You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
न्यूयॉर्कला 'ट्रम्प-प्रूफ' बनवणार म्हणणाऱ्या ममदानींसमोर असेल ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाचं आव्हान?
- Author, मॅडेलिन हॅलपर्ट
- Role, बीबीसी प्रतिनिधी
न्यूयॉर्क शहराचा महापौर बनण्याची लढाई जिंकल्यानंतर अवघ्या काही क्षणांतच, झोहरान ममदानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट संघर्ष करण्याची आपली पुढील लढाई ठरवली आहे.
मंगळवारी (4 नोव्हेंबर) विजयानंतर केलेल्या भाषणात ममदानी यांनी कॅमेऱ्याकडे पाहून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आव्हान दिलं.
त्यांनी म्हटलं आहे की, "डोनाल्ड ट्रम्प, मला माहिती आहे की, आपण बघत आहात. माझ्याकडे तुमच्यासाठी चार शब्द आहेत, "टर्न द व्हॉल्यूम अप." म्हणजेच आवाज वाढवा.
काही मिनिटांनंतर, ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल'वर लिहिलं की, "... आणि आता सुरू!"
ट्रम्प यांनी 34 वर्षीय ममदानी यांना "डेमोक्रॅटिक पक्षाचं कम्युनिस्ट भविष्य" म्हटलं आहे.
ट्रम्प यांनी माजी डेमोक्रॅटिक गव्हर्नर अँड्र्यू कुओमो (जे यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होते) यांना पाठिंबा दर्शविला आणि इशारा दिला की जर न्यूयॉर्कनं ममदानी यांना निवडून दिलं तर ते शहरासाठीचा निधी कमी करतील.
ममदानी यांच्या विजयाच्या दुसऱ्या दिवशी, ट्रम्प म्हणाले की, लोक "न्यूयॉर्क सोडून पळून जातील".
न्यूयॉर्कमध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या ट्रम्प यांनी शहराच्या कारभारात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही.
यापूर्वी, त्यांनी इमिग्रेशन विभागातील छापे वाढवण्याचा आणि "कंजेशन प्रायसिंग" साठीचा निधी थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. या धोरणाला ते विरोध करतात.
(कंजेशन प्रायसिंग म्हणजे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गर्दीच्या वेळी काही रस्ते किंवा परिसर वापरण्यासाठी शुल्क आकारण्याचं धोरण)
ममदानी यांनी काहीच उत्तर दिलं नाही
विजयानंतरच्या भाषणात ममदानी म्हणाले, "डोनाल्ड ट्रम्प यांना कसं पराभूत केलं जाऊ शकतं हे जर कोणी देशाला दाखवू शकत असेल तर हे तेच शहर आहे ज्यानं त्यांना जन्म दिला आहे."
ट्रम्प यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक डेमोक्रॅटिक-शासित शहरांवर आपल्या फेडरल म्हणजेच संघराज्यीय सत्तेचा वापर केला आहे.
यात नॅशनल गार्डच्या तैनातीपासून इमिग्रेशनवरील कठोरतेपर्यंतचा समावेश आहे.
1 ऑक्टोबर रोजी सरकारी शटडाऊन झाल्यानंतर, त्यांनी कोट्यवधी डॉलर्सचा निधी थांबवला आहे, ज्यात न्यूयॉर्कसाठी राखून ठेवलेल्या फेडरल फंडमधील 18 अब्ज डॉलर्सचा समावेश आहे, जो की मोठ्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी होता.
राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, ट्रम्प यात आणखी कपात करू शकतात. त्याचा परिणाम ममदानी यांच्या निवडणूक आश्वासनांवर होऊ शकतो, ज्यामध्ये त्यांनी लोकांना दैनंदिन खर्च कमी करण्यास सांगितलंय.
स्वतःला "लोकशाही समाजवादी" म्हणवणाऱ्या ममदानी यांनी मोफत आणि जलद बस सेवा, घरभाडेवाढीवर स्थगिती, सर्वांसाठी बालसंगोपन आणि सरकारी किराणा दुकाने यासारख्या योजनांचे आश्वासन दिलं आहे.
"वास्तविकता अशी आहे की, नवनिर्वाचित महापौरांना ट्रम्प यांच्या न्यूयॉर्क विरोधातील निर्णयांचा सामना करण्यासाठी बरंच लक्ष द्यावं लागेल. यामुळे शहराच्या समस्यांकडे त्यांचं लक्ष कमी होऊ शकतं," असं प्रिन्स्टन विद्यापीठाचे इतिहासकार ज्युलियन झेलिझर म्हणतात.
