हंता व्हायरसचा अटलांटिक महासागरात जहाजावर उद्रेक, उंदरांच्या विष्ठेमधून पसरतो विषाणू

हंताव्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, यांग तियान
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

अटलांटिक महासागरात प्रवास करणाऱ्या एका क्रूझ जहाजावर संशयित हंता व्हायरसचा उद्रेक झाल्यामुळं तीन जणांचा मृत्यू झाला असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) सांगितलं आहे.

जहाजावरील प्रकरणांपैकी एक हंता व्हायरसच्या प्रकरणाला दुजोरा मिळाला आहे, तर आणखी पाच संशयित रुग्णांची तपासणी सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.

संशयित प्रकरणांबाबत सविस्तर तपास सुरू असून आता प्रयोगशाळा चाचण्या केल्या जाणार असल्याचं WHO नं बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.

महासागरातील एम व्ही होंडीयस जहाजावर हा उद्रेक झाला असल्याचं समोर आलं आहे. हे जहाज अर्जेंटिनामधून केप वर्डेकडं जात होतं.

काय आहे हंता व्हायरस?

हंता व्हायरस हा उंदरांद्वारे पसरणाऱ्या विषाणूंचा एक प्रकार आहे. हा विषाणू प्रामुख्यानं उंदरांच्या सुकलेल्या विष्ठेतून हवेत पसरलेले कण श्वासाच्या माध्यमातून मानवाच्या शरीरात प्रवेश करतो आणि पसरतो.

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिस कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) च्या माहितीनुसार उंदरांचं मूत्र, विष्ठा किंवा लाळेतून हा विषाणू हवेत पसरल्यानंतर त्याचा संसर्ग पसरत जातो.

उंदीर चावल्यामुळं किंवा त्यांच्या ओरखड्याच्या माध्यमातूनही याचा संसर्ग होतो पण अशी प्रकरणं दुर्मिळ असतात.

हंताव्हायरस

फोटो स्रोत, AFP via Getty Images

या विषाणूमुळं दोन गंभीर आजार होण्याची दाट शक्यता असते.

पहिला आजार म्हणजे हंताव्हायरस पल्मनरी सिंड्रोम (Hantavirus Pulmonary Syndrome-HPS) हा आहे.

यामध्ये सुरुवातीला थकवा, ताप आणि स्नायूंमध्ये वेदना असे त्रास होतात. त्यानंतर डोकेदुखी, चक्कर, थंडी वाजणं आणि पोटाशी संबंधित त्रास होताता. श्वसनाशी संबंधित लक्षणं दिसल्यास याच्या प्रकरणांमध्ये सुमारे 38% मृत्यूदर असतो अशी माहिती CDC नं दिली आहे.

तर यामुळं होणारा दुसरा आजार म्हणजे हेमोरॅजिक फिव्हर विथ रेनल सिंड्रोम (Haemorrhagic Fever with Renal Syndrome HFRS) हा आहे.

हा अधिक गंभीर आजार असून प्रामुख्यानं त्याचा परिणाम मूत्रपिंडांवर होतो. त्यानंतर रक्तदाब कमी होणं, अंतर्गत रक्तस्राव आणि मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणं दिसू शकतात.

जगभरात दरवर्षी किती प्रकरणं नोंदवली जातात?

नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थच्या अहवालानुसार, जगभरात दरवर्षी HFRS ची जवळपास दीड लाख प्रकरणं आढळतात. युरोप आणि आशियामध्ये त्याचं अधिक प्रमाण आहे. यापैकी निम्म्याहून अधिक प्रकरणं चीनमध्ये आढळतात.

अमेरिकेतील ताज्या आकडेवारीनुसार 1993 पासून 2023 पर्यंत 30 वर्षांमध्ये हंताव्हायरसची 890 प्रकरणं नोंदवली गेली आहेत.

पण सोल व्हायरस (Seoul virus) हा हंताव्हायरसचा एक प्रमुख प्रकार असून तो नॉर्वेमधील उंदरांद्वारे पसरतो आणि अमेरिकेसह तो जगभरात आढळतो.

यावरील उपचार, उपाय काय?

हंताव्हायरसचा संसर्ग झाल्यास त्यासाठी कोणतेही विशिष्ट उपचार उपलब्ध नाही.

CDC नं दिलेल्या माहितीनुसार लक्षणांनुसार उपचार केले जातात. त्यात ऑक्सिजन थेरपी, व्हेंटिलेशन, अँटीव्हायरल औषधं आणि डायलिसिसचा समावेश असू शकतो.

गंभीर रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करावं लागू शकतं. तर काही प्रकरणांमध्ये श्वासोच्छ्वासासाठी ट्यूब (intubation) लावावी लागू शकते.

हंताव्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

घर किंवा कामाच्या ठिकाणी उंदरांपासून दूर राहणं हे संसर्ग टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. घरातील बेसमेंट किंवा पाईपमध्ये उंदरांनी प्रवेश करू नये म्हणून शक्य त्या उपाययोजना करण्याची शिफारसही केली जाते.

उंदरांची विष्ठा साफ करताना ग्लोव्हज आणि मास्क सारख्या संरक्षक साधनांचा वापर करण्याचा सल्लाही दिला जात आहे.

अलिकडच्या काळात हंता व्हायरसची प्रकरणे आढळली का?

फेब्रुवारी 2025 मध्ये ऑस्कर विजेते अभिनेते जेन हॅकमन यांच्या पत्नी बेट्सी अराकावा यांचा हंता व्हायरसशी संबंधित श्वसनाच्या आजारामुळं मृत्यू झाला होता.

वैद्यकीय तपासणी केलेल्यांच्या मते, अराकावा यांना HPS झाला होता. हा अमेरिकेतील संसर्गाचा सामान्य प्रकार आहे. त्यांच्या घराजवळील बाहेरील इमारतींमध्ये उंदरांची बिळं आणि काही मृत उंदीर आढळले होते.

पोलिसांतील नोंदीनुसार मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी इंटरनेटवर फ्लू आणि कोविडच्या लक्षणांबाबत सर्चिंग केलं होतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)