You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'आमच्या इथं नालेसफाई झालीच नाही, आभाळ भरून आलं की भीती वाटते'
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
मुंबईत 26 मे रोजी झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी साचल्याचं पाहायला मिळालं.
मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये तसेच रेल्वे,मेट्रो, हॉस्पिटल आणि घरांमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले होते.
मुंबईत पाणी साचण्यामागे अनेक कारणं आहेत. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मुंबईत दरवर्षीप्रमाणे होणारी नालेसफाई न होणे तसेच मिठी नदीची स्वच्छता न होणे ही प्रमुख कारणं आहेत.
यंदादेखील मुंबईत पावसाळ्यापूर्वी नालेसफाई ठिकठिकाणी सुरू असल्याचं मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं.
महापालिकेने निर्माण केलेल्या संकेतस्थळावर नालेसफाईची आकडेवारी दाखवत महापालिकेकडून नालेसफाईचा दावा करण्यात आला.
मात्र, प्रत्यक्षात पावसाळ्यापूर्वी मुंबईतली नालेसफाई ही अपुरीच असल्याचं चित्र अनेक भागांमध्ये बीबीसी मराठीच्या टीमला पाहायला मिळालं.
त्यामुळे नाले व्यवस्थित स्वच्छ न झाल्यामुळे तसंच मिठी नदीतला गाळ न काढल्यामुळे मुंबईकर चिंतेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आमचे हाल झाले की प्रशासनाला जाग येईल का?
मुंबईतील कुर्ला हनुमान नगर परिसरामध्ये राहणाऱ्या 57 वर्षाच्या मालती वाघ या यंदाच्या नालेसफाईवर असमाधानी असून पावसाळ्यात सामोरे जावं लागणाऱ्या समस्या सांगत चिंता व्यक्त करतात.
मालती वाघ यांनी त्यांच्या परिसरामध्ये असणाऱ्या नाल्यामधील खरी परिस्थिती काय हे बीबीसीच्या टीमला नेऊन दाखवले.
मालती वाघ या गेल्या 40 वर्षापासून कुर्ला हनुमान नगर परिसरामध्ये आपल्या कुटुंबासहित राहतात.
शेजारीच रस्त्याला आणि रेल्वेला दुभागून एक मोठा नाला त्यांच्या घराशेजारून जातो. हा नाला व्यवस्थित स्वच्छ न केल्यामुळे पावसाळ्यातील समस्यांमुळे त्रस्त असल्याचं त्या सांगतात.
मालती वाघ बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या की, "यंदा आमच्या इथे नालेसफाई झालीच नाही. आम्हाला थोडं जरी आभाळ भरून आलं तरी पाणी साचण्याची भीती वाटते. घरामध्ये पाणी येईल. घरातून बाहेर निघायचं कसं आणि घरात यायचं कसं हा प्रश्न पडतो."
पुढे वाघ म्हणाल्या की, "पालिकेकडून आमच्या या भागामध्ये मोठ्या नाल्यात सफाई झाली नाही, त्यामुळे साहजिकच पाणी जाण्यासाठी वाट नसल्यामुळे आमच्या परिसरामध्ये पाणी साचेल आणि साचतंही. आमचे हाल झाले की प्रशासनाला जाग येईल का?"
नालेसफाईबाबत हीच परिस्थिती मुंबईतील नेहरूनगर इथल्या साबळेनगर परिसरामध्ये देखील पाहायला मिळते. मुंबई महापालिकेच्या नालेसफाईवर इथले स्थानिक नाराजी व्यक्त करतात.
साबळे नगर परिसरातील अनिता शिरसाट या गेल्या 22 वर्षापासून या परिसरामध्ये भाड्याने राहतात.
आपल्या दोन मुलांसहित पती-पत्नी ते या ठिकाणी वास्तव्यास आहेत. शिरसाट यांना पाऊस नकोसा वाटतो.
