मुस्लीम तरुण आणि ज्यू तरुणी, तालिबानच्या राजवटीत कशी फुलली ही प्रेमाची गोष्ट?

ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आली. त्यावेळी अफगाणिस्तान सोडून जाण्यासाठी तिथल्या विमानतळांवर लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.

तेव्हा अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन डीसीमध्ये सफी रऊफ नावाच्या एका माजी नौदल वैद्यकीय कर्मचाऱ्यानं अफगाणिस्तानात अडकलेल्या त्याच्या मित्रांना तिथून बाहेर काढण्यासाठी एक मोहीम सुरू केली.

तेव्हा त्यानं ही मोहीम पार पाडताना तो कोणाच्या प्रेमात पडेल आणि त्याच्या आयुष्याच्या वेगळं वळण लागेल, असा विचारही केला नव्हता. तो वेगळ्या धर्मातील म्हणजे एका ज्यू तरुणीच्या प्रेमात पडेल, याची त्याला जराही जाणीव नव्हती.

सफी रऊफ त्या दिवसांची आठवण सांगतात, "मी दचकतच आधी एका व्यक्तीला मदत केली. मग मी दुसऱ्याला केली आणि मग तिसऱ्याला केली. अचानक ती एक मोठी चळवळ तयार झाली. त्यात अफगाणिस्तानातून शेकडो लोक आणि आमच्यापैकी कित्येकजण अमेरिकेतून काम करत होते."

सफी यांचा जन्म एका निर्वासितांच्या छावणीत झाला होता. त्यानंतर काही वर्षांनी ते अमेरिकेत आले. मात्र अफगाणिस्तानात सत्ताबदल झाल्यानंतर तिथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याच्या मोहिमेचा ते एक भाग झाले.

अशा परिस्थितीत त्यांची भेट न्यूयॉर्कमधील नाट्यदिग्दर्शक सॅमी कॅनॉल्ड यांच्याशी झाली. सॅमी एका मित्राच्या कुटुंबीयांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होत्या.

सॅमी म्हणतात की, "माझा कोणताही संपर्क नव्हता. मी टीव्हीवर सफी यांच्या ग्रुपबद्दल पाहिलं. मग मी मदतीसाठी त्यांना संपर्क केला. त्यांनी मला सांगितलं की, मी वॉशिंग्टनला यावं आणि त्यांच्या टीमबरोबर काम करावं हेच सर्वात योग्य ठरेल."

मग सॅमी यांनी त्यांचं सामान बांधलं आणि त्या वॉशिंग्टन डीसीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसल्या. त्या एका ऑपरेशन सेंटरवर पोहोचल्या. तिथे फक्त पुरुषच काम करत होते.

त्या हसत सांगतात की, "मी जॅझ हँड्स थिएटर सर्कलमध्ये राहते आणि हा माझ्यासाठी एक मोठा सांस्कृतिक धक्का होता."

सॅमी यांना अफगाणिस्तानबदद्ल काहीही माहिती नव्हतं. मात्र त्यांच्याकडे असलेलं एक कौशल्य लवकरच खूप महत्त्वाच ठरलं.

त्या म्हणतात, "मी स्प्रेडशीट आणि कम्युनिकेशनमध्ये निपुण होते. त्यामुळे मी ऑपरेशनच्या कम्युनिकेशनचं काम सांभाळलं."

दोघांमधील प्रेम कसं फुललं?

ऑपरेशन सेंटरमध्ये गडबड-गोंधळ आणि आपत्कालीन स्थिती असताना तिथे आणखीही काहीतरी घडत होतं.

सॅमी म्हणतात, "आकर्षण होतं का? मला वाटतं, त्याचं उत्तर हो असंच आहे." त्यांना हेदेखील आठवतं की त्यांनी गुगलवर सफी यांचं वय किती आहे हे शोधलं होतं.

सॅमी म्हणतात, "मी गुगलवर सफीचं नाव आणि वय शोधलं कारण त्यावेळेस तो इतका तणावात होता की, आताच्या तुलनेत तेव्हा खूपच वयस्कर वाटत होता."

ते पहिल्यांदा फिरायला म्हणून पहाटे 3 वाजता गेले होते. चालत-चालत ते वॉशिंग्टनमधील स्मारकांजवळून फेरफटका मारत लिंकन मेमोरियलला पोहोचले होते.

सॅमी म्हणतात, "सर्वकाही एखाद्या चित्रपटासारखं वाटत होतं. मी विचार केला, मी या मुलाशी लग्न करणार आहे का?"

त्या दोघांचं पहिलं 'चुंबन' किंवा 'किस' ऑपरेशन सेंटरच्या बाल्कनीत झालं होतं. त्यावेळेस सफी घाबरले होते आणि सॅमीबरोबर कारबद्दल बोलू लागले होते.

सांस्कृतिकदृष्ट्या त्या दोघांची पार्श्वभूमी वेगवेगळी असतानादेखील त्या दोघांमधील नातं वेगानं घट्टं होत गेलं. ते दोघेही एकमेकांच्या जवळ येत गेले.

