You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
‘शेतात किटकनाशकाचं काम करणारा हा बेडूक हातात घेणं म्हणजे एखादं बाळ हाती घेण्यासारखं आहे'
दक्षिण आफ्रिकेतील कॅमेरून देशात वन्यजीव संरक्षणाचं काम करणाऱ्या सेड्रिक फॉगवॅनला नावाच्या तरुणाला जेव्हा पहिल्यांदा गोलियाथ बेडूक दिसलं तेव्हा त्याचा भलामोठा आकार पाहून तो आश्चर्यचकित झाला.
एखाद्या सर्वसामान्य मांजरीएवढा आकार असलेला गोलियाथ बेडूक हा जगातील सर्वांत मोठा बेडूक आहे.
गोलियाथला हातात पकडणं म्हणजे एखाद्या नवजात बाळाला हातात पकडल्याप्रमाणे आहे, असं फॉगवॅन सांगतो.
गोलियाथ बेडकाची ही प्रजात अतिशय दुर्मिळ मानली जाते. ती सहजासहजी आढळून येत नाही. शिवाय बेडकांची ही प्रजात नामशेष होत चालली आहे. त्यामुळे या प्रजातीच्या संरक्षणासाठी सेड्रिकने एक मोहीमच उभारलीय.
याबाबत सेड्रिक म्हणाला, “बेडकांची ही प्रजात अतिशय दुर्मीळ आहे, सहज सापडतही नाही, हे मला समजलं तेव्हा मला अभिमान वाटलं. कारण मला या बेडकाला हाताळण्याची संधी मिळाली आहे.”
“हा बेडूक या परिसरात आढळून येत असल्याचं येथील लोकांना प्रचंड अप्रूप आहे. त्यामुळे त्याला आपल्या संस्कृतीशीही ते जोडून पाहतात,” असं सेड्रिकने सांगितलं.
अनेक दशकांपासून, कॅमेरून आणि इक्वेटोरियल गिनीमध्ये गोलियाथची शिकार आणि तस्करी केली जात आहे. खाण्यासाठी किंवा व्यापारासाठी या बेडकाचा बळी घेतला जातो.
कॅमेरूनमधील नद्या आणि ओढ्यांच्या आजूबाजूचा परिसर हा गोलियाथचा अधिवास आहे. पण, गेल्या काही काळात त्याचा हा अधिवास वेगाने नष्ट होत चालला आहे.
या सर्व कारणांमुळे बेडकांची संख्या झपाट्याने कमी होत असून त्याचा समावेश आता नामशेष होणाऱ्या प्रजातींच्या रेड लिस्टमध्ये करण्यात आला आहे.
गोलियाथ बेडकाबाबत जास्त माहिती उपलब्ध नाही. इतकंच नव्हे तर कॅमेरूनमध्येही अनेक स्थानिकांना त्याच्या पर्यावरणातील स्थानाचं महत्त्व माहिती नाही.
गोलियाथ बेडूक हा पिकांचं नुकसान करणाऱ्या कीटकांची शिकार करण्यात पटाईत असतो.
गोलियाथचं संवर्धन करत असलेली वन्यजीव संरक्षण संघटना ही त्याबाबत लोकांमध्ये जनजागृतीचं काम करत आहे.
शिकार करणाऱ्या व्यक्तींना ते त्याचं महत्त्व पटवून देतात. गोलियाथची शिकार करून त्याला खाण्यापेक्षा त्याचे इतर उपयोग दर्शवून देत आहेत.
ही संघटना लोकांना अन्नाचे पर्यायी स्त्रोतही समजून सांगते. त्यांनी आता गोलियाथची शेती सुरू करण्यासाठी स्थानिकांसोबत काम सुरू केलं आहे.
सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून माऊंटो लोन्को अभयारण्यात आता गोलियाथची संख्या वाढू लागली आहे.
बेडकाची शिकार होत असल्यास त्याविषयी तत्काळ संरक्षक संघटनेला माहिती मिळते.
एके दिवशी त्यांना एका व्यक्तीकडून माहिती मिळाली की त्याच्या शेजाऱ्याने गोलियाथ बेडूक पकडलं आहे.
विशेष म्हणजे, हा व्यक्ती पूर्वी शिकार करत असे. पण त्याने शिकार करणं सोडून दिलं होतं. त्याने दिलेल्या माहितीनुसार, गोलियाथ बेडकाचा माग घेऊन त्याला वाचवण्यात संघटनेला यश आलं.
सेड्रिकने त्या बेडकाची सुटका करून त्याला जंगलात परत सोडून दिलं.
याबाबत सेड्रिक म्हणाला, “मला विश्वास आहे की आपण त्यांना वाचवू शकतो. या कामाचा आपल्याला अभिमान वाटेल.”
गोलियाथ बेडूक वाचवण्याच्या प्रकल्पाला फॉना अँड फ्लोरा इंटरनॅशनल, बर्डलाइफ इंटरनॅशनल आणि वाइल्डलाइफ कॉन्झर्व्हेशन सोसायटी यांच्यामार्फत मदत केली जात आहे.
त्यांच्या कन्झर्व्हेशन लीडरशिप प्रोग्राम (CLP) अंतर्गत आवश्यक ती मदत संघटनेपर्यंत पोहोचवली जात असल्याने सेड्रिकच्या मोहिमेला चांगली मदत होताना दिसते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता)