पन्नाः हिऱ्यामुळे एका रात्रीत आयुष्य बदलावं म्हणून इथले लोक दिवसरात्र मजुरी करतात

- Author, विष्णुकांत तिवारी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
स्वामीदीन पाल यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. त्यांच्या आणि त्यांच्या मुलाच्या कष्टाचं चीज झालं आहे. पन्ना येथील नारंगी बागेत राहणाऱ्या या कुटुंबाला नुकताच 32 कॅरेटचा 80 सेंटचा हिरा मिळाला आहे.
त्यांना या हिऱ्याच्या माध्यमातून दीड कोटी रुपये मिळू शकतात अशी पाल कुटुंबीयांना अपेक्षा आहे.
दिवाळीच्या आसपास सरकारी यंत्रणेद्वारे हिऱ्यांचा लिलाव होईल. त्यातून मिळणारे पैसे सरकारी रक्कम वजा करून उरलेली रक्कम स्वामीदीन यांना मिळेल.
पण, इतका मौल्यवान हिरा सापडल्यानंतरही पाल कुटुंबीय आता आराम करण्याच्या विचारात नाहीत.
बीबीसी बरोबर बोलताना स्वामीदीन पाल म्हणाले की, “आम्ही खूप काळ मजुरी केली. मजुरी करून छोटंसं घर बांधलं. नंतर या वयात मुलाबरोबर हीरा शोधण्यासाठी खाण तयार केली. चार पाच वर्षं झाली पण काहीच मिळालं नाही. आता कुठं आमची इच्छा पूर्ण झाली आहे. आता या गोष्टी बदलतील अशी आम्हाला अपेक्षा आहे.”

स्वामीदीन पाल यांचा मुलगा जमुना पाल म्हणतात की, ज्या दिवशी त्यांना हिरा मिळाला त्या दिवशी त्यांना झोप लागली नाही. रात्रभर नाचतच रहावं असं त्यांना वाटत होतं.
ते म्हणतात, “आता मी खाणीतच काम करेन. हिरा मिळाला म्हणून थांबणार नाही. मला एकवेळ खायला मिळालं नाही, तरी मी आता हिऱ्याच्या खाणीतच काम करणार.”
स्वामीदीन यांच्यासारखे हजारो लोक भारताच्या कानाकोपऱ्यातून मध्य प्रदेशातील पन्ना या शहरात येऊन नशीब आजमावतात.
हिरा म्हणजे इथल्या लोकांसाठी एक स्वप्न, जिद्द, नशा आणि एका रात्रीत आयुष्य बदलण्याचा मार्ग आहे.
पिढ्यानपिढ्या हिऱ्याचा शोध
भारतीय खाण विभाग ही संस्था भारताच्या खनिकर्म मंत्रालयाचा एक भाग आहे. या संस्थेच्या 2022 च्या वार्षिक अहवालानुसार पन्ना इथं हिऱ्याचे 90 टक्क्यापेक्षा अधिक साठे आहेत. त्यांचं प्रमाण 28.597 मिलियन कॅरेट इतकं आहे.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळहून 380 किमीवर असलेल्या या शहरात हिरा हा स्थानिक लोकांच्या जीवनशैली, गप्पा, आणि आशेचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. सकाळ होताच इथले हजारो लोक हिऱ्याच्या शोधात निघतात.
इथं अशी अनेक कुटुंबं आहेत ज्यांच्या अनेक पिढ्या हिऱ्याचा शोध घेत आहेत. 67 वर्षीय प्रकाश शर्मा त्यापैकीच एक आहेत. त्यांच्या जवळचे लोक त्यांना कक्कू या नावाने ओळखतात.
त्यांच्या वडिलांनी हिऱ्याच्या शोधात संपूर्ण आयुष्य घालवलं. पन्ना इथं एक तंबू लावून ते राहायचे. रोज सकाळी ते हिरा शोधायला जायचे.
50 वर्षांपूर्वी त्यांना पहिल्यांदा हिरा सापडला होता. जुने दिवस आठवून ते म्हणाले की, “मी 1974 मध्ये शालेय शिक्षण पूर्ण केलं. तेव्हा मला एखाद्या विभागात चांगली नोकरी मिळू शकत होती. माझ्या मनाचा कल मात्र दुसरीकडेच होता. इंटर पास करण्याआधी मला पहिला हिरा सापडला होता. तो सहा कॅरेटचा होता तेव्हा मी निर्णय घेतला की आपण हिरेच शोधायचे.”
प्रकाश म्हणतात की, हिऱ्यांच्या वेडापायी त्यांनी लग्न केलं नाही. आता ते भावांबरोबर आणि त्यांच्या कुटुंबाबरोबर राहतात. हिऱ्याच्या शोधात ते आयुष्य खर्ची घालत आहेत.
ते म्हणतात, “हिरा म्हणजे माझ्यासाठी एक नशा आहे. मी ज्या दिवशी हिरा शोधला नाही, त्यादिवशी मला आजारी पडल्यासारखं वाटतं.”
हिऱ्यामुळे बदललं आयुष्य
पन्नाच्या जवळ रहुनिया गावात राहणाऱ्या मुलायम सिंह यांना 2020 मध्ये जवळजवळ 60 लाखाचा हिरा सापडला होता.
आज मुलायम सिंह यांचं छोटंसं तरी पक्कं घर आहे. मुलांचं शिक्षण आणि आरोग्याची चांगली काळजी घेत आहेत.

