अजय सोनकर : मोती तयार करण्याच्या क्षेत्रात जपानी वर्चस्वाला आव्हान देणारे शास्त्रज्ञ

मोती

फोटो स्रोत, HUAHINE

    • Author, प्रदीप कुमार,
    • Role, बीबीसी प्रतिनिध

सर्वसाधारण कुटुंबातील एका व्यक्तीनं आकाशाएवढं यश मिळवण्याची एक यशोगाथा आपण आज जाणून घेणार आहोत. यावर आपला सहजासहजी विश्वासही बसत नाही.

ही गोष्ट आहे जगभरात भारताचं नाव उंचावणारे अलाहाबादमधील मत्स्यपालन शास्त्रज्ञ (अॅक्वाकल्चरल साइंटिस्ट) डॉक्टर अजय कुमार सोनकर यांची. सुमारे तीन दशकांपूर्वी त्यांनी कल्चर मोती (कृत्रिम मोती) तयार करणाऱ्या देशांच्या यादीत भारताला स्थान मिळवून देण्याचा चमत्कार करून दाखवला होता.

तीन दशकांच्या करिअरमध्ये सोनकर यांनी मोत्यांच्या निर्मितीशी संबंधित विविध प्रकराचं यश मिळवलं आहे. मात्र, सर्वात आधी जाणून घेऊयात त्यांच्या नव्या कामाबाबत.

डॉक्टर सोनकर यांनी टिश्यू कल्चरच्या माध्यमातून प्रयोगशाळेत मोती उगवण्याचं किंवा तयार करण्याचा कारनामा केला आहे. आणखी सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास शिंपल्यामध्ये जे टिश्यू असतात ते ते बाहेर काढून, कृत्रिम वातावरणात ठेवून त्यांनी मोती तयार केले आहेत. म्हणजे मोती उगवण्यासाठी शिंपल्यावर अवलंबून राहण्याची किंवा सागरी हवामानाचीही गरज राहिली नाही.

'अॅक्वाकल्चर युरोप सोसायटी' या सागरी जीवांशी संबंधित मासिकाच्या सप्टेंबर 2021 च्या अंकात डॉक्टर अजय सोनकर यांचं हे नवं संशोधन प्रकाशित झालं आहे. या संशोधनानुसार डॉक्टर अजय सोनकर यांनी अंदमान निकोबार बेटांमधील शिंपल्यांमधील टिश्यूंचा वापर करून प्रयागराज येथील प्रयोगशाळेत मोती तयार केले आहेत.

शिंपल्यातून काढलेला टिश्यू ज्याप्रकारे समुद्रातील वातावरणात काम करतो, त्याचप्रकारे सुमारे दोन हजार किलोमीटर अंतरावरही हे टिश्यू नैसर्गिकरित्या त्यांचं काम करण्यास सक्षम ठरतात.

"पिंकटाडा मार्गेरेटिफेरा हे शिंपले अत्यंत खाऱ्या पाण्याच्या समुद्रात आढळतात. त्यांचं मेंटल काढून मी ते दोन हजार किलोमीटर लांब असलेल्या प्रयागराजच्या प्रयोगशाळेत आणले. ते मेंटल सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या.

ते प्रयागराजला आणण्यासाठीही आम्हाला 72 तास लागले. पण ते पूर्णपणे जिवंत आणि निरोगी होतं. त्यानंतर त्याला कल्चर करून त्यात इंजेक्ट करण्यात आले. त्यात पर्ली कंपोनेंट (मोत्यांचे गुणधर्म असलेली तत्वं) बरोबरच पर्ल म्हणजे मोतीही तयार झाला," असं डॉक्टर अजय कुमार सोनकर यांनी या शोधाबाबत बोलताना सांगितलं.

