रोहित आर्यानं मुलं ओलिस ठेवल्याच्या प्रकरणी केलेल्या आरोपांबाबत प्रशासनाकडून काय बाजू मांडण्यात आली?

फोटो स्रोत, rohit Arya/ BBC
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
मुंबईतल्या गजबजलेल्या पवई परिसरामध्ये रोहित आर्या नावाच्या व्यक्तीनं आपल्या प्रलंबित मागण्या महाराष्ट्र शासनाकडून पूर्ण होत नसल्याच्या कारणावरून काही मुलांना ओलीस धरण्याचा थरारक घटनाक्रम सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनाक्रमातील चकमकीदरम्यान रोहित आर्या यांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईतल्या गजबजलेल्या पवई परिसरामध्ये गुरुवारी (30 ऑक्टोबर) महावीर क्लासिक नावाच्या इमारत परिसरात दुपारी तीन वाजताच्या सुमारास या व्यक्तीने लहान मुला-मुलींना आणि काही व्यक्तींना स्टुडिओमध्ये ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
माध्यमांवर आलेल्या वृत्तानुसार रोहित आर्या हा पुण्यात राहायचा. शिवसेना नेते दीपक केसरकर शिक्षणमंत्री असताना त्याला एका शाळेच्या कामाचं टेंडर मिळालं होतं. पण त्या कामांचे पैसे त्याला मिळाले नाहीत, असा रोहित आर्यचा आरोप होता.
या सगळ्या घटनाक्रमानंतर आता शासनाचे उपसचिव तुषार महाजन यांनी एक निवेदन काढून शासनाची बाजू प्रसिद्ध केली आहे.
पोलिसांच्या दाव्यानुसार, रोहित आर्याला ताब्यात घेत असताना आरोपीने पोलिसांवर हल्ला केला.
त्यानंतर पवई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी केलेल्या प्रत्युत्तरात त्याचा मृत्यू झाला. हे प्रकरण पुढील तपासासाठी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेले आहे.
या मुला-मुलींना रोहित आर्याने अभिनयाच्या ऑडिशनसाठी या परिसरामध्ये बोलावले होते. त्यानंतर पुढचा सगळा प्रकार घडला आहे.
पोलीस अधीक्षक दत्ता नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मुंबई पोलिसांच्या पथकाने मदतकार्य सुरू केले आणि सर्व मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढले. या ऑपरेशनदरम्यान मुलांना वाचवताना ती व्यक्ती जखमी झाली, तिला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आणि नंतर त्याची मृत्यूची नोंद करण्यात आली.'
घटनेची माहिती मिळताच मुलांचे पालक आणि आसपासच्या परिसरातल्या लोकांनी पवई येथील त्या स्टुडिओबाहेर गर्दी केली होती.
घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले, या घटनेमुळे परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
शासनाने निवेदन प्रसिद्ध करून मांडली बाजू
रोहीत आर्या यांच्या अप्सरा मीडिया एंटरटेनमेंट नेटवर्कद्वारे राज्य सरकारचा 'प्रोजेक्ट लेट्स चेंज' राबवला जात होता. ओलिसनाट्य आणि नंतरच्या घटनाक्रमानंतर याबाबत चांगलीच चर्चा सुरू झाली.
त्यानंतर आता शासनाचे उपसचिव तुषार महाजन यांनी एक निवेदन काढून शासनाची बाजू प्रसिद्ध केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटलंय की, रोहीत आर्या यांनी 'प्रोजेक्ट लेट्स चेंज'अंतर्गत स्वच्छता मॉनिटर 2024-25 हा उपक्रम पुन्हा एकदा राज्यातील सर्व शाळांमध्ये राबवण्यासाठी लागणाऱ्या खर्चास मान्यता देण्याची विनंती केली होती.
"मात्र, हा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असताना, त्यांच्या खाजगी कंपनीच्या वेबसाईटवर या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या संस्थेकडून शासनाच्या मान्यतेशिवाय परस्पर नोंदणी शुल्क आकारलं जात असल्याचं शासनाच्या निदर्शनास आले होते," असं या निवेदनात म्हटलं आहे.

