोडलंय का? तर ते मला दाखव. आम्ही दोघींनी कुठं सह्या केल्या ते दाखव म्हटलं."
“मग तो तलाठी डायरेक्ट माझ्याकडे आला. तो पहाटे सकाळच्या 6 वाजता आला. माझा मुलगा झोपलेला होता तर तो झोपेतून उठला. तलाठ्यानं अक्षरश: माझे पाय धरले आणि माझी माफी मागितली.”
‘मुलीनं संपत्तीत हक्क मागणं हे पाप’
पण हे प्रकरण इथंच थांबलं नाही. रुक्मिणी प्रॉपर्टीत अधिकार मागायला लागल्यावर त्याची गावात चर्चा सुरू झाली आणि गावातील ‘प्रस्थापित’ लोक रुक्मिणी यांच्या घरी आले.
रुक्मिणी सांगतात, “गावातील काही प्रस्थापित लोक माझ्या घरी आले आणि मला समजून सांगू लागले, की तू असं करू नको. मुलीनं प्रॉपर्टी नाही घेतली पाहिजे. तुला माहेरी-येण्याजाण्याचा रस्ता होईल. तुमचं नातं तुटेल.
"गावामध्ये चर्चा सुरू झाली की, मुलींनी घ्यायला नाही पाहिजे, हे पाप असतं किंवा वाईट होतं. तुझ्यामुळे आमच्याही महिला, आमच्याही बहिणी आम्हाला मागायला लागतील हीपण त्यांना एक भीती होती.”

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc
2022 मध्ये सातबाऱ्यावर वारसा हक्कात भावासोबतच रुक्मिणी, त्यांची बहीण, आई यांचं नावंही लावण्यात आलं.
रुक्मिणी गेल्या 8 वर्षांपासून एकल महिला संघटनेत काम करतात. या माध्यमातून त्या एकल महिलांना त्यांचे हक्क, अधिकार यांची माहिती करुन देतात. त्यासाठी विवाह नोंदणीचं महत्त्व समजून सांगतात. सातबारा वाचनासारखे उपक्रमही घेतात.
पतीच्या निधनानंतर संघटनेशी जोडलं गेल्यामुळे अनेक एकल महिला आता अधिकार मिळवू लागल्या आहेत.
इतर महिलांचा वारसा हक्क आणि शिक्षणासाठीचा संघर्ष
यापैकी एक आहेत अयोध्या जगताप. अयोध्या यांच्या पतीचं 2016 मध्ये कर्करोगानं निधन झालं.
बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, “मी असंच दारातून जायची-यायची. रुक्मिणी ताई बोलायच्या मला, विचारायच्या. तुम्ही अशा का फिरता? कुठे जाता? काय करता? मी त्यांना माझ्याविषयी सांगितलं. त्या म्हणल्या संघटनेत या. मग मी त्यांच्या संघटनेत आले. माझ्यात बोलण्याची अशी हिम्मतही नव्हती.
"पण त्यांच्याशी जोडून राहिल्यामुळे माझ्यात अशी बोलण्याची हिम्मत आली. सासरची माझी जागा होती, शेती होती. ती मी माझ्या नावावर करुन घेतली. यांच्यामुळे माझ्यात घरच्यांसोबत बोलण्याची हिम्मत आली.”

फोटो स्रोत, kiran sakale
सपना अहिरे या बीडला लागूनच असलेल्या कालवण गावात राहतात. त्यांच्या पतीचं अपघातात निधन झालं. त्यानंतर त्यांचा संपर्क एकल महिला संघटनेशी झाला.
त्या सांगतात, “मॅडमनी मला बऱ्याच गोष्टी समजून सांगितल्या की, तुला मुलं आहेत. तु कसं करणार? पुढची लाईफ कशी काढणार? मग मी त्यामधून बाहेर निघायला लागले. बीए.ला अडमिशन घेतला. ग्रॅज्युएशन तर सगळ्यांचेच होत आहे, त्याला काही अर्थ दिसत नाही म्हटल्यावर मी नर्सिंगला अॅडमिशन घेतलं. नर्सिंगला अॅडमिशन घेतल्यानंतर दोन्ही वर्षं एकदम टॉपमध्येच पास झाले मी अभ्यास करुन.”