डॉ. अजय सोनकर

फोटो स्रोत, dr. ajay sonkar

सोनकर यांचं हे संशोधन अत्यंत महत्त्वाचं असल्याचं भारतीय कृषी संशोधन परिषदेची लखनऊ येथील संस्था नॅशनल ब्युरो ऑफ फिश जेनेटिक रिसोर्सेसचे संचालक डॉक्टर कुलदीप के लाल म्हणाले.

"डॉक्टर सोनकर यांचं नवं संशोधन नक्कीच अत्यंत महत्त्वाचं आहे. यामुळं मोती उगवण्याच्या पद्धतीत आमुलाग्र बदल होऊ शकतो. मोती उगवण्यासाठी समुद्रावर अवलंबून राहावं न लागणं, हेच एक मोठं आश्चर्य आहे," असं ते म्हणाले.

आतापर्यंत समुद्रात आढळणारे शिंपले आणि कवड्यांशिवाय कृत्रिम मोती उगवण्याची कल्पना यापूर्वी केली जात नव्हती. शंख आणि कवड्यांप्रमाणेच मोतीदेखील शिंपले किंवा पाण्यात आढळणाऱ्या मत्स्य समूहातील इतर जीवांच्या जैविक उत्पादनाचा एक भाग आहे.

हे जीव श्वास घेण्यासाठी तोंड उघडतात त्यावेळी कधीकधी बाहेरची एखादी वस्तू तोंडातून आत जाते. हे जीव ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. पण ते शक्य झालं नाही, तर त्रास कमी करण्यासाठी शरिरातून एक खास रसायन त्यावर सोडतात. रसायनाच्या प्रभावामुळं त्या वस्तूचा हळूहळू मोती तयार होतो. मात्र मोती बनण्याची नैसर्गिक प्रक्रिया दहा लाख शिंपल्यांपैकी एकामध्ये होत असते.

मात्र, कृत्रिमरिच्या मोती उगवण्याच्या तंत्रानं मोत्यांचं विश्व बरंच बदललं आहे. अजय सोनकर यांचं काम हे या दिशेनं महत्त्वाचं पाऊल समजलं जात आहे.

विशेष म्हणजे करिअरच्या अत्यंत कठीण काळामध्ये अजय सोनकर यांनी हे काम केलं आहे. त्यांच्या अडचणींबाबत जाणून घेण्यापूर्वी त्यांच्या प्रवासाबाबत माहिती घेणं महत्त्वाचं आहे.

प्रयागराजमधून जगभरात पोहोचले

डॉक्टर अजय सोनकर यांचं काम आश्चर्यचकित करणारं असलं तरी, मोती निर्मितीच्या क्षेत्रात गेल्या तीन दशकांमध्ये त्यांनी अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टींद्वारे अनेकदा जगाला आश्चर्याचे धक्के दिले आहेत. 1991 मध्ये अलाहाबादच्या कटरामध्ये मोती बनवण्याची आवड त्यांना निर्माण झाली होती.

डॉ. अजय सोनकर

फोटो स्रोत, DR AJAY KUMAR SONKAR

भौतिकशास्त्र, रसायन आणि गणिताचा अभ्यास करणाऱ्या सोनकर यांना इंजिनीअर व्हायचं होतं. त्यांनी वारंगळ रिजनल इजिनीअरिंग कॉलेजमधून इंजिनिअरिंगचं शिक्षणही पूर्ण केलं. मात्र त्या काळात दुपारच्या वेळी दूरदर्शनवर प्रसारीत होणाऱ्या यूजीसीच्या शैक्षणिक कार्यक्रमावर आधारित एका टीव्ही शोमधील एका स्टोरीनं त्यांचं जीवन बदलून गेलं.

"त्या स्टोरीमध्ये जपानी पर्ल कल्चरबाबत माहिती दिली जात होती. मी शिंपल्यातून मोती निघताना पाहिलं, तर मला ते आवडलं. त्याचं कारण म्हणजे आमच्याकडे एक तलाव होता आणि त्यात शिंपले होते. त्यामुळं मीही मोती तयार करू शकतो, हे माझ्या मनात ठाम झालं. मात्र मला या तंत्राबाबत काहीही माहिती नव्हता. त्यावेळी नेमकाच इंटरनेटचा जन्म झाला होता. मात्र ते भारतात आलं नव्हतं," असं सोनकर सांगतात.

