You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'आजोबांचा खून करुन तो रक्तानं माखलेल्या हातांनी पोलीस स्टेशनमध्ये आला'
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
प्रॉपर्टीच्या वादातून एका नातवानं चुलत आजोबाच्या डोक्यावर कोयत्याने वार करुन त्यांचा खून केल्याचा प्रकार बीडमध्ये समोर आला आहे.
बीडच्या केज शहरात ही घटना 5 मार्चच्या सकाळी घडली आहे. या घटनेत गिरधारीलाल किसनलाल शिल्लक (57) यांचं निधन झालं आहे.
तर 25 वर्षीय आरोपी रोहित रतन शिल्लक याला पोलिसांनी अटक केली आहे. आजोबाचा खून केल्यानंतर रोहित स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला होता.
रोहितविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 120 (ब) आणि 107 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
गिरधारीलाल शिल्लक केजमध्ये वास्तव्यास होते. इथं त्यांच्या मालकीची दोन दुकानं होती. याच दुकानांच्या मालकीच्या वादातून हा प्रकार घडला आहे.
गिरधारीलाल शिल्लक यांच्या घराशेजारी गणपतीचं मंदिर आहे. ते दररोज सकाळी 7 च्या सुमारास मंदिरात दर्शनाला जात असे.
त्यानुसार ते 5 मार्चच्या सकाळी 7.30 वाजता दर्शनाला गेले. गिरधारीलाल आणि रोहित यांची घरं शेजारीच असल्यामुळे रोहितला गिरधारीलाल यांच्या रुटीनविषयी माहिती होतं.
या मंदिराशेजारी मोकळी जागा आहे. या जागेवर रोहितनं कोयत्यासारख्या हत्यारानं गिरधारीलाल यांच्या डोक्यात सपासप वार केले.
जखमी अवस्थेतील गिरधारीलाल यांना केजमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून पुढील उपचारासाठी त्यांना अंबाजोगाई इथं नेण्यात आलं. सकाळी साडे आठच्या सुमारास त्यांचं निधन झालं.
आरोपी स्वत: पोलीस स्टेशनमध्ये आला
"गिरधारीलाल यांच्या डोक्यावर वार केल्यानंतर आरोपी रोहित स्वत:हून पोलीस स्टेशनमध्ये आला. तेव्हा त्याचे हात आणि कपडे रक्तानं माखलेले होते. आम्ही त्याला ताब्यात घेऊन लगेच घटनास्थळी दाखल झालो," असं केज पोलीस स्टेशनचे पोलीस उप-निरीक्षक वैभव सारंग यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
रोहित सध्या कॉलेजचं शिक्षण घेत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत..
केज पोलीस रोहितला आज दुपारी कोर्टासमोर हजर करणार आहेत.