वेलू नचियार : हैदर अलीच्या मदतीने इंग्रजांचा पराभव करणारी पहिली राणी

फोटो स्रोत, TWITTER @VERTIGOWARRIOR
- Author, वकार मुस्तफा
- Role, पत्रकार, संशोधक
18 व्या शतकात दिंडीगलमध्ये वेलू नाचियार नावाच्या एका राणीची आणि हैदर अलीची भेट झाली होती.
कुलूपं आणि बिर्याणीसाठी प्रसिद्ध असलेला हा दिंडीगल जिल्हा आजच्या तामिळनाडू राज्यात आहे. हे दिंडीगुल शहर एकेकाळी दक्षिण भारतातील म्हैसूर राज्याचा भाग होतं.
त्यावेळचं म्हैसूर राज्य उत्तरेला कृष्णा नदीपासून पश्चिमेला अरबी समुद्रापर्यंत पसरलेलं होतं. हैदर अली या बलाढय राज्याचा शासक होता. आजचं तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक राज्यामधील बहुतांश भाग मिळून तेव्हाचं म्हैसूर राज्य तयार झालं होतं.
वेलू नचियार एक राजकन्या होती. तिचा विवाह शिवगंगाई राज्याचे राजा मुथुवादुगुनाथा पेरियावदया थेवर यांच्याशी झाला. 1773 मध्ये राजाच्या मृत्यूनंतर शिवगंगाईचे राज्य ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेले. परिस्थितीमुळे राणीला आपलं राज्य सोडून आश्रय मागावा लागला.
दिंडीगलच्या वास्तव्यादरम्यान राणी वेलूची भेट म्हैसूरचे शासक हैदर अली यांच्याशी झाली.
राणी वेलूला हैदर अलीकडून योग्य ती मदत मिळाली आणि कायम स्मरणात राहील असा सन्मान देखील मिळाला. पण ही मदत नेमकी काय होती? या राणीचं पुढे काय झालं?
राजकन्या ते राणीपर्यंतचा प्रवास...
राणी वेलूचा जन्म 1730 रामनाड राज्याचे राजा चेल्लामुथु विजयरागुनाथ सेतुपती यांच्या पोटी झाला.
वेलूच्या जन्मानंतर तिच्या पालकांनी तिला राजपुत्रांप्रमाणेच वाढवलं. तिला घोडेस्वारी, धनुर्विद्या, लाठीकाठी, सलुम्बम अशा विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण देण्यात आलं.
याशिवाय ती इंग्रजी, फ्रेंच, उर्दू अशा अनेक भाषाही अस्खलित बोलायची.
वेलू 16 वर्षांची झाल्यावर शिवगंगाईच्या राजपुत्राशी तिचा विवाह लावून देण्यात आला.
या दोघांनीही 1750 ते 1772 अशी दोन दशकं शिवगंगाईवर राज्य केलं.
शिवगंगाईवर इंग्रजांचा हल्ला, राजाची हत्या
1772 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या ब्रिटीश सैन्याने आणि अर्कोटच्या नवाबाने मिळून शिवगंगाईवर हल्ला केला. 'कल्यार कोइल' नावाच्या या युद्धात वेलू नचियारचे पती आणि इतर अनेक सैनिक मारले गेले.
या हल्ल्याच्या वेळी राणी वेलू आणि तिच्या मुलीने जवळच्याच मंदिरात आश्रय घेतला, त्यामुळे त्या बचावल्या. शिवगंगाईशी एकनिष्ठ राहिलेले मुर्तडो बंधू आणि इतर काही सैनिक या मंदिराजवळ पोहोचले.
राणीला आणि राजकन्येला पळून जाण्यासाठी या मुर्तडो बंधूंनी मदत केली.
अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील इतिहासकार शबिंद्रजी लिहितात की, राणीच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी तिचे एकनिष्ठ अंगरक्षक अड्याल आणि इतर महिला योद्ध्यांनी कोलिंगडी गाठलं.
पण नवाबाच्या माणसांनी त्यांना पकडलं. त्यांच्यावर अत्याचार झाले पण त्यांनी तोंड उघडलं नाही. शेवटी अड्यालने राणीचा ठावठिकाणा सांगितला नाही म्हणून त्याचा शिरच्छेद करण्यात आला.
इकडे राणी रानावनातून आणि गावोगावी असहाय्यपणे हिंडत होती. तिच्या मनात सतत शिवगंगाई परत घेण्याचा विचार सुरू होता. पण यासाठी तिला सैन्याची, मित्रांची गरज भासणार होती.
मुर्तडो बंधूंनी निष्ठावंतांची फौज उभी करण्यास सुरुवात केली. पण इंग्रजांशी स्पर्धा करण्याइतकी ताकद या सैन्यात नव्हती.

