You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्री-फ्लाईट 'चेकलिस्ट' म्हणजे काय? विमानाचे उड्डाण घेण्यापूर्वी कोणत्या गोष्टी तपासल्या जातात?
- Author, विनायक होगाडे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
अहमदाबादमध्ये झालेला विमान अपघात प्रचंड भीषण होता. अहमदाबाद विमानतळावरुन लंडन गॅटविक विमानतळाकडे जाण्यासाठी उड्डाण घेतलेलं विमान अवघ्या बत्तीस सेकंदातच जमिनीच्या दिशेने जाऊ लागलं.
विमानाचं नियंत्रण ज्यांच्या हातात असतं, त्या वैमानिकांना फक्त 32 सेकंद मिळाले. या बत्तीस सेकंदात नियंत्रणाबाहेर जात असलेलं हे अवाढव्य विमान ताब्यात आणायचं तरी कसं, हा प्रश्न नक्कीच असेल.
विमानाने आकाशात उड्डाण घेण्यापूर्वी नेमकी कशी प्रक्रिया असते, कोणकोणत्या गोष्टी आधी तपासून मग विमान सुरू केलं जातं. याविषयी अनेकांनी सोशल मीडियावर चर्चा देखील केली आहे.
विमानासारख्या हवाई वाहनाच्या प्रवासामध्ये छोटीशीही चूक होऊन चालत नाही. आकाशात झेपावण्यासाठी एकतर ते शंभर टक्के 'एरर-फ्री' लागतं अन्यथा आकाशात झेपावणं पूर्णपणे धोक्याचंच ठरतं.
यासाठीच, वैमानिकांना अनेक प्रकारची काळजी घ्यावी लागते. त्यातलाच एक महत्त्वाचा भाग असतो तो 'प्री-फ्लाईट चेकलिस्ट'चा! म्हणजेच, उड्डाणापूर्वीची चेकलिस्ट होय.
ही चेकलिस्ट नक्की काय असते? आणि ती इतकी महत्त्वाची का असते? जाणून घेऊयात.
विमान चालवण्यासाठी, विमानात बसल्यापासून ते विमानातून उतरेपर्यंत, ज्या-ज्या गोष्टी विमानात होतात, अथवा केल्या जातात, त्या सगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळी चेकलिस्ट असते.
मानवी चुकांची शक्यता अधिकाधिक कमी करण्यासाठी म्हणून या चेकलिस्ट्सच्या प्रक्रियेची तरतूद विकसित झालेली दिसून येते.
त्याचेही 'नॉर्मल प्रोसिजर' आणि 'अब्नॉर्मल प्रोसिजर' असे दोन भाग पडतात. 'अब्नॉर्मल प्रोसिजर्स'मध्ये 'इमर्जन्सी प्रोसिजर्स' असतात. जर एखादं इक्वीपमेंट काम करत नसल्यास काय अॅक्शन घ्यावी, या अनुषंगाने ती चेकलिस्ट असते.
तर, विमानाच्या 'नॉर्मल प्रोसिजर'मध्ये, प्री-फ्लाईट चेकलिस्ट, स्टार्टअप करणं, टॅक्सी करणं, टेकऑफ करणं, क्लाईंब करणं, लेव्हल ऑफ करणं, क्रूझमध्ये राहणं, डिफेन्ड करणं, मग लँडिंगसाठी तयारी करणं, लँडिंग करणं आणि मग स्वीच ऑफ करणं एवढं सगळं येतं.
'प्री-फ्लाईट चेकलिस्ट' हा या सगळ्या प्रक्रियेतला सर्वांत पहिला आणि महत्त्वाचा एक भाग ठरतो.
चेकलिस्ट पूर्ण करण्याची जबाबदारी ही पूर्णपणे वैमानिकांची असते. बहुतेक चेकलिस्ट वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागलेल्या असतात.
पहिला भाग, इंजिन सुरू करण्यापूर्वी, दुसरा भाग, इंजिन सुरू करताना आणि तिसरा भाग, विमान जागेवरुन हलवण्यापूर्वी तपासयाचा असतो. या सर्व तपासण्या टेकऑफपूर्वी पूर्ण करणं गरजेचं असतं.
वैमानिकांची प्री-फ्लाईट चेकलिस्ट नक्की काय असते, हे जाणून घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्राचे माजी चीफ पायलट संजय कर्वे यांच्याशी संवाद साधला.
त्यांनी विमान उड्डाणासाठी चेकलिस्ट कशी फॉलो केली जाते, ते सविस्तरपणे सांगितलं.
