You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोटामध्ये हिंदू-मुस्लीम कुटुंबीयांचा अनोखा विवाहसोहळा, सर्वांची जिंकली मनं
- Author, मोहर सिंग मीणा
- Role, बीबीसी हिंदीसाठी
राजस्थानमधील कोटा शहरात राहणारे विश्वजित चक्रवर्ती आणि अब्दुल रऊफ अन्सारी यांची मैत्री केवळ चाळीस वर्षांची नाही, तर ती दोन कुटुंबांना एकत्र बांधणारा धागा आहे. धर्म, जात, रूढी, परंपरा यापलीकडे जाऊन या दोन मित्रांनी आपल्या मुलांच्या लग्नाच्या निमित्ताने दिलेल्या सलोखा आणि बंधुभावाचा संदेश, त्याचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
राजस्थानमधील विश्वजित चक्रवर्ती आणि अब्दुल रऊफ अन्सारी यांनी आपल्या मुलांच्या लग्नासाठी एकच निमंत्रण पत्रिका छापली. इतकंच नव्हे तर दोघांचा स्वागत समारंभही एकत्रितच पार पाडला.
अन्सारी आणि चक्रवर्ती यांच्या कुटुंबीयांनी मिळून त्यांच्या नात्याचा आनंद अशा प्रकारे साजरा केला की, आता सोशल मीडियासह सर्वत्र त्याची चर्चा होत आहे.
अब्दुल रऊफ अन्सारी यांचा मुलगा युनूस परवेझ आणि विश्वजीत चक्रवर्तींचा मुलगा सौरभ यांचा नुकताच विवाह झाला. दोघांसाठी एकच निमंत्रणपत्रिका छापून एकाच स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
'युनूस वेड्स फरहीन' आणि 'सौरभ वेड्स श्रेष्ठा' या दोन्ही नावांचा एकाच निमंत्रण पत्रिकेत समावेश होता, आणि ती निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली होती.
पत्रिकेत युनूसच्या लग्नाच्या 'इस्तकबाल' कार्यक्रमात विश्वजीत आणि त्यांच्या कुटुंबाचे नाव होते. तर सौरभच्या लग्नाच्या पाहुण्यांच्या यादीत अब्दुल रऊफ अन्सारींच्या कुटुंबीयांचा समावेश होता.
ईद-दिवाळी एकत्र
कोटा जंक्शनजवळील जनकपुरी कॉलनीमध्ये अब्दुल रऊफ अन्सारी आणि विश्वजीत चक्रवर्ती यांचं घर आहे.
सुमारे चाळीस वर्षांपासून दोघं मित्र आहेत. ईद असो की दिवाळी प्रत्येक सण ते एकत्र साजरे करतात.
दि. 17 एप्रिलला युनूसच्या निकाहमध्ये सौरभ आणि 18 एप्रिलला सौरभच्या वरातीत युनूस नाचताना दिसला. दि. 19 एप्रिलला रिसेप्शनमध्ये दोन्ही कुटुंबाचे नातेवाईक एकत्र येऊन शुभेच्छा देताना दिसले.
विश्वजीत म्हणतात, "आम्ही एकच निमंत्रण पत्रिका छापली. कारण आमच्या मुलांमध्ये काही फरक नाही. आम्ही दोन नाही तर एकाच कुटुंबाचा भाग आहोत. नातेवाईकही एकमेकांना चांगलं ओळखतात."
अब्दुल रऊफ अन्सारी म्हणाले, "आम्ही काही विचार करून नाही, तर कुटुंबाचा भाग म्हणून एकच कार्ड छापलं. यामुळे आमचा आनंद आणखी वाढला."
"लग्नाची पत्रिका छापणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की, मी पहिल्यांदाच असं कार्ड छापत आहे. त्याने काही प्रती त्याच्या रेकॉर्डसाठी स्वत:कडे ठेवल्या आहेत. जे लोक आम्हाला ओळखतात, त्यांना याचा खूप आनंद झाला आहे," असंही ते म्हणाले.
यूनुस परवेज म्हणतो, "आमच्या मोठ्या भावाच्या लग्नातही पत्रिकेवर मोठ्या वडिलांचे म्हणजे विश्वजीत यांचं नाव इस्तकबालमध्ये होतं. ते माझ्या काकांसारखे आहेत, हे आमच्या सर्व परिचितांना ठाऊक आहे."
चाळीस वर्षांची मैत्री
अब्दुल रऊफ आणि विश्वजीत एकमेकांना मित्र नाही, तर भाऊ मानतात. त्यांचे कुटुंबीय देखील स्वतःला वेगळं मानत नाहीत.