फोटो स्रोत, PAN MCMILLAN
म्हैसूरचा सुलतान हैदर अलीचे ब्रिटिशांशी आणि अर्काटच्या नवाबाशी चांगले संबंध नव्हते. राणीला हे समजलं तसं तिने हैदर अलीची मदत घ्यायचं ठरवलं. यासाठी तिने म्हैसूरचा धोकादायक प्रवास करण्याचं ठरवलं.
राणी वेलू नाचियारने शिवगंगाईपासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या दिंडीगल शहरात हैदर अलीची भेट घेतली.
या भेटीत राणी वेलूने उर्दूमध्ये संभाषण केलं. तिचं धैर्य आणि चिकाटी बघून हैदर अली प्रभावित झाला.
त्याने वेलूला दिंडीगल किल्ल्यात राहण्यासाठी आमंत्रित केलं. त्याने वेलूला राणीचा सन्मान दिला. हैदर अलीने राणी वेलूशी असलेल्या त्याच्या मैत्रीचा पुरावा म्हणून त्याच्या राजवाड्यात एक मंदिर देखील बांधलं.
इंग्रजांवर विजय
इतिहासकार आर. मणिकंडन सांगतात की, "वेलू नचियार आणि हैदर अली यांची युती परस्पर गरजेतून झाली होती. वेलूला कोणत्याही किंमतीत तिचं राज्य परत मिळवायचं होतं. त्यामुळे तिला सैन्याची गरज होती. तर दुसरीकडे हैदर अलीला ब्रिटिश सत्तेला आव्हान द्यायचं होतं आणि ही संधी त्याला वेलूमुळे मिळणार होती.
हैदर अलीने इंग्रजांशी लढण्यासाठी राणीला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. हैदर अलीने 400 पौंड आणि 5000 सैनिक देऊन राणीला मदत केली.
शबिंद्रजी लिहितात, या सैन्याच्या मदतीने राणीने शिवगंगाईचे विविध प्रदेश काबीज करायला सुरुवात केली. 1781 मध्ये राणी वेलू नचियार आणि इंग्रजी सैन्य समोरासमोर आले. राणीचं सैन्य इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या थिरुचिरापल्ली किल्ल्यापर्यंत धडकलं.
पण राणी वेलूकडे किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी लागणारा दारूगोळा नव्हता.
अशावेळी राणीच्या मदतीला धावल्या त्या उदयाल स्त्रिया. राणीची विश्वासू आणि अत्यंत जवळची सहकारी असलेल्या उदयालने दिलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ राणी वेलूने स्त्रियांची फौज उभारली आणि या फौजेला उदयालचं नाव दिलं.
याच फौजेतील कुइली नामक स्त्रीने किल्ल्याचे दरवाजे उघडण्यासाठी एक योजना आखली. त्यानुसार विजया दशमीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला होता. आजूबाजूच्या गावातील सर्व महिला मंदिरात जाणार होत्या. त्यांच्यात मिसळून इंग्रजांच्या दारूगोळ्याच्या कोठारापर्यंत जायचं आणि दरवाजे उघडायचे. त्यानंतर राणी आणि उरलेलं सैन्य आत येईल.
ही योजना ऐकून राणी वेलूच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. राणी म्हणाली, 'तुला नेहमीच मार्ग सापडतो, कुइली.'

फोटो स्रोत, GOSHAIN
विजयादशमीचा सण आला. योजनेप्रमाणे कुइली आणि इतर उदयाल स्त्रिया मंदिरात दाखल झाल्या.
विधी सुरू झाले आणि ठरलेल्या वेळी आवाज आला बहीण उठ!
या स्त्रिया ताबडतोब उठल्या आणि त्यांनी तलवारी काढल्या आणि पहारा देत असलेल्या इंग्रज सैनिकांवर तुटून पडत दरवाजाच्या दिशेने पुढे सरकल्या.
यावेळी कुइलीचं लक्ष मंदिराच्या मागे असलेल्या दारूगोळ्यकडे गेलं. तिने पूजेसाठी तुपाने भरलेलं भांडे उचललं आणि स्वत:वर तूप ओतून घेतलं.
तिने स्वतःला पेटवून घेतलं आणि ब्रिटीशांचा दारूगोळा आणि शस्त्र ठेवलेल्या कोठारात उडी मारली.
तेवढ्यात किल्ल्यावरून जोरात स्फोटाचा आवाज आला. काही मिनिटांतच किल्ल्याचे दरवाजे उघडले आणि दोन उदयाल स्त्रिया घोड्यावर बसून राणी वेलूचं सैन्य लपून बसलेल्या ठिकाणी गेल्या.
त्यातल्या एकीने आवाज दिला...राणी! दरवाजे उघडे आहेत. ब्रिटीशांचं दारूगोळ्याचं कोठार उडवलं आहे. हल्ला करण्याची हीच योग्य वेळ आहे.
राणी म्हणाली, उत्तम.. ! पण माझी मुलगी कुइली कुठे आहे?'
त्यावेळी या उदयाल स्त्रियांची नजर खाली गेली.
त्या उत्तरल्या, 'ब्रिटिश दारूगोळा नष्ट करण्यासाठी आमच्या सेनापतीने स्वतःचं बलिदान दिलं.'