ते म्हणतात, “आम्ही लहानपणापासूनच हिऱ्याच्या खाणीचं काम करत आहोत. वडीलही हेच काम करायचे. बऱ्याच काळानंतर आमचं नशीब फळफळलं.
आम्ही चार लोकांनी भागीदारीत हिऱ्याची खाण सुरू केली होती. त्यात हिरा मिळाला तेव्हा त्या पैशाचा वापर आम्ही घर बांधायला, मुलांच्या शिक्षणासाठी आणि शेती खरेदीसाठी केला.”
अनेक वर्षांचा संघर्ष
पण, इथं सगळ्यांचीच गोष्ट स्वामीदीन किंवा मुलायम सिंह यांच्यासारखी नाही. ओडिशाहून आलेले सुखदेव सिंह अनेक वर्षं झाले इथे हिरा शोधताहेत, पण त्यांना अद्याप काहीही मिळालं नाही.
ते म्हणतात, “मी युट्यूबवर एक व्हीडिओ पाहिला. त्यात दाखवलं होतं की, पन्नाला येऊन लोक आपलं नशीब आजमावतात. मी सामान बांधलं आणि आलो. आतापर्यंत माझ्या हाती काही लागलं नाही.”

अमित श्रीवास्तवही अनेक वर्षापासून हिरे शोधताहेत. ते पन्नामधील सिंहपूर भागात राहतात.
ते म्हणाले की, “आमच्याकडे रुंज नदी आहे. तिथे खूप हिरे मिळतात. मी तिथे हिरे शोधतो. पावसाळ्यात तिथे हिरे मिळतात. आतापर्यंत मला मिळालेले नाही. पण त्यांच्या मोहापायी मी इथे येत असतो.”
तर भाजी विकणारे रमेश कुशवाहदेखिल एका रात्रीत श्रीमंत होण्यासाठी हिरे शोधत असल्याचं सांगतात.
ते म्हणतात, “पावसाळ्याच्या दिवसात मी हिरे शोधतो. इतर वेळी भाजी विकतो. मी भाजी विकून एकदम श्रीमंत होऊ शकत नाही, म्हणून मी हिरे शोधतो. माझा एक मित्र हिऱ्याचं काम करतो. त्यामुळं हिरे खूप पाहिले, मात्र आतापर्यंत मिळाले नाहीत. नशिबात असेल तर एक दिवस हिरा नक्की मिळेल.”
हिरा शोधण्यासाठी काय करावं लागतं?
आता प्रश्न असा की, पन्ना याठिकाणी हिरे शोधण्यासाठी काय करावं लागतं?
एखाद्याला कायदेशीर पद्धतीने हिरे शोधायचे असतील त्याने काय करायला हवं?
पन्ना येथे मझगवाँ नावाची एक खाण आहे. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएमडीसी) त्यावर नियंत्रण ठेवतं. हिरे उत्पादनाचा तो एकमेव संघटित स्रोत आहे.

