मुलीच्या 'शाही' साखरपुड्यावरून इंदूरीकर महाराजांवर काय टीका होतेय? ती टीका योग्य की अयोग्य?

इंदूरीकर महाराज

फोटो स्रोत, kiran gujar

प्रसिद्ध आणि वादग्रस्त कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदूरीकर सध्या चर्चेत आहेत. यावेळी ते चर्चेत आहेत ते त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यात केलेल्या अमाप खर्चामुळे!

बरेचदा त्यांनी स्वत:च कीर्तनातून लग्नसमारंभात कमी खर्च करा हे सांगणारी विधानं केलेली आहेत.

त्यामुळे, आता मुलीच्या साखरपुड्यात वारेमाप खर्च केल्यामुळे लोक त्यांना त्यांच्याच अशा विधानांची आठवण करून देताना दिसत आहेत.

या सगळ्यामुळे उद्विग्न झालेल्या इंदूरीकर महाराजांनी 'मी कीर्तनाचा फेटा आता बाजूला ठेवतो,' असं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.

एकूणच, सध्या ते चर्चेत आहेत. मात्र, त्यांच्यावर होणारी टीका योग्य आहे की अनाठायी आहे?

कीर्तनकारानं केलेला उपदेश स्वत: पाळला नाही, तरीही चालू शकतं का?

त्यांच्या कीर्तनाच्या शैली, पद्धती आणि प्रामुख्याने भाषेवर होणारी टीका योग्य आहे का?

या अनुषंगाने घेतलेला हा धांडोळा...

इंदूरीकर महाराजांवर टीका का होतेय?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

इंदूरीकर महाराज यांनी स्वत:च कीर्तनातून उपदेश करताना लग्नसमारंभात कमी खर्च करा हे सांगण्यासाठी 'कमी खर्चात लग्न केलं तरी पोरं होतात', अशा स्वरुपाची विधानं केलेली आहेत.

खरं तर त्यांची अशी अनेक विधानं त्यांच्या भाषेमुळे वारंवार वादात सापडलेली आहेत.

भाषेचा मुद्दा तुर्तास बाजूला ठेवला तरी त्यांनी 'कमी खर्चात लग्न समारंभ करण्याचा उपदेश' स्वत:च्या मुलीच्या लग्नात मात्र पाळला नाही, अशी टीका त्यांच्यावर आता होते आहे.

यासंदर्भात लेखक समीर गायकवाड म्हणतात, "त्यांच्या मुलीला सर्व सुखे लाभोत, असाच आशीर्वाद साऱ्यांनी दिलाय. मात्र, त्याच वेळेस त्यांच्या विसंगतीवर बोट ठेवण्यात समाज मागे राहिला नाही हे आता लपून राहिले नाही! त्यांनी ज्या ज्या गोष्टींवर टीका केली होती त्या सर्व गोष्टी त्यांच्या या सोहळ्यात साजऱ्या झाल्यात."

"त्यांची मुलगी गॉगल घालून कारच्या सनरूफमध्ये उभी राहून नाचलीय. या नाचण्याला माझा तरी आक्षेप नाहीये, त्यांचा मात्र नक्कीच होता! तिने मेकअप केलाय, त्यांच्या भाषेत सांगायचे झाले तर तिने नको ती सर्व थेरं केली आहेत, मुलींनी काय करावे काय नाही हे सांगण्याचा त्यांचा अधिकार नसूनही त्यांनी हिरेमाणकं उधळावीत तशी ही मुक्ताफळे उधळली होती जी सर्वस्वी अश्लाघ्य आणि अस्थानी होती. आता ते कचाट्यात सापडलेत," असं मत समीर गायकवाड व्यक्त करतात.

इंदूरीकर महाराज

फोटो स्रोत, kiran gujar

बीबीसी मराठीने 'शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेने'चे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्याशीही चर्चा केली.

ते सांगतात, "इंदूरीकर महाराजांनी त्यांच्या कीर्तनात आजवर बरीच उपरोधात्मक वक्तव्यं केलेली आहेत, नाही असं नाही. पण त्याबद्दल त्यांनी अनेकदा दिलगिरीही मागितलेली आहे. बोलताना त्यांची भाषा चुकली असली तरीही त्यांचा हेतू शुद्ध होता. मी त्यांची बाजू घेत नाही, पण अनेकदा शिक्का बसला की तो बसतोच."

