ईशान किशन : बीसीसीआयच्या करारातून वगळण्याचा नेमका अर्थ काय?

फोटो स्रोत, ANI
बीसीसीआयने श्रेयस अय्यर आणि ईशान किशनला केंद्रीय कराराच्या यादीतून वगळलं आहे.
बीसीसीआयने बुधवारी संध्याकाळी केंद्रीय करारांची यादी जाहीर केली.
मात्र त्याधीच असं म्हटलं जात होतं की, बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी वगळलं जाऊ शकतं.
हे दोन्ही क्रिकेटपटू इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये त्यांच्या फ्रेंचायझीचा भाग असतील. दोघेही आपापल्या संघातील स्टार फलंदाज आहेत.
आयपीएलमध्ये इतर खेळाडूंचा लिलाव होण्यापूर्वीच दोन्ही खेळाडूंना त्यांच्या संघाने रीटेन केलं होतं.
बीसीसीआयच्या करारातून वगळण्याचा अर्थ काय?
आयपीएल करारात कायम राहणं त्यांच्यासाठी फायदेशीर असलं तरी बीसीसीआयच्या करारातून वगळलं जाणं म्हणजे खेळाडूंच्या आर्थिक आणि क्रिकेट कारकिर्दीसाठी एक मोठा झटका आहे.
आयपीएल वर्षातून फक्त दोन महिने सुरू असतं. याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रेक्षकांना फारसा रस नसतो.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वांत जलद द्विशतक झळकावण्याचा विक्रम ईशान किशनच्या नावावर आहे. 2023 आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत श्रेयस अय्यर भारताचा तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.

फोटो स्रोत, ANI
श्रेयस अय्यरने 14 कसोटी सामने खेळले असून 811 धावा केल्या आहेत. तर 59 एकदिवसीय सामने खेळले असून 2383 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात श्रेयसची सर्वाधिक धावसंख्या 128 इतकी आहे. तो 49 च्या सरासरीने खेळतो.
दोन्ही खेळाडूंनी बीसीसीआयच्या मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचं काही वृत्तांमध्ये म्हटलंय. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
काही आठवड्यांपूर्वी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक पत्र प्रसिद्ध करत म्हटलं होतं की, केंद्रीय करारामध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना रेड बॉल क्रिकेट (रणजी आणि कसोटी क्रिकेट) सोडून आयपीएलला प्राधान्य देता येणार नाही.
बीसीसीआयच्या कराराचे फायदे काय असतात?
केंद्रीय करारामध्ये समाविष्ट असलेल्या क्रिकेटपटूंनाच बीसीसीआयच्या सुविधांचा लाभ घेता येतो. यामध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या सुविधांचाही समावेश आहे.
एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यास राष्ट्रीय क्रिकेट अकादमी खूप महत्त्वाची असते.
केंद्रीय करारामध्ये समाविष्ट असलेल्या क्रिकेटपटूंना विम्याचं संरक्षण दिलं जातं.
मोहम्मद शमीच्या प्रकरणात आपल्याला हे पाहता येईल. शमी सध्या दुखापतग्रस्त आहे पण तो बीसीसीआयच्या केंद्रीय कराराचा भाग असल्याने त्याला सर्व सुविधा मिळत आहेत. त्याचा वैद्यकीय खर्चही बीसीसीआय उचलत आहे.

फोटो स्रोत, ANI
बीसीसीआयच्या केंद्रीय करारामध्ये समाविष्ट असलेले खेळाडू
ग्रेड ए प्लस (सात कोटी रुपये): रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा.

ग्रेड ए (पाच कोटी रुपये): आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, के. एल राहुल, शुभमन गिल, हार्दिक पंड्या.

ग्रेड बी (तीन कोटी रुपये): सूर्य कुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जैस्वाल

ग्रेड सी (एक कोटी रुपये): रिंकू सिंह, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंगटन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, केएस भारत, प्रसिद्ध कृष्ण, आवेश खान, रजत पाटीदार.

वेगवान गोलंदाज करार : आकाश दीप, विजयकुमार वयशक, उमरान मलिक, यश दयाल, विद्वत कावेरप्पा.

फोटो स्रोत, Getty Images
ईशान किशनला कमी संधी मिळाल्या आहेत
ईशान किशन गेल्या काही काळापासून भारतीय संघासोबत सतत प्रवास करतोय. पण संघात एखादा खेळाडू अनुपस्थिती असेल तरच त्याला सामन्यात खेळण्याची संधी मिळते.
या अडचणी आणि अनिश्चिततेमुळे ईशान किशनला मानसिक तणाव जाणवत असल्याचं बोललं जातंय.
दक्षिण आफ्रिकेसोबतच्या कसोटी मालिकेतून त्याने माघार घेतल्याने त्याला मानसिक तणाव आला असण्याची चर्चा सुरू झाली.
ईशान किशनने बीसीसीआयला ब्रेक मागितला होता. यावेळी कारण देताना त्याने सांगितलं होतं की, गेल्या एक वर्षापासून तो सतत प्रवास करत आहे, त्यामुळे त्याला विश्रांतीची गरज आहे.