सफी म्हणतात, "सॅमी मला विचारायची की, मी माझ्या कुटुंबाशी तिची गाठभेट घालून देणार आहे का, तीच असं होऊ शकत नाही, हेही म्हणायची."

सफी यांच्या मुस्लीम कुटुंबाची अपेक्षा होती की, ते एखाद्या अफगाण तरुणीशी विवाह करतील. सॅमी मात्र ज्यू आहेत.

तरीही त्या दोघांनी नातं पुढं नेण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. सॅमीनं सफीचा परिचय त्यांच्या जगाशी करून दिला. तेव्हा त्या दोघांच्या नात्याची पहिली परीक्षा झाली. ते जग म्हणजे म्युझिकल थिएटर स्टेज म्हणजे संगीत नाट्यभूमी. सॅमी सफी यांना म्युझिकल 'ले मिजरेबल्स' दाखवण्यासाठी घेऊन गेल्या.

सॅमी म्हणतात, "सफीला एकप्रकारे वेड लागल्यासारखं झालं होतं. त्याला म्युझिकल आणि विशेषकरून 'ले मिजरेबल्स' खूपच आवडलं. ते माझ्यासाठी स्वप्नपूर्तीसारखंच होतं."

सफीवर एखादी जादू झाल्यासारखंच झालं होतं.

ते म्हणतात, "मी अस्तित्वाचा संघर्ष करत वाढलो आहे. त्या शोमधील मुख्य पात्र मारियस मला खूपच जवळचं वाटलं. ते एक विद्रोही पात्र आहे मात्र एक प्रेमीदेखील आहे."

तालिबानच्या कैदेत

डिसेंबर 2021 मध्ये, सफी लोकांची मदत करण्यासाठी त्यांच्या भावासोबत काबूलला परतले. त्यांना अफगाणिस्तानात न जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र सफी म्हणतात की तालिबाननं त्यांना माफ करण्याची आणि सुरक्षेची खात्री दिली होती.

अर्थात अफगाणिस्तानातील त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये तालिबानच्या गुप्तहेर यंत्रणांनी सफी, त्यांचा भाऊ आणि इतर पाच परदेशी नागरिकांना ताब्यात घेतलं होतं.

सुरुवातीचे काही दिवस त्यांना एका भूमिगत कोठडीत ठेवण्यात आलं होतं. तिथे खूप जास्त थंडी होती.

सफी म्हणतात, "ती सहा फूट बाय सहा फूट लांबीची खोली होती. तिथे खिडक्या नव्हत्या, अंथरुण-पांघरुण नव्हतं."

तर न्यूयॉर्कमध्ये सॅमी घाबरलेल्या होत्या. त्यांनी गुगल मॅप्सवर सफी यांचं लोकेशन तपासलं. सफी यांचं लोकेशन तालिबानच्या गुप्त मुख्यालयात दिसत होतं.

त्या म्हणतात, "मला काबूलबद्दल जास्त माहिती नव्हती. मात्र हे ठीक नाही याची मला जाणीव होती."

अनेक आठवडे सफी यांची कोणतीही माहिती मिळाली नाही. तोपर्यंत एक सुरक्षा रक्षकाबरोबर सफी यांची मैत्री झाली होती. त्या सुरक्षा रक्षकाला पैशांची गरज होती. सफी यांनी या गोष्टीचा फायदा घेतला.

सफी यांनी त्यांच्या चुलत भावाच्या मदतीनं पैसे आणि एका मोबाईल फोनची व्यवस्था केली.

भूमिगत कोठडीत मोबाईल फोनला सिग्नल येत नव्हता. सिग्नलसाठी सफी त्यांच्या भावाच्या खांद्यावर बसले आणि त्यांनी सॅमी यांना एक संदेश पाठवला. "हाय, कशी आहेस? माझं तुझ्यावर प्रेम आहे."

सॅमी म्हणतात, "त्याचा पहिला फोन 17 दिवसांनी आला. तो जिवंत आहे, हे समजणंच माझ्यासाठी खूप काही होतं. त्याचा आवाज ऐकून मी खूप खूश झाले. मात्र तो कोणत्या परिस्थितीत असेल, हा विचार करून लगेचच मी खूप घाबरलेदेखील."

अटकेत असताना सफी यांना फक्त 'ले मिजरेबल्स'चा आधार होता.

ते म्हणतात, "सुरुवातीचे 70 दिवस मी सूर्यच पाहिला नाही. आम्ही पूर्णवेळ भूमिगत कोठडीत होतो. तिथे आणखी सात परदेशी लोकांना ठेवण्यात आलं होतं. त्यातील एकजण खूप आजारी पडला. मग दुसरा खूपच निराश झाला."

अशा परिस्थितीत ते हळूच 'ले मिजरेबल्स'ची गाणी गायचे. ते म्हणतात, "ते माझ्या प्रतिशोधाचं गाणं झालं."