हे लक्षात आल्यानंतर शासनाकडून त्यांना काही गोष्टी कळवण्यात आल्या होत्या.
"या उपक्रमामध्ये सहभागी होण्याकरिता शाळांकडून जमा केलेली रक्कम शासकीय खात्यात जमा करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी. त्यानंतर, शाळांकडून कोणतेही शुल्क आकारणार नाही असे हमीपत्र घेण्यात यावे.
ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर, स्वच्छता मॉनिटर २०२४-२५ हा उपक्रम राबविण्याकरिता अप्सरा मिडीया एन्टरटेनमेन्ट नेटवर्क या संस्थेचा प्रस्ताव शासनास सादर करावा," असं सांगण्यात आल्याचं निवेदनात स्पष्ट केलं आहे.
मात्र, प्रस्तुत प्रकरणी रोहित आर्या यांच्याकडून अपेक्षित माहिती प्राप्त न झाल्यामुळे पुढील कार्यवाही करता आलेली नाही, असं शासनाच्या वतीने सांगण्यात आलंय.
नक्की काय घडलं?
अभिनयाचे क्लास घेणाऱ्या एका स्टुडिओमध्ये काही मुलांना रोहितने त्याच्या खाजगी प्रकरणावरून ओलीस ठेवले होते.
दुपारी साधारण तीन ते साडेतीनची वेळ होती. मुले या क्लासमधून मदत मागताना, काचेतून बाहेर डोकावताना दिसून आली. यानंतर घटनास्थळी आसपासचे लोक आणि पोलिसांनी परिसराला घेराव घातला आणि मुलांची सुरक्षित सुटका करण्यासाठी कारवाई सुरू केली .
घटनेची माहिती मिळताच, पोलिसांचा ताफा व इतर सुरक्षा यंत्रणांची पथके घटनास्थळी दाखल झाली. स्टुडिओबाहेर हाय अलर्ट लागू करण्यात आला होता.
आरोपीची ओळख पटवण्याचा आणि त्याचे हेतू समजून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत होते. तसेच मुलांना त्याच्या ताब्यातून सुरक्षितपणे सोडवण्यासाठी अधिकारी प्रयत्न करत होते.
घटनास्थळी साधारण पावणेदोन तास पोलीस, सुरक्षा यंत्रणांची इतर पथकं आणि आरोपी यांच्यामध्ये संवाद होत होता.

फोटो स्रोत, BBC/ApleshKarkare
परंतु रोहित आक्रमक होता, तो दरवाजा उघडण्यास तयार नव्हता, असं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांशी होत असलेल्या संवादानंतर रोहितने काही मागण्या मांडल्या. तर पोलिसांनी मुलांना सुरक्षित सोडा, अन्यथा कठोर कारवाई करू, सांगितले. मात्र यातून काही काळ मार्ग निघणं कठीण झालं होतं.
अखेर पोलीस स्टुडिओच्या बाथरुमच्या खिडकीतून आत घुसले.
आरोपीकडे एक एअरगन आणि काही रासायनिक पदार्थ आढळले असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.
रोहित आर्या कोण आहे? पोलिसांनी काय माहिती दिली?
या प्रकरणामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नाव रोहित आर्या आहे.
तो 2017 पर्यंत पुण्यात राहायचा, त्यानंतर मुंबईत स्थायिक झाला. तो व्यावसायिक होता, अशी माहिती पोलिसांनी दिली होती.
सत्यनारायण चौधरी, मुंबई पोलीस दलातील कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त यांनी या घटनेसंदर्भात माहिती दिली.
ते म्हणाले, "सर्व मुले सुरक्षित आहेत आणि त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. आरोपीकडे एअरगन आणि काही इतर साहित्य सापडले आहे. योग्य पडताळणीनंतर इतर तपशील लवकरात लवकर शेअर केले जातील."
पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी देखील घटनास्थळी लगेच धाव घेतली.