फोटो स्रोत, Getty Images
याप्रकरणात संघ व्यवस्थापनाने निवडकर्त्यांशी बोलून त्यांची विनंती मान्य केली होती.
3 जानेवारी 2023 पासून ईशान किशन भारतीय संघात कायम होता. मात्र त्याला खेळण्याची फार काही संधी मिळाली नाही. गतवर्षीच्या विश्वचषकात त्याला पहिल्या दोन सामन्यातच खेळण्याची संधी मिळाली होती.
शुभमन गिलला डेंग्यू झाल्याने तो संघाच्या बाहेर होता, मात्र तो आल्यावर ईशान किशनला बाहेर बसावं लागलं होतं. तर के. एल. राहुल यष्टिरक्षक म्हणून लक्ष वेधण्यात यशस्वी ठरला होता.
त्यानंतर ईशान किशनने ऑस्ट्रेलियासोबत टी-20 मालिकेत तीन सामने खेळले आणि दोन सामन्यात अर्धशतक झळकावलं.
ईशान किशन दक्षिण आफ्रिकेतील टी-20 मालिकेचा भाग होता, पण संघ व्यवस्थापनाने जितेश शर्माला प्राधान्य दिलं. किशन दक्षिण आफ्रिकेसोबतच्या कसोटी मालिकेत होता, पण त्याने विश्रांतीचं कारण पुढे करत ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.
गेल्या वर्षी 9 फेब्रुवारी ते 22 मार्च या कालावधीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात ईशान किशन देखील होता.
ईशान किशन ऑस्ट्रेलियासोबतच्या चारही कसोटी सामन्यांमध्ये खेळू शकला नाही कारण संघ व्यवस्थापनाने त्याच्याऐवजी के. एस भारतची निवड केली. त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली.
संधी मिळाल्यावर ईशान किशनची कामगिरी कशी होती?
ईशान किशनने संपूर्ण आयपीएलचा हंगाम मुंबई इंडियन्सकडून खेळला.
त्याने 2021 च्या मध्यात पदार्पण केलं होतं. तेव्हापासून तो भारतीय संघाचा नियमित खेळाडू आहे, परंतु आतापर्यंत त्याला केवळ 27 एकदिवसीय आणि 32 टी-20 सामने खेळण्याची संधी मिळाली आहे.
त्याला लागोपाठ सामने खेळण्याची संधी फारच क्वचितच मिळाली आहे. संघ व्यवस्थापनानेही कायम त्याच्या भूमिकेत बदल केलाय. कधी त्याला बॅकअप ओपनर म्हणून तर कधी स्पेशालिस्ट कीपर म्हणून मैदानात उतरविण्यात आलं.
ईशान किशनला कोणत्याही फॉरमॅटमध्ये कधीच कीपर आणि ओपनर म्हणून पहिली पसंती मिळालेली नाही.
कदाचित याच कारणामुळे ईशान किशनने मानसिक तणावाचं कारण देत ब्रेक घेण्याची विनंती केली होती.

फोटो स्रोत, Getty Images
ईशान किशनला जेव्हा-जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्याने संधीचं सोनं केलं आहे.
बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात जेव्हा शिखर धवन सलामी देऊन बाहेर पडला तेव्हा ईशान किशनने द्विशतक झळकावलं.
असं असूनही ईशान किशनला शिखर धवनची जागा मिळाली नाही. या जागेसाठी शुभमन गिल पात्र ठरला.
माध्यमातील वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिकेसोबतच्या कसोटी मालिकेतून ब्रेक घेतल्यानंतर ईशान किशन दुबईमध्ये पार्टी करताना दिसला. याकडे अनुशासनहीनता म्हणून पाहिलं गेलं.
मात्र, खुद्द राहुल द्रविडने अनुशासनहीनतेचा मुद्दा फेटाळून लावलाय.
काही बातम्यांमध्ये असाही दावा करण्यात आला होता की, ईशान किशनला विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियासोबत टी-20 मालिका खेळायची नव्हती, पण त्याची विनंती बीसीसीआयने मान्य केली नाही.
ईशान किशन म्हणाला होता की, त्याला प्रवासाचा कंटाळा आला असून त्याला त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. पण तो दुबईमध्ये पार्टी करताना दिसला. ईशान किशन त्याच्या भावाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुबईला गेला होता, असाही दावा केला जातोय.