"मी एक शिंपलं खिशात घेतलं आणि अलाहाबाद विद्यापीठाच्या जीवशास्त्र विभागाच्या एका प्राध्यापकांना ते काय आहे, हे विचारायला गेलो. त्यांनी मला ते मसल्स आहे, असं सांगितलं. हे उघडतं कसं विचारलं असता त्यांनी पाण्यात उकळायला सांगितलं. पण त्यामुळं हे मरून जाईल, असं मी म्हटलं. त्यावर मेल्यावरच याला उघडत असतात, विद्यापीठात असलेली सगळी शिंपली मेलेलीच आहेत असं त्यांनी मला सांगितलं."

यावरून मोती उगवणं किंवा तयार करणं एवढं सोपं नसल्याचा अंदाज अजय सोनकर यांना आला होता. मात्र त्यांनी आशा सोडली नाही.

"अलाहाबादच्या दरंभगा कॉलनीजवळ मत्स्य विभागाचं कार्यालय होतं. त्याठिकाणी ते गेले. माझ्याकडे तलाव आहे आणि मला मोती उगवायचे आहेत, काही मदत मिळेल का? असं घाबरत घाबरतच विचारलं. त्यांनी माझ्याकडे खालून वरपर्यंत पाहिलं. आम्हाला माशांचं उत्पन्न घेता येत नाहीये आणि तुला मोत्याचं सुचतंय, अभ्यासाचं वय आहे तर अभ्यास कर, असं ते म्हणाले. मोती ताज्या पाण्यात तयार होत नाहीत, कधीतरी समुद्र घेऊन ये मग पाहू, असं ते म्हणाले."

मोती

मात्र सोनकर यांनी हार मानली नाही. त्यांनी कल्चर मोती तयार करण्याची माहिती गोळा करायला सुरुवात केली. मात्र, त्या काळात माहिती मिळवण्याची सोपी पद्धत उपलब्ध नव्हती. पण प्रयत्न केल्यास मार्ग सापडतो म्हणतात, तसंच सोनकर यांच्याबरोबर घडलं.

मोती तयार करण्याची प्रेरणा कुठून मिळाली?

अलाहाबाद स्टेशनवर त्यांना एका दुकानात योगायोगानं नॅशनल जिओग्राफिकचा एक जुना अंक भेटला. कल्चर मोती तयार करण्याची माहिती असलेला तो विशेषांक होता. सोनकर यांनी तो खरेदी केला आणि आजवर जपूनही ठेवलेला आहे.

याबरोबरच त्यांनी तलावातील शिंपल्यांसह त्यांना असलेल्या माहितीवरून प्रयोग करायला सुरुवात केली. शिंपली मोठ्या मोठ्या भांड्यात ठेवायची आणि त्याकडं एकटक पाहत बसायचं, हा सोनकर यांचा जणू छंद बनला होता. पण मध्यवर्गीय समाजात हे काम एवढं सोपंही नव्हतं.

डॉ. अजय सोनकर

फोटो स्रोत, DR. AJAY KUMAR SONKAR

शिंपले श्वास घेण्यासाठी तोंड उघडतात हे त्यांना लवकरच कळलं. शिवाय बाहेरची एखादी वस्तू आत गेल्यास मोती बनू शकतो, हेही माहिती होतं.

"मी अभ्यास सुरू केला तर मला समजलं की, जगभरात केवळ जपानकडं मोती तयार करण्याचं तंत्रज्ञान आहे. इतर देशांना ते तंत्रज्ञान देत नव्हते. तसंच चांगले मोती तयार करण्यासाठी, जो कच्चा माल म्हणजे न्यूक्लिअस इंजेक्ट करावं लागतं, ते अमेरिकेच्या मिसीसिपी नदीत आढळतं. पण अमेरिकेत तंत्रज्ञान नव्हतं. त्यामुळं मोती तयार करण्यासाठी जपानकडून मदत घ्यावी लागायची," असं सोनकर सांगतात.

