एकेकाळी देवांच्या वधू ते आता सेक्स वर्कर, देवदासी प्रथेच्या बळी पडलेल्या महिलांच्या सुन्न करणाऱ्या व्यथा

फोटो स्रोत, Sakhi Trust
- Author, स्वामिनाथन नटराजन
- Role, बीबीसी वर्ल्ड न्यूज
"सेक्स इंडस्ट्रीचा माझ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. माझं शरीर अशक्त, क्षीण झालं आहे. मी मानसिकदृष्याही कमकुवत झाली आहे," असं चंद्रिका (नाव बदललं आहे) म्हणाल्या.
एक सेक्स वर्कर म्हणून चंद्रिका यांच्या आयुष्याची सुरुवात एका धार्मिक समारंभानं झाली. त्या 15 वर्षांच्या असताना, त्यांना एका मंदिरात नेण्यात आलं आणि एका पारंपारिक समारंभात त्यांचं लग्न एका देवतेशी करण्यात आलं.
"त्यावेळेस ती नेमकी काय प्रथा आहे, हे मला माहिती नव्हतं," असं चंद्रिका यांनी बीबीसीला सांगितलं.
चंद्रिका आता वयाच्या तिशीत आहेत. जवळपास 20 वर्षांपासून त्या उदरजीविकेसाठी सेक्स वर्करचं काम करत आहेत.
एकेकाळची देवांची वधू, आता आहे सेक्स वर्कर...
कर्नाटक सरकार एक सर्वेक्षण करतं आहे. या सर्वेक्षणाचा उद्देश देवदासी झाल्यानंतर सेक्स वर्कर बनलेल्या महिलांची ओळख पटवण्याचा आहे.
देवदासी म्हणजे 'देवाची दासी'. दक्षिण भारतात हजारो वर्षांपूर्वी ही देवदासीची पद्धत सुरू झाली होती. त्याकाळी देवदासी मंदिरातील कलाकार होत्या.
त्या गायन आणि नृत्यकलेमध्ये निपुण होत्या. मात्र कालांतरानं, देवदासीची ही प्रथा वेश्याव्यवसायात रूपांतरित झाली.

फोटो स्रोत, Sakhi Trust
देशाच्या अनेक भागांत रुजलेल्या देवदासी प्रथेवर ब्रिटिश राजवटीत बंदी घालण्यात आली होती. 1982 मध्ये फक्त कर्नाटक सरकारनंच या प्रथेला बेकायदेशीर ठरवलं.
अर्थात काही भागांमध्ये आजही देवदासी प्रथा सुरू आहे.
यातील अनेकजणी मुंबईसारख्या शहरात स्थलांतरित होतात आणि वेश्यावस्त्यांमध्ये सेक्स वर्कर म्हणून काम करतात.
'वेश्याव्यवसायात यायला भाग पाडलं'
चंद्रिका, यांनी बेळगावातील एका मंदिरात स्वत:ला समर्पित केल्यानंतर त्या घरी परतल्या होत्या. त्यानंतर चार वर्षे सामान्य आयुष्य जगल्या.
नंतर त्यांच्या एका नातेवाईकानं त्यांना औद्योगिक शहर असलेल्या सांगलीला नेलं. तिथं घरकाम मिळवून देण्याचं आश्वासन नातेवाईकानं चंद्रिका यांना दिलं होतं. मात्र तिथे पोहोचल्यावर, चंद्रिका यांना वेश्यावस्तीत सोडून देण्यात आलं.
"सुरुवातीचे काही महिने खूपच कठीण होते. माझ्या आरोग्यावर विपरित परिणाम झाला. मी झोपू शकत नव्हते, जेवू शकत नव्हते. मला कुठेतरी पळून जावंस वाटत होतं. मात्र हळूहळू मला ती परिस्थिती स्वीकारावी लागली," असं चंद्रिका म्हणाल्या.
त्यावेळेस त्या फक्त 19 वर्षांच्या होत्या. त्यांनी फारसं शिक्षणही घेतलेलं नव्हतं. सांगलीत हिंदी आणि मराठी भाषा बोलल्या जात होत्या. मात्र त्यांना या दोन्ही भाषा येत नव्हत्या.

