You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आरोपींच्या सत्कारानंतर गौरी लंकेश यांच्या बहिणीचा सवाल, 'आपला समाज नेमका कुठे चाललाय'
- Author, इमरान कुरेशी
- Role, बीबीसी हिंदी, बंगळुरु
पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपी जामिनावर बाहेर आल्यानंतर त्या दोघांचा सत्कार करण्यात आला आहे. विजयपुरातील एका मंदिरात हार घालून या दोन्ही आरोपींना सन्मानित करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. यावर समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया येत आहे.
आपला समाज नेमका कोणत्या दिशेला जात आहे, असा प्रश्न गौरी लंकेश यांची बहीण कविता लंकेश यांनी विचारला आहे.
आरोपी परशुराम वाघमारे आणि मनोहर यादव या दोघांना विजयपुरा जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती. कोर्टानं शुक्रवारी (11 ऑक्टोबर) या दोघांसह इतर सहा आरोपींना जामिनावर बाहेर सोडले.
5 सप्टेंबर 2017 रोजी गौरी लंकेश यांची त्यांच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर बंगळुरू पोलिसांच्या विशेष तपास दलाकडून (एसआयटी) या प्रकरणाचा तपास सुरू होता.
गौरी लंकेश यांच्या हत्येचा संबंध महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते नरेंद्र दाभोळकर, कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे आणि ज्येष्ठ विचारवंत एमएम कलबुर्गी यांच्या हत्येशी असल्याचे एसआयटीच्या तपासातून समोर आलं.
या सत्काराबाबत बोलताना श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष नीलकांत कंडगल बीबीसी हिंदीला म्हणाले, “ते हिंदू कार्यकर्ते आहेत. जामिनावर बाहेर आले होते, त्यामुळे आम्ही त्यांचा फुल आणि हारांनी सत्कार केला. आम्ही कलिका मंदिरात पूजा करून ते कोर्टानं त्यांना निर्दोष सोडावं यासाठी प्रार्थना केली.”
मंदिरात येण्यापूर्वी परशुराम वाघमारे आणि मनोहर यादव यांनी विजयपुरा शहरातील शिवाजी सर्कलमधील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.
त्यानंतर नीलकांत कंडगल यांनी आपल्या समर्थकांसह इतर लोकांच्या उपस्थितीत वाघमारे आणि यादव यांचा मंदिरात सत्कार केला. मात्र, यावेळी प्रसारमाध्यमांना येऊ दिले नाही तसेच कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
‘बलात्काऱ्यांचं हार घालून स्वागत केलं जातंय’
गौरी लंकेश यांची बहीण आणि या प्रकरणातील तक्रारदार कविता लंकेश बीबीसी हिंदीसोबत बोलताना म्हणाल्या, "बलात्काऱ्यांचं हार घालून अभिनंदन केलं जात आहे. आपला समाज कोणत्या दिशेला चाललाय?" असा प्रश्न कविता यांनी उपस्थित केला.
तसेच, गोध्रा घटनेनंतर उसळलेल्या जातीय हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींची सुटका आणि त्यानंतर करण्यात आलेल्या सत्काराकडेही लक्ष वेधलं.
सुप्रीम कोर्टानं आरोपींची सुटका रद्द करत त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवले होते.
मात्र, नीलकांत कंडगल म्हणतात, "त्यांचा या प्रकरणात सहभाग नाही, असा आमचा विश्वास आहे. ते निर्दोष आहेत."
जामीन मिळण्यामागचं कारण
या प्रकरणातील 18 पैकी 16 आरोपींना जामीन मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे खटल्याला झालेला विलंब. आरोपपत्रात नमूद केलेल्या 527 साक्षीदारांपैकी आतापर्यंत सुमारे 140 साक्षीदारांची चौकशी करण्यात आली असून भविष्यात हा खटला पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे.
कर्नाटक हायकोर्टानं मोहन नाईक उर्फ संपांजे याचा जामीन मंजूर केला होता. मात्र, याचिकाकर्त्यांनी याविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. तर, सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला.
