60 हिरे आणि 15 नीलम जडलेले 17 लाखांचे अंडे गिळल्याचा आरोप, आगळ्या-वेगळ्या चोरीची चर्चा

फॅबर्जी एग

फोटो स्रोत, Faberge

    • Author, केली एनजी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

न्यूझीलंडमध्ये एका आगळ्या वेगळ्या चोरीची चर्चा होत आहे. चोरी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने रत्नजडित अंडे गिळले. आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याला पकडून पोलिसांकडे देण्यात आले. त्याने तब्बल 17 लाख रुपयांचे अंडे गिळल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गिळण्यात आलेलं हे फॅबर्जी अंड अद्याप सापडलेलं नाही.

या अंड्यांची किंमत 33,585 न्यूझीलंड डॉलर्स म्हणजेच 17,39,400.73 रुपये इतकी आहे.

शुक्रवारी (28 नोव्हेंबर) दुपारी मध्य ऑकलंडमधील पॅट्रीज ज्वेलर्समध्ये पोलिसांना बोलावण्यात आलं. त्यानंतर काही मिनिटांतच 32 वर्षांच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली.

त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तो आता कोठडीत असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे.

जेम्स बाँडच्या चित्रपटावरून ठेवण्यात आलं रत्नजडित अंड्याचं नाव

पार्ट्रिज ज्वेलर्सच्या वेबसाईटनुसार, कथितरीत्या चोरी झालेल्या फॅबर्जी अंड्यावर 60 पांढरे हिरे आणि 15 नीलम जडलेले होते. ते उघडल्यानंतर त्यात 18 कॅरेट सोन्याचा छोटा ऑक्टोपस दिसतो.

या अंड्याचं नाव 'ऑक्टोपसी' अंडं असं आहे. 1983 मध्ये जेम्स बाँडवरचा एक चित्रपट आला होता. त्या चित्रपटाचं नाव ऑक्टोपसी होतं.

हा चित्रपटाची कथा फॅबर्जी अंड्याच्या चोरीवर केंद्रित आहे. या चित्रपटावरूनच या अंड्याचं नाव ठेवण्यात आलं आहे.

संशयिताला न्यायालयात केलं जाईल हजर

फॅबर्जी हा दोन शतकांपूर्वी रशियामध्ये स्थापन झालेला जगप्रसिद्ध ज्वेलर आहे. तो रत्न आणि मौल्यवान धातूंनी बनलेल्या त्याच्या अंड्यांसाठी प्रसिद्ध आहे.

फॅबर्जी अंड्याच्या चोरीच्या संशियताला 8 डिसेंबरला न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे.

प्रसारमाध्यमांमधील वृत्तांनुसार, या व्यक्तीवर, 12 नोव्हेंबरला त्याच ज्वेलरी दुकानातून कथितरीत्या एक आयपॅड चोरल्याचा आरोप आहे.

त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी एका ठिकाणावरुन 100 न्यूझीलंड डॉलर्स किंमतीचं कॅट लिटर (मांजरींची विष्ठा शोषून घेणारी विशिष्ट माती असलेला बॉक्स) आणि पाळीव प्राण्यांवरील पिसू हटवण्यासाठीची किटकनाशकं किंवा रसायनं पळवल्याचा आरोपदेखील या संशयितावर ठेवण्यात आला आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.