पर्यावरणपूरक सोलर पॅनलच भविष्यात पर्यावरणासाठी धोका ठरतील कारण...

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE
- Author, डॅनियल गॉर्डन
- Role, द क्लायमेट क्वेश्चन पॉडकास्ट, बीबीसी साऊंड्स
कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठीच्या लढाईत सोलर पॅनल जगभरात एक महत्त्वाचं शस्त्र म्हणून वापरले जातात.
खरंतर केवळ 25 वर्षांपूर्वीच शोध लागलेल्या सोलर पॅनलला अल्पावधीत हे स्थान प्राप्त झालं.
तज्ज्ञांच्या मते, पर्यावरणपूरक मानले जाणारे हेच सोलर पॅनल भविष्यात पर्यावरणासाठी चिंतेचा विषय ठरू शकतात.
सोलर पॅनलमुळे भविष्यात इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मोठी समस्या निर्माण होऊ शकते, असं त्यांना वाटतं.
ऑस्ट्रेलियात न्यू साऊथ वेल्स युनिव्हर्सिटीमध्ये सोलर पॅनल पुनर्वापर विषयाचे तज्ज्ञ असलेल्या डॉ. रॉग डेंग यांच्या मते, “संपूर्ण जगात आतापर्यंत एक टेरावॉट क्षमतेचे सोलर पॅनल लावण्यात आलेले आहेत.”
त्यांच्या मते, “सर्वसामान्य सोलर पॅनलची क्षमता 400 वॉटची असते. छतांवर तसंच सोलर प्रकल्पात लावण्यात आलेल्या पॅनलची संख्या विचारात घेतली तर त्याची संख्या अडीच अब्जांपर्यंत होईल.”
ब्रिटिश सरकारच्या माहितीनुसार, “ब्रिटनमध्ये दहा लाखांहून अधिक सोलर पॅनल लावण्यात आले आहेत. पण ते हटवण्याची किंवा पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने कोणताही विचार अद्याप करण्यात आलेला नाही.”
यामुळेच, सोलर पॅनलच्या रिसायकलिंगबाबत ठोस धोरण तयार करण्यात यावं, अशी मागणी तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. त्यांच्या मते, जागतिक पातळीवर यामुळे पर्यावरण संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

फोटो स्रोत, LAURENT JULLIAND
इंटरनॅशनल रिन्यूएबल एनर्जी एजन्सी (IRENA) च्या उपसंचालक युटे कोलियर म्हणतात, “आपण सोलर पॅनलचं रिसायकलिंग करण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुरू केल्या नाहीत, तर 2050 पर्यंत सोलर पॅनल कचऱ्याचे डोंगर ठिकठिकाणी आपल्याला दिसतील.”
त्या म्हणतात, “आपण सतत ऊर्जेबाबत विचार करून सोलर पॅनल बनवत आहोत. हे चांगलं असलं तरी त्याच्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी?”
फ्रान्समध्ये जगातील पहिली कारखाना
सोलर पॅनल पूर्णपणे रिसायकल करण्यासाठीचा एक कारखाना फ्रान्समध्ये सुरू करण्यात येणार आहे. जूनअखेरपर्यंत हा कारखाना सुरू होईल. अशा प्रकारचं काम करणारा हा जगातील पहिला कारखाना असणार आहे.
हा कारखाना सुरू होताच या दिशेने काम करणाऱ्या लोकांना आशेचा किरण दिसू लागला आहे.
ROSI असं या कंपनीचं नाव असून फ्रान्समध्ये ग्रेनोबेल या ठिकाणी हा कारखाना सुरू होत आहे.

फोटो स्रोत, LAURENT JULLIAND
सोलर पॅनलमधील 99 टक्के भागाचा पुनर्वापर करून तो पुन्हा वापरालायक बनवण्याची कंपनीची अपेक्षा आहे.
हा कारखाना सोलर पॅनलची काच आणि अल्युमिनिअर फ्रेमसोबतच त्यामध्ये लावण्यात आलेले मौल्यवान धातू – चांदी आणि तांबे यांना वेगळं करण्याचं काम करेल.
हे विभाजन करणंच मुळाच सर्वांत आव्हानात्मक काम आहे.
हे धातू रिसायकल केल्यानंतर अधिक क्षमतेच्या सोलर पॅनलमध्ये त्यांचा पुनर्वापर केला जाऊ शकतो.
रिसायकलिंगच्या पारंपारित पद्धतीने अल्युमिनिअम आणि काच यांना वेगळं केलं जाऊ शकतं. पण रोसी कंपनीच्या मते यातून परत मिळालेली काच ही कमी दर्जाची असते.
त्यामुळे या काचेचा वापर टाईल्स बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. अन्यथा डांबर बनवण्यातही याचा उपयोग होऊ शकतो. पण उच्च क्षमतेचे सोलर पॅनल बनवण्यासाठी याचा वापर होऊ शकणार नाही.
सोलर पॅनल लावण्याची स्पर्धा
ROSI कारखाना सुरू होत आहे, ती वेळही महत्त्वाची आहे. कारण, जगभरात सध्या सर्वत्र सोलर पॅनल लावण्याची स्पर्धा सुरू आहे.
2021 पर्यंत जगभरात सौर ऊर्जासंदर्भातील उत्पादनात 22 टक्के वाढ झाली. एकट्या ब्रिटनमध्ये प्रत्येक महिन्यात सरासरी 13 हजार सोलर पॅनल लावण्यात येत आहेत. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या छतांवर लावण्यात येणाऱ्या सोलर पॅनलचा मोठा वाटा आहे.

