You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एअर इंडियाच्या विमानाचा व्हीडिओ रेकॉर्ड करणाऱ्या 17 वर्षांच्या मुलाचं आयुष्य त्या अपघातानं कसं बदललं?
- Author, झोया मतीन
- Role, बीबीसी न्यूज, दिल्ली
प्रत्येक वेळेस विमानाचा आवाज ऐकल्यानंतर आर्यन असारी, विमान पाहण्यासाठी घराबाहेर पळत जायचा. विमान पाहणं हा त्याच्यासाठी एकप्रकारचा छंद होता, असं त्याचे वडील मगनभाई असारी यांनी सांगितलं. आर्यनला इंजिनचा आवाज, ती घरघर खूप आवडायची.
विमान आकाशात उडत असताना इंजिनचा तो आवाज अधिकच वाढायचा आणि इंजिनमधून आकाशात धूर सोडला जायचा. मात्र आता या गोष्टीचा निव्वळ विचार जरी केला तरी तो आजारी पडतो.
गुरुवारी (12 जून) 17 वर्षांचा आर्यन असारी अहमदाबादमधील त्याच्या घराच्या छतावर होता. तो विमानांचे व्हीडिओ रेकॉर्ड करत होता.
तेव्हाच एअर इंडियाचं 787-8 ड्रीमलायनर विमान त्याच्या डोळ्यासमोर कोसळलं आणि विमानानं पेट घेतला. या अपघातात विमानातील 241 जणांचा मृत्यू झाला. तसंच जमिनीवरही जवळपास 30 जणांचा मृत्यू झाला.
एअर इंडियाचं विमान कोसळत असल्याचे क्षण आर्यनच्या फोनमध्ये टिपले गेले.
"मी विमान पाहिलं. ते खाली खालीच जात होतं. मग ते माझ्या डोळ्यादेखत कोसळलं," असं आर्यननं या आठवड्याच्या सुरुवातीला बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
आर्यननं निव्वळ छंद म्हणून तयार केलेला हा व्हीडिओ आता या अपघाताचा तपास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा धागा आहे.
या व्हीडिओमुळे प्रसारमाध्यमांमध्ये खळबळ उडाली आणि हायस्कूल विद्यार्थी असलेला आर्यन देशाच्या इतिहासातील सर्वात भीषण विमान अपघातांपैकी एकाच्या केंद्रस्थानी आला.
"आमच्याकडे मुलाखतीसाठी येणाऱ्या विनंत्यांचा ओघ लागला आहे. आर्यनशी बोलण्यासाठी पत्रकार दिवस-रात्र माझ्या घराभोवती फिरत आहेत," असं मगनभाई असारी यांनी बीबीसीला सांगितलं.
"अपघात आणि त्यानंतर घटनांचा आर्यनवर भयावह परिणाम झाला आहे. त्यानं जे पाहिलं, त्याचा त्याला मोठा धक्का बसला आहे. माझा मुलगा इतका घाबरलेला आहे की, त्यानं त्याचा फोन वापरणं बंद केलं आहे," असं मगनभाई म्हणाले.
विमानांचं वेड असलेला आर्यन
मगनभाई असारी, एक निवृत्त सैनिक आहेत. ते आता अहमदाबादच्या सबवे सेवेमध्ये काम करतात. ते गेल्या 3 वर्षांपासून विमानतळाजवळच्या एका परिसरात राहत आहेत.
अलीकडेच ते एका तीन मजली इमारतीच्या छतावर असलेल्या एका छोट्या खोलीत राहण्यासाठी आले होते. तिथून त्यांना शहराचं लांबवरचं दृश्य दिसतं.
त्यांची पत्नी आणि दोन अपत्यं, आर्यन आणि त्याची मोठी बहीण, अजूनही त्यांच्या मूळ गावीच राहतात. गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवर हे गाव आहे.
"आर्यन पहिल्यांदाच अहमदाबादला आला होता. किंबहुना, आयुष्यात तो पहिल्यांदाच गावाबाहेर पडला होता," असं मगनभाई म्हणाले.
"प्रत्येक वेळेस मी जेव्हा फोन करायचो, तेव्हा आर्यन मला विचारायचा की मला घराच्या छतावरून विमानं दिसतात का. मी त्याला सांगायचो की, मला आकाशात शेकडो विमानं उडताना दिसतात."
ते म्हणाले की, आर्यनला विमानांची आवड होती. गावावरून विमानं जायची तेव्हा ती पाहताना त्याला खूप आनंद व्हायचा. त्याच्या वडिलांच्या नवीन घराच्या छतावरून विमानं जवळून पाहण्याची कल्पना त्याला खूपच आकर्षक वाटली होती.
