You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अगोदर धनंजय मुंडे, मग पार्थ पवार आणि आता माणिकराव कोकाटे; अजित पवारांची 'राष्ट्रवादी' सारखी अडचणीत का येते?
जेव्हापासून नोव्हेंबर 2024 मध्ये भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांचं महायुती सरकार सत्तेत आलं तेव्हापासून पहिल्या वर्षात या सरकारच्या कामाच्या बातम्यांसोबतच अनेक वादही या सरकारभोवती घोंगावत राहिले.
हे वाद मुख्यत: सत्ताधारी असलेल्या पण क्रमांक 2 आणि 3 वर असलेल्या मित्रपक्षांशी संबंधितच होते. म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी.
पण अजित पवार जरी सत्तेत असले तरीही, त्यांच्या पक्षाचं सतत अडचणीत येणं मात्र थांबत नाही.
सध्या हा पक्ष चर्चेत आहेत माणिकराव कोकाटेंमुळे. कारण घरकुल घोटाळ्यात न्यायालयानं त्यांना दोषी ठरवल्यानंतर आता त्यांच्याकडची खाती काढून घेण्यात आली आहेत.
कोकाटेंनी त्यांचा राजीनामा अजित पवारांकडे पाठवला आहे. इथंच हे प्रकरण थांबेल असं दिसत नाही.
त्यामुळेच या सरकारच्या काळात हा प्रश्न सतत चर्चेत आहे की, अजित पवारांची राष्ट्रवादी सतत अडचणीत का येते आहे? सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत.
त्याच वेळेस अशा प्रकरणांमुळे सरकारच्या प्रतिमेवर याचा परिणाम होईल की सत्ताधारी पक्षांतर्गत सतत एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा जी गेली वर्षभर पहायला मिळाली आहे, त्याचाच हाही एक भाग आहे?
विरोधकांकडून हा आरोप सातत्यानं केला गेला आहे की, विविध चौकशांचा ससेमिरा चुकवण्यासाठी 'राष्ट्रवादी काँग्रेस'मधला एक गट फुटून सरकारमध्ये सहभागी झाला.
भाजपाच्या अनेक समर्थकांनी 'राष्ट्रवादी'तल्या अगोदरपासूनच आरोप असलेल्या या गटासोबत जाण्यासाठी नाकं मुरडली होती. पण तरीही 'महायुती' झाली.
आता त्यानंतरही एकमागोमाग अशी 'प्रकरणं' होत असतांना, त्याचा परिणाम 'महायुती'च्या भविष्यावरही होईल का?
'राष्ट्रवादी'च्या नेत्यांची नावं एकामागोमाग एक वादात
असं नाही की 'राष्ट्रवादी'चा जो गट फुटून भाजपासोबत सत्तेत सहभागी झाल्या त्या गटातल्या कोणाची नावं आरोपांमध्ये वा चौकशांमध्ये आली नव्हती.
स्वत: अजित पवार यांच्यावर भाजपानं आरोप केले होते आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्ती वा संस्थांवर अंमलबजावणी संचलनालयाची चौकशीही झाली होती.
त्याशिवाय छगन भुजबळ, हसन मुश्रिफ हेही यापूर्वी चौकशीच्या घेऱ्यात आले होते. प्रफुल पटेलांवरही आरोप झाले होते.
पण फडणवीस-शिंदे-अजित पवार यांचं सरकार आल्यावर या सरकारशी संबंधित जे वाद सुरू झाले, त्यात पहिली विकेट गेली अजित पवारांच्या 'राष्ट्रवादी'मधलीच.
धनंजय मुंडेंना अधिवेशनकाळातच राजीनामा द्यावा लागला.
बीडच्या संतोष देशमुख हत्याकांडाचं प्रकरण महाराष्ट्रात गाजलं. त्या प्रकरणात जसजसा तपास पुढे गेला, नावं समोर आली आणि अटकसत्रही घडलं, तसं सरकारवरचा आणि धनंजय मुंडेंवरचा दबाव वाढत गेला.
मुंडे अजित पवारांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. पण एका मर्यादेपलिकडे त्यांनाही हा दबाव संपवता आला नाही आणि मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं.
पुण्याच्या पोर्शे अपघात प्रकरणातही अजित पवारांच्या पक्षाशी संबंधित आमदाराचं नाव चर्चेत आलं होतं.
मोठा गदारोळ झाला. पण असे वाद सुरू असतांनाच अजित पवारांच्या मुलाचंच नाव काही दिवसांपूर्वी मोठ्या वादात आलं.
पुण्याच्या कोरेगाव पार्कजवळ असलेल्या महार वतनाच्या एका जमिनीच्या व्यवहारावरून वादंग उठला. एक तर महार वतनाची जमीन कायद्यानं खासगीरित्या विकता येत नाही. त्यात सरकारची परवानगी लागते. पण तरीही अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांची भागिदारी असलेल्या कंपनीनं या जागेचा व्यवहार केला.
प्रकरण बाहेर आल्यावर अजित पवारांनी आपल्याला याबद्दल काहीही माहिती नव्हतं असं म्हणून हात झटकले. गुन्हा दाखल झाला आणि काही अटकाही झाल्या.