पाणी साचणार मग आमचं नुकसान असं समीकरण
बीबीसी मराठीशी बोलताना 38 वर्षीय अनिता शिरसाट म्हणतात की, "मुंबई महानगरपालिकेकडून नालेसफाई होते. पण व्यवस्थित होत नाही. छोट्या मोठ्या नाल्यातील गाळ, कचरा बाहेर काढला जातो आणि तो बाहेरच नाल्याच्यावर जमा केला जातो. उचलला जात नाही. ही परिस्थिती यंदा देखील नेहरूनगर नाल्यात आहे. थोडासा पाऊस पडला की तो गाळ पुन्हा नाल्यात जातो. यामुळे आमच्या सर्व भागांमध्ये पाणी साचते"
पुढे शिरसाट म्हणाल्या की, "पाऊस पडला की आमच्या घरामध्ये पाणी तुंबते. त्यामुळे आमच्या सर्व साहित्याचं नुकसान होतं, घरात पाणी साचल्यामुळे पती आणि मला कामावरही जाता येत नाही. मुलांचे हाल होतात. या पाण्यामुळे रोगराई पसरते. आता नुकताच पाऊस पडला तेव्हा देखील हीच परिस्थिती होती. पाऊस म्हणजे पाणी साचणार मग आमचं नुकसान असं समीकरण आता झालं आहे."
चार महिने दहशतीखाली जगायचं, एवढंच आमच्या हाती
साबळे नगर याच परिसरात राहणाऱ्या लता गवळी या 61 वर्षीय महिला देखील नालेसफाई आणि पावसाळ्यात महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपायोजनेवर नाराजी व्यक्त करतात.
लता गवळी बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या की, "दरवर्षी आमच्या भागामध्ये पाणी साचतं. प्रशासनाला मात्र याची काहीही पडलेली आमच्या इथे वस्त्यांमध्ये छोटे नाले आहेत ते देखील व्यवस्थित साफ केले गेले नाहीत. त्यामुळे पाणी साचेल हे नक्की आहे.
पाणी घरात घुसतं, लाईट बंद होतात, प्यायचं पाणी गढूळ येतं, रोगराई पसरते अशा अनेक समस्या पाऊस येण्यापूर्वी आमच्या समोर संकट म्हणून दिसू लागतात. नुकत्याच झालेल्या पावसात देखील हीच परिस्थिती आम्ही पाहिली. आता पुढे चार महिने भीतीत जगायचं एवढेच आमच्या हाती".
या मुंबईकर महिलांप्रमाणेच राजीव गांधी नगर परिसरातील मुंबईकर देखील त्रस्त आहेत. व्यवस्थित नालेसफाई त्यांच्या परिसरात न झाल्यामुळे ते चिंतेत आहेत.
हीच परिस्थिती मुंबईतील धारावी, वडाळा, मरोळ, चेंबूर, घाटकोपर ,अंधेरी , जोगेश्वरी आणि विक्रोळी मिठी नदीतील अनेक परिसरात आहे.
मुंबईतील राजीव गांधी नगर येथे राहणारे स्वप्निल जवळगेकर बीबीसी मराठीशी बोलताना याबाबत म्हणाले की, "नालासफाई झाली आहे की नाही हे तुम्हाला नाल्यात पाहून समजेलच, नालेसफाई यांनी अजून व्यवस्थित केलेले नाही.
पालिका आयुक्त असतील किंवा इथले प्रशासकीय अधिकारी असतील हे फक्त उच्चभ्रू सोसायटीत जातात. त्या परिसरातील नाल्यांचे सफाई करताना फोटो काढतात आणि सोशल मीडियावर टाकतात. प्रत्यक्षात मात्र वस्ती आणि कुठेही नालेसफाई केली जात नाहीत. ही परिस्थिती आमच्या सर्व भागात वडाळा भागात देखील आहे."
नालेसफाईचे दावा; मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी
महाराष्ट्रात अखेर मान्सून दाखल झाला. पहिल्याच पावसात मुंबईकरांची पावसाने दाणादाण केली.
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होणे अपेक्षित असताना, पाऊस सुरू झाला तरी पालिकेने दिलेल्या डेडलाईन पुढे सरकवत महानगरपालिकेकडून कंत्राटदारांमार्फत ठिकठिकाणी नालेसफाई सुरू आहे.
मुंबई महानगरपालिका दरवर्षी प्रमाणे कोट्यवधी रुपये खर्च करून यंदाही नालेसफाईचे दावा करतेय. मात्र, प्रत्यक्षात मुंबईत अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये अजूनही गाळ, कचरा आणि अपुरा निचरा दिसतो आहे.
पालिकेचा दावा एक आणि प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी अशी परिस्थिती मुंबईतील नाले आणि मिठी नदी पाहिल्यावर दिसते.
पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाई करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. ज्या परिसरात जास्त पाणी तुंबतं त्या परिसरांकडे महानगरपालिकेने विशेष लक्ष दिलंय.
वरळी, दादर, धारावी, सायन, माटुंगा, हिंदमाता, मिलन सबवे यांसारख्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणीकोंडीची शक्यता असते. त्यामुळे या परिसरातील नालेसफाई आणि अन्य उपाययोजनांना महानगरपालिकेनं प्राधान्य दिलं आहे .
मुंबईत पाणी तुंबू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने अनेक उपाय केले आहेत. यामध्ये नाल्यांमधील गाळ काढणं, हाय-कॅपॅसिटी पंप बसवणं, मिठी नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण, कचरा व्यवस्थापन सुधारणं, आणि अतिक्रमण हटवणं यांचा समावेश आहे.
दीर्घकालीन उपाय म्हणून वेटलँड्स आणि स्टॉर्मवॉटर ड्रेनेज सिस्टीम सुधारणा करण्यावर भर दिला आहे, असं पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
नालेसफाई अपुरी झाल्याचं वास्तव
मुंबईत एकूण 2 हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे नाले आणि गटारे आहेत. यातील गाळ, कचरा काढण्याचं काम महानगरपालिकेकडून सुरू असल्याचं पालिकेने सांगितलं आहे.
मात्र, बीबीसीच्या टीमला प्रत्यक्षात ज्या परिसरामध्ये नालेसफाई झाली, तिथे पाहणी केली असता एक वेगळंच वास्तव पाहायला मिळालं.
मुंबईतील प्रतीक्षा नगर आणि चेंबूर या परिसरात असलेल्या मोठ्या नाल्यांमध्ये मुंबई महापालिकेकडून कंत्राटदारांमार्फत नालेसफाई करण्यात आली.
मात्र, प्रत्यक्षात या नाल्यामध्ये अजूनही काही गाळ, कचरा आणि ढिगारा पाहायला मिळाला. त्यामुळे कंत्राटदारांमार्फत नालेसफाई नक्की कोणत्या आधारे करण्यात आली आणि दिसणारा गाळ त्याच परिस्थितीत का? हा प्रश्न नाले पाहिल्यावर पडतो आहे.
मुंबईत नालेसफाई किती टक्के ?
मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसाठी 7 जूनची डेडलाईन ठेवली आहे. मात्र यापूर्वी ही डेडलाईन 31 मे अशी होती.
कामाची संथ गती पाहता ही डेडलाईन पुढे वाढवण्यात आली आहे.
27 मे 2025 रोजी मुंबई महापालिकेच्या डॅशबोर्ड च्या माहितीनुसार एकूण मुंबईची सर्व नालेसफाई 72.11 टक्के इतकी झाली आहे.तर शहरामध्ये ही नालेसफाई 73.14 टक्के इतकी झाली असल्याचं डॅशबोर्ड वर दाखवत आहे.
मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये 91.30 टक्के इतकी नालेसफाई झाल्याचं दाखवण्यात आलेलं आहे. तर मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये 96.54 टक्के नालेसफाई झाल्याच दाखवण्यात आलं आहे.
तर मुंबईची मिठी नदी 53.10 टक्के इतका गाळ काढण्यात आल्याच सांगण्यात आलं आहे. तसेच मुंबईतील छोटे नाले हे 63.49 टक्के इतके सफाई झाल्याचं पालिकेच्या डॅशबोर्ड वर पालिके मार्फत सांगण्यात आलेले आहे.
पुराचा धोका वाढतोय
मुंबईतील मिठी नदी आणि शहरातील नाले हे पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी अत्यावश्यक आहेत.
गाळ न काढल्यास नदीची खोली कमी होते आणि असलेल्या गाळामुळे पावसाचे पाणी वाहाण्याचा धोका वाढतो.
2005 साली मुंबईच्या महापुरात याचे गंभीर परिणाम झाले. पण आज 2025 मध्येही मिठी नदी आणि नाल्यातील गाळामुळे तोच धोका डोकं वर काढतोय असा पर्यावरणवादी आणि मुंबईचे व्यवस्थापनाचे अभ्यासक सांगतात.
