परदेशातील एकमेव लष्करी तळ हातातून जाणं भारतासाठी किती मोठा धक्का?

भाजपाच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

फोटो स्रोत, Prakash Singh/Bloomberg via Getty Images

फोटो कॅप्शन, भाजपाच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
    • Author, चंदन कुमार जजवाडे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारतानं जवळपास 25 वर्षांपूर्वी ताजिकिस्तानात एक हवाई तळ उभारला होता. मात्र आता हा हवाई तळ भारतानं रिकामा केला आहे. परदेशातील हा भारताचा एकमेव लष्करी तळ होता.

भौगोलिक स्थितीमुळे ताजिकिस्तानातील या आयनी एअरबेसचं खूप जास्त लष्करी महत्त्वं होतं. या तळाचं वैशिष्ट्यं म्हणजे तो अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि चीन या तिन्ही देशांपासून जवळ होता.

'हिंदुस्तान टाइम्स' या इंग्रजी वृत्तपत्रातील एका बातमीनुसार, गेल्या दोन दशकांच्या कालावधीत भारतानं हा हवाई तळ विकसित करण्यासाठी कथितरित्या जवळपास 10 कोटी डॉलर्स खर्च केले होते.

हा हवाई तळ सोव्हिएत युनियनच्या काळात तयार केला होता. भारतानं इथं लढाऊ विमानांसाठीची धावपट्टी, इंधनाचा साठा आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलची सुविधा विकसित केली होती.

आयनी एअरबेसबाबतची माहिती उघड झाल्यानंतर भारतात यावरून राजकारण तापलं आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी हे भारताचं व्यूहरचनात्मक अपयश असल्याचं म्हटलं. तर सरकारचं म्हणणं आहे की, कराराचा कालखंड पूर्ण झाल्यानंतर भारतानं हा हवाई तळ रिकामा केला आहे.

जयराम रमेश यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं आहे की, 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला भारतानं ताजिकिस्तानात आयनी एअरबेस उभारला होता. त्यानंतर तिथे पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्या होत्या.

आयनी एअरबेसचं महत्त्व

जयराम रमेश यांचं म्हणणं आहे की, आयनी हवाई तळाचं लष्करी महत्त्व लक्षात घेऊन तिथे विस्तार करण्याच्या भारताच्या मोठ्या योजना होत्या.

ताजिकिस्तानमधील वखान खोऱ्याजवळ असलेल्या एका बौद्ध स्तूपाचे अवशेष

फोटो स्रोत, Tiffany Kary/Bloomberg via Getty Images

फोटो कॅप्शन, ताजिकिस्तानमधील वखान खोऱ्याजवळ असलेल्या एका बौद्ध स्तूपाचे अवशेष
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ते म्हणाले, "4 वर्षांपूर्वी, भारताला स्पष्ट संदेश देण्यात आला होता की, भारताला तिथून हळूहळू हटावं लागेल. आता असं दिसतं की, शेवटी भारतानं तो हवाई तळ बंद केला आहे. तो भारताचा परदेशातील एकमेव लष्करी तळ होता. हा आपल्या व्यूहरचनात्मक मुत्सद्देगिरीला नक्कीच एक मोठा धक्का आहे."

"योगायोगानं आयनी एअरबेस ताजिकिस्तानची राजधानी असलेल्या दुशान्बे शहरापासून जवळपास 10 किलोमीटर अंतरावर आहे. तिथे एक उत्तम संग्रहालय आहे. तिथे असणाऱ्या सर्वात आकर्षक आणि लक्षणीय कलाकृतींपैकी एक आहे हे बुद्धाची प्रतिमा. ही प्रतिमा 1500 वर्षांहून अधिक जुनी असल्याचं मानलं जातं."

30 ऑक्टोबरला या मुद्द्यावरून एक प्रश्न विचारण्यात आल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी दिलेल्या उत्तरानंतरच या मुद्द्याबाबत अधिकृतपणे माहिती मिळाली.

रणधीर जायसवाल म्हणाले होते, "एअरोड्रोम बनवण्यासंदर्भात आपला ताजिकिस्तानबरोबर एक द्विपक्षीय करार होता. ही व्यवस्था अनेक वर्षे सुरू होती. या कराराचा कालावधी संपल्यानंतर 2022 मध्ये आपण तो तळ ताजिकिस्तानच्या ताब्यात दिला आहे."

भारतासाठी किती मोठा धक्का

संरक्षण विश्लेषक राहुल बेदी यांच्या मते, हा हवाई तळ भारतीय हवाई दल आणि बीआरओ म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यांनी मिळून विकसित केला होता.

राहुल बेदी म्हणतात, "आयनी एअरबेस जवळपास तीन वर्षापूर्वी बंद करण्यात आला होता. हा मुद्दा हवाई दलाशी निगडीत नाही. तो सरकारशी निगडीत मुद्दा आहे. सरकारनं या विषयाबाबत कोणताही पुढाकार घेतला नाही."

"हा हवाई तळ बंद झाल्यामुळे भारताचं जे नुकसान झालं आहे, त्याबद्दल बोलायचं तर सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीत यामुळे फायदा नाही आणि नुकसानदेखील नाही. मात्र शक्ती प्रदर्शनाबाबत सरकारनं हा विषय गांभीर्यानं घेतला नाही."