फोटो स्रोत, Sakhi Trust
"काही ग्राहक मला मारहाण करायचे. ते माझ्याशी उद्धटपणे वागायचे. ते सहन करणं खूप कठीण असायचं," असं चंद्रिका म्हणाल्या.
तिथे येणाऱ्या लोकांमध्ये कॉलेजचे विद्यार्थी, ड्रायव्हर, वकील आणि रोजंदारीवर काम करणारे कामगार यांचा समावेश होता.
सांगलीमध्ये सेक्स वर्कर म्हणून काम करताना चंद्रिका यांची भेट एका ट्रक ड्रायव्हरशी झाली आणि तो त्यांचा पती बनला.
त्यांना एक मुलगा आणि मुलगी होती.
चंद्रिका यांचा पती मुलांची काळजी घेत होता, तर त्या सेक्स वर्कर म्हणून काम करत राहिल्या. त्यांना दररोज 10 ते 15 ग्राहकांना भेटावं लागत असे.
चंद्रिका यांनी दुसऱ्या अपत्याला जन्म दिल्यानंतर काही वर्षांनी रस्त्यावरील एका अपघातात त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. परिणामी त्यांना बेळगावला परत जावं लागलं.
चंद्रिका यांनी एक अनुवादकाच्या मदतीनं बेळगावहून बीबीसीशी संवाद साधला.
सर्व देवदासी सेक्स वर्कर नसतात
सर्वच देवदासी वेश्यावस्त्यांमध्ये सेक्स वर्कर म्हणून काम करत नाहीत. काही जणी तर सेक्स वर्करही नसतात.
अंकिता आणि शिल्पा या उत्तर कर्नाटकातील एका गावात राहणाऱ्या चुलत बहिणी आहेत. दोघी जणीचं वय 23 वर्षे आहे. चंद्रिकाप्रमाणेच, त्यादेखील अनुसूचित जातीतील आहेत. देशात या वर्गातील लोकांना तीव्र भेदभावाला तोंड द्यावं लागतं.
त्यांना 2022 मध्ये त्यांना एका मंदिराला अर्पण करण्यात आलं.
अंकिता यांनी वयाच्या 15 व्या वर्षापर्यंत शिक्षण घेतलं. 2023 मध्ये त्यांच्या पालकांनी त्यांना मंदिराला अर्पण करण्याचं ठरवलं. त्यांच्या भावाचा मृत्यू झाल्यावर त्यांच्यावरील दबाव वाढला आणि अखेर त्यांना देवदासी व्हावं लागलं.
"माझे आईवडील मला म्हणाले की, ते मला देवाला अर्पण करणार आहेत. मात्र मी त्यासाठी तयार नव्हते. परिणामी त्यांनी एक आठवडाभर मला जेवणसुद्धा दिलं नाही," अस अंकिता म्हणाल्या.
"मी मानसिकदृष्ट्या उदध्वस्त झाले होते. मात्र कुटुंबाच्या हितासाठी मी त्याला तयार झाले. मी वधूचा पोशाख घातला. माझं एका देवाशी लग्न झालं," असं त्या म्हणाल्या.
लग्नाचं प्रतीक म्हणून ते पांढरे मोती आणि लाल मणी असलेला हार अर्पण करत आहेत.
अंकिता यांची आई किंवा त्यांची आजीदेखील देवदासी नव्हत्या. त्यांच्या कुटुंबाच्या मालकीची थोडी शेतजमीन होती. मात्र त्यातून पुरेसं उत्पन्न मिळत नव्हतं.
"कोणीच स्वत:ला अर्पण केलं नाही, तर देव आपल्याला शाप देतील अशी भीती आहे," असं अंकिता म्हणाल्या.
देवदासींना लग्न करता येत नाही. मात्र त्या विवाहित पुरुषांसोबत राहू शकतात.
अंकितानं कोणत्याही पुरुषाला त्यांच्याजवळ येऊ दिलं नाही. त्या शेतमजूर म्हणून काम करतात. त्यांना रोजची साधारण 350 रुपये मजूरी मिळते.