या संदर्भात बीबीसी मराठीशी बोलताना पर्यावरणवादी आणि वॉचडॉग फाउंडेशन संस्थापक निकोलस अल्मेडा सांगतात, "2005 साली महापुराचा ट्रेलर होता, मात्र खरा पिक्चर आता दिसणार आहे. क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग या सगळ्या परिस्थितीमुळे मुंबईचे हवामान केंद्र देखील व्यवस्थित काम करत नाही. त्यामुळे पाऊस कधीही पडतो. मुंबईतले नाले आणि नदी साफ झालेली नाही, त्यामुळे 100% पूर परिस्थिती मुंबईत येऊ शकते."
पुढे निकोलस यांनी म्हटलं की, "पाणी साचण्यामागं एक कारण आहे, मुंबईत दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतीये, वस्त्या वाढत चालल्या आहेत. नाल्यांच्या शेजारी असणाऱ्या घरांच्या सीमाही वाढत आहेत, त्यामुळे नाले लहान होत आहेत. वर्षातून दोनदा नालेसफाई झाली पाहिजे. पालिकेकडून नालेसफाईचा दावा केला जातो इतके टक्के नालेसफाई झाली, प्रत्यक्षात नालेसफाई झाली कुठे आहे हे दाखवा"
'वेळेत काम पूर्ण झाली नाहीत तर कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करा'
मुंबईतील अपुऱ्या नालेसफाईवर माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी म्हटलं की, "नालेसफाईचं काम पूर्ण झालं पाहिजे. काम पूर्ण झाल्याचं जोपर्यंत निश्चित होत नाही, तोपर्यंत कंत्राटदारांना पैसे देऊ नये. 6 जून पर्यंत काम पूर्ण झाले नाही तर कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई करा. पाणी जर यावर्षी साचलं तर अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी आम्ही करणार आहोत."
यंदा मुंबईतील मिठी नदी आणि नालेसफाई हवी तशी पूर्ण झालेली नाही.
त्यातच 2005 ते 2021 दरम्यान मिठी नदीच्या स्वच्छता प्रकल्पात झालेल्या गैरव्यवहाराच्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, कंत्राटदार आणि मध्यस्थ यांचा समावेश आहे.
या प्रकरणात 65 कोटी 54 लाख रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे. अधिक तपास सुरू आहे. कंत्राट घेतले, मात्र प्रत्यक्षात काम नाही ही परिस्थिती असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळे याचा देखील परिणाम मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी साचण्यावर आहे.
मिठी नदीच्या सफाई प्रकरणी तपास सुरू असलेल्या प्रकरणासंदर्भात बोलताना आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त संग्राम सिंग निशाणदार यांनी म्हटलं की, "जिथे जिथे आम्हाला तपास करताना पुरावे सापडले त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. आता याचा तपास पुढे देखील सुरू राहील. सध्या गुन्हा दाखल झालाय त्यानुसार तपास सुरू आहे. यात काही अपडेट असेल तर कळवले जाईल."
नालेसफाईवर पालिकेकडून प्रतिक्रिया नाही
मिठी नदीतील सफाई प्रकरणात झालेला गैरव्यवहार आणि मुंबईतील अपुरे नालेसफाई हे केवळ मुंबईत पुढील काळात पाणी साचण्याचं कारण नाही, तर संभाव्य पुढील आपत्तीचं लक्षण आहे.
यंदाही नालेसफाईत आणि मिठी नदी स्वच्छतेत प्रशासनाचे दावे आणि प्रत्यक्ष परिस्थितीत मोठा फरक पाहायला मिळतोय.
या संदर्भात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी बीबीसी मराठी टीमने संवाद साधला असता, ते भारताबाहेर असल्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.
इतर संबंधित अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधला असता त्यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे किती व्यवस्थित प्रमाणात नालेसफाई झाली आहे, अपुऱ्या नालेसफाईवरून होणारे आरोप, कंत्राटदाराकडून झालेल्या गैरव्यवहाराचा परिणाम नालेसफाईवर होईल का आणि मुंबईकरांना नालेसफाई न झाल्यामुळे वाटणारी भीती याबाबत पालिका प्रशासनाकडून कोणतीही स्पष्टता आली नाही.
पहिल्याच पावसात मिठी नदी आणि अपुऱ्या नालेसफाईचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसणारच हे वास्तव समोर आलं आहे.
मिठी नदी आणि नाल्यांमध्ये अजूनही असलेला गाळ, प्रशासनातील गोंधळ, आणि भ्रष्ट कंत्राटदार यामुळे मुंबई पुन्हा पुन्हा बुडण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे हे स्पष्ट होत आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.