फोटो स्रोत, LAURENT JULLIAND
आजवर असं लक्षात आलं आहे की सोलर पॅनल आपल्या एक्स्पायरी डेटच्या बराच काळ आधी निरुपयोगी होऊन जातात.
या क्षेत्रात तंत्रज्ञान सातत्याने प्रगत होत चाललेलं आहे. त्यामुळे अत्यंत कमी कालावधीत अपडेटेड स्वरुपात पॅनल येत आहेत. त्यामुळे 10-15 वर्षं जुने पॅनल दुरुस्त करून घेण्याऐवजी बदलणं जास्त स्वस्त पडतं.
कोलियर म्हणतात, “सोलर पॅनलची स्पर्धा अशीच कायम राहिल्यास कालबाह्य किंवा नादुरुस्त सोलर पॅनलचा कचरा आणखी वाढू शकतो.”
ते पुढे म्हणतात, “2030 पर्यंत आपल्याकडे 40 लाख टन सोलर कचरा असेल. त्याचा निपटारा करता येऊ शकतो. पण 2050 पर्यंत जागतिक पातळीवर 20 कोटी टन कचरा असू शकतो.”
रिसायकलिंगसमोरचं आव्हान
सोलर पॅनलचं रिसायकलिंग करणारे कारखाने अद्याप इतके कमी आहेत, कारण आजवर सोलर पॅनल रिसायकलिंग करण्याची गरजच भासली नाही.
पहिल्या पीढीतले सोलर पॅनल कालबाह्य होऊन निरुपयोगी होण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यामुळेच तज्ज्ञांच्या मते, यावर तत्काळ कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
निकोलस डिफ्रेनी यांच्या मते, “सोलर पॅनल रिसायकलिंगच्या कामात फ्रान्स हा देश युरोपात सर्वांत पुढे आहे.”

फोटो स्रोत, ROSI
त्यांची संस्था सोरेन, रोसी आणि इतर फर्म यांच्या पार्टनर आहेत. संपूर्ण फ्रान्समध्ये सोलर पॅनल वापरातून बाद करण्याचं कामही ही संस्था पाहते.
निकोलस म्हणतात, “आम्ही एक सर्वांत मोठा प्रकल्प वापरातून बाद केला. त्यालाही तीन महिन्यांचा वेळ लागला.”
सोरेनमध्ये त्यांची टीम रिसायकलिंगसाठी वेगवेगळ्या पद्धती वापरून पाहत आहे.
ग्रेनोबेलच्या रोसी हायटेक प्लांटमध्ये सोलर पॅनलच्या आतमध्ये लावण्यात आलेल्या धातूंना वेगळं करण्याचं काम केलं जातं. पण हे धातू अत्यंत कमी प्रमाणात लावलेले असल्याने आर्थिकरित्या ते फायदेशीरही ठरत नाही.
निकोलस यांच्या मते, हे धातू मौल्यवान आहेत, पण त्यांना वेगळं काढण्यासाठी चांगला पर्याय शोधल्यास हे सर्वांसाठीच गेमचेंजर ठरू शकतं.
त्यांच्या मते, सोलर पॅनलमध्ये 60 टक्के किंमती वस्तू या केवळ 3 टक्के वजनात उपस्थित असतात.

फोटो स्रोत, SHARAD BADHE
सोरेन यांच्या टीमला अपेक्षा आहे की नवीन सोलर पॅनल बनवण्यासाठी तीन चतुर्थांश सामान जुन्या सोलर पॅनलमधून काढता येऊ शकेल.
जिवाश्म इंधनापासून आपल्याला सौरऊर्जेच्या दिशेने जायचं असल्यास भविष्यात लागू शकणाऱ्या सोलर पॅनलसाठी आवश्यक असलेली चांदी सध्या उपलब्ध नाही.
ब्रिटनचे शास्त्रज्ञही सोसी कंपनीसारखं तंत्रज्ञान शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लिसेस्टर युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी गेल्या वर्षी म्हटलं होतं की त्यांनी सोलर पॅनलमधून सलाईनच्या स्वरुपात चांदी काढण्याची पद्धत शोधली आहे.
पण असं असलं तरी केवळ रोसी कंपनी हे काम औद्योगिक पातळीवर आणू शकली आहे.
पण हे तंत्रज्ञान खूप महाग असणार आहे. सध्यातरी युरोपातील सोलर पॅनलचे आयातदार आणि उत्पादक अशा प्रकारच्या कचऱ्याशी निपटण्यास जबाबदार आहेत.
दुसरीकडे, काही लोकांच्या मते हा कचरा तुकडे-तुकडे करून कापला तर हे काम स्वस्तात होऊ शकेल.
निकोलस यांच्या मते, सोलर पॅनलची रिसायकलिंग अजूनही प्राथमिक टप्प्यात आहे. गेल्या वर्षी सोरेन कंपनीने फ्रान्समध्ये 4 हजार टन कचऱ्याचीच विल्हेवाट लावली होती.
त्यांच्या मते, गेल्या वर्षी फ्रान्समध्ये जितके सोलर पॅनल विकले गेले, त्यांचं वजन होतं 2.32 लाख टन. हे पॅनल 20 वर्षांनंतर बाद होतील. त्यामुळे आपल्याकडे किती कचरा गोळा होणार आहे, याचा अंदाज आपण लावू शकतो.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