"त्यांनी आपल्या कीर्तनातून सांगितलंय की, ऐपतीप्रमाणे लग्न करा. कर्ज काढून खर्च करत बसू नका. क्षमता असेल तर करा, नसेल तर करू नका. त्यांचा हा संदेश योग्यच होता आणि आहे. पण, त्यांना केलं जाणारं ट्रोलिंग चुकीचं आहे. कुठल्याही मुलीचा बाप हौसमौस करत खर्च करतच असतो. त्यामुळे, त्यांच्या कुटुंबापर्यंत हे सगळं घेऊन जाणं काही योग्य नाही. पण महाराजांनी त्यांच्या कीर्तन शैलीत बदल नक्कीच केला पाहिजे," असं मत भोसले व्यक्त करतात.

दुसऱ्या बाजूला, भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई मात्र इंदूरीकर यांच्यावर जोरदार टीका करतात.

त्या म्हणाल्या, "इंदूरीकरांनी कीर्तनातून जेव्हा दुसऱ्यांच्या मुलींची, त्यांच्या आई-वडिलांची बदनामी केली, तेव्हा त्यांना काहीच वाटलं नाही. त्यांनी आपल्या मुलीचा साखरपुडा शाही थाटात केला, याची आम्हाला अडचण नाहीये. पण तुम्ही इतरांना जेव्हा याच गोष्टीवरून बदनामीकारक बोलता, त्या बाबतीत आता तुमच्यावर टीका होते आहे."

"तुम्हाला आता वाटतंय की, तुमच्या घरापर्यंत लोक बोलत आहेत. पण, तुम्ही दुसऱ्याच्या घरापर्यंत बोललात, म्हणून लोक तुमच्यावर टीका करत आहेत," असं देसाई म्हणाल्या.

लग्नसमारंभाबाबत वारकरी संप्रदाय काय सांगतो?

'होय होय वारकरी' या पुस्तकाचे लेखक आणि ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांच्याशीही आम्ही यासंदर्भात चर्चा केली.

लग्नसमारंभ साजरा करण्याबाबत वारकरी संप्रदायातील संतांची शिकवण कशी राहिलेली आहे, हे त्यांच्याकडून जाणून घेतलं.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "वारकरी संप्रदायात लग्न समारंभ डामडौलात साजरा करणं ही चुकीची गोष्ट आहे. कारण, तो जीवाचा उत्सव आहे, देवाचा नाही. तो जीवाचा उत्सव असल्यामुळे शक्यतो साधेपणानं साजरा करणं, हे त्यात अपेक्षितच आहे."

"तशा प्रकारचा प्रयत्न विदर्भातील गणपती महाराजांनी केला होता. गणपती महाराजांनीही साध्या आणि कमी खर्चात लग्नाची पद्धत आणली आणि स्वतःही त्या पद्धतीनं लग्न केलं. लोकांनाही त्यांनी त्या पद्धतीची शिकवण दिली आणि अनेकांनी तशी लग्ने केलीही. तुकडोजी महाराजांनीही ग्रामगीतेमध्ये कमी खर्चात विवाह करण्याला प्राधान्य दिलंय. गाडगेबाबांनीही असंच प्रबोधन केलंय," अशी माहिती बंडगर देतात.

"कीर्तन आणि आचरण हे समान असलं पाहिजे. कीर्तन हे केवळ सांगण्याकरता नाही, तर ते आचरणात आणण्याकरिता आहे. त्यांची स्वत:चीच जी भूमिका होती की, लग्न किंवा कुठलाही घरगुती समारंभ साध्या पद्धतीनं केला पाहिजे, तर तो उपदेश त्यांनी स्वत:च पाळलेला दिसत नाही," असंही ते नमूद करतात.

इंदूरीकर महाराज

फोटो स्रोत, kiran gujar

इंदूरीकरांच्या कीर्तनाची पद्धत आणि त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यावर झालेल्या टीकेबाबत आम्ही जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विश्वस्त दिनकर शास्त्री भुकेले यांच्याशी चर्चा केली.

ते सांगतात, "त्यांनी त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यावर किती खर्च करावा, याला कुणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही. पण, 'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले,' असं तुकाराम महाराज सांगतात. पण लोकांनाच अस वाटलं की, त्यांनी कीर्तनात एक सांगितलं आणि वागताना मात्र ते वेगळंच वागले."

"त्यांनी स्वत:च 'साधं लग्न केलं तरी मुलं होतात,' असं विधान केलेलं आहे. म्हणूनच आता लोक प्रश्न विचारत आहेत की, तुम्ही साध्या पद्धतीनं लग्न केलं असतं, तर मुलं झाली नसती का?"

समीर गायकवाड सांगतात, "इंदूरीकर म्हणतात की, वऱ्हाडी मंडळी भारतीय बैठकीत होती, जेवण वाढणारे वाढपी वारकरी वेषभुषेत होते, लग्नाला आलेल्या महिला मराठी साज नेसून होत्या, इत्यादी. मात्र, ते हे सांगत नाहीत की, त्यांनी ज्या भपकेबाजीवर टीका केली होती ती त्यांना टाळता आली नाही. नाचणाऱ्या स्त्रियांवर टीका केली होती ते टाळता आले नाही."