मात्र या कारवाईत पार्थ पवारांचं नाव मात्र कुठंही आलं नाही. प्रकरण सध्या न्यायालयापर्यंत पोहोचलं आहे.
या प्रकरणाची धग कमी होते न होते तोच माणिकराव कोकाटेंचं प्रकरण बाहेर आलं. कोकाटेंना वास्तविक या अगोदरच कनिष्ठ न्यायालयानं घरकुल घोटाळ्यात दोषी ठरवलं होतं.
त्याला त्यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं. सत्र न्यायालयानं त्यांची शिक्षा कायम ठेवताना वॉरंटही काढलं.
यापूर्वी वादग्रस्त वक्तव्यांमुळे कोकाटेंचं कृषी मंत्रिपद काढून त्यांना क्रिडा खात्याचा कारभार देण्यात आला होता. पण आता न्यायालयानं दोषी ठरवल्यावर राजिनाम्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.
क्रिडा खातेही त्यांच्याकडून काढून घेण्यात आले आहे आणि त्यांनी दिलेला राजिनामा आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठवला असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.
'राष्ट्रवादी'चेच नेते का अडकतात? याचा 'महायुती'वर काय परिणाम होईल?
एक नक्की आहे की नेत्यांचं असं अडकणं, त्यावरुन राजीनामे होणं, हे कोणत्याही पक्षाला सोयीचं नाही. पण अशा अडचणी पहिल्यापासूनच असल्यानं अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाली, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.
ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे म्हणतात, "या सगळ्या गोष्टींवरून सत्तेत येण्याचं कारणं अधोरेखित होतं आहे. हे सगळे अगोदर स्वच्छ होते असं नाही. पण सत्तेच्या बाजूला आपण असावं असं सगळ्यांना वाटत होतं त्यामागची कारणं काय, हे आता स्पष्ट होतं आहे."
"अजित पवारांना हे माहिती आहे की, यातली एक तर बरीचशी जुनी प्रकरणं आहेत आणि शिवाय काही त्या त्या नेत्यांनी आपापल्या अखत्यारित केली आहेत. त्यामुळे अगदी पार्थ पवारांंचं प्रकरणही त्यांनी स्वत:ला लावून घेतलं नाही," असं देशपांडे पुढे म्हणतात.
पण देशपांडे यांच्या मते या प्रकरणांमुळे भाजपाची काही अडचण होते आहे आणि त्यानं 'महायुती'वर काही परिणाम होईल असं नाही.
"भाजपाला जनमताची चिंता फार असावी असंही दिसत नाही. त्यांना एकच करायचं होतं की, अशांना आपल्या बाजूला घेऊन विरोधी पक्ष कमकुवत करायचा होता. तो झालेला दिसतो आहे. त्यामुळे फडणवीस अथवा भाजपा या प्रकरणांमुळे फारसे चिंतित आहेत, असं दिसत नाही," अभय देशपांडे म्हणतात.
'राष्ट्रवादी काँग्रेस'चं राजकारण अनेक वर्षं जवळून पाहणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार संजय जोग यांच्या मते या सगळ्या परिस्थितीत पक्षाचे नेते म्हणून अजित पवार कमकुवत दिसताहेत हे खरं, पण सध्या राजकीय गरजही आहे. जसे एकनाथ शिंदे आक्रमक होऊ शकतात, तसं अजित पवार नाही.
"मित्रपक्षांमधले एकनाथ शिंदे लढतात, जशास तसं उत्तर देतात. याचं एक कारण हेही आहे की शिंदे स्वत: अजूनही मुख्यमंत्र्याच्या मानसिकतेतून काम करतात. पण दुसरीकडे अजित पवार मात्र भाजपाला काऊंटर करू शकत नाहीत. अजित पवार असे आक्रमक होऊ शकत नाहीत. त्यामुळे एकामागोमाग एक त्यांच्या पक्षाची प्रकरणं बाहेर आली तरीही ते काहीही करू शकत नाहीत," जोग म्हणतात.
पण या स्थितीमुळे अडचणीची प्रकरणं समोर आली, राजीनामे झाले, तरीही आहे अशीच 'युती' पुढे सुरू ठेवायची हेच या पक्षांसाठी सोयीचं आहे.
"एक उदाहरण द्यायचं झालं तर युतीच्या घोषणेचं देता येईल. बिनसल्यानंतर एकनाथ शिंदे दिल्लीला जाऊन अमित शाहांना भेटून आले. त्यानंतर मग भाजपाच्या स्थानिक नेत्यांना बोलणी करून एकत्र लढायचा निर्णय घ्यावा लागला.
दुसरीकडे अजित पवार मात्र असं काही करू शकत नाही. त्यांच्या युतीबद्दल भाजपाचे नेतेच बोलताहेत. त्यामुळे सध्या जे सत्तेमुळे मिळतं आहे त्यावरच अजित पवार आणि त्यांचा पक्ष समाधानी आहे. ते त्यांच्या आणि भाजपाच्याही सोयीचं आहे," असंही जोग नमूद करतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)