You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुसाईड पॉडमध्ये महिलेचा मृत्यू, या देशात इच्छामरणाची परवानगी असूनही पोलिसांनी अनेकांना अटक का केली?
स्वित्झर्लंडमध्ये एका महिलेनं सुसाईड पॉड वापरून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अशा प्रकारची उघडपणे घडलेली ही पहिलीच घटना असून स्वित्झर्लँड पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे.
सार्को कंपनीने बनवलेल्या पॉडचा वापर करून 23 सप्टेंबरला या महिलेनं आत्महत्या केली. त्यानंतर आत्महत्येसाठी मदत करणं आणि त्यासाठी प्रवृत्त केल्याच्या संशयावरून अनेकांना अटक केली असल्याचं शॅफहौसेन प्रदेशातल्या पोलिसांनी सांगितलं.
स्वित्झर्लंडमध्ये काही अपवादात्मक परिस्थितींमध्ये इच्छामरणाला कायदेशीर परवानगी दिली जात असली तरी त्याच्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जातं. पण, सार्को पॉडला मात्र विरोध झाला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून मृतदेह आणि सुसाईड पॉड ताब्यात घेतलं आहे.
या वादग्रस्त पॉड तयार करणाऱ्या कंपनीचं म्हणणं आहे की वैद्यकीय पर्यवेक्षणाशिवाय स्वतःचं जीवन संपवू पाहणाऱ्या व्यक्तीद्वारे हे पॉड वापरलं जाऊ शकतं.
मेरीशौसेन हा स्वित्झर्लंडचा विरळ लोकवस्तीचा भाग असून तो जंगलात आहे. याच जंगलातील झोपडीत सोमवारी या सुसाईड पॉडचा वापर करण्यात आला. त्यानंतर याबद्दल एका लॉ फर्मने पोलिसांना माहिती दिली.
त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता प्रकरण समोर आलं. पोलिसांनी अटक केलेल्या लोकांची संख्या, त्यांची ओळख अद्यापही उघड केली असून मृत महिलेचं नाव देखील समोर आलं नाही.
यंदा या सुसाईड पॉडचा पहिल्यांदाच वापर केला जाईल, असं इच्छामरणाला सहाय्य करणाऱ्या एका गटानं सांगत सार्को यंत्राचा प्रचार केला होता.
हे यंत्र एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सहज नेता येतं आणि ते 3D प्रिंट करून घरीच जोडता येतं. तसेच कुठल्याही डॉक्टर किंवा औषधांवर अवलंबून न राहता इच्छामरण देतं. त्यामुळे त्याचा वापर होतोय, असं वकिलांचं म्हणणं आहे.
पण, स्वित्झर्लंडमध्ये इच्छामरणाला पाठिंबा देणारे जगातील सर्वोत्तम कायदे असूनही या देशात अशा यंत्राचा विरोध झाला आहे. या सुसाईड पॉडचे अत्याधुनिक डिझाईन आत्महत्येचं उद्दात्तीकरण करते आणि कुठल्याही वैद्यकीय पर्यवेक्षणाशिवाय हे वापरलं जातं. त्यामुळे टीकाकारांनी चिंता व्यक्त केली आहे.
यूके आणि इतर अनेक युरोपियन देशांमध्ये इच्छामरण हे बेकायदेशीर आहे. पण, गेल्या वर्षात या देशांमधील हजारो लोकांनी आपलं जीवन संपविण्यासाठी स्वित्झर्लंडला प्रवास केला आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.