अयोध्या : राम मंदिर आंदोलनाचं नेतृत्व करणारे नेते आता कुठे आहेत?

अयोध्येतील राम मंदिराच्या 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्यासाठी राजकारण, चित्रपट आणि व्यवसाय क्षेत्रातील बड्या व्यक्तींना निमंत्रण देण्यात आलं आहे.

ज्यांनी 1990 च्या दशकात राम मंदिर आंदोलनाचं नेतृत्व केलं ते भारतीय जनता पक्षाचे चेहरे आहेत त्यांचाही यात समावेश आहे

मात्र या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना राम मंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित राहू नये, अशी विनंती करण्यात आली आहे.

त्यामागे त्यांची प्रकृती आणि वय हे कारण सांगण्यात आलं आहे.

माध्यमांशी बोलताना राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, "लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांसारख्या ज्येष्ठ भाजप नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे, पण ते या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.

ते म्हणाले, "अडवाणीजींची उपस्थिती अनिवार्य आहे, पण आम्ही त्यांनाही येऊ नका असं सांगू. डॉ. जोशी यांच्याशी माझं थेट बोलणं झालं आहे. मी त्यांना येऊ नका असं सांगत राहिलो, आणि ते येणारच असा आग्रह धरत राहिले. मी वारंवार म्हणत राहिलो की तूमच वय झालं आहे, थंडी आहे आणि शस्त्रक्रिया करुन तुमचे गुडघे बदलले आहेत."

या दोघांशिवाय उमा भारती, साध्वी ऋतंभरा, कल्याण सिंह आणि अशोक सिंघल या हिंदू नेत्यांनीही राम मंदिर आंदोलनाचं नेतृत्व केलं.

2014 मध्ये भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या मुद्द्यांवर सत्तेत आले त्यात राम मंदिराचं बांधकामही महत्त्वाचं होतं. आता 22 जानेवारीला राम मंदिर आंदोलनाचा हेतू साध्य होणार आहे.

या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्याला पोहोचतील तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे असतील. पण ते चेहरे कुठे आहेत ज्यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं.

अडवाणी आणि जोशी यांची तब्येत कशी आहे?

लालकृष्ण अडवाणी आता 96 वर्षांचे आहेत आणि मुरली मनोहर जोशी पुढील महिन्यात 90 वर्षांचे होणार आहेत.

नव्वदच्या दशकात विश्व हिंदू परिषदेनं अयोध्या, काशी आणि मथुरा येथील मंदिरं 'मुक्त' करण्याची मोहीम सुरू केली आणि त्याअंतर्गत लालकृष्ण अडवाणींनी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली.

मात्र, बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी त्यांना समस्तीपूर जिल्ह्यात अटक केली होती.

अडवाणींवर मशीद पाडण्याचा कट रचल्याप्रकरणी फौजदारी खटलाही दाखल करण्यात आला होता.

या वर्षी 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंह यांसारखे भाजप नेते अडवाणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते.

अडवाणींसोबतचा फोटो शेअर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलं होतं, "माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे माजी अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो आणि त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या."

मुरली मनोहर जोशी हे राम मंदिर आंदोलनात सक्रियपणे सहभागी झालेले अडवाणींनंतरचे भारतीय जनता पक्षाचे दुसरे मोठे नेते आहेत.

6 डिसेंबर 1992 रोजी घटनेच्या वेळी ते वादग्रस्त जागेजवळ उपस्थित होते. घुमट पडल्यावर उमा भारतींनी त्यांना आलिंगन दिलं. ते वाराणसी, अलाहाबाद आणि कानपूरमधून खासदार राहिले आहेत.

हे दोन्ही नेते सध्या भाजपच्या मार्गदर्शक मंडळात आहेत. पण हे दोघेही सध्या सार्वजनिक जीवनात फारसे सक्रिय दिसत नाहीत.

उमा भारती

तीन दशकांपूर्वी राम मंदिर आंदोलनाच्या नेतृत्वात उमा भारती यांचाही सहभाग होता. या आंदोलनातून उमा भारतींना देशभरात राजकीय ओळख मिळाली.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी बाबरी पाडल्यानंतर दहा दिवसांनी स्थापन करण्यात आलेल्या लिबरहान आयोगाला त्यांची भूमिका सदोष असल्याचं आढळून आलं. उमा भारती यांच्यावर जमावाला भडकवल्याचा आरोप होता, तो त्यांनी फेटाळला.

केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये त्या मंत्री होत्या. उमा भारती 2003 ते 2004 दरम्यान मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीही होत्या.

मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीपासून त्या दूर होत्या. यानंतर त्यांना पक्षातून बाजूला केलं जाणार असल्याची चर्चा होत राहिली.

नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश निवडणुकीसाठी भाजपने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली तेव्हा त्यात उमा भारती यांचं नाव नव्हतं.

उमा भारती यांनी मध्य प्रदेश निवडणुकीपूर्वी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

साध्वी ऋतंभरा

साध्वी ऋतंभरा या एकेकाळी हिंदुत्ववादी फायरब्रँड नेत्या होत्या.