सुरुवातीच्या काळात शिंपल्यानं तोंड उघडलं की, सोनकर यांनी व्हाईट सिमेंटचे लहान लहान तुकडे टाकून प्रयोग सुरू केला.

"कोणीही भेटलं की मला विचारायचं, मोती बनला का? लोक टोमणे मारायचे. आई वडीलही मला वेड लागलंय, असं म्हणायचे. पण मला त्यानं फरक पडत नव्हता," असं सोनकर यांनी सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी सांगताना म्हटलं.

सोनकर यांनी केवळ त्यांच्या जिद्दीपोटी काहीही अपेक्षा नसलेला हा प्रयोग सुरू ठेवला. विशेष म्हणजे अवघ्या दीड वर्षात ताज्या पाण्यात कृत्रिम मोती तयार करत त्यांनी संपूर्ण जगाला, धक्का दिला. विशेष म्हणजे जपानची काहीही मदत न घेता त्यांनी हे केलं होतं.

डॉ. अजय सोनकर

फोटो स्रोत, DR. AJAY KUMAR SONKAR

कृत्रिम मोती तयार करण्याच्या क्षेत्रात जपानला मिळालेलं हे पहिलंच आव्हान होतं. 1993 मध्ये मिळालेल्या या यशानं अजय सोनकर एका रात्रीत चर्चेत आले. प्रथमच, शेकडो शिंपल्यांमधून 36 मध्ये मोती तयार झाले होते. कुटुंबीयांना आश्चर्य वाटलं, मात्र मी वेगळ्याच विचारात होतो. इतर शिंपल्यांत मोती का बनले नाही, याचा मी विचार करत होतो, असं सोनकर सांगतात.

त्यांच्या या यशाची गाथा त्यावेळी दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या गिरीश कर्नाड यांच्या प्रसिद्ध 'टर्निंग पॉइंट' या कार्यक्रमात दाखवण्यात आली होती. तो एपिसोड आपण इथे पाहू शकता.

14 ते 19 मे 1994 मध्ये अमेरिकेतील बेटावर पर्ल कल्चरची पहिली आंतरराष्टीय परिषद आयोजित करण्यात आली होती. अजय सोनकर यांनाही त्यात सहभागी होण्याचं आमंत्रण मिळालं.

"मी त्याठिकाणी स्टेट गेस्ट होतो. त्यांनी विमान प्रवासासाठी तिकिट पाठवलं होतं. प्रथमच विमानात जाणार होतो. शिवाय मी सर्वात लहान होतो. मी यावर एक मार्ग शोधला. लोकांकडे पाहायचंच नाही असं ठरवलं. कॉन्फरन्स हॉलमध्ये माझा पेपर वाचताना मी एकदाही वर नजर केली नाही. माझं वाचून झाल्यानंतर लोक उभं राहून टाळ्यात वाजवत होते. मी आजही ते विसरू शकलो नाही," असं सोनकर म्हणाले.

डॉ. अजय सोनकर

फोटो स्रोत, DR. AJAY KUMAR SONKAR

मात्र, तेव्हापासून सुरू झालेला प्रवास आजही सुरुच आहे. जगभरात 68 देशांमध्ये अजय सोनकर यांची पर्ल कल्चरबाबत व्याख्यानं झाली आहेत. त्याचे अनेक रिसर्च पेपर प्रकाशित झाले आहेत.

