युक्रेननं रशियाच्या रासायनिक शस्त्रप्रमुखाला इलेक्ट्रिक स्कूटरचा स्फोट घडवून कसं मारलं?

    • Author, पॉल किर्बी
    • Role, युरोप डिजिटल एडिटर

रशिया-युक्रेन युद्ध आता वेगळ्या वळणावर पोहोचलं आहे. युद्धाच्या सुरूवातीच्या टप्प्यात युक्रेन बचावात्मक भूमिकेत होता आणि रशियन फौजांनी युक्रेनमध्ये बरीच मुसंडी मारली होती. मात्र काही महिन्यांपासून युक्रेनच्या सैन्यानं आक्रमक रणनिती अंमलात आणत रशियातील प्रदेशात आक्रमण केलं आहे.

या रणनीतीचाच पुढचा भाग म्हणून इगोर किरिलोव या रशियन सैन्याच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्याची मॉस्को मध्येच हत्या घडवून आणण्यात आली. किरिलोव नेमके कोण होते आणि युक्रेन युद्धात ते काय भूमिका बजावत होते, याविषयी...

इगोर किरिलोव रशियाच्या किरणोत्सर्ग, रासायनिक आणि जैविक सुरक्षा दलांचे प्रमुख होते. मॉस्कोतील एका बॉम्बस्फोटात त्यांचा मृत्यू झाला. रशिया-युक्रेन युद्धात रासायनिक शस्त्रांच्या वापरावर देखरेख करत असल्याचा आरोप पाश्चात्या देशांकडून किरिलोव यांच्यावर करण्यात आला होता.

म्हणजेच किरिलोव हे रशियाकडून युक्रेनमधील रासायनिक शस्त्रांच्या वापराचे मुख्य सूत्रधार असल्याचंच पाश्चात्य देशांचं म्हणणं होतं.

युक्रेनच्या एसबीयू (SBU) सुरक्षा सेवेनं म्हटलं आहे की मॉस्कोतील ज्या स्फोटात किरिलोव यांचा मृत्यू झाला तो स्फोट आपणच घडवून आणला होता.

किरिलोव यांच्याविरोधात विशेष ऑपरेशन करून हा स्फोट घडवण्यात आला. रशिया-युक्रेन युद्धात किरिलोव जी भूमिका बजावत होते त्यामुळे ते एक वैध्य लक्ष्य असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

एका इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ठेवण्यात आलेल्या स्फोटकांद्वारे करण्यात आलेल्या या बॉम्बस्फोटात किरिलोव आणि त्यांचा सहाय्यक मारले गेले, अशी माहिती रशियन अधिकाऱ्यांनी दिली आहे.

किरिलोव आग्नेय मॉस्कोतील रियाझान्स्की प्रॉस्पेक्टमधील एका इमारतीत राहत होते. या इमारतीतून ते बाहेर पडत असताना हा स्फोट घडवण्यात आला.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयातील परदेशी पत्रकार परिषद किंवा बैठकांमध्ये माहिती देण्याबद्दल किरिलोव कुख्यात झाले होते. त्यामुळेच युकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं त्यांना 'क्रेमलिनची खोटी माहिती प्रसारित करणारा महत्त्वाचा प्रवक्ता' असं नाव दिलं होतं.

(क्रेमलिनमध्ये रशियन सरकारच्या महत्त्वाच्या इमारती आहेत. त्यामुळे रशियन सरकारबद्दल बोलताना क्रेमलिन हा शब्द अनेकदा वापरला जातो)

किरिलोव कोण होते?

किरिलोव हे फक्त प्रवक्तेच नव्हते. 2017 मध्ये रशियाच्या किरणोत्सर्ग, रासायनिक आणि जैविक संरक्षण दलांचे नेतृत्व करण्याआधी ते रशियाच्या तिमोशेंको किरणोत्सर्ग, रासायनिक आणि जैविक संरक्षण अकॅडमीचे प्रमुख होते.

युकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की किरिलोव सैन्याच्या ज्या तुकड्यांचं नेतृत्व करत होते त्यांनी "युक्रेनमध्ये रानटी किंवा क्रूर स्वरुपाची रासायनिक शस्त्रं" तैनात केली होती. यातून दंगल नियंत्रक रसायनांचा मोठ्या प्रमाणातील वापर आणि "क्लोरोपिक्रीन या विषारी चोकिंग एजंट (श्वास रोखणारं किंवा श्वास घेणं अवघड करणारं रसायन) चा वापर केल्याच्या अनेक बातम्या" या बाबी अधोरेखित केल्या.

किरिलोव यांच्या हत्येच्या पूर्वसंध्येला, युक्रेनच्या एसबीयूनं जाहीर केलं होतं की युक्रेनमधील पूर्व आणि दक्षिणेकडील युद्ध आघाड्यांवर प्रतिबंधित अशा रासायनिक शस्त्रांचा "मोठ्या प्रमाणात वापर" केल्याच्या गुन्हेगारी प्रकरणात किरिलोव यांच्या अनुपस्थित त्यांना जबाबदार ठरवण्यात आलं होतं.

सीबीयूच्या आरोपात फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाचं युक्रेनवर आक्रमण सुरू झाल्यापासून रशियानं युक्रेनमध्ये रासायनिक शस्त्र आणि लष्करी सामुग्रीचा वापर केल्याच्या 4,800 हून अधिक प्रकरणांचा उल्लेख करण्यात आला आहे.