तसंच पन्नामध्ये कोणीही 8x8 मीटर भूखंडावर कायदेशीर पद्धतीनं एका वर्षापर्यंत खोदकाम करू शकतो. त्यासाठी वर्षाला फक्त 200 रुपये खर्च करावा लागतो. मात्र पट्टे तत्त्वावर जमिनीचा जो भाग एखाद्या व्यक्तीला मिळाला आहे तिथे त्याला हिरा सापडेलच याची काही शाश्वती नाही.
त्यामुळं अनेक लोक अशा अधिकृत पद्धतीनं हे काम करत नाहीत.
हिरा मिळाल्यावर काय होतं?
पट्टे तत्त्वावर मिळालेल्या सरकारी जमिनीवर किंवा एका विशिष्ट कालावधीत कोणाला हिरा मिळाला तर तो हिरा पन्ना इथं सरकारने नियुक्त केलेल्या रत्नपारखीकडं घेऊन जातात.
तिथे हिऱ्याचे रंग, झळाळी, आकार दोष इत्यादीच्या आधारावर त्याचं मुल्यांकन केलं जातं. त्यानंतर हिऱ्याच्या मूल्यांकनाच्या आधारावर सर्व माहितीसह हिऱ्याच्या अंदाजित किंमतीची पावती हिरा सापडलेल्या व्यक्तीला दिली जाते आणि हिरा सरकारनियुक्त रत्नपारखीकडे जमा केला जातो.

त्यानंतर तो रत्नपारखी त्या हिऱ्याची एक पायाभूत किंमत ठरवतो आणि मग लिलावाची प्रतीक्षा सुरू होते.
प्रत्येत तिमाहीत हिऱ्याच्या उपलब्धतेच्या आधारावर हिऱ्याचा लिलाव आयोजित केला जातो. तिथं हिऱ्यासाठी कोणीही बोली लावू शकतं. सर्वोच्च बोली लावणाऱ्यांना तो हिरा विकला जातो.
हिऱ्याचा लिलाव झाल्यानंतर एकूण उत्पन्नाच्या 12.5 टक्के रक्कम सरकार ठेवते इतर रक्कम हिरा शोधणाऱ्याच्या खात्यात जमा केली जाते.
अवैध उत्खनन जोरावर
पण हिरा शोधायची आणि रक्कम मिळवण्याची प्रक्रिया इतकी साधी नाही. वर दिलेली सर्व माहिती हा फक्त त्यातला एक पैलू आहे. या बातमीत ज्या लोकांची माहिती दिली आहे त्यांच्याशिवाय अनेक लोक पट्टे तत्त्वावर न मिळालेल्या सरकारी जमिनीवर हिऱ्याचा शोध घेताना दिसतात.
कशाचीही भीती न बाळगता तंबूतून, झोपडीतून किंवा घरातून बाहेर निघत ते शोधमोहीम सुरू करतात.
हे खोदकाम करणाऱ्या बहुतांश लोकांना हिरा शोधण्यासाठी उत्खनन करण्याचं कोणतंही प्रशिक्षण मिळालेलं नाही.

