NCERT च्या पुस्तकांमध्ये बदल, इतिहासात मुघलांची उपस्थिती आता किती उरली...

फोटो स्रोत, NCERT
- Author, दिलनवाज पाशा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
NCERT अर्थात नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने आपल्या 12वीच्या इतिहास विषयाच्या पुस्तकातील मुघल साम्राज्याशी संबंधित धडे हटवले आहेत.
यासोबतच अभ्यासक्रमात अनेक असे बदल करण्यात आले आहेत, ज्यावरून आता वाद निर्माण होताना दिसत आहे.
NCERT च्या 12वी इतिहासाचं पुस्तक हे 'थीम्स ऑफ इंडियन हिस्ट्री' नावाने तीन भागात प्रकाशित करण्यात आलेलं आहे. याच्या दुसऱ्या भागातील 9व्या क्रमांकाचा राजा आणि इतिहास, मुघल दरबार हा धडा पुस्तकातून हटवण्यात आलेला आहे.
NCERT च्या वेबसाईटवरून डाऊनलोड करण्यासाठी जी नवी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, त्यामध्ये 28 पानांचा मुघल शासकांवर केंद्रीत असलेला हा धडा गायब असल्याचं दिसून येतं.
NCERT ने भारताच्या पूर्वीच्या मुस्लीम शासकांना अभ्यासक्रमातून हटवण्यासंदर्भात घेतलेला हा निर्णय म्हणजे भारतीय इतिहासातून मुघलांना हटवण्यासाठीचे प्रयत्न म्हणून बोललं जात आहे.
मात्र, दुसरीकडे NCERT ने या निर्णयाचं समर्थन करताना विद्यार्थ्यांवरील अभ्यासक्रमाचा ताण कमी करणं हा आपला उद्देश असल्याचं म्हटलं आहे.
त्यासोबतच इतिहासाच्या पुस्तकात असे काही धडेही आहेत, ज्यामध्ये मुघलांचा उल्लेख येतो.
पाचव्या क्रमांकाच्या धड्यात (परकीय) प्रवाशांच्या दृष्टिकोनातून भारत दर्शवण्यात आलेला आहे. यामध्ये दहाव्या ते सतराव्या शतकापर्यंतच्या भारताचा उल्लेख पाहायला मिळतो.
तर, सहावा धडा हा भक्ति आणि सुफी संप्रदायाशी संबंधित आहे.
यामध्ये मुघल काळाची झलक पाहायला मिळते. धडा 8 चं शीर्षक आहे शेतकरी, जमीनदार आणि राज्य, कृषी समाज आणि मुघल साम्राज्य. यामध्येही मुघल साम्राज्याचा उल्लेख बघायला मिळतो.
बदल का झाले?
इतिहासाच्या पुस्तकात करण्यात आलेल्या बदलांचं समर्थन करताना NCERT चे प्रमुख दिनेश सकलानी माध्यमांसमोर म्हणाले, “मुघलांचा इतिहास हटवण्यात आलेला नाही, तर विद्यार्थ्यांवरील बोजा करण्यासाठी काही भाग वगळण्यात आलेला आहे.”
सकलानी पुढे म्हणतात, “हे म्हणजे अभ्यासक्रमाचं रॅशनलायझेशन (सुसूत्रीकरण) नाही, तर टेक्स्टबुकचं रॅशनलायझेशन आहे. आम्ही गेल्या वर्षीही स्पष्टीकरण दिलं होतं की कोव्हिड साथीमुळे आपल्या विद्यार्थ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. विद्यार्थ्यांवर मोठा दबाव आहे. त्यामुळेच त्यांच्यावरील अभ्यासक्रमाचा ताण कमी करण्याची गरज असल्याचं आमच्या लक्षात आलं. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच अभ्यासक्रमात हे बदल करण्यात आलेले आहेत.

फोटो स्रोत, NCERT
अभ्यासक्रमातील बदलांच्या या प्रक्रियेत फक्त इतिहासातून मुघलांचा धडा हटवण्यात आला, असं नाही. तर राज्यशास्त्र विषयातून असे काही वाक्यंही हटवण्यात आली, ज्यामध्ये महात्मा गांधी यांची हिंदुत्ववाद्यांच्या प्रति असलेली नाराजी, त्यांच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घालण्यात आलेली बंदी या बाबींचा उल्लेख आहे.
महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेबद्दल लिहिलेलं वाक्य ‘तो पुण्याचा ब्राह्मण होता’ हेसुद्धा आता हटवण्यात आलेलं आहे.
सोबतच 11वीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकातून 2002 च्या गुजरात दंगलीसंदर्भात तिसरा आणि अंतिम संदर्भ हटवण्यात आलेला आहे.
NCERT च्या पुस्तकात करण्यात आलेल्या बदलांमुळे बिगर-भाजपशासित राज्य आणि विरोधी पक्षांकडून टीकेची झोड उठण्यास सुरू झालं आहे.