फोटो स्रोत, Sakhi Trust
शिल्पाचं आयुष्य मात्र वेगळं होतं.
मंदिरात देवदासी म्हणून अर्पण करण्यात आल्यानंतर, शिल्पा यांचं एका स्थलांतरित मजूराबरोबर जवळचं नातं निर्माण झालं.
"मी देवदासी आहे हे माहिती झाल्यावर त्यानं माझ्याशी जवळीक केली," असं शिल्पा म्हणाल्या.
इतर अनेक देवदासींप्रमाणेच, शिल्पा त्यांच्या या जोडीदारासोबत त्यांच्याच घरात राहत होत्या.
"काही महिन्यांमध्येच त्याच्यापासून मी गरोदर झाले. मी गरोदर आहे, हे माहिती असूनही त्यानं कोणतीही संवेदना दाखवली नाही. त्यानं मला 3,000 रुपये दिले आणि मग एक दिवस, तो मला न सांगताच निघून गेला," असं शिल्पा यांनी त्यांच्या भूतकाळाबद्दल सांगितलं.
तो व्यक्ती शिल्पा यांना सोडून निघून गेला, त्यावेळी त्या तीन महिन्यांच्या गरोदर होत्या. तेव्हा त्यांची कोंडी झाली होती आणि त्या द्विधा मन:स्थितीत होत्या.
"मी त्याला फोन करायचं ठरवलं. मात्र माझ्याकडे त्याचा फोन नंबरदेखील नव्हता. तो नेमका कुठला होता, हे देखील मला माहिती नव्हतं," असं शिल्पा म्हणाल्या.
त्यांनी त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रारदेखील दाखल केली नाही.
"आमच्या या व्यवस्थेत, कोणताही पुरुष आमच्याशी विवाह करण्यासाठी पुढे येत नव्हता," असं शिल्पा म्हणाल्या.

फोटो स्रोत, Sakhi Trust
गरिबी आणि शोषण
डॉ. एम. भाग्यलक्ष्मी सखी ट्रस्टच्या संचालिका आहेत. ही एक स्थानिक स्वयंसेवी संस्था असून ती गेल्या दोन दशकांपासून देवदासी महिलांसाठी काम करते आहे.
डॉ. भाग्यलक्ष्मी म्हणाल्या, "दरवर्षी आम्ही तीन ते चार मुलींना देवदासी होण्यापासून रोखतो. मात्र बहुतांशवेळा ही प्रथा गुप्तपणे पार पाडली जाते. जेव्हा या मुली गरोदर होतात किंवा कुठेतरी बाळंत होतात, त्यानंतरच त्यांच्यावर आमचं लक्ष जातं."