हे लोक साधारणपणे जुन्या खाणीच्या आसपासच खड्डा खोदतात. जेव्हापर्यंत दगड गोटे असलेल्या मातीपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत हे लोक खोदत राहतात. त्याला स्थानिक भाषेत ‘चाल’ असं म्हणतात.
त्यानंतर या खड्ड्यात पाणी भरतात. मग त्या ओल्या मातीला अगदी बारीक चाळणीने चाळतात. मग त्याला धुवून वाळवलं जातं. त्यानंतर चाळणीत गोळा झालेल्या दगडं निवडण्याची (धान्य निवडतो तसे) प्रक्रिया सुरू होते. चाळणीत असलेल्या असंख्य दगडांपैकी हिरा शोधण्याची ही अंतहीन प्रक्रिया असते.
या प्रक्रियेत सहभाग असणाऱ्या लोकांनी आमच्याशी बोलताना दावा केला की, पन्ना येथील रुंज नदीच्या किनारी रिकाम्या असलेल्या जमिनीवर सकाळपासून लोक फावडा घेऊन खोदकाम करायला सुरुवात करतात.
असंच खोदकाम करणाऱ्या एका व्यक्तीने आम्हाला सांगितलं की, “माझ्या वडिलांना एक दशकांपूर्वी एक हिरा सापडला होता आणि तेव्हापासून आम्ही ही गोष्ट ऐकत आहोत. त्यांनी आयुष्यभर हिऱ्याचा शोध घेतला. काही काळापूर्वी त्यांचं निधन झालं. आता आम्ही त्याच वाटेवर जात हिऱ्याचा शोध घेत आहोत.”


अवैध पद्धतीने हिऱ्याचा शोध घेत असल्याचंही त्या व्यक्तीने आम्हाला सांगितलं.
मग चाळणीत जमा झालेल्या दगडांपैकी हिरा कोणता हे कसं ओळखायचं हा प्रश्नच आहे. त्याच्या उत्तरादाखल एक व्यक्ती म्हणाला, “जेव्हा तुम्ही हिरा पाहता किंवा त्याला स्पर्श करता तेव्हा शरीरात विजेचा धक्का लागल्यासारखं वाटतं. तो दगड जीवंत आहे असं वाटायला लागतं. हिऱ्याची प्रचंड आवड असणाऱ्या लोकांना ते लगेच कळतं.
आम्ही ज्या लोकांशी संवाद साधला त्यापैकी बहुतांश लोकांनी सांगितलं की, कायदेशीर पद्धतीने हिरा मिळाला आणि त्याचं मुल्यांकन करायला ते रत्नपारखीकडे गेले तर त्यांच्यासाठी ते नुकसानकारक होऊ शकतं कारण गुन्हेगार या लोकांपर्यंत पोहोचू शकतात.
पैसे मिळाले तर चोरी होण्याचा धोका असतो. त्यामुळं सरकारी पद्धतीचा अवलंब करण्यासाठी लोक कचरतात.
हिऱ्याच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीनं सांगितलं की, “पन्ना इथं सापडलेल्या हिऱ्यांपैकी फक्त 10-15 टक्के हिरेच सरकारपर्यंत पोहोचतात. बाकी हिरे खासगी पद्धतीने विकले जातात. लगेच हिरे विकले जातात आणि मिळालेल्या पैशावर कर लागत नाही त्यामुळे काळा बाजार जोरावर असतो. त्याचवेळी हिरे सरकारी कार्यालयात जमा करण्यासाठी लिलावाची वाट पाहावी लागते. त्यानंतरच पैसे मिळतात.”
पट्टे तत्त्वावर न मिळालेल्या जमिनीत हिरे शोधणाऱ्या लोकांमध्ये बाहेरच्या राज्यातील लोकांचा समावेश आहे.
अवैध खाणकामाच्या आरोपांवर सरकारची भूमिका?
पन्नामध्ये अवैध खाणकाम हिऱ्याचा काळा बाजाराचा आरोपांवर पन्ना जिल्ह्यातील उत्खनन अधिकाऱ्यांनी दावा केला की, आता परिस्थिती नियंत्रणात आहे.
आम्ही रुंज नदीच्या किनाऱ्यावरील आणि पन्ना इथं अवैध उत्खनन करणाऱ्यांबाबत सरकारी उत्खनन अधिकारी रवी पटेल यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले की, “आम्ही वेळोवेळी सोशल मीडियाचा वापर करून जागृती करतो. लोकांना सापडलेला हिरा सरकारी कार्यालयात जमा करण्याचं आवाहन करतो. मात्र हिरा इतका छोटा असतो की, त्याचा शोध घेणं कठीण असतं. त्यामुळं हिरा कोणाला मिळाला आणि कोणाला विकला हे कळणं फार कठीण होतं.”