आरोपीला पकडल्यानंतर दत्ता नलावडे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "आरोपीला अटक करण्यात आली आहे, मुलं आणि दोन व्यक्ती यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. आम्ही आरोपीशी व्यवस्थित संवाद साधला. त्याचा यामागे काय उद्देश आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला."
"तो गेल्या काही वर्षापासून त्याच्या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे तो हे कृत्य करण्यावर ठाम होता. पोलीस अधिकारी बाथरुमच्या खिडकीतून या बंदिस्त जागी शिरले आणि त्यांनी लोकांना सुखरूप बाहेर काढले."
पुढे दत्ता नलावडे म्हणाले की, "हे ऑपरेशन आमच्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. एकीकडे मुलं अडकलेली होती आणि दुसरीकडे आरोपी अडून बसला होता. अखेर मुंबई पोलिसांनी यावर मार्ग काढत मुलांना सुखरूप बाहेर काढलं ."
मात्र रोहितने पोलिसांवर गोळीबार केला आणि प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
रोहित आर्याने हे असं का केलं?
माध्यमांवर आलेल्या वृत्तानुसार रोहित आर्या हा पुण्यात राहायचा. शिवसेना नेते दीपक केसरकर शिक्षणमंत्री असताना त्याला एका शाळेच्या कामाचं टेंडर मिळालं होतं. पण त्या कामांचे पैसे त्याला मिळाले नाहीत, असा रोहित आर्यचा आरोप होता.
दीपक केसरकर मंत्री असताना त्याने अनेकदा त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं होतं, अशी माहिती आता समोर येत आहे. शाळेच्या दुरुस्तीच्या कंत्राटाचे पैसे थकले होते.
सरकारकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. आत्महत्या करण्याचा विचार होता. मात्र त्याने काहीही होणार नसल्याने लक्ष वेधण्यासाठी हे कृत्य केल्याचे म्हटले जात आहे.
याबाबत दीपक केसरकर यांनी टीव्ही ९ शी बोलताना याबद्दल आपली बाजू स्पष्ट केली. ते म्हणाले, "मी व्यक्तीशः त्यांना मदत केलेली आहे. तसेच चेकने पैसे दिले आहे. सरकारी कामात सर्व तरतुदी पूर्ण केल्याच पाहिजेत. मात्र दोन कोटी रुपये अडकले आहेत हे मला पटत नाही, तसं असेल तर त्यांनी खात्याशी संपर्क करुन पूर्ण करुन घ्यावे."
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी याबद्दल सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, "सरकारने अशी किती बिल थकवली आहेत? यातून अजून किती मोठ्या घटना घडू शकतात? सरकारच्या बेशिस्त आर्थिक नियोजनामुळे आज निष्पाप मुलांचा जीव गेला असता तर जबाबदारी कुणाची आहे? तत्कालीन शिक्षणमंत्री केसरकर जबाबदारी घेणार की महायुती सरकार?"
तर, पवईमध्ये रोहित आर्याने ज्या प्रकारे मुलांना ओलीस ठेवून, आपले पैसे मिळाले नाहीत म्हणून भयावह वातावरण तयार केलं, याला राज्य सरकार जबाबदार असल्याचं मत काँग्रेसचे नेत्या वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलं.
त्या म्हणाल्या, "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या अभियनाच्या अंतर्गत 2022 ते 2023 दरम्यान जवळपास 2 कोटींचं काम त्यानं केलं होतं. आणि त्या कामाचे पैसे मिळाले नाहीत, म्हणून त्यानं यापुर्वी सुद्धा उपोषण केलं होतं. त्यावेळी तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्याला सांगितलं होतं की, आम्ही तुझे पैसे तुला देऊ, परंतु, त्याला त्याचे पैसे मिळाले नाहीत. त्यानंतर त्यानं अजून एक आरोप केलेला की, या अभियानाअंतर्गत ज्या शाळांना पुरस्कार मिळाला होता, तो कुठे ना कुठे राजकीय वरदहस्त असलेल्या शाळांना मिळाला होता. त्यामुळे माझे पैसे अजून मला मिळाले नाहीत."
"ठेकेदाराचे पैसे देण्याचं काम राज्य सरकारचं आहे. त्याचा परिणाम आज सर्वसामान्य नागरिकांना आणि मुलांना सहन करावा लागत आहे. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले असताना अशा प्रकारे मुलांचं आयुष्य धोक्यात टाकायचं काम जे राज्य सरकार करत आहे, त्याचा मी निषेध करते" असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
आरोपीने व्हीडिओतून काय म्हटलं?
या प्रकरणामध्ये मुलांना ओलीस धरणाऱ्या आरोपी रोहित आर्या यांनी घटनेदरम्यान एक कथित व्हीडिओ प्रसारित करत म्हटलं होतं की, "मी आत्महत्या करण्याऐवजी मी मुलांना बंदी बनवलं आहे."
"मी एक प्लान बनवला आणि काही मुलांना डांबून ठेवले. माझ्या फार काही मागण्या नाहीत. खूप साध्या मागण्या आहेत. खूप मॉरल आणि एथिकल मागण्या आहेत.
तसेच माझी काही प्रश्न आहेत मला काही लोकांशी बोलायचे आहे. त्यांना प्रश्न विचारायचे आणि त्याची उत्तरे देखील हवी आहेत.
मला दुसरे काहीच नको. ना मी दहशतवादी आहे ना माझी पैशांची मागणी आहे. इमॉरल तर अजिबातच नाही. मला साधे सरळ संभाषण करायचे आहे. ज्यासाठी मी या मुलांना ओलीस ठेवले आहे."

फोटो स्रोत, Rohit Arya
पुढे रोहित म्हणाला की, "तुमच्या एखाद्या छोट्या चुकीमुळे मला प्रवृत्त केले तर मी हे ठिकाण जाळून टाकेन. मी मरेन की नाही माहिती नाही पण मुलांना दुखापत नक्की होईल. त्यांना मोठा धक्का बसेल. त्यापलीकडे जर काही झाले तर मला सांगू नका.
या सगळ्याला मला दोषी ठरवू नये. त्या लोकांना दोषी ठरवा जे उगाचच प्रवृत्त करत आहेत. एका सर्वसामान्य माणसाला केवळ बोलायचे आहे. माझे बोलणे झाल्यावर मी स्वत:च बाहेर येईन.अनेक प्रयत्न झाले. अनेकांना अनेक वेळा भेटून झाले. 1 मे पासून साधे उपोषण करून देखील अजून आज किंवा उद्या असेच होत आहे. आजपासून तीव्र उपोषण सुरु केले. आता पाणी सुद्धा घेणार नाही. गांभीर्य समजून घेतले तर बरे होईल."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