"त्यांनी मध्य आशियात शक्ती प्रदर्शनाला गांभीर्यानं घेण्यास सुरुवात केली आणि हवाई तळ बनवला. मात्र नंतर यात प्रगती झाली नाही."

याच वर्षी ऑगस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांची ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इमोमाली रहमान यांच्याबरोबर भेट झाली होती

फोटो स्रोत, @narendramodi

फोटो कॅप्शन, याच वर्षी ऑगस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांची ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इमोमाली रहमान यांच्याबरोबर भेट झाली होती

राहुल बेदी यांना वाटतं की, अफगाणिस्तानमुळे हा हवाई तळ भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. सद्यपरिस्थितीत 25 वर्षांच्या तुलनेत अफगाणिस्तानातदेखील बराच बदल झाला आहे. त्या दृष्टीकोनातून पाहता या हवाई तळाचं महत्त्वदेखील कमी झालं आहे.

तर संरक्षणतज्ज्ञ संजीव श्रीवास्तव म्हणतात, "अफगाणिस्तानात पहिल्यांदा तालिबानची राजवट आली होती आणि तालिबान तिथे अधिक सक्रिय होतं, तेव्हा आयनी एअरबेस तयार झाला होता."

"भारत आणि ताजिकिस्तान यांच्यात एक करार झाला होता. या करारानुसार तिथे एक हवाई तळ आणि हॉस्पिटल तयार करण्यात आलं होतं."

ते सांगतात की, 9/11 च्या हल्ल्यानंतर अमेरिकेनं तालिबानच्या विरोधात युद्ध पुकारलं आणि तालिबानला अफगाणिस्तानच्या सत्तेतून हाकलून दिलं. त्यानंतर अफगाणिस्तानात मोठा बदल झाला आहे. 2021 मध्ये अफगाणिस्तानात तालिबान पुन्हा सत्तेत आलं आहे.

ते म्हणतात, "तसं पाहिलं तर, अफगाणिस्तानात पुन्हा तालिबानची सत्ता आली आहे. जर तालिबानच्या विरोधात बनवण्यात आलेला हा हवाई तळ भारतानं सक्रिय ठेवला असता, तर ते योग्य झालं नसतं."

संजीव श्रीवास्तव यांना वाटतं की, सद्यपरिस्थितीत भारत आणि तालिबानमधील संबंध सुरळीत होत आहेत. तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अलीकडेच भारताच्या दौऱ्यावर येऊन यासंदर्भातील संदेशदेखील दिला आहे.

22 एप्रिलला जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये हल्ला झाला होता. त्यावेळेस तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांनी या हल्ल्याचा निषेध केला होता.

काही दिवसांपूर्वी मुत्तकी जवळपास एक आठवड्याच्या भारत दौऱ्यावर आले होते. त्यातून हे स्पष्ट आहे की, अफगाणिस्तानबद्दलच्या धोरणात भारत स्पष्ट बदल करतो आहे.

भारतासाठी ऐतिहासिक महत्त्व असलेला आयनी एअरबेस

राहुल बेदी यांच्या मते आयनी एअरबेस तयार करणं हा एक शक्ती प्रदर्शनाचा भाग होता. त्याचा उद्देश मध्य आशियात भारताची ताकद दाखवण्याचा होता.

ते म्हणतात की, त्याकाळी भारताचे अफगाणिस्तानशी खूप चांगले संबंध होते. नॉर्दर्न अलायन्सचे नेते अहमद शाह मसूद यांच्याबरोबर भारताचे चांगले संबंध होते.

9/11 च्या हल्ल्याच्या 2 दिवस आधी म्हणजे 9 सप्टेंबर 2001 ला अल-कायदाच्या कट्ट्ररतावाद्यांनी एका आत्मघातकी हल्ल्याद्वारे अफगाणिस्तानातील एक मोठे योद्धे आणि नॉर्दर्न अलायन्सचे प्रमुख अहमद शाह मसूद यांची हत्या केली होती.

अहमद शाह मसूद ज्या हॉस्पिटलमध्ये मरण पावले होते, ते हॉस्पिटल भारतानंच हवाई तळाच्या जवळ बांधलं होतं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अहमद शाह मसूद ज्या हॉस्पिटलमध्ये मरण पावले होते, ते हॉस्पिटल भारतानंच हवाई तळाच्या जवळ बांधलं होतं

राहुल बेदी म्हणतात की, अहमद शाह यांना जखमी अवस्थेत ताजिकिस्तानातील फरखर शहरात नेण्यात आलं. तिथे असलेल्या एका भारतीय डॉक्टरनं त्यांना मृत घोषित केलं होतं.

दुशान्बेपासून जवळपास 80 मैल दक्षिणेला फरखर एअरबेस आहे. त्याच्याजवळ भारतानं एक हॉस्पिटल बनवलं होतं.

तर आयनी एअरबेस भारतासाठी ऐतिहासिकदृष्ट्या खूपच महत्त्वाचा होता. या एअरबेसजवळ भारतानं एक फील्ड हॉस्पिटलदेखील बांधलं होतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)