इस्रायल-इराणच्या संघर्षात जॉर्डन का पडला, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

    • Author, मोहम्मद सुहैब
    • Role, बीबीसी उर्दू

14 आणि 15 एप्रिलची रात्र मध्यपूर्वेतील नागरिकांसाठी मोठी रात्र ठरली. त्या रात्री इराणने इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करायला सुरुवात केली. सर्वांच्या नजरा आकाशावर खिळलेल्या होत्या.

मागे काही दिवसांपूर्वी दमास्कस मधील इराणच्या वाणिज्य दूतावासावर हल्ला झाला होता. इस्रायलने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. पण या हल्ल्यामागे इस्रायलचा हात असल्याचे मत संयुक्त राष्ट्रांमधील अनेक देशांचं आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून इस्रायल-हमास युद्धामुळे संपूर्ण जगाच्या नजरा आखाती देशांकडे खिळून आहेत. अशात इराणने केलेल्या या हल्ल्याकडे जगभराचं बारकाईने लक्ष आहे.

रात्री वेगवेगळ्या वेळी हे हल्ले करण्यात आले. इस्रायलने आपल्या मित्र देशांच्या मदतीने या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव केला.

इस्रायलने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलंय की, आधुनिक सुरक्षा व्यवस्थेमुळे काही ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडण्यात आली, तर काही क्षेपणास्त्रे इस्रायलच्या सीमेवर पोहोचण्यापूर्वीच अमेरिकेसह इतर मित्र देशांच्या मदतीने पाडण्यात आली.

या मित्र राष्ट्रांमध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जॉर्डन यांचा समावेश आहे.

अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स हे तिन्ही पाश्चिमात्य देश आहेत. पण इराणचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हवेतच उडवून लावण्यात मध्यपूर्वेतील मुस्लीम देश जॉर्डन देखील सहभागी होता.

त्यामुळे पाकिस्तानातच नव्हे तर जगातील विविध मुस्लीम देशांमध्ये खळबळ उडाली आहे. यावर सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला जातोय. काही लोकांनी जॉर्डनवर टीकाही केली. जॉर्डनच्या या कारवाईमुळे पाकिस्तानमध्येही वातावरण तापलं आहे.

पाकिस्तानमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर 'जॉर्डन' टॉप ट्रेंडमध्ये सामील होता.

याबाबत पाकिस्तानच्या वरिष्ठ सभागृह म्हणजेच सिनेटचे माजी सदस्य आणि जमात-ए-इस्लामीचे नेते मुश्ताक अहमद खान यांनी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांचे छायाचित्र पोस्ट करताना नकारात्मक शब्द वापरले आहेत.

मुश्ताक यांच्या या पोस्टवर 26 लाखांहून अधिक लोकांनी कमेंट केल्या आहेत.

याबाबत त्यांनी 'आझाद डिजिटल' नावाच्या व्यासपीठावरून सांगितलं की, "जेव्हा इस्रायलची क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि जहाजे दुसऱ्यांवर हल्ला करत होती तेव्हा जॉर्डनच्या राजाला ते रोखण्याची सदबुद्धी मिळाली नाही. पण जेव्हा इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला तेव्हा ती पाडण्याची बुद्धी त्यांना सुचली याचं मला वाईट वाटतं आहे."

या कारवाईवर केवळ पाकिस्तानच नाही तर जॉर्डनमध्येही टीका होत आहे. काही आठवड्यांपूर्वीपर्यंत अमेरिकन दूतावासाबाहेर इस्रायलविरोधी निदर्शने होत होती.

जॉर्डनमधील प्रत्येक पाच लोकांपैकी एकाचे पूर्वज पॅलेस्टिनी प्रदेशातील आहेत. जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांची पत्नी महाराणी याही पॅलेस्टाईनच्याच आहेत.

गाझामधील मानवतावादी संकटाबद्दल अलीकडेच त्यांनी आवाज उठवला होता.

या प्रकरणी जॉर्डन आणि इराणची भूमिका काय आहे?

सार्वजनिक टीकेनंतर जॉर्डन सरकारने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. जॉर्डनच्या स्थानिक लोकांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचं त्यात म्हटलं आहे.

या निवेदनानुसार, "काही ऑब्जेक्ट्स (क्षेपणास्त्रे आणि ड्रोन) आमच्या हवाई क्षेत्रात आले होते. आम्ही त्यांना थांबवले कारण ते आमच्या लोकांसाठी आणि क्षेत्रासाठी धोकादायक होते. त्या सोडलेल्या लक्ष्यांचा ढिगारा जॉर्डनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पडला पण त्यामुळे कोणाचेही नुकसान झालेले नाही."

निवेदनात म्हटलंय की, "आमचे सैन्य जॉर्डनचे रक्षण करण्यासाठी भविष्यातील कोणत्याही देशाच्या हल्ल्याला प्रतिबंध करेल आणि आपला देश, नागरिक, हवाई क्षेत्र आणि भूभागाचे रक्षण करेल."

इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने म्हटलं होतं की, ते इस्रायलविरुद्धच्या हल्ल्यादरम्यान जॉर्डनच्या कारवाईवर लक्ष ठेवून होते. जॉर्डन हस्तक्षेप करत राहिल्यास पुढील लक्ष्य जॉर्डन असू शकतो.

मात्र इराणचे गृहमंत्री नासेर कनानी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, हा हल्ला थांबवण्यासाठी जॉर्डनच्या भूमिकेबाबत मी बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये, ही लष्करी बाब आहे.

