H3N2 इन्फ्लुएन्झा काय आहे? त्याची लक्षणं कोणती? थंडीच्या काळात काय काळजी घ्याल?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, H3N2 इन्फ्लुएन्झाची जगभर चर्चा सुरू आहे, कारण सगळ्या जगात या फ्लूमुळे लोक आजारी पडतायत.
    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

H3N2 इन्फ्लुएन्झाची जगभर चर्चा सुरू आहे, कारण सगळ्या जगात या फ्लूमुळे लोक आजारी पडतायत.

तसं पहायला गेलं तर थंडीच्या काळात फ्लूच्या केसेस वाढतात. कारण इन्फ्लुएन्झाचा व्हायरस थंड वातावरणात अधिक काळ टिकून राहू शकतो.

ऑगस्ट 2025 पासून H3N2 इन्फ्लुएन्झाच्या केसेस झपाट्याने वाढल्याचं जागतिक आरोग्य संस्था (WHO) ने म्हटलंय.

हा H3N2 इन्फ्लुएन्झा किती गंभीर आहे? भारतात आहे का? आणि याची लक्षणं काय आहेत?

H3N2 इन्फ्लुएन्झा काय आहे? याची माहिती घेऊ.

फ्लू म्हणजे इन्फ्लुएन्झा ज्या विषाणूंमुळे होतो त्यांची विभागणी साधारण चार प्रकारात केली जाऊ शकते.

  • Type A (H1N1, H3N2)
  • Type B (Yamagata, Victoria
  • Type C
  • Type D

इन्फ्लुएन्झा A व्हायरस मुळे हा H3N2 इन्फ्लुएन्झा होतो. दरवर्षी फ्लूचे काही व्हायरस पसरतात त्यापैकीच हा एक आहे.

पण इतर फ्लूंच्या तुलनेत यामुळे येणारं आजारपण जरा जास्त असतं आणि इतर प्रकारांच्या तुलनेत हा जास्त वेगाने पसरतो.

या प्रकारच्या व्हायरसमध्ये म्युटेशन्स म्हणजे बदल होतात. म्हणून दर फ्लू सीझनच्या वेळी हा व्हायरस थोडा बदललेला असतो. H3N2 मध्ये आतापर्यंत 7 म्युटेशन्स झाल्याचं आढळून आलंय.

या व्हायरसच्या आताच्या म्युटेशनला H3N2 'subclade K' म्हटलं जातंय.

हा व्हायरस नवीन नाही. भारतातही हा व्हायरस आहे. 2017-2018 मध्ये या H3N2 चा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला होता. 2023 मध्येही हा संसर्ग पसरला होता.

H3N2 चा धोका कुणाला अधिक?

H3N2 हा प्रामुख्याने आपल्या शरीरातल्या श्वसनयंत्रणेवर (respiratory system) वर हल्ला करतो.

याचा संसर्ग कुणालाही होऊ शकतो, पण लहान मुलं, गरोदर महिला, म्हातारी माणसं आणि दीर्घकालीन आजार, श्वसनयंत्रणेचे आजार असणाऱ्या व्यक्तींना याचा धोका अधिक असतो.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, H3N2 चा संसर्ग कुणालाही होऊ शकतो, पण लहान मुलं, गरोदर महिला, म्हातारी माणसं आणि दीर्घकालीन आजार, श्वसनयंत्रणेचे आजार असणाऱ्या व्यक्तींना याचा धोका अधिक असतो.

काही केसेसमध्ये रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज लागू शकते.

तुमची लाईफस्टाईल चांगली नाही, रोग-प्रतिकारशक्ती कमी असेल, तर तुम्हालाही हा संसर्ग पटकन होऊ शकतो.

H3N2 कसा पसरतो?

H3N2 इन्फ्लुएन्झा अगदी सहजपणे आणि वेगाने पसरतो. हा संसर्ग कसा होतो?

  • संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शिंकण्या-खोकण्यातून, बोलताना उडालेल्या तुषारांद्वारे.
  • संसर्ग झालेल्या व्यक्तीसोबत थेट संपर्क - हस्तांदोलन, मिठी किंवा अधिक जवळीक.
  • संसर्गबाधित तुषार असणाऱ्या पृष्ठभागांद्वारे म्हणजे तुषारांद्वारे बाहेर फेकला गेलेला हा व्हायरस दरवाजाची हँडल्स, मोबाईल, कीबोर्ड्स, टेबलं अशा पृष्ठभागांवर टिकून राहू शकतो.
  • याला हात लागला आणि नंतर त्याच हातांनी डोळे, तोंड, नाकाला स्पर्श केल्याने संसर्ग होऊ शकतो.
ग्राफिक
  • बंद जागी हवेत असलेल्या विषाणूंमुळे, बंद खोलीतल्या हवेत हा व्हायरस टिकून राहू शकतो. त्यामुळे तिथे हे इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.
  • घरातल्या एकाला हा संसर्ग झाल्यास तो इतरांनाही होण्याची शक्यता असते.