बीबीसीनं या मुद्द्यांवर भाष्य करण्यासाठी ममदानी यांच्याशी संपर्क साधला, परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
आठ अब्ज डॉलर्सच्या निधीचा तुटवडा
तज्ज्ञांच्या मते, ममदानी यांना त्यांच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ट्रम्प यांच्या व्यतिरिक्त इतर अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल.
तज्ज्ञांचा म्हणणं आहे की, श्रीमंत कंपन्या, उत्पन्नाच्या बाबतीत सर्वात वरच्या स्तरावरील व्यक्ती आणि श्रीमंत कॉर्पोरेशन्सवरील कर वाढवून ते 10 अब्ज डॉलर्स उभारू शकतात, परंतु यासाठी राज्यपालांच्या मान्यतेची आवश्यकता भासेल.
डेमोक्रॅटिक गव्हर्नर कॅथी होचुल, ज्यांना पुढील वर्षी पुन्हा निवडून येण्यासाठी निवडणुकीच्या कठीण लढाईचा सामना करावा लागत आहे, त्या आतापर्यंत या कर योजनेला पाठिंबा देण्यास कचरत आहेत.
त्याचवेळी ट्रम्प समर्थक रिपब्लिकन नेत्या एलिस स्टेफनिक यांनी गव्हर्नरपदासाठी उमेदवारीची तयारी सुरू केली आहे.
जर ट्रम्प यांनी निधीमध्ये आणखी कपात केली, तर शहराच्या बजेटमध्ये नवीन समस्या निर्माण होतील. गेल्या वर्षी, फेडरल फंडचा वाटा शहराच्या बजेटच्या सुमारे 7 टक्के म्हणजेच 8.5 अब्ज डॉलर्स इतका होता.
झेलिझर म्हणाले, "कोणत्याही नवीन योजनेची अंमलबजावणी करताना शहराला आधीच निधीच्या समस्या येत आहेत, परंतु जर फेडरल निधी कमी झाला तर परिस्थिती आणखी कठीण होईल."
न्यूयॉर्क सिटी इंडिपेंडेंट ऑफिसनुसार, या पैशांचा वापर गृहनिर्माण, आपत्ती निवारण, बाल सेवा, कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि शालेय जेवण यासाठी केला जातो.
मात्र, आपण कोणत्या निधी कपात करणार आहोत हे ट्रम्प यांनी अद्याप स्पष्ट केलेलं नाही.
न्यूयॉर्क सिटी इंडिपेंडंट बजेट ऑफिसच्या वरिष्ठ अधिकारी सारा पार्कर म्हणाल्या की, "शहर आणि प्रांतीय सरकारे अनेक संभाव्य परिस्थितींसाठी पर्यायी योजना तयार करत आहेत."
त्यांचं म्हणणं आहे की, "कायदेशीररित्या बेघरांना निवारा देण्यासारख्या काही सेवा देणं आवश्यक आहे. जर फेडरल निधीत कपात केली गेली तर शहर आणि राज्याला स्वत: याची कमतरता भरून काढावी लागेल, ज्याचा परिणाम इतर योजनांवर होईल."
हार्वर्ड विद्यापीठाच्या केनेडी स्कूलचे प्राध्यापक जस्टिन डी बेनेडिक्टिस-कासनर म्हणाले की, ट्रम्प यांना फेडरल फंड रोखण्याबाबत कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, परंतु यामुळे पैसे मिळण्यास नक्कीच विलंब होईल.
नॅशनल गार्ड पाठवण्याची शक्यता
ट्रम्प यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली डेमोक्रॅटिक शासित शहरांमध्ये नॅशनल गार्डला यापूर्वी देखील पाठवलं आहे. यामध्ये लॉस एंजेलिस, पोर्टलँड आणि वॉशिंग्टन डीसीचा समावेश आहे.
त्यांनी आतापर्यंत न्यूयॉर्कमध्ये असं काही केलं नाही, परंतु तज्ज्ञांचं म्हणणं आहे की भविष्यात याची शक्यता आहे.
झेलिझर म्हणाले, "त्यांच्याकडे हे मॉडेल आधीपासूनच आहे. त्याला अंमलात आणणं कठीण असणार नाही."
