व्हिक्टोरिया : 9 मुलांची आई असलेल्या या राणीच्या हत्येचे 7 वेळा प्रयत्न, तरी ती कशी वाचली?

फोटो स्रोत, Getty Images
27 जून 1850 रोजीचा दिवस व्हिक्टोरिया राणीसाठी नेहमीसारखा नव्हता. या दिवशी राणी मृत्यूच्या तोंडातून परतली. त्या संध्याकाळी राणी तिच्या तीन मुलांना घेऊन तिच्या आजारी काकांना पाहण्यासाठी पिकॅडिलीला गेली होती. पिकॅडलीच्या घराबाहेर त्यांना पाहण्यासाठी शेकडो लोक जमले होते.
तिथं जमलेल्या शेकडोंच्या गर्दीला राणीची एक झलक पाहायची होती. पण त्यातल्या एका माणसाचा उद्देश राणीला पाहण्याचा नव्हता.
राणीचा लवाजमा निघून गेल्यानंतर त्या गर्दीतून रॉबर्ट पेट राणीच्या गाडीकडे धावत गेला आणि तिच्या डोक्यावर धातूच्या वस्तूनं हल्ला केला. या घटनेमुळे गर्दीमध्ये गोंधळ सुरू झाला.
असा सगळा गोंधळ सुरू झाल्यानंतर, राणी व्हिक्टोरिया गाडीच्या बोनेटवर चढल्या आणि समोरील गर्दीला संबोधून म्हणाल्या, “मला कुठलीही दुखापत झाली नाहीय.”
राणी व्हिक्टोरियावर हल्ल्याच्या प्रयत्नाचा हा काही पहिलाच प्रसंग नव्हता. 1837 साली राणी म्हणून सिंहासनावर आरूढ झाल्यापासूनचा हा पाचवा हल्ला होता. त्या प्रचंड सौम्य स्वभावाच्या होत्या आणि या घटनांनंतर माध्यमांनीही हेच वृत्तांकन केलं होतं.
'द मॉर्निंग पोस्ट'नं वृत्तात म्हटलं होतं की, ‘राणीनं कुठल्याच त्रासदायक भावना चेहऱ्यावर दाखवल्या नाहीत. किंबहुना, बकिंगहॅम पॅलेसकडे गाडी येत असताना स्वागत करणाऱ्या लोकांच्या सदिच्छांचा स्वीकारही मोठ्या आनंदानं त्यांनी केला.’
राणीच्या या कर्तव्याप्रति वचनबद्ध आणि शांतचित्त स्वभावाचं वर्णन एकप्रकारे त्यांच्या लोकप्रिय प्रतिमेचं वर्णन होतं. तेव्हाच्या आणि आताच्या लोकप्रियतेचं.
“आम्ही आनंदी नाही” हे राणी व्हिक्टोरियाचं प्रसिद्ध वाक्य कदाचित त्या कधीच बोलल्या नसतील. पण राणीच्या अविचल स्वभवाचे आणि एका युगाच्या स्वभावाचे प्रतिक आहे.
बरेच लोक असं मानतात की, एकोणिसाव्या शतकाकडे भावनांच्या दडपशाहीचं शतक म्हणून पाहतात, तर काही लोक कथित वैराग्याचं शतक म्हणून साजरं करतात.
राणी व्हिक्टोरिया यांची एक सार्वजनिक बाजू होतीच, पण राणीची खासगी कागदपत्रं त्यांची भावनिक बाजू दाखवतात. अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या बकिंगहॅम पॅलेसच्या आवारातही हल्ल्याकडे पाहताना, त्यांनी लिहिलंय की, ‘ते एका भयंकर स्वप्नासारखं होतं.’
केवळ राणी व्हिक्टोरियाच नव्हे, तर प्रिन्स अल्बर्ट यांनाही ‘भयानक धक्का’ होता. त्यावेळचे गृहसचिव सर जॉर्ज ग्रे अत्यंत ‘व्यथित आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी’ बकिंगहॅम पॅलेसमध्ये पोहोचले होते. या हल्ल्यानंतर राणी व्हिक्टोरिया ‘हादरलेली, घाबरलेली आणि खाऊही शकत नव्हती’ अशा अवस्थेत होती.