त्यानंतर दोन वर्षांमध्ये 1996 मध्ये अजय सोनकर यांनी 22 मिलीमीटर लांबीचं न्यूक्लिअस तयार केलं. कृत्रिम मोती निर्मितीच्या क्षेत्रात तो जगातील सर्वात मोठा होता. अमेरिकेत या न्यूक्लिअसची तपासणी करण्यात आली. कृत्रिम मोती निर्मितीच्या क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित शास्त्रज्ञ डॉक्टर सी रिचर्ड फॉस्लर यांनी अमेरिकेच्या बाजारात त्याची किंमत 30 हजार डॉलर असल्याचा अंदाज व्यक्त केला. जपान आणि अमेरिकेच्या न्यूक्लिअसच्या तुलनेत ती पाच ते सहा पटींनी अधिक होती.

सोनकर यांच्या कामाबाबत जगभरात चर्चा सुरू झाली. त्यावेळी भारत सरकारच्या सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटनंही त्यांनी 1999 मध्ये कामाची ऑफर दिली. मात्र तोपर्यंत सोनकर यांनी अभ्यास आणि संशोधनाच्या आधारे, भारताच्या अदमान निकोबार बेटांच्या सागरी भागात काम करण्याचा निर्णय घेतला आणि केंद्र सरकार तसंच स्थानिक प्रशासनाच्या परवानगीनं 2003 पासून तिथं काम सुरू केलं.

डॉ. अजय सोनकर

फोटो स्रोत, DR. AJAY KUMAR SONKAR

अंदमानच्या सागरी भागामध्ये पिंकटेडा मार्गेरेटिफेरा नावाची शिंपल्याची प्रजाती आढळते. त्यापासून काळा मोती तयार करणं शक्य होतं. पाहता पाहता सोनकर यांनी काळ्या पाण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अंदमानची ओळख 'काळ्या मोत्यांचं केंद्र' अशी बदलून टाकली.

अंदमानमधील चढ-उतार

सोनकर त्यांचं काम स्वतंत्र पद्धतीनं करत होते. पण कृत्रिम मोत्यांच्या बाजारपेठेत त्यांच्या मोत्यांची मागणी वाढू लागली होती. अंदमान प्रशासनही त्यांच्या कामाला अभिमानाना सर्वांसमोर सादर करत होतं.

भारताचे राष्ट्रपती आर के नारायणन यांच्यापासून ते एपीजे अब्दुल कलाम आणि रामनाथ कोविंद यांनीही त्यांचं कौतुक केलं आहे. सोनकर त्यांना भेटून कामाची माहिती देत होते. याच दरम्यान त्यांनी 43 मिलीमीटर आकाराचा गणेशाची प्रतिकृती असलेला मोती तयार करत, जगाचं लक्ष वेधून घेतलं.

डॉ. अजय सोनकर

फोटो स्रोत, DR. AJAY KUMAR SONKAR

पण प्रत्येक वेळ सारखी नसते म्हणतात तसंच काहीसं घडलं. सोनकर यांच्या अडचणी वाढू लागल्या. 2019 मध्ये अंदमान प्रशासनानं त्यांना समुद्रातील काम थांबवण्यास सांगितलं. त्यासाठी प्रशासनानं सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्युटच्या अभ्यासाचा हवाला दिला. त्यात व्यावसायिक उत्पादन घेण्यासाठी अंदमानमध्ये पिंकटेडा मार्गेरेटिफेराची उपलब्धता पुरेशी नसल्याचं म्हटलं होतं.

त्यानंतर सोनकर यांच्या समुद्रकिनारी असलेल्या प्रयोगशाळेवर अज्ञात लोकांनी हल्ला करत ती उध्वस्त केली असा दावा त्यांनी केला आहे. अजय सोनकर यांनी अंदमान निकोबारच्या डीजीपींकडे या घटनेबाबत तक्रार केली. त्यांनी चौकशीचं आश्वासन दिलं. पण काहीही झालं नाही, असं सोनकर सांगतात.