सपना सध्या खासगी दवाखान्यात नोकरी करतात. दुसरीकडे, लग्नाच्या वेळी आठवीत असलेल्या रुक्मिणी यांनी आता एम.ए पूर्ण झालंय. अजूनही वही-पेन सोडला नसल्याचं त्या सांगतात. महापुरुष, स्त्री-पुरुष समानता याविषयीचे त्यांचे अनेक लेख स्थानिक वर्तमानत्रांत छापून आले आहेत.
सरकारकडे मागण्या
रुक्मिणी यांना सरकारकडून काही मागण्या आहेत-
- महिलांच्या नावावर घर आणि शेती करण्यासाठी दोघांचं पती-पत्नी म्हणून नाव लावलं पाहिजे.
- वारसा हक्क कायद्याची अंमलबजाणी
- विवाह नोंदणी कायद्याची अंमलबजावणी
- एकल महिलांची ग्रामपंचायतला स्वतंत्र नोंद करायला पाहिजे. कायदेशीर एकल महिलांची नोंद केली तर त्याच्यात विवाहित किती, विधवा किती, परित्यक्त्या किती, घटस्फोटित किती हा आकडा त्याठिकाणी येईल आणि त्यांना तसे कायदेशीर प्रमाणपत्र मिळेल.
- त्या प्रमाणपत्राच्या आधारे त्या महिलेला शासनाच्या योजना मिळवण्यासाठी फायदा होईल.
देशभरात काय चित्र?
हिंदू वारसा हक्क कायद्यामध्ये 2005 साली सुधारणा करण्यात आली. वडील किंवा मुलगी हयात असो वा नसो मुलींचा वडिलांच्या संपत्तीवर समान हक्क आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने 11 ऑगस्ट 2020 पुन्हा एकदा स्पष्ट केलं. त्यापुढे जाऊन कोर्टानं आता हा कायदा येण्याच्याआधीच्या प्रकरणांमध्येसुद्धा महिलांना समान वाटा मिळेल, अशी भूमिका घेतली.
महिलांच्या नावावर जमीन करुन देण्यास अनेकदा पुरुष प्रधान समाज तयार होत नाही. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर महिलेच्या नावावर थोडी जमीन करुन दिली जाते.
आकडेवारीचा विचार केला तर, जगभरात केवळ 12 ते 13 % महिलांच्या नावावर जमीन असून भारतात ती 13 % महिलांच्या नावावर असल्याचं कोरो इंडियाच्या अमिता जाधव सांगतात. त्या गेली अनेक वर्षं महिलांच्या संपत्ती हक्काविषयी काम करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
अमिता यांच्या मते, “वारसा हक्कानं महिलांना वडिलोपार्जित मालमत्तेत अधिकार दिला आहे. तसेच सासरच्या प्रॉपर्टीतही अधिकार दिलेला आहे. पण प्रॉपर्टी माहेरची असो की सासरची, ती महिलेच्या नावावर करण्याची मानसिकता दिसत नाही. महिलेकडून हक्कसोड प्रमाणपत्र घेतलं जातं. जी की अगदीच सोपी प्रक्रिया आहे. कधीकधी घरचे तयार असले तरी महिलेच्या नावावर जमीन करुन देण्यास शासकीय यंत्रणा अडथळे आणते.”
वडिलांच्या मृत्यूनंतर प्रत्येक वारसाची नोंद घेणे, विवाह नोंदणी कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थितपणे करणे, ग्रामसभेमध्ये वारसांची माहिती वेळोवेळी अपडेट करणे आणि सरकारनं वारसा हक्क कायद्याची जनजागृती मोठ्या प्रमाणावर करुन त्याची अंमलबजावणी करणे, या बाबी महिलांना वारसा हक्क मिळवून देण्यासाठी गरजेचं असल्याचंही त्या सांगतात.
दरम्यान, बाईच्या नावावर जमीन का पाहिजे असा प्रश्न विचारल्यावर अयोध्या सांगतात, “बाईच्या नावावर जमीन पाहिजेच. कारण कुणावर काय टाईम येईल सांगता येत नाही. कुणी कुणाचं नसतं. वाईट वेळ आला की कुणी विचारत नाही.”
(या लेखासाठी अत्त दीप या ग्रासरुट लिडरशीप अकॅडमीच्या रिसर्चची मदत झाली)












