You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
DeepFake : ज्यामुळे तुमच्या क्लोनचा वापर पॉर्नसाठी आणि राजकीय कुरघोडीसाठी होऊ शकतो
- Author, निक मार्श
- Role, बिझनेस प्रतिनिधी, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
स्वत:चा डीपफेक तयार करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी आणि फुटबॉलपटू तंत्रज्ञान कंपनींसोबत करार करत आहेत.
तुम्ही नेटफ्लिक्सवरची नुकतीच रीलिज झालेली ब्लॅक मिररची नवीन सिरीज पाहिली का? त्यामधील सलमा हाएक ही अभिनेत्री ही खरीखरू नसून तिचा तो डीपफेक आहे, असं सांगितलं तर तुम्ही आश्चर्य वाटून घेऊ नका.
चार्ली बेकरची नेटफ्लिक्सवरील ब्लॅक मिररची नवीन सीरिज नुकतीच रीलिज झाली आहे.
या मालिकेच्या पहिल्या भागात अभिनेत्री सलमा हाएक ही एका डीपफेकमध्ये दाखवण्यात आली आहे. यासाठी तिने एका प्रॉडक्शन कंपनीसोबत करार केला होता.
कराराचा एक भाग म्हणून तिचा ब्लॅक मिररमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तिचा डीपफेक दाखवला आहे.
या सिरीजमध्ये ती जे काही बोलते आणि करते ते सर्व कॉम्प्युटरून नियंत्रित करण्यात आलं आहे.
तसंच सिंगापूरची अभिनेत्री जेमी येओने अलीकडंच डीपफेक तंत्रज्ञानासाठी एका कंपनीसोबत करार केलाय. अशाप्रकारे अनेक सेलिब्रिटी डीपफेकचा वापर करण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वी हॉलीवूडमध्ये एक संप झाला. चार दशकांनंतर पहिल्यांदाच हा संप झाला. AIच्या वाढत्या प्रभावामुळे हा संप करण्यात आला होता असं सांगितलं.
या संपामुळे अमेरिकेतील अनेक चित्रपट आणि टीव्ही शोचे शूटिंग थांबलं होतं.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी कायदे करावेत अशी स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड (SAG-AFTRA)ची मागणी होती. पण त्याबाबचा करार अयशस्वी झाल्याने संप करण्यात आला होता.
कृत्रिम बुद्धिमत्ता ही कलाकारांच्या अस्तित्वावरच घाला घालेल असा दावा करण्यात येतोय.
पण सिंगापूरची जेमी येओ'ला याची चिंता वाटत नाही. AI चा वापर करून जाहिराती तयार करणाऱ्या सेलिब्रिटींपैकी ती एक आहे.
या आधुनिक तंत्रज्ञानावर चित्रपटसृष्टीतून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
जेमी येओने 'ह्यूगोसेव्ह' या तंत्रज्ञान कंपनीसोबत करार केला आहे.
याचा एक भाग म्हणून कंपनी जेमी येओ हिचे डीपफेक तयार करते आणि त्यातून पैसे कमवते.
'डीपफेक व्हीडिओ करणं सोपं'
जेमी येओच्या मते हे खूप सोपं आहे. यासाठी पहिल्यांदा अनेक तास हिरव्या पडद्यासमोर उभं राहावं लागतं.
तिथे तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि शरीराच्या हालचाली टिपल्या जातात.
त्यानंतर तिच्या आवाजाचा अभ्यास करण्यासाठी तिने रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आणखी काही तास घालवले.
पुढे तिचे व्हीडिओ आणि ऑडिओ एकरूप (synchronise) केले. मग तिचा एक डिजिटल अवतार तयार केला. जो तिच्याकडून अगदी काहीही करून घेऊ शकतो.
“मी याविषयीची चिंता समजू शकते. पण हे तंत्रज्ञान आपल्यासोबत असणार आहे. त्याला नजरअंदाज करता येणार नाही. तुम्ही ते घाबरून बाजूला ठेवलं तर इतर त्याचा चांगला उपयोग करतील आणि पुढे जातील,” असं जेमी सांगते.
दुसरीकडे फुटबॉल सुपरस्टार लिओनेल मेस्सी पण डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. त्याने लेज क्रिस्प्ससाठी पेप्सिको कंपनीसोबत करार केला आहे. त्यामुळे मेस्सीचा या जाहिरातींमध्ये डीपफेक म्हणून वापर होत आहे.