"जॉर्डनशी आमचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये वारंवार बैठका झाल्या आहेत."

अलीकडेच जॉर्डनमधील 'टॉवर 22' या अमेरिकन लष्करी तळावर इराणचा पाठिंबा असलेल्या अल-मकमूता इस्लामिया या इराकी मिलिशिया गटाने ड्रोन हल्ला केला होता. या हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिक ठार झाले तर 34 जखमी झाले.

तसं पाहायला गेलं तर जॉर्डन हा अमेरिकेचा खूप जुना आणि जवळचा मित्र आहे. परंतु 1990 च्या दशकात जेव्हा दोन देशांदरम्यान अमेरिकेच्या मध्यस्थीने करार झाला तेव्हा इस्रायलशी त्यांचे संबंध सुधारले.

जॉर्डन कुठे आहे आणि अरब जगतात त्यांचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे?

भौगोलिकदृष्ट्या जॉर्डन हा मध्यपूर्वेत अतिशय संवेदनशील ठिकाणी आहे. सौदी अरेबिया, इराक आणि सीरिया व्यतिरिक्त, जॉर्डनची सीमा इस्रायल आणि वेस्ट बँकेला लागून आहे. पॅलेस्टिनी प्रदेश आणि सीरियातून लोकांनी मोठ्या संख्येने जॉर्डनमध्ये आश्रय घेतला आहे.

जॉर्डनमध्ये राजेशाही आहे. सध्या जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय सत्तेवर आहेत. 1946 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा हाशमी राजवंश (अल हाशिमून) देशावर राज्य करत आहे.

हाशमी कुटुंबाचा इतिहास आणि वंशावळी राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्या अधिकृत वेबसाइटवर तपशीलवार दिले आहेत. त्यानुसार जॉर्डनच्या राजाचा वंश इस्लामचा प्रेषित हजरत मोहम्मद आणि त्यांचे आजोबा हाशिम यांच्यापर्यंत जातो.

20 व्या शतकापूर्वी या प्रदेशावर ऑटोमन साम्राज्याचं 400 वर्षं राज्य होतं. परंतु नंतर त्यांनी पहिल्या महायुद्धात मित्र देशांविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मक्केचे तत्कालीन अमीर (स्थानिक शासक) शरीफ हुसैन बिन अली यांना ओट्टोमन साम्राज्यापासून स्वातंत्र्याची संधी मिळाली.

ब्रिटनसह इतर मित्र राष्ट्रांच्या मदतीने, 1916 मध्ये अरब विद्रोहानंतर मक्का ऑट्टोमन सल्तनतपासून स्वतंत्र झाली.

1917 मध्ये, अँग्लो-अरब सैन्याने पॅलेस्टाईनच्या प्रदेशाचा समावेश असलेल्या भागाचा ताबा मिळवला. 1921 मध्ये पॅलेस्टाईन त्या भागापासून वेगळा होऊन 'ट्रान्स जॉर्डन'चा पाया घातला गेला. यानंतर अब्दुल्ला यांच्याकडे सत्ता सोपवण्यात आली. यानंतर ते जॉर्डनचे पाहिले राजे म्हणून सत्तेवर विराजमान झाले.

ब्रिटनने मक्काचे अमीर शरीफ हुसेन बिन अली यांना वादग्रस्त बाल्फोर घोषणेवर स्वाक्षरी करून मोबदल्यात मोठी रक्कम देण्याचे अनेकवेळा प्रयत्न केले, पण याला मान्यता मिळाली नाही.

यानंतर मित्र देशांच्या वतीने सौदी कुटुंबासोबत करार करण्यात आला.

बाल्फोर घोषणेनुसार ज्यूंसाठी स्वतंत्र देश स्थापन करण्यासाठी पॅलेस्टाईनची जमीन वापरण्याची ब्रिटनची एक वादग्रस्त योजना होती.

1946 पर्यंत या भागावर ब्रिटनचा ताबा होता. परंतु 1946 मध्ये हाशमी किंगडम ऑफ जॉर्डन नावाचा स्वतंत्र देश अस्तित्वात आला.

1948 ते 1973 या काळात जॉर्डनने इस्रायलशी चार युद्ध केली. यामध्ये 1948 मधील पहिलं अरब-इस्त्रायल युद्ध, 1967 चं युद्ध, 1967 ते 70 दरम्यान लढलेलं युद्ध आणि 1973 चं युद्ध असा समावेश आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या कार्यकाळात जॉर्डन आणि इस्रायल यांच्यात 1994 मध्ये शांतता करार झाला होता. त्यानंतर हा तणाव कधीच वाढला नाही.

जॉर्डनच्या अधिकृत वेबसाइटनुसार, जॉर्डनच्या ध्वजाची कहाणी देखील खूप मनोरंजक आहे. हा ध्वज ऑटोमन साम्राज्याविरुद्ध जे अरब बंड झालं होतं, त्या ध्वजाच्या प्रेरणेतून बनला आहे.

यात तीन वेगवेगळ्या रंगाचे पट्टे आणि एक लाल त्रिकोण आहे. या ध्वजावर सात कोनांचा ताराही आहे.

या ताऱ्याची प्रत्येक किनार मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ कुराणची पहिली सुरा 'अल-फातिहा' च्या सात श्लोकांचे प्रतीक आहे. या ताऱ्यामुळे जॉर्डनचा ध्वज पॅलेस्टाईनच्या ध्वजापेक्षा वेगळा दिसतो.