कर्वे म्हणाले की, "सगळ्या विमानांमध्ये चेकलिस्ट फॉलो करण्यासाठी 'चॅलेंज अँड रिस्पॉन्स' ही पद्धत असते. म्हणजे, एक वैमानिक ती चेकलिस्ट वाचतो आणि दुसरा त्याप्रमाणे करतो. म्हणजे, एकच जण वाचतोय आणि तोच ती फॉलो करतोय, असं होत नाही. यामागचं कारण म्हणजे कुठलीही गोष्ट चेक करणं मिस होत नाहीये ना, याची खात्री होणं."
या चेकलिस्ट इतक्या महत्त्वाच्या असतात, की वैमानिकांना त्या तोंडपाठदेखील असाव्या लागतात, असं कॅप्टन अमोल यादव सांगतात. ते दोन इंजिनवाल्या टर्बोप्रॉप विमानाचे वैमानिक आहेत.
त्यांनी मुंबईतील एका बॉक्सी अपार्टमेंट इमारतीच्या छतावर स्वत: फेब्रुवारी-2016 मध्ये सहा आसनी प्रॉपेलर विमान तयार केलं होतं.
प्री-फ्लाईट चेकलिस्ट इतकी महत्त्वाची का असते, याविषयी आम्ही अमोल यादव यांच्याकडून सविस्तरपणे जाणून घेतलं.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले की, "प्री-फ्लाईट चेकलिस्टमध्ये वैमानिक विमानाच्या आतमध्ये गेल्यानंतर पहिली चेकलिस्ट करतो, त्याला प्री-फ्लाईट चेकलिस्ट म्हणतात. त्या चेकलिस्टमध्ये विमानाचे सगळे स्वीचेस जागेवर म्हणजेच जसे असले पाहिजेत, तसे आहेत की नाहीत, ते पाहिलं जातं. विमानाच्या वॉर्निंग लाईट्स आणि स्वीचेस काम करतात की नाही, या सगळ्या गोष्टी सामान्यत: सहवैमानिक चेक करतो. त्यालाच प्री-फ्लाईट चेकलिस्ट म्हणतात."
ही चेकलिस्ट फॉलो करण्याचीही एक पद्धत असते.
त्या पद्धतीविषयी सांगताना संजय कर्वे म्हणाले की, "ही चेकलिस्ट करताना मध्येच काही कारणांनी तुम्ही थांबलात तर तुम्हाला ती पुन्हा पहिल्यापासूनच फॉलो करावी लागते. म्हणजे तुम्ही समजा तुम्ही गोष्टी चेक करत पंधराव्या क्रमांकापर्यंत आला आहात आणि केबिन क्रू मध्येच येऊन काही सांगून गेला आणि तुम्ही डिस्टर्ब झालात, तर मग तुम्ही सोळापासून नव्हे तर पुन्हा पहिल्यापासूनच चेकलिस्ट तपासावी लागते. त्यामुळे, चेकलिस्ट हा फार महत्त्वाचा भाग असतो."
वैमानिकांच्या चेकलिस्ट्सचा जन्म कसा झाला, याविषयीची माहितीविमान निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी एअरबस ने या संकेतस्थळावर दिली आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1935 मध्ये, एका नवीन 'बोईंग बी-17 बॉम्बर'ची चाचणी एका उड्डाणात घेण्यात आली.
ते विमान शक्तिशाली आणि प्रगत स्वरुपाचं असं होतं. पण म्हणूनच त्याचं उड्डाण करणं ही गोष्ट नेहमीपेक्षा अधिक क्लिष्ट होती. एकदा या विमानातील वैमानिक 'गस्ट लॉक' नावाचं एक सुरक्षा उपकरण काढण्यास विसरला.
खरं तर हे उपकरण जमिनीवर असताना विमानाचे हालणारे भाग स्थिर ठेवण्याचं काम करते. मात्र, हे सुरक्षा उपकरण काढणं राहून गेलेलं असल्याने, टेकऑफनंतर वैमानिकाला विमान नियंत्रित करता आलं नाही.
त्यामुळे, हे क्रॅश झालं आणि त्यामध्ये वैमानिकासह दोन लोकांचा मृत्यू झाला. तेव्हा, काही लोकांना असं वाटलं की, असं प्रगत विमान उडवणं ही फारच जिकरीची आणि आव्हानात्मक अशी गोष्ट आहे.
मात्र, तेव्हा एका इंजिनिअरने एक सोपा मार्ग शोधून काढला आणि त्याने वैमानिकांची चेकलिस्ट बनवली. हीच चेकलिस्ट वैमानिकांना टेकऑफ आणि लँडिंग करण्यापूर्वी काय काय करावं, याची आठवण करून देते.