फोटो स्रोत, Getty Images
एवढं सगळं स्वत:वर ओढवूनही राणी ऑपेराला उपस्थित राहिल्या होत्या. तिथं जमलेल्या लोकांनी आपापल्या डोक्यावरील टोप्या हवेत भिरकावत, मोठ्या आवाजात म्हटलं होतं – ‘गॉड सेव्ह द क्वीन’.
सर्व व्हिक्टोरियन तितके भावनाशील नसले, तरी राणीवरील हल्ल्यानंतर भावनांचा ओघ वाढला होता. व्हिक्टोरिया तेव्हा थोडं मस्करीनं म्हणाली होती की, “एखाद्यावर किती प्रेम आहे, हे पाहण्यासाठी गोळी मारणं तसं फायदेशीरच आहे.”
हल्ल्यानंतरही लपून त्या लपून बसल्या नाहीत, हे उल्लेखनीय होतं. 1842 साली राणी कॉन्स्टिट्युशन हिलकडे जात असताना तिच्या गाडीच्या दिशेनं जॉन फ्रान्सिस नावाच्या किशोरवयीन मुलानं बंदूक रोखली होती. अल्बर्टनं त्या मुलाला पाहिलं, मात्र त्या मुलानं गोळी चालवली नाही. शिवाय, तिथून निसटण्यातही तो यशस्वी ठरला.
राणीवर हल्ला करू इच्छिणारे मोकाट फिरत असल्यानं, तत्कालीन पंतप्रधान रॉबर्ट पील यांनी राणीला घरीच राहण्याचा आग्रह केला. मात्र, राणीनं हा आग्रह नाकारला.
पुढच्याच दिवशीच्या संध्याकाळी राणी आणि अल्बर्ट उघड्या गाडीतून जात होते. सुरक्षारक्षकांनी या गाडीला वेढा घातला होता. मात्र, तिथेही फ्रान्सिसने हल्ल्याचा प्रयत्न केलाच. मात्र, या हल्ल्यातूनही त्या बचावल्या. जर यावेळी काही चुकीचं घडलं असतं, तर शेवट फार वेगळा असता.
फ्रान्सिसच्या हल्ल्यानंतरही राणीनं लगेचंच आपली शाही कर्तव्यं पुन्हा सुरू केलं. शिवाय, सार्वजनिक ठिकाणीही दिसू लागल्या. त्यांच्या शौर्याचं आणि धाडसाचं ते प्रदर्शन होतं. वृत्तपत्रांनीही त्यांच्या या कृतींचं कौतुकच केलं.

फोटो स्रोत, Getty Images
द टाइम्समध्ये एक कविताच प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या कवितेत राणीबद्दल म्हटलं होतं - ‘सिंहाच्या काळजाच्या सम्राट’ आणि ‘धाडसी राजा, जरी त्या राणी असतील’
आपण कणखर आहोत, हे सार्वजनिकरित्या दाखवणं राणीसाठी महत्त्वाचंही होतं.
मात्र, हल्ल्यांसारखे अनुभव लगेच विसरणं फार कठीण होतं. 1840 च्या दशकात चार वेगवेगळ्या लोकांनी राणी व्हिक्टोरियावर गोळ्या चालवल्या.
1850 मध्ये रॉबर्ट पेटने राणीवर हल्ला करेपर्यंत, खरंतर राणीला गर्दीत जाण्याबाबत चिंता वाटू लागली होती. राणीच्या कागदपत्रांमध्ये तिने कबूल केलंय की, लोक गाडीच्या जवळ गर्दी करतात, तेव्हा हल्ल्याच्या आठवणी जाग्या होतात.
सरतेशेवटी राणी व्हिक्टोरियावरील सर्वात मोठा भावनिक आघात कुणा मारेकऱ्याने केला नाही, तर राणीच्या जवळच्या लोकांच्या निधनानं झाला. पेटच्या हल्ल्याच्या काही दिवसांनंतर रॉबर्ट पिल घोड्यावरून पडून मृत्युमुखी पडला, त्यानंतर काहीच दिवसात राणीचे काका गेले. राणीच्या कागदपत्रांमध्ये तिने कबूल केलंय की, दु:खाच्या भावनांनी माझ्यावर मात केली.
1861 साली अल्बर्टचा मृत्यू झाला, तेव्हा राणीला जे दु:ख झालं, त्या तुलनेत हे सर्व दु:ख फारच कमी होतं. पुढच्याच दशकात राणीनं सार्वजनिक जीवनातून जवळपास निवृत्तीच घेतली. त्यानंतर राणी नैराश्यातही लोटली गेली. या दिवसांचं वर्णन राणीनं ‘हिंसक दु:ख’ असं केलं होतं. या दिवसात मृत्यूची इच्छा व्हायची, असंही त्यांनी कागदपत्रांमध्ये लिहिलंय. त्यानंतरही त्या 40 वर्षे जगल्या खऱ्या, पण त्या दु:खातून कधीच सावरू शकल्या नाहीत.
अधूनमधून त्या सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावत. यावेळीही तिच्यावर हल्ल्याचे प्रयत्न झालेच.
आयुष्यातील शेवटची वर्षे अत्यंत नुकसानदायी, आठवणींच्या वेदना आणि अपंगत्वाने भरलेलं होतं. त्यांच्या कागदपत्रांमधील नोंदी, त्यांच्या आयुष्यातील नैराश्याचे प्रसंग हेच सांगतात.
राणी व्हिक्टोरियावर संपूर्ण आयुष्यात हल्ल्याचे एकूण 7 प्रयत्न झाले. तिने 9 मुलांना जन्म दिला. अल्बर्टना गमावल्याचं दु:ख सहन करण्याचा मार्गही शोधला.
संपत्ती आणि सामार्थ्याने अनेक त्रासांपासून दूर ठेवलं खरं, पण वैयक्तिक दु:ख राणी व्हिक्टोरियाला टाळता आलं नाही. तिचं शौर्य, सौम्यपणा आणि आत्म-नियंत्रणाचा तिचा स्वभाव तिच्या आयुष्याची निम्मी कथा सांगतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








