ब्रेस्ट कॅन्सरवर मात शक्य? नवीन लसीने बदलू शकेल लाखो महिलांचं आयुष्य

    • Author, अँजेला हेन्शल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

ब्रेस्ट कॅन्सर (स्तनाचा कर्करोग) हा स्त्रियांमध्ये सर्वात घातक कॅन्सर आहे. जगभरात प्रत्येक 20 पैकी एक महिला तिच्या आयुष्यात याचा सामना करते.

याचा फक्त आरोग्यावर नाही तर कुटुंब आणि सामाजिक आयुष्यावरही मोठा परिणाम होतो. पण आता वैयक्तिक लसीमुळे या रोगावर मात होण्याची आशा वाढली आहे.

डॉ. नोरा डीसिस एक अनुभवी कॅन्सरतज्ज्ञ (ऑन्कोलॉजिस्ट) आहेत. त्या एक महत्त्वाची लस तयार करण्याच्या निर्णायक टप्प्यावर आहेत.

"आम्ही एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत," असं ब्रेस्ट कॅन्सरच्या लसीच्या जवळ पोहोचलेल्या डॉ. डीसिस सांगतात.

डॉ. डीसिस यांच्या मते, पुढील 10 वर्षांत ही लस ब्रेस्ट कॅन्सरसह सर्व कॅन्सरच्या उपचारांचा भाग बनेल. त्या वॉशिंग्टन विद्यापीठाच्या कॅन्सर व्हॅक्सिन इन्स्टिट्यूटचे नेतृत्वही करतात.

जगभरातील स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर हे सर्वात मोठे कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचे कारण आहे. सध्या जगातील प्रत्येक 20 पैकी एक महिलेला तिच्या आयुष्यात ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो, असं आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्थेने (आयएआरसी) म्हटलं आहे.

पण याबद्दल आता काही आशा निर्माण झाल्या आहेत. कारण जगभरात 50 हून अधिक ब्रेस्ट कॅन्सरच्या लसीच्या चाचण्या वेगवेगळ्या पद्धती वापरून सुरू आहेत, असं ब्रेस्ट कॅन्सर रिसर्च फाऊंडेशन सांगतं. या चाचण्यांपैकी 5 चाचण्या या आता प्रगत टप्प्यात आल्या आहेत.

गेल्या 18 महिन्यांत लस विकसित करण्यात मोठी प्रगती झाली आहे. हे इम्युनोथेरपीमुळे शक्य झालं आहे. ही शरीराची प्रतिकारशक्ती वापरतं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जे कॅन्सरग्रस्त रुग्णांचा डेटा सेट्स वेगाने विश्लेषण करू शकतो.

अभिनेत्री व्हिक्टोरिया एकानॉयच्या अनुभवातून या लसीचा खरा फायदा दिसून येतो. व्हिक्टोरियाला तिच्या वयाच्या 30 व्या वर्षी डीसीआयएस (स्तनातील दुधाच्या नलिकांतील सुरुवातीचा कर्करोग) आढळून आला.

"याचा तुमच्या कामावर, सामाजिक जीवनावर आणि कुटुंबावर खूप परिणाम होतो. तुमच्या आयुष्यात उलथापालथ होते," असं ती म्हणते. "जर लसीने याचा प्रतिकार रोखता आला, तर ते खरोखर अद्भुत असेल."

तिच्यावर उपचार करणं खूप कठीण होतं. कारण तिला सिकल सेल आजारसुद्धा आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेसाठी रक्तवाहिनी देणं आवश्यक होतं. पण हे लवकर समजल्यामुळे त्यावर उपचार करता आले. त्याचा तिला फायदा झाला.

कॅन्सरवरील लसी कशा काम करतात?

शास्त्रज्ञ अनेक दशकांपासून कॅन्सरविरोधात लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, यात त्यांना फारसं यश मिळालेलं नाही.

गोवर किंवा मेंदूज्वरसारख्या आजारांसाठीच्या लसी शरीराला व्हायरस किंवा बॅक्टेरियापासून बचाव करण्यासाठी आवश्यक सुरक्षा तयार करण्यास मदत करतात.

कॅन्सरच्या बाबतीत हे जास्त कठीण आहे. कारण तो शरीरातील स्वतःच्या पेशींपासून तयार होतो.

म्हणून कॅन्सरच्या बहुतेक लसी प्रत्येक रुग्णासाठी खास बनवल्या जातात. त्यांच्या ट्यूमरच्या अनोख्या जनुकांना अनुरूप असे बदल करून, ते तयार केले जातात.

या लसी शरीराला असे प्रोटीन (प्रथिने) किंवा अँटीबॉडी तयार करण्यास सांगतात जे फक्त कॅन्सरच्या पेशींवरील चिन्हांवर किंवा अँटीजेन्सवर हल्ला करतात.

सध्या कोणते संशोधन सुरू आहे?