सीबीयूनं म्हटलं आहे की या घातक, विषारी पदार्थांचा वापर ड्रोन हल्ल्यांमध्ये आणि लढाईत वापरण्यात आलेल्या ग्रेनेड मध्ये करण्यात आला होता.

रशिया-युक्रेन युद्धातील किरिलोव यांची भूमिका

किरिलोव रशिया-युक्रेन युद्धाच्या सुरूवातीपासून कुख्यात झाले होते. युक्रेन आणि पाश्चात्य देशांबद्दल त्यांनी केलेल्या विविध दाव्यांमुळे ते कुख्यात झाले होते. या दाव्यांपैकी एकही वस्तुस्थिती वर आधारित नव्हता.

त्यांनी केलेला सर्वात संतापजनक दावा म्हणजे अमेरिका युक्रेनमध्ये जैविक शस्त्रांच्या प्रयोगशाळा बांधते आहे. रशियानं 2022 मध्ये आपल्या छोट्या शेजारी राष्ट्रावर जे मोठ्या प्रमाणात आक्रमण केलं, त्या आक्रमणांचं समर्थन करण्यासाठी आणि आक्रमण योग्य ठरवण्यासाठी हे दावे करण्यात आले होते.

त्यांनी मार्च 2022 मध्ये काही कागदपत्रे सादर केली. ज्याबाबत त्यांनी दावा केला होता की 24 फेब्रुवारीला रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्याच्या दिवशी जप्त करण्यात आली होती. या कागदपत्रांचा मुद्दा रशियन सरकारधार्जिण्या प्रसारमाध्यमांनी उचलून धरला होता, मात्र स्वतंत्र तज्ज्ञांनी त्यावर टीका करत ती फेटाळली होती.

किरिलोव यांचे युक्रेन वरील चुकीचे आरोप या वर्षीही सुरूच राहिले.

गेल्या महिन्यात किरिलोव यांनी दावा केला होता की युक्रेन नं कुर्स्क या युक्रेन सीमेला लागून असणाऱ्या रशियाच्या प्रांतात केलेल्या प्रति आक्रमणाचा "एक महत्त्वाचा उद्देश" कुर्स्क अणुऊर्जा प्रकल्प ताब्यात घेणं हा होता.

यासंदर्भात त्यांनी एक स्लाईडशो सादर केला होता. जो कथितरित्या युक्रेनच्या एका अहवालावर आधारित होता. याबाबत किरिलोव यांनी आरोप केला होता की या अणुऊर्जा प्रकल्पाला ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात जर तिथे काही अपघात झाला तर त्या प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या किरणोत्सर्गाचा परिणाम फक्त रशियन प्रदेशावर होईल.

किरिलोव वारंवार करत असलेल्या दाव्यांपैकी एक दावा म्हणजे युक्रेन एक "डर्टी बॉम्ब" (विनाशकारी बॉम्ब) विकसित करण्याचा प्रयत्न करतं आहे.

दोन वर्षांपूर्वी त्यांनी आरोप केला होता की, "युक्रेनमधील दोन संस्थांना तथाकथित "डर्टी बॉम्ब" तयार करण्याच्या विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. बॉम्ब तयार करण्याचं हे काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे."

किरिलोव यांचे दाव्यांमध्ये कोणतीही पारदर्शकता किंवा सत्यता नसल्याचं सांगत पाश्चात्य देशांनी ते फेटाळले होते.

मात्र किरिलोव यांच्या दाव्यांमुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी चेतावणी दिली होती की जर युक्रेन अशा प्रकारचं शस्त्र किंवा बॉम्ब तयार करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं रशिया म्हणत असेल तर त्याचा एकच अर्थ होतो, तो म्हणजे रशिया या प्रकारचं शस्त्र किंवा बॉम्ब आधीच तयार करत आहे.

गेल्या उन्हाळ्यात किरिलोव यांनी पुन्हा एकदा डर्टी बॉम्ब संदर्भातील त्यांचे दावे केले. यावेळेस त्यांनी आरोप केला होता की रशियन सैन्यानं गेल्या फेब्रुवारीमध्ये ताब्यात घेतलेल्या अवडिवका या पूर्व युक्रेनमधील शहराजवळ रासायनिक शस्त्रांची एक प्रयोगशाळा सापडली आहे.

किरिलोव यांनी दावा केला होता की युक्रेन आंतरराष्ट्रीय रासायनिक शस्त्रास्त्रं कराराचं (International Chemical Weapons Convention) उल्लंघन करतं आहे. पाश्चात्य देशांच्या मदतीनं युक्रेन विविध प्रकारची रासायनिक शस्त्रं तयार करत असून त्यात बीझेड (BZ)या सायकोकेमिकल रसायनाचा तसंच हाड्रोसायनिक अॅसिड आणि सायनोजेन क्लोराईड या रसायनांचा समावेश आहे.

रशियन सरकारच्या निष्ठावंतांसाठी किरिलोव यांचा मृत्यू हा एक मोठा धक्का म्हणून पाहिला जातो आहे. त्याचबरोबर मॉस्कोतील उच्च स्तरीय अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याची क्षमता युक्रेनकडे आहे, या गोष्टीचा पुरावा म्हणून देखील किरिलोव यांच्या मृत्यूकडे पाहिलं जातं आहे.

रशियन संसदेच्या वरच्या सभागृहाचे उप सभापती, कॉन्स्टंटिन कोसाचेव्ह म्हणाले की किरिलोव यांच्या मृत्यूमुळे "कधीही भरून न निघणारी हानी" झाली आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.