यानंतर केटी नवीन कुमार, अमित दिगवेकर आणि सुरेश एचएल यांनाही जुलै 2024 मध्ये हायकोर्टातून जामीन मिळाला. यानंतर भरत कुमार, श्रीकांत पांगारकर, सुजित कुमार आणि सुधाना गोंधकर यांना सप्टेंबर 2024 मध्ये जामीन मिळाला.
गेल्या आठवड्यात सेशन कोर्टानं वाघमारे, यादव यांच्यासह आठ आरोपींना जामीन मंजूर केला होता. जामीन मिळालेल्यांमध्ये अमित काळे, राजेश डी. बंगेरा, वासुदेव सूर्यवंशी, ऋषीकेश देवदार, गणेश मिस्कीन आणि अमृत रामचंद्र बद्दी यांचा समावेश आहे.
विकास पटेल उर्फ दादा उर्फ निहाल हा अद्याप फरार आहे. तर, अन्य दोन जणांनी अद्याप कोर्टात धाव घेतली नाही.
आरोपींवर भारतीय दंड संहिता (IPC), भारतीय शस्त्र कायदा आणि कर्नाटक संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या तरतुदीनुसार आरोप ठेवण्यात आले आहेत.
आरोपींच्या सत्काराबाबत कोणी काय प्रतिक्रिया दिली
हरमिंदर कौर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आरोपींच्या सत्काराचा व्हीडिओ शेअर करत लिहिलं, “गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना जामीन मिळाला असून हिंदू संघटनांनी या आरोपींचं जाहीर स्वागत केलं. हे अतिशय संतापजनक आहे.”
अभिनेते प्रकाश राज यांनी याबाबत एक्सवर एक पोस्ट केली आहे. या ते म्हणाले, “या देशात जामीनसारखे नियम केवळ खुनी आणि बलात्काऱ्यांसाठी आहेत.. लज्जास्पद.”
तर, कार्यकर्ता आणि लेखक शिव सुंदर या प्रकरणाकडे वेगळ्या रूपानं पाहतात. ते बीबीसी हिंदीसोबत बोलताना म्हणाले, “तत्त्वतः खटला पूर्ण होईपर्यंत कोणत्याही आरोपीला तुरुंगात ठेवू नये, असे म्हणणे योग्य आहे. समस्या अशी आहे की हे तत्त्व अतिशय भेदभावपूर्ण आहे.”
ते म्हणाले, “सरकारला विरोध करणाऱ्यांना हे लागू होत नसले तरी उजव्या विचारसरणीच्या लोकांना लागू होतो. एखाद्या आरोपीला संपूर्ण खटल्याच्या कालावधीसाठी तुरुंगात ठेवणे हे मानवाधिकाराच्या तत्त्वाविरोधात आहे. ते डावी किंवा उजव्या विचरसरणीला पाहून लागू केली जाऊ नये.”
शिव सुंदर म्हणाले, “आम्ही जलद खटला चालवण्यासाठी विशेष न्यायालयाची मागणी करत आहोत. याचिकाकर्त्यांनीही खटला जलद गतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने सुमारे 150 साक्षीदारांची सुटका करण्याचं मान्य केलं आहे.
“परंतु, बिल्किस बानोच्या प्रकरणात जे घडले, आरोपींचं स्वागत आणि पुष्पहार घालण्यात आला, तो भयंकर प्रकार आहे.
“गौरी लंकेश यांच्या बाबतीत हे त्यांच्या हत्येचा आनंद साजरा करण्यासारखं आहे. 5 सप्टेंबर, 2017, ज्या दिवशी त्यांची हत्या झाली ती घटनेची पुनरावृत्ती करण्यासारखा हा प्रकार आहे. हे भयंकर आहे. समाजाला अशाप्रकारचा संदेश देणे घातक आणि धोकादायक आहे,” असं शिवसुंदर यांनी म्हटलं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.