"तुम्ही खुर्चीवर बसला की जमिनीवर बसला याला महत्व नाही, तुम्ही जे सांगत आला होतात त्याचे तुम्हीच पालन केले की नाही हे महत्वाचे आहे. वाढपी वारकरी वेषात होते की नव्हते, याला तितके महत्व नाही जितके महत्व जेवणाचा मेनू कमी खाद्यपदार्थांचा होता की नव्हता याला आहे. कारण हा मुद्दा देखील ते कीर्तनात सांगत असत. आता ही सर्व त्यांचीच मते होती आता त्यांच्याच अंगलट आली आहेत," असं गायकवाड नमूद करतात.

इंदूरीकरांच्या कीर्तनातील भाषा आणि पद्धतीवर टीका का?

इंदूरीकर महाराज पहिल्यांदा वादात सापडलेत, असं नाही. इंदुरीकरांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे तर त्यांच्याविरोधात न्यायालयात खटलाही दाखल करण्यात आला आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.

त्या कीर्तनात इंदुरीकर म्हणाले होते, "स्त्री संग सम तिथीला झाला, तर मुलगा होत असतो. स्त्री संग जर विषम तिथीला झाला, तर मुलगी होत असते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला, तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होत असते."

त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना प्रचंड टीका सहन करावी लागली होती. तसेच न्यायालयातही खेचण्यात आलं होतं.

इंदूरीकर महाराज

फोटो स्रोत, facebook

एका कीर्तनात लव्ह मॅरेजविषयीचं मत पटवून देताना इंदुरीकरांनी महिलांची तुलना चपलेशी केली होती.

ते म्हणाले होते, "लव्ह मॅरेज करणाऱ्या माणसाची बायको नवऱ्याला नावानं हाक मारते. किती मोठा कमीपणा आहे हा. आपण पुरुष आहोत पुरुष. नवरा आहे नवरा. मह्या बायकोनं मला एकेरी हाक मारली तर दात नाही का पाडणार तिचे? चप्पल कितीही भारी झाली म्हणून काय गळ्यात घालतो का? अहो चप्पल कुठं शोभती? बायको आहे ती. तिनं त्या मापात असावं."

मुलीच्या जवळील मोबाईलबाबत केलेल्या वक्तव्यामुळेही इंदूरीकर महाराज वादात सापडले होते.

त्यांची विधानं, जसे की, "नवरदेवापुढे पोरीनं नाचायला सुरुवात केली लग्नात, अरे खानदान तपासा आपले कोणते आहेत?"

त्याबरोबरच, "गोरी बायको करू नये, कारण ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या," अशी बरीच विधानं वादग्रस्त ठरलेली आहेत.

कीर्तनातील उपदेश आणि मुलीच्या साखरपुड्यावरील टीका अनाठायी आहे का?

दिनकर शास्त्री भुकेले हे इंदूरीकर यांच्यावर होणाऱ्या टीकेबाबत बीबीसी मराठीशी बोलताना म्हणतात, "लोकांनी त्यांच्यावर 'वारकरी' म्हणून टीका करूच नये, असं माझं मत आहे. कारण, ते या परंपरेतले नाहीतच. असलेच तर ते 'विनोदाचार्य' आहेत. त्यांचा आणि वारकरी परंपरेतील कीर्तनाचा एकमेकांशी काहीही संबंध नाही," असं ते सांगतात.

"आता जे घडलं, त्याची वारकरी संप्रदायाने दखल घेतलेली नाही. त्यांचे जे श्रोते आहेत, त्यांनाच त्यांचं वर्तन खुपलेलं आहे आणि त्यांनीच त्यांच्यावर टीका केलेली आहे," असं मत भुकेले व्यक्त करतात.

इंदूरीकर महाराज

फोटो स्रोत, you tube

वारकरी कीर्तन नक्की कसं असतं, याविषयी बोलताना दिनकर शास्त्री भुकेले म्हणाले, "वारकरी संप्रदायातील जी थोर कीर्तनकार मंडळींची परंपरा मी पाहिलेली आहे, त्यामध्ये अभंग घेणे आणि संतांच्या प्रमाणाणेच तो प्रामाणिक करून सोडवणे, याचा समावेश आहे. इतर बाह्य सरमिसळ जसे की स्वत: रचलेली गाणी म्हणणे किंवा फिल्मी गाण्यांच्या चालीवर उड्या मारणे किंवा विचित्र गात्रविक्षेप करणे याला काहीही स्थान नाही."