ममदानी म्हणाले आहेत की, जर नॅशनल गार्डला न्यूयॉर्कला पाठवलं गेलं तर तेही इतर राज्यांप्रमाणे न्यायालयात याला आव्हान देतील.
इमिग्रेशनशी संबंधित छाप्यांमध्ये वाढ
तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की, ट्रम्प न्यूयॉर्कमधील इमिग्रेशन विभागातील शिस्तही वाढवू शकतात.
1980 च्या दशकापासून पासून न्यूयॉर्क हे 'सॅक्चुअरी शहर' आहे, म्हणजेच स्थानिक प्रशासन फेडरल इमिग्रेशन एजन्सींसोबत मर्यादित सहकार्य करत असतो.
ट्रम्प प्रशासनानं शहरातील इमिग्रेशन न्यायालयांवर आधीच छापे टाकले आहेत, जिथं इमिग्रेशन विभागातील एजंट्सनी खटल्यादरम्यान शेकडो लोकांना ताब्यात घेतलं आहे.
न्यूयॉर्क शहराचे सध्याचे महापौर एरिक अडम्स यांनी बऱ्याच बाबींवर ट्रम्प प्रशासनाला सहकार्य केलं होतं.
मात्र, वयाच्या सातव्या वर्षी युगांडाहून अमेरिकेत आलेल्या ममदानी यांनी या प्रकरणावर आपण वेगळी भूमिका घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
ते म्हणालेत की, "न्यूयॉर्क हे स्थलांतरितांचं शहर राहील. एक शहर जे स्थलांतरितांनी बांधलं आहे, त्याला सामर्थ्य दिलं आहे आणि आता स्थलांतरित त्याचं नेतृत्व करतील."
त्यांनी निवडणुकीच्या रात्री इशारा दिला होता की, "मी हे सांगत असताना माझं ऐका, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, आमच्यापैकी कोणापर्यंतही पोहचण्यासाठी तुम्हाला आम्हा सर्वांचा सामना करावा लागेल."
न्यूयॉर्कला 'ट्रम्प-प्रूफ' बनवणार
कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक बॉब शापिरो यांच्या मते, जानेवारीमध्ये पदभार स्वीकारण्यापूर्वी ममदानी ट्रम्प यांच्या धोरणांना तोंड देण्यासाठी एक रणनीती तयार करतील.
डेमोक्रॅटिक पक्षाच्या इतर महापौरांप्रमाणे तेही वेगवेगळे मार्ग स्वीकारू शकतात.
बोस्टनच्या महापौर मिशेल वू यांनी ट्रम्प यांच्या धोरणांना उघडपणे विरोध केला, तर सॅन फ्रान्सिस्कोचे महापौर डॅनियल ल्युरी यांनी टेक कंपन्यांच्या मदतीनं ट्रम्प यांना नॅशनल गार्ड पाठवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला.
प्राध्यापक शापिरो यांच्या मते, जिथं ट्रम्प यांनी आपली रिअल इस्टेटमधील कारकीर्द बनवली होती, त्या वॉल स्ट्रीटवरील प्रमुख चेहऱ्यांच्या मदतीनं ट्रम्प ममदानी यांच्या हस्तक्षेपाला रोखू शकतात.
"ट्रम्प-प्रूफिंग न्यूयॉर्क सिटी" नावाच्या या धोरणात्मक दस्तऐवजात ममदानी यांनी म्हटलं आहे की, ट्रम्प प्रशासनाच्या हालचालींना प्रतिसाद देण्यासाठी ते शहराच्या कायदेशीर टीममध्ये 200 नवीन वकिलांचा समावेश करतील.
हार्वर्डचे प्राध्यापक कासनर म्हणाले, "ममदानी यांना त्यांचा अजेंडा राबविण्यासाठी मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल. त्यामुळेच न्यूयॉर्कमधील ट्रम्पविरोधी मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी ते ट्रम्प यांचा सामना कधी आणि कसा करायचा हे देखील ठरवतील."
ते म्हणाले, "मला वाटतं की जर त्यांना असं वाटत असेल की ते त्यांच्या ध्येयाच्या दिशेनं जाऊ शकतात तरच ते ट्रम्प यांचा सामना करतील. ते हुशार राजकारणी आहेत, विनाकारण ते असं करणार नाहीत."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.