त्या म्हणाल्या की, या प्रथेवर बंदी असूनदेखील, मंदिरांमध्ये तरुण मुलींना अर्पण करण्याची परंपरा अजूनही सुरुच आहे.
डॉ. भाग्यलक्ष्मी पुढे म्हणाल्या की, अनेक देवदासींना योग्य अन्न आणि शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधादेखील मिळत नाहीत. यासंदर्भात मदत मागण्याचीही त्यांना भीती वाटते.
त्या बीबीसीला म्हणाल्या, "आमच्या अंदाजानुसार, कर्नाटकातील विजयनगर जिल्ह्यात 10,000 देवदासी आहेत. मी अशा अनेक अपंग, अंध आणि इतर महिला पाहिल्या आहेत, ज्या या व्यवस्थेत ढकलल्या गेल्यानंतर अतिशय हलाखीत आणि कठीण आयुष्य जगत आहेत. जवळपास 70 टक्के देवदासींकडे त्यांचं स्वत:चं असं घरदेखील नाही."
'95 टक्के देवदासी दलित'
जे पुरुष या देवदासींबरोबर सेक्स करतात ते कंडोमचा वापर करायलादेखील नकार देतात. परिणामी या महिला इच्छा नसताना गरोदर होतात किंवा त्यांना एचआयव्हीसारखे आजार होतात.
भाग्यलक्ष्मी म्हणाल्या की जवळपास 95 टक्के देवदासी दलित समुदायातील आहेत. तर उर्वरित देवदासी आदिवासी समुदायातील आहेत.
पूर्वी, मंदिरं देवदासींना आधार देत असत आणि तिथूनच त्यांना उत्पन्नाचं साधनदेखील मिळत असे. मात्र आजच्या देवदासींना त्यातील काहीही मिळत नाही.
"देवदासी व्यवस्था म्हणजे शोषण आहे," असं डॉ. भाग्यलक्ष्मी म्हणाल्या.
'कायद्यानं शिक्षेस पात्र असलेला गुन्हा...'
बेळगावातील सौंदत्ती येल्लम्मा मंदिरात होणाऱ्या वार्षिक उत्सवांना विद्यमान आणि माजी देवदासी उपस्थित राहतात.
मात्र अधिकारी म्हणतात की, मंदिरात महिलांना अर्पण करण्याचे कोणतेही समारंभ होत नाहीत.
विश्वास वसंत वैद्य येल्लम्मा मंदिराच्या ट्रस्टचे सदस्य आहेत आणि कर्नाटकातील विधानसभेत आमदार आहेत.

विश्वास वसंत वैद्य बीबीसीला म्हणाले, "देवदासी व्यवस्था हा आता कायद्यानं दंडनीय गुन्हा आहे. मंदिराच्या उत्सवाच्या काळात आम्ही पोस्टर आणि पत्रकं लावतो. त्यातून आम्ही इशारा देतो की, असं करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल."
ते पुढे म्हणाले, "सध्या माझ्या मतदारसंघात 50 ते 60 देवदासी असू शकतात. मंदिरांमध्ये महिलांना देवदासी करण्याच्या कार्यक्रमांना कोणीही प्रोत्साहन देत नाही."
वैद्य म्हणाले की, देवदासी प्रथा बंद करण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जातील.
कर्नाटक सरकारनं 2008 मध्ये एक सर्वेक्षण केलं होतं. त्यातून समोर आलं होतं की कर्नाटकात 46,000 हून अधिक देवदासी होत्या.
पुढील पिढीची चिंता
चंद्रिका यांनी सेक्स वर्कर म्हणून काम करून जे पैसे कमावले होते, त्यातून त्यांना गरीबीतून बाहेर पडण्यास मदत झाली. त्यांनी मुलांचं भविष्य चांगलं असावं यासाठी त्यांना बोर्डिंग स्कूलमध्ये दाखल केलं.
"मला माझ्या मुलीच्या लग्नाची चिंता वाटत होती. ती 16 वर्षांची असताना मी माझ्या चुलत भावाशी तिचं लग्न लावून दिलं. कारण माझ्याप्रमाणेच तिनंदेखील देवदासी व्हावं अशी माझी इच्छा नव्हती. आता ती तिच्या पतीसोबत राहते आहे," असं चंद्रिका म्हणाल्या.

फोटो स्रोत, Sakhi Trust
चंद्रिका सध्या एका स्वयंसेवी संस्थेत काम करतात आणि नियमितपणे एचआयव्ही चाचणी करतात.
त्यांना फळं आणि भाजीपाला विकण्यासाठी एक स्टॉल लावायचा आहे.
त्याचप्रमाणे, शिल्पा यांनादेखील त्यांच्या मुलीला चांगलं शिकवायची इच्छा आहे. त्यांनादेखील देवदासी व्यवस्था नको आहे.
"ही प्रथा बंद झाली पाहिजे. मला माझ्या मुलींना देवदासी होऊ द्यायचं नाही. ही प्रथा मला पुढे सुरू ठेवायची नाही," असं शिल्पा म्हणाल्या.
अंकिता यांनादेखील लग्न करायचं आहे. त्यांना त्यांच्या गळ्यातून तो मोत्याचा हार काढायचा आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