फोटो स्रोत, NCERT
बदलांना विरोध का?
इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, राजस्थान, केरळ आणि पश्चिम बंगालच्या शिक्षण मंत्र्यांनी या बदलांना जोरदार विरोध दर्शवला.
तर आंध्र प्रदेश, तेलंगण, ओडिशा आणि तामिळनाडूच्या शिक्षण मंत्र्यांनी म्हटलं की राज्यात हे बदल लागू करण्यापूर्वी त्याची समीक्षा केली जाईल.
पण, उत्तर प्रदेश सरकारने या बदलांचं समर्थन केल्याचं दिसून येतं.
उत्तर प्रदेशच्या शिक्षण मंत्री गुलाब देवी यांनी म्हटलं, “नव्या शिक्षण धोरणाच्या आधारावर हे काम केलं जात आहे. NCERT ने दिल्यानुसार हे अभ्यासक्रम आम्ही वापरणार आहोत.”

फोटो स्रोत, Getty Images
उत्तर प्रदेशच्या सरकारी शाळांमध्ये सप्टेंबरमध्ये NCERT पुस्तकातील 8वा अध्याय शिकवला जाईल.
यामध्ये मुघल साम्राज्याच्या दरम्यान भारताच्या कृषी संस्कृतीचा उल्लेख आहे. पण, 9वा अध्याय जो पूर्णपणे मुघलांवर आधारित आहे, तो अभ्यासक्रमाच्या मासिक वेळापत्रकातून हटवण्यात आल्याचं दिसून येतं. म्हणजे, नव्या शैक्षणिक वर्षात अभ्यास नव्या पुस्तकांमधूनच होईल.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी म्हटलं, “धार्मिक आधारावर इतिहासाचं लेखन करणं वाढलं आहे.”
तर कम्युनिस्ट पक्षाचेच नेते डी. राजा म्हणाले, “हा बदल म्हणजे इतिहासाची छेडछाड करण्यासाठी, तो बदलण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेला आणखी एक प्रयत्न आहे. सरदार पटेल यांनी महात्मा गांधींच्या हत्येनंतर संघावर बंदी घातली होती. कारण द्वेष आणि हिंसेच्या शक्तींना त्यांना मूळापासून उखडून टाकायचं होतं. कोणताही खोटेपणा हे सत्य लपवू शकणार नाही.”
बदलामागील युक्तिवाद
NCERT ची नवी पुस्तके शाळांमध्ये पाठवण्यात येतात. तेव्हा विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून त्यावर प्रतिक्रिया येतात. चुका, सल्ले यांच्याबाबत मत जाणून घेतलं जातं. साधारणपणे त्या लक्षात घेऊन मगच अभ्यासक्रमात बदल करण्यात येत असतात.
विज्ञान विषयाच्या पुस्तकात वेळोवेळी नवे बदल करण्यात येत असतात. कारण यामध्ये खूप सारी माहिती सतत नव्याने येत असते.
अनेकवेळा बाजारात उपलब्ध असलेली माहिती कालबाह्य ठरते. या क्षेत्रात नव्या घडामोडी घडल्यानंतर असे बदल स्वाभाविक असतात.
इतिहास किंवा इतर विषयांच्या पुस्तकांमध्ये यापूर्वीही अनेक बदल झाल्याचं पाहायला मिळतं. या बदलांसाठी NCERT चे तज्ज्ञ चर्चा करतात. त्यानंतर पुस्तकांच्या लेखकांना बदल सुचवण्यात येतात.
भाजपचे निकटवर्तीय मानले जाणारे NCERT चे माजी चेअरमन जे. एस. राजपूत म्हणतात, “NCERT ही एक मोठी संस्था आहे. यामध्ये अनेक तज्ज्ञ मंडळी आहेत. NCERT ने बदल केला तरी तो शैक्षणिक आधारावरच केला जातो. इतिहासात जर कुणी आपली विचारसरणी घातलेली असेल, तर ती हटवण्यात आली पाहिजे. पण मुघल इतिहास हा जागतिक इतिहास आहे. तो पूर्णपणे हटवता येणार नाही. त्याला रॅशनलाईज केलं गेलं असेल.”
राजपूत पुढे म्हणतात, “पुस्तकांमध्ये हेसुद्धा पाहिलं जातं की इतिहासाच्या एखाद्या कालखंडात काही भाग वगळण्यात आला होता का? मलाही वाटलं होतं की मुघल काळाचा इतिहासच जास्त शिकवण्यात आलेला आहे. ते वाचून वाटतं की फक्त मुघल काळातच भारत होता, त्याशिवाय काहीही नव्हतं. आता नव्या शैक्षणिक धोरणाच्या आधारावर जी पुस्तके तयार होत आहेत, त्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात येतो आहे.”