गेल्या आठवड्यात त्याला तशी संधी मिळाली. त्याच्या मोठ्या बहिणीला पोलीस अधिकारी व्हायचं आहे. ती प्रवेश परीक्षा देण्यासाठी अहमदाबादला आली होती.
आर्यननं तिच्याबरोबर जाण्याचं ठरवलं. "त्यानं मला सांगितलं की त्याला नवीन वह्या आणि कपडे खरेदी करायचे आहेत," असं असारी म्हणाले.
'विमान थरथरत होतं, एकीकडून दुसऱ्या बाजूला जात होतं'
गुरुवारी (12 जून) हा अपघात घडण्याआधी साधारण दीड तास आधी, दुपारच्या वेळेस ही भावंडं त्यांच्या वडील राहतात त्या घरी पोहोचली.
त्या सर्वांनी एकत्र जेवण केलं. त्यानंतर असारी मुलांना घरी ठेवून कामावर गेले.
नंतर आर्यन छतावर गेला आणि त्याच्या मित्रांना दाखवण्यासाठी व्हीडिओ तयार करू लागला. तेव्हाच त्यानं एअर इंडियाचं विमान पाहिलं आणि तो त्याचा व्हीडिओ बनवू लागला, असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.
आर्यनला लवकरच लक्षात आलं की, विमानात काहीतरी गडबड आहे. "विमान थरथरत होतं, एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला हलत होतं" असं तो म्हणाला. विमान खाली जात असताना तो व्हीडिओ काढत होता. पुढे काय होणार आहे हे त्याला समजत नव्हतं.
मात्र जेव्हा हवेत धुराचे मोठे लोट पसरले आणि इमारतींमधून आगीचे लोट बाहेर पडले, तेव्हा अखेर त्याच्या लक्षात आलं की, त्यानं काय पाहिलं आहे.
त्यानंतर त्यानं तो व्हीडिओ त्याच्या वडिलांना पाठवला आणि त्यांना फोन केला.
'मी स्वत: देखील घाबरलो होतो'
"तो खूप घाबरलेला होता. 'मी ते पाहिलं, पप्पा, मी ते कोसळताना पाहिलं,' असं तो म्हणाला. तो मला विचारत राहिला की, त्या विमानाला काय झालं आहे. मी त्याला शांत राहण्यास आणि काळजी न करण्यास सांगितलं. मात्र तो प्रचंड घाबरलेला होता," असं असारी यांनी सांगितलं.
असारी यांनी त्यांच्या मुलाला तो व्हीडिओ शेअर न करण्यासदेखील सांगितलं. मात्र खूप घाबरलेल्या आणि धक्का बसलेल्या अवस्थेत त्यानं तो व्हीडिओ त्याच्या मित्रांना पाठवला. "अचानक तो व्हीडिओ सर्वत्र पोहोचला."
त्यानंतरचे दिवस या कुटुंबासाठी एखाद्या भयावह स्वप्नासारखे होते.
शेजारी, पत्रकार आणि कॅमेरामन यांची असारी यांच्या छोट्या घरात दिवस-रात्र रीघ लागली. त्यांना आर्यनशी बोलायचं होतं. "त्यांना थांबवण्यासाठी आम्ही काहीही करू शकलो नाही," असं ते म्हणाले.
या कुटुंबाकडे पोलीसदेखील आले होते. त्यांनी आर्यनला पोलीस स्टेशनला नेलं आणि त्याचा जबाब नोंदवला.
असारी यांनी स्पष्ट केलं की, बातम्यांमध्ये आलं होतं, तसं आर्यनला अटक करण्यात आली नव्हती. मात्र त्यानं जे पाहिलं होतं, त्याबद्दल पोलिसांनी अनेक तास चौकशी केली.
"तोपर्यंत माझा मुलगा इतका अस्वस्थ झाला होता की, आम्ही त्याला परत गावी पाठवण्याचा निर्णय घेतला."
गावी परतल्यावर आर्यन शाळेत जातो आहे. मात्र "तो अजूनही हरवल्यासारखाच आहे. त्याची आई मला सांगते की, प्रत्येक वेळेस त्याचा फोन वाजला की तो घाबरतो," असं असारी म्हणाले.
"मला माहीत आहे की तो हळूहळू बरा होईल. मात्र मला वाटत नाही की, माझा मुलगा पुन्हा कधीही आकाशात विमानं उडताना पाहण्याचा प्रयत्न करेल," असं त्यांनी पुढे नमूद केलं.
रॉक्सी गागडेकर यांचं अहमदाबादमध्ये बीबीसीसाठी अतिरिक्त वार्तांकन.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)