फोटो स्रोत, HISTORY LUST
ही बातमी ऐकताच राणी वेलूने घोड्यावर मांड ठोकली. तेव्हा सय्यद कार्की राणीला म्हणाले: 'आम्ही त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. हल्ला करण्याची वेळ आली आहे. आम्ही तुमच्या आदेशाची वाट पाहत आहोत.'
राणी वेलूने धैर्य एकवटून हल्ल्याचा आदेश दिला. किल्ल्याच्या आत, कर्नल विल्यम फुलरटन यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सैन्य लढत होतं. ब्रिटीश सैन्याकडची रसद आणि दारूगोळा संपत चालला होता.
लेखक सुरेश कुमार लिहितात की, ऑगस्ट 1781 मध्ये वेलू नचियार आणि हैदर अलीच्या सैन्याने मिळून किल्ला ताब्यात घेतला.
अशा प्रकारे ब्रिटिश वसाहतवादी सत्तेविरुद्ध युद्ध पुकारणारी आणि ते जिंकणारी वेलू नचियार भारतातील पहिली राणी होती.
राणी वेलूने पुढची 10 वर्ष शिवगंगाईवर राज्य केलं आणि मुलगी वेलाचीला उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं.
इतिहासकार आर मणिकंडन म्हणतात की, 'वेलू नचियार एक सक्षम योद्धा होती. शत्रूंच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्यात ती पारंगत होती. ब्रिटिश वसाहतवादी सत्तेला आव्हान देण्यासाठी हैदर अली आणि टिपू सुलतान यांच्याशी युती करणं हे तिच्या रणनीतीचं उदाहरण आहे.'
युद्धाच्या मैदानावर ती जितकी आक्रमक होती तितकीच ती आपल्या प्रजेप्रती दयाळू होती. इतिहासकार व्ही. पद्मावती यांच्या मते, आपल्या प्रजेवर प्रेम करणारी ती एक न्यायी आणि दयाळू शासक होती.
उच्चवर्णीयांकडून छळ झालेल्या दलितांना आश्रय देण्याच्या तिच्या निर्णयात करुणा दिसते.
आर मणिकंडन यांच्या मते: 'ती जन्मजातच योद्धा होती.'
युद्धानंतर...
वेलू नचियारने जवळपास एक दशक शिवगंगाईवर राज्य केले. तिच्या पडत्या काळात साथ देणाऱ्या सहकाऱ्यांना तिने प्रशासकीय पदे दिली. वेलू नचियारने हैदर अलीने केलेल्या मदतीबद्दल आभार मानण्यासाठी सरगणी येथे मशीद बांधली.
जे एच राईस यांनी द म्हैसूर स्टेट गॅझेटियरमध्ये लिहिलंय की, ब्रिटिशांविरुद्धच्या दुसऱ्या म्हैसूर युद्धात वेलूने हैदर अलीला पाठिंबा दिला आणि त्याच्या मदतीसाठी आपलं सैन्य पाठवलं.
हैदर अलीच्या मृत्यूनंतर, वेलूने त्याचा मुलगा टिपू सुलतानशीही मैत्रीपूर्ण संबंध ठेवले आणि त्याच्यावर भावासारखं प्रेम केलं. तिने टिपू सुलतानला भेट म्हणून वाघ पाठवला होता.
मुहिबुल हसन यांनी हैदर अली आणि टिपू सुलतान यांच्यावरील पुस्तकात लिहिलंय की, वेलू नचियारचं सैन्य मजबूत करण्यासाठी टिपू सुलतानाने शस्त्रे आणि दारूगोळा देखील पुरवला होता.
टिपू सुलतानने युद्धांमध्ये वापरलेली तलवार वेलू नचियारला भेट म्हणून दिली होती.

फोटो स्रोत, WIKIMEDIA COMMONS
वेलू नाचियारची मुलगी वेलाची हिने 1790 ते 1793 पर्यंत राज्य केलं. 1796 मध्ये शिवगंगाई येथे राणी वेलू नचियारचं निधन झालं.
हमसाधवानी अल्गारसामी लिहितात की, वेलूला तमिळ सभ्यतेत 'वीरमंगाई' (शूर स्त्री) म्हणून ओळखलं जातं.
31 डिसेंबर 2008 रोजी भारतीय पोस्टाने राणीच्या सन्मानार्थ एक टपाल तिकीट जारी केलं. तर तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांनी 2014 मध्ये शिवगंगाई येथे 'वीरमंगाई वेलू नचियार मेमोरियल'चं उद्घाटन केलं होतं. यावेळी राणीचा सहा फुटी ब्राँझचा पुतळाही बसवण्यात आला.
जयललिता यांच्या कारकिर्दीतच हैदर अली आणि टिपू सुलतान यांच्या शौर्याचा गौरव म्हणून स्मारक बांधण्याचं काम सुरू झालं होतं.
गेल्या पाच वर्षांपासून हे स्मारक दिंडीगुल मधील पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरतंय. हेच ते दिंडीगल शहर... जिथे हैदर अली आणि वेलू नचियार यांच्या युतीची पायाभरणी झााली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