H3N2 इन्फ्लुएन्झाची लक्षणं काय?

हा श्वसनयंत्रणेवर परिणाम करणारा संसर्ग आहे आणि प्रत्येकावर याचे परिणाम वेगवेगळे आणि वेगवेगळ्या तीव्रतेचे दिसून येतात.

काहींसाठी लक्षणं अगदी सौम्य असू शकतात तर काहींसाठी गंभीर. डॉक्टर तुम्हाला प्रत्यक्ष तपासून आणि रक्तचाचणी करून याचं निदान करू शकतात.

थंडी आणि ताप, सतत खोकला येणं, घसा खवखवणं, नाक चोंदणं, अंग आणि स्नायूदुखी, डोकेदुखी, थकवा, नाक गळणं, शिंका येणं, गॅस्ट्रोसारखी लक्षणं अशा सगळ्या गोष्टी यात होऊ शकतात.

साधारण 7 ते 10 दिवस हा संसर्ग टिकतो. पण सतत जास्त ताप भरत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल, प्रचंड थकवा, छातीत दुखणं अशी लक्षणं असतील, तर लगेच डॉक्टरांकडे जा.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, थंडी आणि ताप, सतत खोकला येणं, घसा खवखवणं, नाक चोंदणं, अंग आणि स्नायूदुखी, डोकेदुखी, थकवा, नाक गळणं, शिंका येणं, गॅस्ट्रोसारखी लक्षणं अशा सगळ्या गोष्टी यात होऊ शकतात.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना मुंबईतल्या फोर्टिस हॉस्पिटलच्या संसर्गजन्य विकारांच्या तज्ज्ञ डॉ. कीर्ती सबनीस यांनी सांगितलं, "ज्या लोकांना आधीपासून श्वसनाचा आजार आहे म्हणजे अस्थमा किंवा फुफ्फुसांशी संबंधित इतर काही औषधं सुरू असतील, तर अशा लोकांमध्ये या इन्फेक्शनचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो.

ज्या पेशंटना आधीपासूनच इम्युनिटी कमी होण्याची औषधं सुरू असतील, म्हणजे किमोथेरपी किंवा आर्थरायटिसची औषधं सुरू असतील अशांना हे इन्फेक्शन इतरांपेक्षा लवकर होऊ शकतं आणि जास्त दिवस राहू शकतं."

पुढे त्या म्हणाल्या, "याची सर्वसामान्य लक्षणं म्हणजे, हा श्वासनलिकेचा आजार असल्याने सगळ्यात इतर कुठल्याही फ्लूसारखा आधी सर्दी - खोकला याचा त्रास सुरू होतो. घरामध्ये एक-दोन लोकांना एकत्र इन्फेक्शन होऊ शकतं.

H3N2 हे थंडीच्या महिन्यांमधलं इन्फेक्शन आहे. याच्या केसेस फक्त भारतात नाही तर इतर देशांमध्येही आढळून आलेल्या आहेत.

इन्फेक्शन जास्त झाल्यास यामध्ये लोकांना छातीत न्युमोनिया होतो. त्यामुळे श्वासाला त्रास होणं, खोकला जास्त वाढणं, ऑक्सिजनची पातळी कमी होणं अशा गोष्टी होऊ शकतात."

H3N2 पासून बचाव शक्य आहे का?

कुठल्याही प्रकारच्या फ्लूपासून बचावासाठी सर्वात महत्त्वाची ठरते ती लस. फ्लूची लस तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या संसर्गांपासून संरक्षण देऊ शकतं.

लस तुम्हाला संसर्ग होण्यापासून पूर्ण संरक्षण जरी देऊ शकत नसली, तरी त्यामुळे संसर्गाची तीव्रता कमी होईल, त्रास कमी होईल.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कुठल्याही प्रकारच्या फ्लूपासून बचावासाठी सर्वात महत्त्वाची ठरते ती लस.

फक्त याच नाही तर इन्फ्लुएन्झाच्या बहुतेक व्हायरसेसमध्ये म्युटेशन्स होत राहतात. त्यामुळे दरवर्षी फ्लूची लस घेणं चांगलं, असं WHO ने म्हटलंय.

यासोबतच हात किमान 20 सेकंद व्यवस्थित धुणं, नाक - तोंड - डोळे यांना सतत स्पर्श न करणं, सॅनिटायझर वापरणं, गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर या कोव्हिडच्या वेळी लागलेल्या सवयी इथेही फायद्याच्या ठरतील.

H3N2 कोव्हिडसारखा गंभीर आहे का?

गेल्या काही महिन्यांत जगभरातलंच H3N2 इन्फ्लुएन्झाचं प्रमाण वाढलेलं असलं तरी याला सीझनल इन्फ्लुएन्झाचीही जोड मिळत असल्याचं WHO ने म्हटलंय.

पण कोव्हिड -19 इतका हा व्हायरस गंभीर नाही. WHO ने त्याबद्दलची कोणतीही मार्गदर्शक नियमावली प्रसिद्ध केलेली नाही.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.