दरम्यान, त्यांचं सॅमीबरोबर बोलणं सुरू होतं.

ते म्हणतात, "मी पांघरुण अंगावर घेऊन हळूहळू बोलायचो, जेणेकरून गार्डला माझा आवाज येणार नाही."

"माझा भाऊ माझ्यापासून दोन फूट अंतरावरच असायचा. त्यामुळे सॅमीबरोबर रोमँटिक बोलणं शक्य व्हायचं नाही."

सफी यांच्या आई-वडिलांशी सॅमी यांची भेट

तालिबानबरोबरच्या वाटाघाटी बऱ्याच लांबल्या. शेवटी 70 व्या दिवशी सफी यांच्या सुटकेला ते तयार झाले.

सॅमी सांगतात की, एकदा तर तालिबाननं धमकी दिली होती की जर अमेरिकेनं काही केलं नाही तर ते त्यांना ठार करतील.

सॅमी म्हणाल्या, "मग असं ठरलं की सफी यांचे आई-वडील आणि मी कतारला जाऊ. तिथे ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी बऱ्याच वाटाघाटी सुरू होत्या."

सॅमी कतारला गेल्या. तिथे वाटाघाटी सुरू होत्या. तिथे पहिल्यांदा त्यांची भेट सफी यांच्या आई-वडिलांशी झाली.

त्या म्हणतात, "त्यांना आधीपासूनच माझ्याबद्दल माहिती नव्हतं आणि अचानक आम्ही दोन आठवडे एकत्र राहू लागलो."

त्या पुढे म्हणतात, "सफीच्या आई-वडिलांना चांगलं इंग्रजी बोलता येत नव्हतं. त्यामुळे असं ठरवण्यात आलं की, मी त्यांच्या कुटुंबाची प्रतिनिधी होईल."

परंपरावादी अफगाण मुस्लिमांसाठी त्यांच्या मुलाच्या सीक्रेट ज्यू गर्लफ्रेंडबद्दल माहित होणं, हा मोठा धक्काच होता. मात्र या संकटाच्या परिस्थितीमुळे त्यांना ही गोष्ट स्वीकारणं भाग पडलं.

सॅमी म्हणतात, "मी याचं श्रेय सफीच्या आई-वडिलांना देते. त्यांनी ज्याप्रकारे मला स्वीकारलं, ते अद्भूत होतं."

105 दिवसांनंतर, सफी यांची सुटका करण्यात आली आणि शेवटी त्यांची सॅमीशी भेट झाली.

असा झाला दोघांचा विवाह

अमेरिकेत पुन्हा भेट झाल्यानंतर ते दोघेही सोबत राहू लागले.

लवकरच त्या दोघांनी विवाह केला. त्यांच्या विवाहात अफगाण आणि ज्यू परंपरेचा संगम दिसून आला.

पाहुण्यांनी अफगाणी पोशाख घातला, ज्यू गाणी गायली. सफी यांनी त्यांच्या मित्रांबरोबर 'फिडलर ऑन द रूफ'चा बॉटल डान्सदेखील केला.

एका भावूक प्रसंगी, सफी कैदेत असताना सॅमी यांनी लिहिलेली डायरी वाचली.

तालिबानच्या कैदेत असताना 32 व्या दिवशी सॅमी यांनी डायरीत लिहिलं होतं, "माझं स्वप्न आहे की, एक दिवस मी तुझ्याबरोबर व्हरांड्यात बसून डायरी वाचेन. प्लीज, प्लीज, प्लीज परत ये."

ती डायरी लिहिताना सॅमीनं ते वाचलं नव्हतं.

"ते खूप वेदनादायी होतं. मात्र आम्ही लग्नाच्या वेळेस ते एकत्र वाचलं."

इतकंच काय, त्यांच्या साखरपुड्याच्या अंगठीमागदेखील एक कहाणी आहे. सपी यांनी त्यांच्या कोठडीच्या कुलुपाचा एक तुकडा अंगठीत बसवला होता.

ते म्हणतात, "त्या अनुभवानं आमच्या आयुष्याचा पाया घातला."

प्रेमाचा धडा

मागे वळून पाहिल्यावर, सॅमी यांना वाटतं की त्यांच्या अनुभवामुळे त्यांच्या नात्याला नवं रूप मिळालं.

त्या म्हणतात, "मी जितक्या जोडप्यांना ओळखते, त्यांच्या तुलनेत आम्ही कमी भांडतो. कारण जेव्हा तुम्ही एखाद्याला जवळपास गमावलेलंच असतं. तेव्हा छोट्या-छोट्या कुरबुरींचं महत्त्व राहिलेलं नसतं."

सफी यांना खूप धन्य वाटतं.

ते म्हणतात, "आम्ही ज्या आव्हानांना तोंड दिलं आहे, त्याच्यापुढे आता आयुष्यात यापुढे येणारी आव्हानं तितकी कठीण वाटणार नाहीत. इथे असणं, नातं संपलेलं नसणं आणि प्रेमात असणं- हा एक चमत्कार आहे."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.