“अवैध खाणींबद्दल बोलायचं झालं तर रुंज नदीच्या किनारी असलेल्या खाणी, तिथे सामील लोकांवर कारवाई केली जाते. खाणकाम करणाऱ्या तीन मशीन आम्ही नुकत्याच जप्त केल्या आहेत. त्यामुळं लोक घाबरले आहेत आणि परिस्थिती नियंत्रणात आहे,” असं ते म्हणाले.
हिऱ्याच्या काळा बाजार होतोय या आरोपाबद्दल बोलताना ते म्हणाले, “जेव्हाही आम्हाला याबद्दल माहिती मिळते तेव्हा आम्ही तातडीने कारवाई करतो. पण खरी परिस्थिती अशी आहे की, हिरा इतका छोटा असतो की तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी काही ना काही तुमच्या हातातून निसटतंच. लोकांनी अशा प्रकाराच्या कृत्यांमध्ये सहभागी होऊ नये याबद्दल जागृती करावी असं आमचं उद्दिष्ट आहे.”
पन्ना इथं हिऱ्याच्या शोधात येणारे लोक हे निम्न आर्थिक स्तरातील आहेत. त्यातील अनेकांना हिरा शोधण्याची कायदेशीर पद्धत कोणती आहे हेसुद्धा माहिती नाही.
अवैध खाणकामाची समस्या कमी होत आहे असं सरकारी अधिकारी वारंवार सांगत असले तरी पन्ना येथील कार्यालयात दर वर्षी लिलावासाठी येणाऱ्या हिऱ्यांची संख्या कमी होत आहे.
2016 मध्ये 1133 हिऱ्यांचा लिलाव झाला होता. तर 2023 मध्ये हीच संख्या फक्त 23 इतकी होती.
गरीबी आणि बेरोजगारीचंही आव्हान
गरिबीच्या वेगवेगळ्या निकषांचा विचार करायचा झाला तर, केंद्र सरकारनं केलेल्या यादीनुसार पन्ना हा मध्य प्रदेशातील अतिशय मागास भागांपैकी एक आहे.
इथे प्रचंड गरिबी आहे, पाण्याची टंचाई आणि कुपोषणासारख्या समस्या आहेत. बेरोजगारी ही सुद्धा मोठी समस्या आहे. इथले स्थानिक लोक हिऱ्याचं उत्खनन, मजूरी आणि शेतीवर अवलंबून आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
हिऱ्याच्या खोदकामात बहुतांश पुरुषच सहभागी आहेत. महिलासुद्धा हे काम करतात. मात्र, इथं काम करणाऱ्या लोकांची परिस्थिती फारशी चांगली नाही.
राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणाच्या अहवालानुसार पन्ना येथील 23.2 टक्के मुलं कुपोषणग्रस्त आहेत. 15 ते 49 वयोगटातील 59 टक्के महिलांमध्ये रक्ताचं प्रमाण कमी आहे.
पर्यावरणाची चिंता
पन्ना इथं सातत्यानं होणाऱ्या उत्खननामुळं पर्यावरणवाद्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
हिऱ्याच्या खोदकामावर नियंत्रण ठेवावं म्हणजे, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याचा सरकारवर दबाव वाढत आहे. पन्ना इथं असलेला व्याघ्र प्रकल्प हेही चिंतेचं एक कारण आहे. इथं आता 50 वाघ आहेत.
हा प्रकल्प पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित करण्यासाठी सरकारवर खाणकाम मर्यादित करण्याचा दबाव आहे.
मात्र, विनापरवाना खाणकाम केलं तर बंदी आणि दंडाची तरतूद आहे.
अनेक लोक असेही आहेत की, ज्यांच्यासाठी हिरा शोधणं आता त्यांच्यासाठी पैसा कमवणं आणि आयुष्य बदलण्याच्या पलीकडची बाब झाली आहे.
आता तो त्यांच्या दिनचर्येचा भाग झाला आहे. जमना पाल, अमित श्रीवास्तव आणि प्रकाश शर्मा यांसारखे अनेक लोक दिवस उगवताच हिरे शोधायला निघतील याबद्दल शंका नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