फोटो स्रोत, NCERT
जे. एस. राजपूत यांच्या मते, मुघल हे भारतीय इतिहासातील महत्त्वाचा भाग आहेत. त्यांना पुस्तकातून हटवून चालणार नाही. पण ते कमी तर नक्कीच होऊ शकतं.
1999 ते 2004 च्या दरम्यान NCERT चे प्रमुख राहिलेले जे. एस. राजपूत म्हणतात, “1970 पासून डाव्या विचारसरणीच्या लोकांचा संस्थेवर प्रभाव राहिला. हा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
“आपल्या कार्यकाळात मी सुद्धा पुस्तकांचं रॅशनलायझेशन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी अंतिम निर्णय आम्ही पुस्तकांच्या लेखकांवरच सोडून दिला होता. ते बदलांना तयार नव्हते, तेव्हा आम्हाला नवे लेखक शोधावे लागले.”
पुस्तकांत करण्यात आलेल्या बदलांवरून वाद निर्माण झाल्यानंतर NCERT च्या हेतूवरही प्रश्न उपस्थित होत आहे.
NCERT एका विशिष्ट विचारसरणीला पाठिंबा देण्यासाठी अशा प्रकारचे बदल करत असल्याचा आरोप होत आहे.
राजपूत सांगतात, “NCERT चा हेतू स्पष्ट आहे. वादामुळे त्यांच्यावर काहीच परिणाम होणार नाही. NCERT जे काही करतं, ते विचारपूर्वक करतं. भारतात शैक्षणिक संस्थांवर डाव्या विचारांचा प्रभाव राहिलेला आहे, हे लोकांना माहीत आहे. त्यामुळे ते कमी करण्यात येत असेल, तर या बदलांना पाठिंबा मिळेल. या बदलांचं अनेकजण स्वागतही करत आहेत.”
‘पुढची पिढी उद्ध्वस्त होईल’
NCERT ने केलेले हे बदल म्हणजे भारतातून मुघलांचा इतिहास हटवण्याचे प्रयत्न असल्याचा आरोप अनेकांकडून केला जात आहे.
इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे सचिव आणि अलीगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीचे इतिहास विषयाचे प्राध्यापक सैय्यद अली नदीम रेझावी म्हणतात, “इतिहास बदलत राहतो. काही काळानंतर विद्यार्थ्यांना शिकवण्यात येत असलेल्या गोष्टींमध्ये बदल करण्याची गरज निर्माण होत असते. बदल करणं काय मोठी गोष्ट नाही. ती होत राहते. पण हे बदल नेहमी तथ्यांवर आधारित असले पाहिजेत. नव्या माहितीच्या आधारे ते केले जावेत. पण दुर्दैवाने गेल्या काही वर्षांत इतिहास आपल्या मर्जीनुसार लिहिण्याचा प्रकार सुरू आहे. एक प्रकारे इतिहास बदलून त्याऐवजी मिथकांना जागा देण्यात येत आहे.”
अली नदीम रेझावी म्हणतात, “2014नंतर इतिहासाला एक वेगळा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न वारंवार सुरू आहे. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातही बदल करण्याचे प्रयत्न झाले. पण त्यावेळी केलेले बदल हे तथ्यं आणि स्त्रोत यांच्यावर आधारित होते. आता पूर्णपणे काल्पनिक इतिहास लिहिण्याचा प्रयत्न होत आहे.”
मुघलांचा इतिहास हटवला नाही, तर काही भाग वगळण्यात आला, हा युक्तिवाद प्रा. रेझावी मान्य करत नाहीत.
प्रा. रेझावी यांच्या मते, तुम्ही इतिहासातील एक विशिष्ट भाग हटवू शकत नाही. तुम्ही तसं करत असाल, तर तुम्ही विद्यार्थ्यांना चुकीचा इतिहास शिकवत आहात. यामुळे समाजावर विपरित परिणाम होईल.”
प्रा. रेझावी यांच्या मते, पुस्तकात मुघलांशी संबंधित जो भाग कायम ठेवण्यात आला, तोसुद्धा विशिष्ट हेतूनेच ठेवण्यात आला.”
ते म्हणतात, “त्यांनी काही निवडक भाग कायम ठेवले. यामध्ये मुघलांनी हिंदूंविरोधात युद्ध केलं, असं ठसवण्यात आलेलं आहे. पण मुघलांनी हा देश आणि समाज बनवण्यासाठी जे काम केलं, तेच हटवण्यात आलेलं आहे.”
प्रा. अली नदीम रेझावी म्हणतात, “महाराणा प्रताप यांना हिरो बनवण्याचा प्रयत्न होत आहे. पण महाराणा प्रताप यांना एकट्याने बाजूला ठेवून हिरो ठरवता येणार नाही. तिथे अकबर गरजेचा आहे, त्यामुळे तिथे अकबराचा उल्लेख आहे. पण अकबरने नंतर धार्मिक सौहार्दाच्या दृष्टीने जे काम केलं, एक सहिष्णु समाज त्याने बनवला ते हटवण्यात आलेलं आहे.”
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