एवढंच नाही तर मेस्सीचे फॅन्ससुद्धा त्याचा डीपफेक वापरून त्याचे व्हीडिओ मेसेज तयार करत आहेत.
डीपफेकमधील मेस्सी इंग्रजी, स्पॅनिश, पोर्तुगीज आणि तुर्की भाषेत बोलू शकतो.
आणखी एक फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम आणि हॉलिवूडचा दिग्गज ब्रूस विलिस यांनीही डीपफेक तंत्रज्ञानासाठी करार केला आहे.
येत्या काळात डीपफेक हे जाहिरातींमध्ये सामान्य बाब बनेल, असं किंग्ज कॉलेज लंडनचे मार्केटिंग तज्ज्ञ डॉ. कर्क प्लॉन्गर यांना वाटतं.
"डीपफेकमुळे लोकांच्या कल्पकतेचे अनेक दरवाजे उघडतील. याच्या मदतीने ग्राहकांपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे पोहोचता येईल. यामुळे चांगले परिणाम देखील मिळू शकतात,” असं कर्क सांगतात
डीपफेक हे आर्थिकदृष्ट्या परवडणारंही आहे, असंही ते म्हणतात.
"आम्हाला पूर्वीसारखं काम करावं लागणार नाही," असं जेमी सांगते.
तिच्या मते, याचा ग्राहकांना पण फायदा होईल. कारण कमी पैशात त्यांना अधिक चांगलं कंटेंट मिळू शकेल.
तिचे जाहिरातीसाठीचे ग्राहक ह्यूगोसेव्ह (Hugosave) यांनाही हा दावा पटतोय.
"या तंत्रज्ञानामुळे काही दिवसातच शेकडो व्हीडिओ बनवता येतात. नाहीतर याला आधी महिने आणि कधीकधी वर्षही लागायचे,” असं ह्यूगोसेव्हचे सह-संस्थापक, मुख्य उत्पादन अधिकारी ब्रह्म जीझेली म्हणतात.
असं करत असताना आम्ही त्याचा मानवी चेहरा जपत असल्याचं जीझेली सांगतात.
डीपफेकची 'काळी बाजू'
या तंत्रज्ञानाची दुसरी बाजूही असल्याचं या विषयाचे तज्ज्ञ डॉ. प्लांजर सांगतात.
"जाहिरात उद्योगाने याचे धोके लवकर ओळखले पाहिजेत. या तंत्रज्ञानाचा नैतिक आणि योग्य रीतीने वापर कसा करता येईल यावर लक्ष देणं गरजेच आहे," असं प्लांजर सांगतात.
यामुळे विश्वासाहर्तेवर प्रश्न उठू शकतात. कोणतं खरं आणि कोणतं खोटं हे ग्राहक ओळखू शकणार नाहीत, असं प्लांजर यांना वाटत.
दुसरीकडे काहीजण त्याचा वापर पॉर्नसाठी तर काहीजण राजकीय कुरघोडीसाठी करत आहेत.
काही लोक स्वेच्छेने येथे डिपफेकसाठी साइन अप करत आहेत. पण त्यांचा डेटा अनैतिक हेतूंसाठी वापरण्यापासून संरक्षित करण्यासाठी सध्या कोणतेही स्पष्ट नियम नाहीत.
उदाहरणार्थ एखादा ब्रँड तुमची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी तुमचा डिजिटल अवतार वापरत असल्यास किंवा कोणीतरी अनैतिक मार्गांनी त्याचा वापर करत असल्यास त्यावर काय कारवाई केली जाईल याविषयी सध्या काहीच तरतूद नाहीये.
सिंगापूरमधील बौद्धिक संपदा हक्कांचे वकील टेंग शेंग रोंग म्हणाले, "कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डीपफेक तंत्रज्ञानाबद्दल आपल्याला अजूनही बरेच काही समजून घेणे आवश्यक आहे."
अनेक नवीन समस्या उद्भवू शकतात. यावरील बौद्धिक संपदा अधिकार कोणाचे आहेत? काही कायदेशीर गुंतागुंत असेल तर कुठे जायचे? अजूनही असे प्रश्न असल्याचं टेंग सांगतात
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)