डोनाल्ड ट्रंप मध्यावधी निवडणुकीनंतर कमबॅक करणार का? राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची कसोटी

फोटो स्रोत, Getty Images
आठ नोव्हेंबरला म्हणजे आजच अमेरिकेत तिथल्या संसदेसाठी निवडणुका होतायत. या मिडटर्म इलेक्शन म्हणजे मध्यावधी निवडणुकांकडे जगाचंही लक्ष लागलं आहे.
या निवडणुकीत एकीकडे अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा तर दुसरीकडे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आपापल्या पक्षांच्या उमेदवारासाठी स्वतः प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले.
मिडटर्म इलेक्शन इतकं महत्त्वाचं का आहे? या निवडणुकीच्या निकालाचा अमेरिकेच्या राजकारणावर आणि पर्यायानं जगावर काय परिणाम होऊ शकतो? जाणून घेऊयात.
मिडटर्म इलेक्शन म्हणजे काय?
अमेरिकेच्या संसदेचं नाव आहे काँग्रेस.
भारतीय संसदेत जशी लोकसभा आणि राज्यसभा ही दोन सभागृहं आहेत, तशीच अमेरिकेतल्या काँग्रेसचीही दोन सभागृह आहेत. एक आहे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज आणि दुसरं सिनेट.
हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघांतून निवडून गेलेले प्रतिनिधी म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह्ज असतात, ज्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असतो.
तर प्रत्येक राज्यातून दोन जण सिनेटमध्ये निवडून जातात आणि हे दोन सिनेटर त्या राज्याचं सहा वर्षं प्रतिनिधित्व करतात.
हे प्रतिनिधी निवडण्यासाठी दर दोन वर्षांनी निवडणुका होत असतात. या निवडणुका राष्ट्राध्यक्षांच्या चार वर्षांच्या कार्यकाळात बरोबर मध्यावर येतात, तेव्हा त्यांना मिडटर्म किंवा मध्यावधी निवडणूक म्हणून ओळखलं जातं.
यंदा मध्यावधी निवडणुकीत हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या सर्व 435 जागांसाठी तर सिनेटच्या 100 पैकी 35 जागांसाठी मतदान होतंय.
मिडटर्म निवडणूक का महत्त्वाची?
अमेरिकेत अध्यक्षीय लोकशाही असली तरी या दोन्ही सभागृहांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे.
कारण अध्यक्षांनी आणलेल्या कुठल्या कायद्यांवर मतदान करायचं हे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह ठरवतं.
तर सिनेट ते कायदे पास करू शकते किंवा रद्द करू शकते. राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या नेमणुकांवर शिक्कामोर्तब करायचा किंवा नाकारायचा अधिकार सिनेटला असतो, तसंच क्वचित राष्ट्राध्यक्षांविरोधात आरोपांची चौकशी सिनेटमध्ये होते.
त्यामुळेच या दोन्ही सभागृहांत कोणत्या पक्षाची सत्ता येते, हे राष्ट्राध्यक्षांसाठी महत्त्वाचं असतं.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेत सध्या डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन राष्ट्राध्यक्षपदावर आहेत आणि त्यांच्या कार्यकाळातल्या त्यांच्याच पक्षाला पहिल्या दोन वर्षांत हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जमध्ये अगदी थोड्या फरकानं बहुमत होतं.
यंदाही अटीतटीची निवडणूक होण्याची चिन्हं आहेत आणि सर्व निकाल लगेच हाती येतील, अशी चिन्हं नसल्याचं विश्लेषक सांगतात.
राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची कसोटी
सामान्यतः अमेरिकेतली मध्यावधी निवडणूक म्हणजे राष्ट्राध्यक्ष दोन वर्षांत योग्य काम करतायत की नाही, याविषयी लोकांनी दिलेला कौल मानली जाते.
त्यामुळेच विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. इतकी, की बायडन यांचे एकेकाळचे 'बॉस' आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाही प्रचाराच्या रणधुमाळीत उतरलेले दिसले.

फोटो स्रोत, Getty Images
रिपब्लिकन पक्षानं दोन्हीपैकी एकाही सभागृहात बहुमत मिळवलं, तर बायडन यांना हवामान बदल, आरोग्याच्या सरकारी योजना याविषयी त्यांचा अजेंडा पुढे नेण्यात अडचणी येतील.
स्वतः जो बायडन यांचं भवितव्यही मध्यावधी निवडणुकीवर अवलंबून आहे.
बायडन यांच्या पक्षाचा म्हणजे डेमोक्रॅट्सचा मोठा पराभव झाला, तर ते राष्ट्राध्यक्षांविरुद्धचं जनमत धरलं जाईल आणि 2024 साली राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी बायडनऐवजी दुसऱ्या उमेदवाराला तिकीट मिळावं अशी मागणी पक्षात जोर धरेल.
दुसरीकडे रिपब्लिकन पक्षाचे माजी राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रंप यांच्या राजकीय आकांक्षाही अजून टिकून आहेत.
ट्रंप पुन्हा कमबॅक करणार?
ट्रंप 2020 साली झालेली राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक हरले होते, पण त्यांनी आपला पराभव स्वीकारला नाही.
रिपब्लिकन पक्षात आणि या पक्षाचा प्रभाव असलेल्या राज्यांमध्ये अजूनही ट्रंप यांनं अनेकांचा पाठिंबा आहे. पण पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवायची, तर तो पुरेसा आहे का, हे स्पष्ट नाही.
त्यामुळेच ट्रंप यांच्यासाठी यंदाची मिडटर्म निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. ट्रंप थेट कुठली जागा लढवत नाहीयेत, पण काही रिपब्लिकन उमेदवारांच्या प्रचारात उतरले आहेत.
या उमेदवारांचा विजय झाला, तर ट्रंप यांचा पुन्हा राध्यक्षपदासाठी उमेदवारीचा दावा आणखी मजबूत होईल आणि ते 2024 सालची निवडणूक लढवण्याचा इरादा जाहीर करू शकतील.
मिडटर्म निवडणूक का महत्त्वाची?
अमेरिकेत गर्भपाताविषयी महिलांच्या हक्कांचा मुद्दा यंदा पुन्हा चर्चेत आहे.
डेमोक्रॅटिक पक्षानं महिलांचा गर्भपाताचा निर्णय घेण्याचा अधिकार कायम राहील, असं आश्वासन दिलं होतं. तर रिपब्लिकन पक्षानं गरोदरपणाच्या 15 आठवड्यांनंतर गर्भपातावर देशव्यापी निर्बंध घालण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
स्थलांतरित आणि निर्वासितांविषयी रिपब्लिकन पक्षानं याआधी कडक भूमिका स्वीकारली आहे. ते निवडणूक जिंकले तर धार्मिक हक्क आणि हिंसात्मक गुन्ह्यांचा मुद्दा अजेंड्यावर ठेवण्याचा प्रयत्न करतील.
तर डेमोक्रॅटिक पक्ष पर्यावरण, आरोग्य, मतदानाचा हक्क आणि बंदुकांवर बंधनं अशा मुद्द्यांना प्राधान्य देत आहे.
म्हणजे एक प्रकारे या निवडणुकीचा निकाल हवामान बदल, युक्रेन युद्ध अशा मुद्द्यांवर अमेरिकेची भूमिका ठरवू किंवा बदलू शकतो.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त