"अतिशय सभ्यपणे शांतरस निर्माण होईल आणि संतांच्या विचाराचं कथन होईल, अशाप्रकारची कीर्तन परंपरा होती. पण काळाच्या ओघात कीर्तन हे अर्थार्जनाचं माध्यम झालेलं आहे. अर्थार्जनाकरता मनोरंजन आलं. मनोरंजन केवळ संतांचा उपदेश किंवा अध्यात्मिक चिंतन सांगून होत नाही किंवा लोक आकर्षित होत नाहीत, हे लक्षात आल्यावर अशा कीर्तनकारांनी लोकांची अभिरूचीच बिघडवून टाकली आहे," असा गंभीर आरोप भुकेले करतात.

दुसऱ्या बाजूला, ज्ञानेश्वर महाराज बंडगर सांगतात, "'जगा सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण' असं असू नये, ही संतांचीच शिकवण आहे. मूळात तुम्ही सांगत असा किंवा नसा, वारकरी संप्रदायाला साधेपणानं लग्न करणं, हेच अपेक्षित आहे."

टीकेमुळे उद्विग्न आणि कीर्तन बंद करण्याबाबत वक्तव्य

मुलीच्या साखरपुड्यावरून होणाऱ्या टीकेनंतर इंदूरीकर यांनी उद्विग्नतेनं भाष्य केलं आहे.

एका कीर्तनात ते म्हणाले, "माझ्या इतकी कीर्तने कुणी केली नाहीत. माझ्या इतका त्रासही संप्रदायात कुणी काढला नाही, दुसरा असता तर मेलाच असता. मी निर्लज्ज म्हणून जिवंत आहे. माझ्या मागे रोज नवे लफडे आहे. लोक आता रोज मला शिव्या द्यायला लागले आहेत. त्यामुळे मला आता थांबायची गरज निर्माण झाली आहे. दोन-चार दिवसांत मी निर्णय घेणार आहे."

यासंदर्भात बोलताना अक्षय महाराज भोसले म्हणतात, "मी त्यांच्याशी अलीकडेच बोललो. आजमितीला तुमच्याकडे जो समाज आकृष्ट होतो, तो इतरांकडे होत नाही. तुमची स्वत:ची वेगळी शैली आहे. तुमच्या बोलण्यात थोडा निश्चित बदल करावा, पण कीर्तन बंद करणं, हा काही मार्ग नाही, असं त्यांना मी सांगितलं आहे."

"जे लोकांना चुकीचं वाटतंय, ते तुम्ही टाळून परखड संत साहित्य मांडलं पाहिजे. मांडताना योग्य पद्धतीत आणि शैलीत मांडलं पाहिजे. वारकरी संप्रदाय त्यांच्यासोबत पूर्वीही होता आणि आताही आहे. त्यांच्या भूतकाळातील काही विधानांमुळे त्यांना आता त्रास सहन करावा लागतोय, तो त्यांनी करावा. त्याला सामोरं जावं, पण कीर्तन बंद करू नये," असंही ते नमूद करतात.

इंदूरीकर महाराज

फोटो स्रोत, vivek kashid

दुसऱ्या बाजूला दिनकर शास्त्री भुकेले म्हणतात, "'निंदा आणि स्तुती, समान पै झाली, त्याची स्थिती आली, समाधीशी' अशी स्थितप्रज्ञ अवस्था कीर्तनकारांची असली पाहिजे, असं वारकरी संप्रदाय सांगतो. म्हणजे निंदा आणि स्तुती दोन्हीही तुम्हाला समान व्हायला पाहिजे. पण, ते जे उद्विग्न झालेले आहेत. त्यातूनच असं दिसायला लागलं की, त्यांना ही निंदा सहन झालेली नाही."

"कुणी कीर्तन करायचं थांबलं म्हणून वारकरी संप्रदाय थांबणार नाहीये. नामदेवांपासून ते तुकोबारायांपर्यंत अनेकजण संप्रदायात होऊन गेलेले आहेत. त्यांच्यानंतरही हा संप्रदाय सुरू राहिलेला आहे. त्यामुळे, त्यांनी फेटा खाली ठेवला, तरी वारकरी संप्रदायाचं काही नुकसान होणार नाहीये," असंही दिनकर शास्त्री भुकेले नमूद करतात.

"जेव्हा इंदूरीकर दुसऱ्यांना बोलतात, त्यांची मजा घेतात, इतरांवर हसतात, विनोद करतात आणि आता त्यांच्यावर आलंय, तेव्हा त्यांना वाईट वाटतंय आणि फेटा खाली ठेवावासा वाटतोय. तुम्ही फेटा खाली ठेवत असाल तर तो तुमचा निर्णय आहे. शेवटी तुमचं कीर्तन नसतंच, ती कॉमेडीच असते," अशी टीका तृप्ती देसाई करतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)