You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुढच्या 5 दिवसांत महाराष्ट्रात कुठे आणि किती पाऊस पडणार?
देशाच्या पूर्व किनारपट्टीचा विचार करता काल (20 जुलै) ओडिशाच्या किनारपट्टीवरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. तिथे आता ठळक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. आज (21 जुलै) हा कमी दाबाचा पट्टा ओडिशा आणि छत्तीसगडच्या परिसरात आहे.
पश्चिमेला दक्षिण गुजरात ते उत्तर केरळपर्यंतच्या किनारपट्टीलगत असलेला कमी दाबाचा पट्टा स्थिर आहे.
आज (21 जुलै) गोव्यासह महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर उद्या (22 जुलै) कोकणात आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
आज (21 जुलै) ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये त्याचबरोबर पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात, गोंदिया, नागपूर जिल्ह्यात, 116 - 204 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासात 116 ते 204 मिमी पर्यंत पाऊस कोसळण्याची शक्यता असल्यामुळे त्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील 24 तासातील पावसाचा अंदाज
उद्या (22 जुलै) कोकणात आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उद्या (22 जुलै) रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांच्या घाट विभागात, भंडारा जिल्ह्यात 116 - 204 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
याशिवाय पुणे आणि परिसरात पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सैरी पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पुढील 3-4 दिवसांसाठी पावसाचा अंदाज
राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये भागात पुढील 3-4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
उद्या (22 जुलै) रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांच्या घाट विभागात, भंडारा जिल्ह्यात 116 - 204 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तर 23 जुलैला रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाट विभागात 116 - 204 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
24 जुलैला पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अती-मुसळधार म्हणजे 116 - 204 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
आजपासून (21 जुलै) पुढील पाच दिवस कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.
त्यामुळे या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
रत्नागिरी, कोल्हापूरात मुसळधार पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असून राजापूरची अर्जुना व कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे
आज सकाळपासूनच सर्वत्र जोरदार पाऊस होता. राजापूरच्या अर्जुना नदी तसेच गोदावरी नदीचा राजापूर शहराला मागील दोन दिवसापासून पुराच्या पाण्याचा वेढा असून आज सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा बाजारपेठेमध्ये पुराचे पाणी शिरू लागले आहे.
कोल्हापूर आणि सांगलीत पावसाची संततधार
जिल्ह्यात पडणाऱ्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू असून 39 फूट इशारा तर 43 फूट धोका पातळी असून पंचगंगेची पाणी पातळी 37 फूट झाली आहे.
मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 79 बंधारे पाण्याखाली गेल्याने 7 राज्य मार्ग बंद तर 12 जिल्हा मार्ग बंद झाले असून वाहतूक अन्य मार्गाने वळवली आहे. राधानगरी धरण 77 टक्के भरल्यामुळे त्यातून 1450 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
सांगली जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वाण आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.
शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रा मध्ये अतिवृष्टी झाली असून गेल्या 24 तासात 75 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होऊन धरण 72 टक्के भरले आहे. सध्या कृष्णा नदी दुथडी वाहू लागली आहे, आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पाण्याची पातळी 18 फुटांवर पोहोचली आहे.
अलमट्टी धरणाची पाणी पातळी वाढली
कर्नाटकमधील अलमट्टी धरणाची पाणी पातळी देखील वाढ झाली आहे. गेल्या 6 तासात अलमट्टी धरणात 1 लाख क्यूसेक पाण्याची आवक झाल्याने अलमट्टी धरण प्रशासनाकडून विसर्ग करण्यात येत असून 1 लाख 25 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
123 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या धरणात सध्या 97.700 टीएमसी पाणी साठा झाला असून अलमट्टी धरणातून पाणी विसर्ग व पाणी पातळी नियंत्रण ठेवण्यावर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सांगली पाटबंधारे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.