OpenAI कंपनीत नेमकं चाललंय तरी काय? राजीनामा, हकालपट्टी की बंड?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, झो क्लिनमन
- Role, तंत्रज्ञान संपादक, बीबीसी
कोट्यवधी उत्पन्न असणाऱ्या, त्या कंपनीच्या तंत्रज्ञानामुळे भविष्य एकतर उजळ होईल किंवा नष्ट होईल अशी परिस्थिती असणाऱ्या कंपनीच्या बोर्डरुममध्ये काय चालत असेल याचा प्रत्यय OpenAI या कंपनीच्या निमित्ताने येतो आहे.
या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी काय बोलतो याकडे जागतिक नेत्यांचं लक्ष लागलेलं असतं.
मात्र याच कंपनीच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी या व्यक्तीविरुद्ध बंड केलं. मात्र कंपनीच्या इतर लोकांनी सांगितलं की त्याला परत घ्या किंवा आम्हालाही नोकरीवरून काढून टाका.
ही सगळी नेटफ्लिक्सच्या एखाद्या सीरिजची पटकथा नाही. तर OpenAI या कंपनीत गेल्या काही दिवसात होत असलेल्या घडामोडी आहेत.
जगभरातील सर्व तंत्रस्नेही, पत्रकार हे सगळं नाट्य उलगडताना पाहत आहे. काही लोकांना ही अतिशयोक्ती वाटेल मात्र हे सगळंच अतिशय थरारक आणि नाट्यमय आहे.
हे सगळं सुरू कसं झालं?
OpenAI या कंपनीने ChatGPT या क्रांतिकारी टूलची स्थापना केली आहे. शुक्रवारी कंपनीच्या संचालक मंडळाने कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमॅन यांना कामावरून काढून टाकत असल्याची घोषणा केली.
एका ब्लॉगवर लिहिलेल्या पोस्टमध्ये संचालक मंडळाने आरोप लावला की अल्टमन हे त्यांच्याशी योग्य संवाद साधत नाही आणि त्यांच्या नेतृत्वगुणांवरून आमचा विश्वास उडाला आहे.
या मंडळावर फक्त सहा लोक होते. त्यापैकी दोघं जण म्हणजे सॅम अल्टमन आणि कंपनीचे सहसंस्थापक ग्रेग ब्रॉकमन आहेत. ब्रॉकमन यांनीही राजीनामा दिला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
तर या इतर चार मंडळींनी कोणताही आगापिछा न ठेवता, अगदी त्यांच्या गुंतवणूकदारांचा विचारही न करता हे टोकाचं पाऊल उचललं.
एलॉन मस्क हे या कंपनीचे मूळ सहसंस्थापक आहेत त्यांनी X वर लिहिलं की ते या घडामोडींमुळे अतिशय काळजीत आहेत.
इल्या सुटस्किवर हे या कंपनीचे मुख्य वैज्ञानिक आहेत. “अगदी गरजेचं असल्याशिवाय ते इतका कठोर निर्णय घेणार नाहीत,” असंही मस्क म्हणाले.
आता मात्र सुटस्किवर यांना या निर्णयाचा पश्चाताप होत आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी संचालक मंडळाला एक पत्र लिहिलं आहे.
त्यात सुटस्किवर यांचाही समावेश आहे. कर्मचाऱ्यांनी अल्टमन आणि ब्रॉकमन यांना परत आणण्याची मागणी केली आहे किंवा आम्हीच कंपनी सोडू असा इशारा दिला आहे.
हे सगळं कशामुळे झालं?
हे सगळं कशामुळे झालं? आम्हाला अजूनही माहिती नाही. तरी यापैकी काही कारणं असू शकतात.
काही जणांच्या मते अल्टमन हार्डवेअरमध्ये काही बदल करणार होते. त्यांना AI चीपसाठी फंडिग आणि विकसन हवं होतं.
त्यामुळे OpenAI कंपनीची दिशाच बदलली असती. संचालक मंडळाला विश्वासात न घेता त्यांनी असे काही वायदे केले आहेत का? की नेहमीप्रमाणे हा पैशाचं प्रकरण होतं.