या एका कृतीमुळे विमान चालवताना होणाऱ्या चुका टाळण्यास मदत झाली आणि विमानाचं उड्डाण आणि त्यातला प्रवास हा अधिक सुरक्षित झाला. तेव्हापासून सर्व वैमानिक सुरक्षिततेसाठी प्रत्येक विमानात चेकलिस्ट वापरतात.
1935 साली झालेल्या त्या अपघातानंतर, इतर विमान कंपन्या आणि लष्करातील वैमानिकांनीही प्री-फ्लाइट चेकलिस्ट वापरण्यास सुरुवात केली. त्यामुळेच, आज प्री-फ्लाइट चेकलिस्ट वापरणं हा उड्डाण करण्याचा सर्वोत्तम आणि सुरक्षित मार्ग मानला जातो. बहुतेक एअरलाइन्स आणि फ्लाइंग स्कूलमध्येदेखील वैमानिकांनी अशा प्रकारची चेकलिस्ट वापरणं हे अत्यावश्यकच असतं.
कारण, या चेकलिस्ट नवीन वैमानिकांना, आपण प्रशिक्षणात काय काय शिकलो, ते लक्षात ठेवण्यास मदत करतात. दुसऱ्या बाजूला, अनुभवी वैमानिकांना अतिआत्मविश्वासामुळे होणाऱ्या चुका टाळण्यास देखील त्या मदत करतात. कारण, विमान चालवण्याचा कितीही मोठा अनुभव असला तरीही एक साधी चूक प्रचंड महागात पडू शकते.
या चेकलिस्ट इतक्या महत्त्वाच्या का असतात, याविषयी बोलताना अमोल यादव म्हणाले की, "विमानाच्या निर्मात्यांकडूनच सांगितलं जातं की, हे उडवायला कमीतकमी दोन वैमानिक लागतात. विमानात एवढे स्वीचेस असतात की, त्यासाठी कमीतकमी दोन वैमानिक गरजेचे ठरतात. चेकलिस्टमध्ये एवढे सगळे स्वीचेस आहेत, जे ऑपरेट करण्यासाठी दोन प्रशिक्षित माणसं लागतात.
"खरं तर तीच ती गोष्ट वैमानिक दिवसातून कधी कधी तीन-तीन, चार-चार फ्लाईट्सच्या वेळेला करत असतो. अशावेळी माणसाचं कन्फ्यूजन सुद्धा होऊ शकतं. आपलंही बरेचदा होतं की, आपण दार लावलं पण आपण कडी लावली आहे का? अशी शंका मनात येतेच येते. आपण परत चेक करायला जातो.
हा मानवी स्वभावाचा भाग आहे. त्या ज्या मानवी चूका असतात, त्या टाळण्यासाठीच या प्रोसिजर्स बनवल्या गेलेल्या आहेत. ही प्रक्रिया एका रात्रीत तयार झालेली नाही तर ती हळूहळू सुधारत गेलेली आहे. पूर्वीच्या विमानांमध्ये कमी स्वीचेस असल्याने वैमानिक स्वत:चं सगळं करायचे. चेकलिस्ट तोंडपाठ असायच्या. मात्र, जेव्हा विमान मोठं असतं, तेव्हा सगळ्याच गोष्टी फार काळजीपूर्वक आणि प्रोफेशनली कराव्या लागतात," असं यादव सांगतात.
चेकलिस्ट हा विमान उड्डाणाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
चेकलिस्टशिवाय, पायलट विमान उडवत नाहीत. विमान चालवण्याची स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर असते. चेकलिस्ट हा त्याचाच एक भाग असतो. या दोन्ही गोष्टी DGCI कडूनच सर्टीफाय केलेल्या असतात.
ही चेकलिस्ट तुम्हाला फॉलो करावीच लागते. ती तुम्ही एखाद्यावेळेस फॉलो नाही केलीत, तर मग वैमानिकांनी प्रोसिजर फॉलो केली नाही, यासाठी त्याला दोषी धरलं जाऊ शकतं, असंही कॅप्टन अमोल यादव सांगतात.
पुढे ते सांगतात की, "गाडी अथवा इतर वाहना चालवताना थोडी बेशिस्तीने वागण्याची मुभा आहे, मात्र, ही मुभा वैमानिकांना जराही नसते. वैमानिकांना सगळ्या गोष्टी लिखित ठेवलेल्या आहेत. नवा वैमानिक या चेकलिस्ट आणि एसओपींमध्ये बांधला जातो. त्याला त्यामध्ये जराही कसूर करुन चालत नाही."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.