हे संशोधन डॉ. नोरा डीसिस पुढे नेत आहेत. त्या कॅन्सर व्हॅक्सिन कोलिशनसह काम करत आहेत. ही अमेरिकेतील एक अशी संस्था आहे, जी आशादायक लसी तयार करण्याची गती वाढवते.

डॉ. डीसिस अनेक प्रकल्प चालवत आहेत, ज्यात यूडब्ल्यूच्या व्होकव्हॅक लसीच्या चाचण्यांचा विस्तारही आहे. ही लस एचइआर2 प्रथिनांना (प्रोटीन) लक्ष्य करते, जी सहसा ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशी लवकर वाढण्यास मदत करते.

या चाचणीत ही लस एचइआर2 पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर असलेल्या रुग्णांना केमोथेरपी आणि इतर उपचारांसोबत दिली जाते. ही लस शस्त्रक्रियेपूर्वी ट्यूमर काढण्यासाठी दिली जाते.

"आम्ही अखेरीस अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत, जिथे लवकरच कॅन्सरच्या लसीला वैद्यकीय (क्लिनिकल) वापरासाठी मान्यता मिळेल," असं डॉ. डीसिस म्हणतात.

दरम्यान, ऑगस्टमध्ये बायोटेक कंपनी ॲनिक्सा बायोसायन्सेस आणि ओहायोमधील क्लीव्हलँड क्लिनिक यांनी तयार केलेल्या लसीच्या पहिल्या टप्प्याच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्या.

ही पेप्टाइड लस अल्फा‑लॅक्टॅलब्युमिन नावाच्या स्तनाच्या दूधाच्या प्रथिनांना लक्ष्य करते, जी ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरशी (टीएनबीसी) संबंधित आहे. हे सर्वात घातक प्रकारांपैकी एक आहे.

"आम्ही शरीरात असे प्रोटीन आणत आहोत, जो फक्त ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशींमध्ये असतो, आणि शरीराला त्या पेशींवर हल्ला करायला शिकवतो," असं ॲनिक्साचे डॉ अनिल कुमार स्पष्ट करतात.

शास्त्रज्ञ ही लस रुग्णाच्या ट्यूमरची वाढ कमी करू शकते का, हे तपासत आहेत. म्हणजे शस्त्रक्रिया कमी कठीण होईल किंवा काही वेळा त्याची आवश्यकताच भासणार नाही. नंतर ट्यूमर पुन्हा होण्याची शक्यता कमी होते का, हेही ते पाहत आहेत.

टीएनबीसीपासून बरे झालेल्या रूग्णांवर या लसीची चाचणी केली जात आहे. तसेच ज्या महिलांच्या बायोप्सीत कॅन्सरपूर्वीचे बदल आढळून आले आहेत अशांवरही याची चाचणी केली जात आहे.

या चाचणीत आढळलं की, 70 टक्केपेक्षा जास्त महिलांच्या शरीरात ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशींना ओळखलं आणि त्यांच्यावर हल्ला केला

क्लीव्हलँड क्लिनिक कॅन्सर इन्स्टिट्यूटचे डॉ. जी. थॉमस बड म्हणाले की, प्राथमिक निकालांनुसार ही लस 'सुरक्षित होती' आणि त्याचे साइड‑इफेक्ट्स खूपच कमी होते.

क्लिनिकल चाचण्यांचा दुसरा टप्पा 2026 च्या सुरुवातीला चालू होईल आणि यात एक प्लेसबो गट असेल- ज्यांना लस मिळणार नाही. त्यामुळे शास्त्रज्ञांना त्याच्या परिणामकारकतेची तुलना करता येईल.

ज्यांना अजून कॅन्सर झालेला नाही. आणि भविष्यात त्यांना होऊ नये, अशा महिला आणि पुरूषांना भविष्यात ही लस दिली जाईल अशी आशा आहे, असं डॉ. कुमार म्हणतात.

त्यानंतर फेज 3 च्या चाचण्या होतील. या मोठ्या अभ्यासात अनेक रुग्णालयांमध्ये शेकडो ते हजारो रुग्ण सहभागी असतील. आणि यात नवीन उपचारांचा सध्या उपलब्ध सर्वोत्तम उपचारांशी तुलनात्मक अभ्यास केला जाईल.

हा टप्पा पूर्ण झाल्यानंतरही लसीला अधिकृत परवानगी मिळायला काही वर्षे लागू शकतात. तरीही अमेरिकेतील नियामक संस्था एफडीए कॅन्सरसह काही आजारांसाठी मंजुरीची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी उपाययोजना करत आहे.

"हे जणू एखादी लॉटरी जिंकल्यासारखं आहे," असं डायना इन्नेस म्हणतात. त्यांनी ब्रेस्ट कॅन्सरची लस घेतली आहे. आता तीन वर्षांपासून त्यांना कॅन्सर नाही.