एक अंतर्गत मेमो या निमित्ताने बाहेर आला. त्याबद्दलही बरीच चर्चा झाली. त्यात संचालक मंडळाने हे स्पष्ट केलं की अल्टमन यांनी कोणताही आर्थिक घोटाळा केलेला नाही हे संचालक मंडळाने स्पष्ट केलं आहे.
मात्र आपल्याला माहिती आहे की OpenAI ही विना नफा संस्था आहे. याचा अर्थ पैसा उभं करणं हे त्यांचं उद्दिष्ट नाही. म्हणजे कंपनी चालवायला जितका पैसा लागतो तितकाच पैसा उभा करायचा आणि त्यापेक्षा अधिक पैसा कमावला तर तो कंपनीच्या विकासासाठीच वापरायचा.

फोटो स्रोत, Getty Images
2019 मध्ये कंपनीत आणखीच एक विभाग स्थापन करण्यात आला होता. हा भाग नफ्याशी निगडीत होता. दोन्ही भाग कसे एकत्रित काम करतील हेही कंपनीने स्पष्ट केलं. मात्र या निर्णयाने सर्वच लोक खूश नव्हते. म्हणूनच एलॉन मस्क कंपनीतून निघून गेल्याचं सांगितलं जातं.
OpenAI कंपनीकडे आता अमाप पैसा आहे. अधिक पैसा उभा करण्याच्या नादात तर हे झालं नसेल ना?
या सगळ्याला पूर्णविराम कसा लागेल?
OpenAI ही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातली कंपनी आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता सध्या पूर्णपणे अस्तित्वात नाही. अशा प्रकारचं तंत्रज्ञान हे एकाच वेळी आश्चर्यचकित करणारं आणि घाबरवणारं आहे. एक दिवस असा येईल की AI माणसांसारख्या किंवा माणसांपेक्षाही अधिक क्षमतेने करू शकेल.
आपण ज्या गोष्टी आता करतो त्याचं संपूर्ण प्रारुप यामुळे बदलणार आहे. मग ते नोकरी, पैसा, शिक्षण अगदी काहीही असो. मशीननेच सगळं काम करण्याचा काळ पुढे येणार आहे. हे अतिशय शक्तिशाली टूल आहे.
अल्टमन हे सगळं घडवून आणण्याच्या अधिक जवळ होते का? नुकत्याच दिलेल्या एका भाषणात ते म्हणाले की ChatGPT हे एखाद्या दुरच्या नातेवाईकासारखं आहे.
असं काही होईल असं मला वाटत नाही. OpenAI चे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी इमेट शिअर यांनी X वर लिहिलं की, “सुरक्षेच्या मुद्द्यावरून अल्टमन यांच्याशी कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. जे झालं त्याबद्दल सखोल चौकशी केली जाईल.”
मायक्रोसॉफ्टची OpenAI कंपनीत सर्वांत मोठी गुंतवणूक आहे. त्यांनी अल्टमन यांना त्यांच्या कंपनीत बोलावून घेतलं आहे. एका नवीन AI संशोधन टीमचे ते नेतृत्व करतील. त्यांचे सहसंस्थापक ब्रॉकमनही त्यांच्याबरोबर जाणार आहे. तसंच OpenAI कंपनीतील अनेक चांगली लोक त्यांच्याबरोबर जाणार आहे.
OpenAI तिथल्या लोकांशिवाय काहीच नाही अशा पोस्ट्स कंपनीचे कर्मचारी विविध समाजमाध्यमांवर शेअर करत आहेत.
म्हणजे नव्या सीईओंना पुन्हा नव्या लोकांना आणावं लागेल असा त्याचा अर्थ होतो का? कंपनीच्या हेडक्वार्टरच्या बाहेर उभ्या असलेल्या बीबीसीतीलच माझ्या सहकाऱ्याने सांगितलं की लोक कामाला येण्याच्या मूड मध्ये नाहीत.
फक्त एक आठवण करून द्यावीशी वाटते की हे सगळं नाट्य जग बदलू पाहणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी असलं तरी त्यात मानवी भावभावनाही तितक्याच ओतप्रोत भरल्या आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








