केदारनाथहून परतणारं हेलिकॉप्टर दरीत कोसळलं, महाराष्ट्रातल्या तिघांसह 7 जणांचा मृत्यू

उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात रविवारी (15 जून) सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळलं. हे हेलिकॉप्टर केदारनाथ धाम येथून यात्रेकरूंना गुप्तकाशी तळावर परत आणत होते. या हेलिकॉप्टरमध्ये 6 प्रौढ व्यक्ती आणि एक बाळ होते.

खोऱ्यातील हवामान अचानक बिघडल्यानं हेलिकॉप्टर अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे.

उत्तराखंडचे जिल्हा पर्यटन विकास अधिकारी आणि नोडल हेलिकॉप्टर सर्व्हिस राहुल चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आज (15 जून) सकाळी आम्हाला एक हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच आम्ही त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

"प्राथमिक माहितीनुसार, आर्यन एव्हिएशनचे एक हेलिकॉप्टर केदारनाथ धाम येथून प्रवाशांना त्यांच्या गुप्तकाशी तळावर परत आणत होते. त्यावेळी खोऱ्यातील हवामान अचानक बिघडले. पायलटने हेलिकॉप्टरला खोऱ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण यादरम्यान हेलिकॉप्टर कोसळले."

महाराष्ट्रातील तिघांचा मृतांमध्ये समावेश

केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जयस्वाल कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाला. राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल, दोन वर्षांची मुलगी काशी जयस्वाल अशी मृतांची नावं आहेत.

यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी बीबीसी मराठीशी बोलताना, केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात जयस्वाल कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला.

जयस्वाल यांचा मुलगा विवान पांढरकवडा येथील आजोबांकडे थांबल्यानं तो या अपघातातून बचावला. त्यांनी एक वर्षापूर्वीच त्यांच्या मुलीचं नाव काशी असं ठेवलं होतं.

राजकुमार जयस्वाल कोण आहेत?

राजकुमार जयस्वाल हे कोळसा व्यापारी आहेत. त्यांचा ट्रान्स्पोर्टचाही व्यवसाय आहे. यवतमाळच्या वणीमध्ये ते भगवान शिवभक्त म्हणून ओळखले जात होते.

प्रदीप मिश्रा यांचा शिवपुराण कार्यक्रम वणीत आणण्यात जयस्वाल यांचा वाटा होता.

राजकुमार जयस्वाल यांनी अगदी लहान वयातच एक व्यावसायिक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्यांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी श्रद्धा यांच्याशी लग्न केलं होतं.

जयस्वाल यांचे वणीमधील वरोरा बायपासजवळ कार्यालय आहे. त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुलं आणि आई आहेत. ते वणीत अतिशय धार्मिक व्यक्ती म्हणूनही ओळखले जात होते. त्यांच्या अचानक निधनाने संपूर्ण वणी परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

पुष्कार सिंह धामी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं की, "रुद्रप्रयाग जिल्ह्यात हेलिकॉप्टर अपघाताची अतिशय दुःखद बातमी मिळाली आहे. एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्य करत आहे. सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मी बाबा केदार यांना प्रार्थना करतो."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)