डायना या 39 वर्षांच्या आहेत. त्यांना त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीला झोपवताना स्तनात गाठ आढळून आली. ही गाठ स्टेज 3 ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर (टीएनबीसी) असल्याचं निदान झालं.

डायनांनी अनेक महिने कडक उपचार घेतले. ज्यात मोठ्या शस्त्रक्रियेचाही समावेश होता, रेडिओथेरपी आणि 16 राउंड्सची केमोथेरपी. त्यापैकी तीन राउंड्स या अत्यंत ताकदवान केमोथेरपीच्या म्हणजे 'रेड डेव्हिल' नावाने ओळखल्या जाणाऱ्या केमोथेरपीच्या होत्या.

त्यानंतर त्यांना सांगितलं गेलं की, त्या ब्रेस्टकॅन्सर लसीच्या चाचणीसाठी योग्य आहेत. सुरुवातीला त्यांना शंका होती. परंतु, सविस्तर माहिती मिळाल्यावर त्यांनी स्वतःला भाग्यवान समजलं.

"माझ्या मते, ही विज्ञानातील पुढची मोठी क्रांती आहे," असं त्या म्हणतात.

हे उपचार कोणाला मिळू शकतील?

वैयक्तिक लसींबाबत खूप आशा आहे, पण हे अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. त्या विशेष प्रकारचे उपचार देतात, पण त्यांची तयार करण्याची प्रक्रिया खूपच गुंतागुंतीची असल्यामुळे ते महाग पडतं.

फार्मास्युटिकल कंपन्यांचा दीर्घकालीन उद्देश हा अशा लसी तयार करण्यावर आहे, ज्या सर्वसामान्य लोकांवरही काम करतील आणि सामान्य ट्यूमर मार्करलाही लक्ष्य करतील.

ब्रेस्ट कॅन्सरमधून बचावण्याची शक्यता रुग्ण कुठे राहतो यावर अवलंबून आहे.

उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये 83 टक्के निदान झालेल्या महिला बचावतात. तर कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, जसं की जवळजवळ संपूर्ण दक्षिण आफ्रिका. इथे निदान झालेल्या महिलांपैकी अर्ध्याहून अधिक महिलांचा मृत्यू होतो.

काही कॅन्सर तज्ज्ञांना भीती आहे की, लसीसारखं अत्याधुनिक तंत्रज्ञान ज्यांना त्याची गरज आहे, अशा अनेक महिलापर्यंत ते पोहोचणार नाहीत.

शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी आणि केमोथेरपीसारखे कॅन्सरचे मूलभूत उपचार मिळवू शकणाऱ्या आणि न मिळवू शकणाऱ्या लोकांमध्ये मोठा फरक आहे, असं आयएआरसीमधील कॅन्सर सर्व्हिलन्स शाखेच्या उपप्रमुख डॉ. इसाबेल सोर्जोमतारम म्हणतात.

"सोप्या उपचारांपेक्षा अत्याधुनिक आणि वैयक्तिकृत कर्करोग उपचार (पर्सनाइल्जड कॅन्सर ट्रीटमेंट) मिळवणं अजूनही मोठी आव्हानात्मक गोष्ट आहे," असं त्या म्हणतात.

आयएआरसीच्या फेब्रुवारीच्या अहवालानुसार, 2050 पर्यंत जगभरात ब्रेस्ट कॅन्सरचे रुग्ण 38 टक्क्यांनी वाढतील, आणि या रोगामुळे होणाऱ्या वार्षिक मृत्यूची संख्या 68 टक्य्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.

"दर मिनिटाला जगभरात चार महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचे निदान होते आणि एका महिलेचा मृत्यू होतो आणि ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे," असं या अहवालाचे लेखक आणि आयएआरसीचे शास्त्रज्ञ डॉ. जोआन किम म्हणतात.

व्हिक्टोरियासाठी लसीची प्रगती जितक्या लवकर होईल तितकं चांगलं होईल. आता ती कृष्णवर्णीय महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरबद्दल अधिक जागरूकता वाढवण्यासाठी मोहीम राबवते.

"अजूनही असे समाज आहेत, जिथे ब्रेस्ट कॅन्सरबद्दल फारशी चर्चा होत नाही," असं ती म्हणते.

"ब्रेस्ट कॅन्सरमुळे लोकांना लाज आणि अपराधीपणा वाटतो, आणि तो तुमच्या आयुष्याचा भाग बनतो. हे सहन करणं खूप अवघड आहे," असं ती म्हणते.

डायना अजूनही त्यांचा कॅन्सर परत येईल का, म्हणून विचार करतात. विशेषतः त्यांचा आजार गेल्या पाच वर्षांपासून नियंत्रणात असतानासुद्धा.

"पण ही कोणतीही विज्ञानकथा नाही, आम्ही फेज 2 च्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये आहोत. आज मी येथे जिवंत पुरावा म्हणून तुमच्या समोर आहे," असं त्या सांगतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)