बाबरी मशीद पाडल्या प्रकरणात त्याच्यावर गुन्हेगारी कट रचण्याचे आरोप ठेवण्यात आले होते.

अयोध्या आंदोलनादरम्यान त्यांच्या धगधगत्या भाषणांच्या ऑडिओ कॅसेट्स देशभर झळकत होत्या ज्यात त्या आपल्या विरोधकांना 'बाबर की औलाद' (बाबराची मुलं) म्हणत आव्हान देत असत.

साध्वी ऋतंभरा यांचा वृंदावनमध्ये वात्सल्यग्राम नावाचा आश्रम आहे.

साध्वी ऋतंभरा यांचा समावेश अशा लोकांमध्ये आहे, ज्यांना 22 जानेवारीचं सर्वप्रथम निमंत्रण मिळालं.

कल्याण सिंह

कल्याण सिंह हे 6 डिसेंबर 1992 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांच्यावर आरोप होता की त्यांच्या पोलीस आणि प्रशासनानं जाणूनबूजून कारसेवकांना रोखलं नाही.

नंतर कल्याण सिंह यांनी भाजपपासून वेगळं होऊन राष्ट्रीय क्रांती पक्षाची स्थापना केली पण ते पुन्हा भाजपमध्ये परतले.

मशीद पाडण्याचा कट रचल्याचा आरोप असलेल्या 13 लोकांमध्ये कल्याण सिंह यांच्या नावाचा समावेश होता. कल्याण सिंह यांचं ऑगस्ट 2021 मध्ये वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं.

अशोक सिंघल

रामजन्मभूमी आंदोलनाला जन्म देणाऱ्यांमध्ये अशोक सिंघल यांचंही नाव घेतलं जातं.

मंदिर उभारणी चळवळीला जनतेचा पाठिंबा मिळवून देण्यात अशोक सिंघल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अनेकांच्या नजरेत ते राम मंदिर आंदोलनाचे 'मुख्य शिल्पकार' होते.

2011 पर्यंत ते विहिंपचे अध्यक्ष राहिले आणि नंतर प्रकृतीच्या कारणामुळे राजीनामा दिला. 17 नोव्हेंबर 2015 रोजी त्यांचं निधन झालं.

विनय कटियार आणि प्रवीण तोगडिया

1984 मध्ये राम मंदिर आंदोलनासाठी 'बजरंग दल'ची स्थापना करण्यात आली आणि आरएसएसनं त्याचे पहिले अध्यक्ष म्हणून विनय कटियार यांच्याकडे जबाबदारी सोपवली.

कटियार यांचं राजकीय महत्त्व वाढलं आणि ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीसही झाले. कटियार हे फैजाबाद (अयोध्या) लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.

ते राज्यसभेचे खासदारही होते. मात्र, 2018 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना पुन्हा तिकीट मिळालं नाही.

त्याचवेळी विश्व हिंदू परिषदेचे आणखी एक नेते प्रवीण तोगडिया हे राममंदिर आंदोलनाच्या काळात खूप सक्रिय होते.

पण त्यांनी विहिंपपासून वेगळं होऊन आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद नावाची संघटना स्थापन केली. राम मंदिराच्या उभारणीपूर्वी ते अनेकवेळा पंतप्रधान मोदींवर टीका करत राहिले.

चंपत राय यांनी आणखी काय सांगितलं?

माजी पंतप्रधान देवेगौडा यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यासाठी तीन सदस्यीय टीम तयार करण्यात आल्याचं चंपत राय यांनी सांगितलं.

ते म्हणाले, "सहा दर्शन परंपरेतील शंकराचार्य आणि 150 साधू-संत यात सहभागी होणार आहेत. याशिवाय सुमारे 4000 संत आणि 2,200 इतर पाहुण्यांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे."

चंपत राय म्हणाले की, काशी विश्वनाथ, वैष्णो देवी यांसारख्या मोठ्या मंदिरांना आणि धार्मिक आणि संवैधानिक संस्थांच्या प्रमुखांनाही निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.

राय म्हणाले की धार्मिक नेते दलाई लामा, केरळच्या माता अमृतानंदमई, योगगुरू रामदेव, सिनेस्टार रजनीकांत, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अरुण गोविल, चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि मुकेश अंबानी, अनिल अंबानी यांसारखे प्रसिद्ध उद्योगपती, प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत, इस्रोचे संचालक नीलेश देसाई या सारख्या बड्या व्यक्तींना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे.

ते म्हणाले की, 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्यानंतर 24 जानेवारीपासून पुढील 48 दिवस 'मंडलपूजा' होणार आहे. 23 जानेवारीपासून मंदिर भाविकांसाठी खुलं होणार आहे.

राय म्हणाले की, पाहुण्यांच्या राहण्यासाठी अयोध्येत तीनहून अधिक ठिकाणी पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय विविध मठ, मंदिरं आणि सर्वसामान्यांनाही 600 खोल्या तयार ठेवल्या आहेत.

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)