बीडमध्ये मशिदीत जिलेटिनच्या कांड्यांनी स्फोट, अर्धमसला गावात नेमकं काय घडलं?

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावात जिलेटीनच्या माध्यमातून मशिदीत स्फोट केल्याची घटना समोर आली आहे.

30 मार्चच्या पहाटे अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतलं असून त्यांना 3 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बीड प्रशासनाने सांगितले आहे की किरकोळ वादावरुन ही घटना झाली असून सध्या गावात शांततेचे वातावरण आहे.

विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे अशी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत. या स्फोटापूर्वी त्यातील एकानं जिलेटिनच्या कांड्यांसह व्हीडिओ काढल्याचं समोर आलं आहे.

स्फोटानंतर मशिदीत फरशी फुटून खड्डा पडल्याचं दिसत आहे. काही ठिकाणी भींतींना आणि काचांना तडे गेले आहेत.

नेमकं काय घडलं?

अर्धमसला गावात 30 मार्चच्या पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास गावातील मशिदीमध्ये दोन तरुणांनी जिलेटीनच्या माध्यमातून स्फोट घडवून आणला.

हा स्फोट घडवण्यापूर्वी यातील आरोपी विजय गव्हाणे याने इंस्टाग्रामवर रील बनवल्याचं समोर आलं आहे. यात एका तरुणाच्या हातात जिलेटीनच्या कांड्या आणि तोंडात सिगारेट दिसत आहे.

जिलेटीनच्या कांड्यांचा वापर स्फोटक म्हणून खाणकामच्या ठिकाणी केला जातो. विहिरी खोदणें, रस्ते किंवा इतर कामांदरम्यान मोठमोठे दगड किंवा खडक फोडण्यासाठी जिलेटीनचा वापर केला जातो.

या स्फोटानंतर मोठा आवाज झाल्यानंतर स्थानिकांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांनी पोलिसांना कळवलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून तलवाडा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बॉम्बशोधक पथक आणि फॉरेन्सिक पथकाकडून या ठिकाणाची तपासणी करण्यात आली. पुढील तपास पोलिसांकडून केला जातोय. पोलिसांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.

पोलीस काय म्हणाले?

बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सकाळी 4 वाजता आम्हाला या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर तलवाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी 20 मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत आरोपीनं मशिदीत जाऊन जिलेटीनच्या साहाय्यानं एक ब्लास्ट केला होता. सकाळी 6 वाजता दोन्ही आरोपींना बीड पोलिसांना अटक केली आहे."

नवनीत काँवत पुढे म्हणाले, "याप्रकरणी फिर्याद दाखल करुन घेतली आहे आणि कठोर कलमं लावण्यात आली आहेत. गाव स्तरावर आणि पोलिसांच्या स्तरावर या घटनेबाबत शांतता समितीची बैठक पार पडली आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा होईल, या दिशेनं आमचा तपास सुरू आहे."

पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दोन्ही आरोपींना पाच दिवसांची 3 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील दोन्ही तरुण अर्धमसला गावातलेच रहिवासी आहेत. हे तरुण विहीरीचं खोदकाम करणाऱ्या कंत्राटदाराकडे काम करतात.

किरकोळ भांडणाच्या वादातून हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अर्धमसला गावात धार्मिक तणाव नसून हिंदू-मुस्लिम एकोप्यानं राहतात. गावात सध्या शांततेचं वातावरण असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलिसांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेप्रकरणी कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असं सोनवणे यांनी म्हटलंय.

यावेळी बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले, "या गावातील लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. ईद आणि गुढीपाडवा ते एकत्रितपणे साजरा करता. या प्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक झाली पाहिजे. यासाठी पोलिसांसोबत बोलणार आहोत. गावात शांततेचं वातावरण आहे. कुणीही अफवा पसरवू नये."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.