डॉक्टर अजय सोनकर प्रयोगशाळेवर लावलेल्या बंदीबाबत कोलकाता हायकोर्टात गेले. न्यायालयानं प्रशासनाच्या आदेशावर स्थगिती आणली. म्हणजे सोनकर यांना कल्चर मोती तयार करण्यासाठी पुन्हा जागा मिळाली आहे.

पण ज्या अंदमान प्रशासनाला सोनकर यांचा अभिमान होता, तिथं असं कशामुळं घडलं. "सरकारच्या प्रशासनातील लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली होती. प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. तसंच कोरोनाचा लॉकडाऊनही लागला होता. त्यामुळं मी अलाहाबादमध्येच काम सुरू ठेवलं. त्यामुळंच टिश्यू कल्चरचं काम यशस्वी झालं. आता मी कुठेही हे काम करू शकतो," असं सोनकर म्हणाले.

डॉ. अजय सोनकर

फोटो स्रोत, DR. AJAY KUMAR SONKAR

या संपूर्ण प्रकरणात दक्षिण अंदमानचे उपायुक्त सुनील अंचिपाका यांच्याकडे विचारणा केली. त्यावर "मी गेल्या एक वर्षापासून इथं आहे. प्रकरण त्याआधीचं आहे. अजय सोनकर यांनी मला अडचण सांगितली तर मी त्यांची तक्रार सोडवण्याचा प्रयत्न करेल किंवा संबंधित ठिकाणी त्यांची तक्रार पोहोचवेल," असं ते म्हणाले.

कोव्हिडचं संकट टळल्यानंतर पुन्हा एकदा अंदमानमध्ये काम सुरू करण्याचा विचार करत अल्याचं सोनकर म्हणाले. प्रशासनाबाबत मात्र त्यांची नाराजी आहे. "एकीकडे देशात 'मेड इन इंडिया'च्या चर्चा होत आहेत. मात्र कनिष्ठ पातळीवर याला गांभीर्यानं घेतलं जात नाही. सरकारी कार्यालयांमध्ये बेजबाबदारपणा पाहायला मिळतो," असं ते म्हणाले.

अजय सोनकर यांनी आतापर्यंत त्यांचं काम खासगी पद्धतीनंच केलं आहे. मात्र, त्यांना सरकारच्या साथीनं हे कौशल्य इतरांपर्यंत पोहोचवायचं आहे.

"सरकार पर्ल कल्चरबाबत गंभीर आहे. सरकारला याचा विकास करायचा आहे. मी आतापर्यंत वैयक्तिकरित्या काम केलं आहे. सरकारची इच्छा असेल तर मलाही देशाच्या आर्थिक विकासात योगदान द्यायला आवडेल," असं सोनकर म्हणाले.

समुद्र

फोटो स्रोत, HARI KUMAR

"भारतीय पर्ल कल्चरला अजय सोनकर यांच्या तंत्रामुळं फायदा होऊ शकतो. पण यात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे सोनकर त्यांचं तंत्रज्ञान किती लोकांबरोबर कशाप्रकारे शेअर करू इच्छितात. तर दुसरी बाब म्हणजे, हे एवढं परिश्रमाचं आणि कठीण काम आहे, की हजारोंपैकी एक दोन लोकच ते शिकू शकतात," असं कुलदीप के लाल म्हणाले.

"जपानकडे तंत्रज्ञान आहे, मात्र त्यांच्याकडे नैसर्गिक हवामान नाही. त्याठिकाणी एवढी थंडी असते की, एका राऊंडच्या पर्ल कल्चरसाठी कमीत कमी, अडीच ते तीन वर्षांचा कालावधी लागतो. आपल्याकडे ते सहा महिने ते एका वर्षाच्या कालावधीत होतं. हा भारताच्या दृष्टीनं सकारात्मक मुद्दा आहे. शिवाय आपल्या मोत्यांचा दर्जाही, अधिक चांगला असतो," असं सोनकर यांनी भारतीय पर्ल कल्चरच्या संधींबाबत बोलताना सांगितलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)