विश्वजित चक्रवर्ती सांगतात, "आम्ही सुरुवातीपासून एकत्र आहोत, आम्ही कधी मोठे झालो ते कळलंही नाही. आमची लग्नंही झाली. घरं ही आम्ही जवळच बांधली, एकत्र व्यवसाय करतो आणि आम्ही मित्र नाही, भाऊ आहोत."
'आमचे नातेवाईक एकमेकांना ओळखतात आणि आमचे मित्रही कॉमन आहेत. आमची मुलंही भाऊ-बहिणींसारखी राहतात. दोन दिसतात, पण आम्ही एकाच कुटुंबाचे आहोत,'" असं अब्दुल रऊफ अन्सारी म्हणाले.
अजमेरच्या केकडी येथील सेवानिवृत्त अतिरिक्त पोलीस अधीक्षक जसवंत सिंग राठोड, हे अन्सारी आणि चक्रवर्ती यांचे कॉमन मित्र आहेत.
ते सांगतात, '2010 मध्ये मी कोटा येथे इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होतो, तेव्हापासून दोन्ही कुटुंबांशी माझा स्नेह जुळला. त्यांची नावं वेगळी आहेत, पण कुटुंब एकच आहे. यांची मैत्री आदर्श आहे.'"
विश्वजीत यांचा मुलगा सौरभ सांगतो, "आम्ही लहानपणापासून एकत्र आहोत. युनूस (अब्दुल रऊफ यांचा मुलगा) आणि त्याची भावंडं, आम्ही सगळे भावा-बहिणींसारखे मोठे झालो आहोत. आमचे मित्रही कॉमन आहेत. आम्ही एकत्रच वाढलो आहोत, खरं तर आम्ही एकाच कुटुंबाचा भाग आहोत."
सौरभ अभिमानाने सांगतो की, "आम्ही नेहमी कुटुंबासारखं राहू. युनूस आणि मी जयपूरमध्ये शिकत असताना एकत्रच राहायचो. मी त्याला कधीच मित्र मानलं नाही, आम्ही एकमेकांना भाऊ समजत आलो आहोत."
गंगा-जमुना संस्कृती
अब्दुल रऊफ अन्सारी आणि विश्वजीत चक्रवर्ती यांच्या मैत्री आणि त्यांच्या कुटुंबातील एकतेचे प्रत्येकजण उदाहरण देत आहे.
लग्नपत्रिकेपासून रिसेप्शनपर्यंतचे नियोजन हे बंधुभावाचे आदर्श उदाहरण मानलं जात आहे.
जसवंत सिंह राठोड म्हणतात, "मी हे पाऊल मैत्रीचे एक आदर्श उदाहरण मानतो. आपल्या देशाच्या गंगा-जमुना संस्कृतीचे हे एक मोठे उदाहरण आहे."
ते पुढे म्हणतात, "मी पोलीस दलात काम केलं आहे. जातीय तणावाच्या वेळी अशा घटनांमुळं कायदा आणि सुव्यवस्थेचाही मजबूत संदेश जातो."
सौरभचे मामा, 75 वर्षीय कमल कांत चक्रवर्ती हे कोलकाता येथून या लग्नात सहभागी होण्यासाठी आले होते.
ते म्हणाले, "माझ्या आयुष्यात इतकं प्रेम आणि जिव्हाळा मी कधीच पाहिलं नाही. या लग्नासाठी मी खास आलो आहे. कोलकात्यातही मी हिंदू आणि मुस्लीम एकत्र पाहिले आहेत, पण इतकी घट्ट मैत्री मी कधीच पाहिली नाही. हे अनोखं आहे."
जेव्हा देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून हिंदू-मुसलमानांमधील तणावाच्या बातम्या येतात, तेव्हा त्याचा या मैत्रीवर काही परिणाम होतो का? असं विचारल्यावर अब्दुल रऊफ म्हणतात, "आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही त्याबद्दल विचारही करत नाही. आम्ही फक्त एक कुटुंब आहोत आणि सर्वांनी असंच एकत्र राहायला हवं."
यूनुस म्हणतो, "आमच्या मित्रांमध्ये कधीच धर्म किंवा जात यामुळं अडथळा आला नाही. आम्ही खूप प्रेमाने राहतो. सौरभ आणि मी नेहमी एकत्रच राहिलो आहोत."
त्यांच्या मैत्री आणि कुटुंबातून काय संदेश देऊ इच्छिता, असं जेव्हा विचारलं गेलं, तेव्हा अब्दुल रऊफ अन्सारी म्हणाले, "जसं आम्ही एक कुटुंब म्हणून प्रेमाने राहतो, तसंच सगळ्यांनीही प्रेमाने आणि एकत्र राहिलं पाहिजे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)