आई झाल्यानंतर स्त्रीची सेक्सची इच्छा कमी होते का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

    • Author, एमिली होल्ट
    • Role, बीबीसी न्यूज

अनेक नात्यांमध्ये सेक्स किंवा शारीरिक संबंध महत्त्वाचे असतात. मात्र, एनएचएसच्या मते, गर्भधारणा किंवा बाळंतपणासारख्या आयुष्यात बदल घडवणाऱ्या घटनांनंतर काही लोकांची कामवासना कमी होणं ही सामान्य बाब आहे.

रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार आणि फिटनेस कोच हॉली हेगन-ब्लिथ सांगते की, तिला मूल झाल्यावर तिच्यासोबतही असंच घडलं होतं.

"त्या वेळी माझी अशी अवस्था होती की, 'तू मला पुन्हा कधीही स्पर्श केला नाहीस, तरी मला काही फरक पडणार नाही,' असं मी सहज म्हणाले असते," असं तिनं सीबीबीज पॅरेंटिंग हेल्पलाइनचं को-होस्टिंग करताना सांगितलं.

सेक्स आणि रिलेशनशिप थेरपिस्ट रॅचेल गोल्ड सांगतात की, बाळंतपणानंतर 6 आठवड्यांची तपासणी झाल्यावर महिला पुन्हा लैंगिक संबंध ठेवण्याची अपेक्षा ठेवतात.

"लोकांना वाटतं की, आता पुन्हा सेक्स करायची हीच वेळ आहे, पण तसं नाही."

'मला बाळ झालं आणि सर्वच बदललं'

हॉली म्हणते की, 2023 मध्ये तिचा मुलगा अल्फा-जॅक्सच्या जन्मानंतर तिची सेक्सची इच्छा कमी झाली आणि तिने पतीबरोबर कोणत्याही प्रकारची जवळीकता टाळायला सुरुवात केली.

"जेव्हा मी त्याला (पती जेकब) प्रेमानं स्पर्श करायची किंवा मिठी मारायची, मला वाटायचं की, त्याचा शेवट सेक्सकडे होईल आणि मला तेच नको होतं."

"त्याच्याबरोबर काहीही करण्याबाबत मी नकारात्मक झाले."

'जोडीदाराला समजावून सांगणं आवश्यक'

ती म्हणाली, याबद्दल पतीशी मनमोकळेपणाने बोलल्यानं मोठी मदत झाली.

"मी पतीला म्हणाले, 'मला असं वाटतं, जेव्हा मी तुला मिठी मारते किंवा हात लावते, तेव्हा ते पुढे सेक्सकडे जाऊ नये. कारण मला ते करायची इच्छा नसते किंवा करावसं वाटत नाही,' आणि अचानक सगळं सोपं झालं, कारण तो दबाव कमी झाला."

आपल्या पत्नीला आता आपण आवडत नाही, अशी जेकबला काळजी वाटत होती.

"त्यावेळी मी त्याला म्हणाले की, 'तू समजून घे, हे तुझ्याशी संबंधित नाही. सध्या मला असं वाटतं आहे, पण तुझ्याबद्दल मला काही वेगळं वाटत नाही.'"

"सध्या मला सेक्स करायची इच्छा नाही, कदाचित पुढील काही महिन्यांतही होणार नाही. ही माझी समस्या आहे, ज्यातून मी जात आहे आणि मला यावर काम करणं आवश्यक आहे."

हॉलीला आशा आहे की, अशीच समस्या असलेली जोडपी आपापसांत जास्त मनमोकळेपणाने बोलतील.

"लोक म्हणतात की, बाळ झाल्यावर नातं बदलतं, पण प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला खरंच समजत नाही की ते किती बदलतं."

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. जेनिफर लिंकन सांगतात की, बाळंतपणानंतर स्त्रियांना सेक्स नकोसं वाटण्याची किंवा लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा नसण्याची अनेक कारणं असू शकतात.

"शरीरात बऱ्याच गोष्टी बरी म्हणजे नीट होण्याची प्रक्रिया सुरू असते. गर्भाशय पूर्वीच्या आकारात येण्यासाठी सुमारे 6 आठवडे लागतात. योनीत किंवा पेरिनियममध्ये झालेल्या दुखापती देखील बऱ्या होत असतात."

स्त्रियांमध्ये मोठे हार्मोनल बदलही होतात, जे त्यांच्या सेक्सच्या इच्छेवर परिणाम करू शकतात.

"इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोनचं प्रमाण खूप कमी होतं. इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे योनी कोरडी होऊ शकते. त्यामुळे सेक्स वेदनादायक होऊ शकतो."

"लोक सहसा म्हणतात की, महिलांमध्ये होणारा हार्मोनल बदल सर्वात जास्त मासिकपाळी बंद होण्याच्या वेळी होतो, पण खरंतर बाळंतपणाच्या काही दिवसांत हा बदल खूप मोठा असतो."

'फक्त महिलाच नव्हे तर पुरुषांनाही ही समस्या'

ही केवळ आई झालेल्या महिलांची समस्या नाही. सीबीबीज पॅरेंटिंग हेल्पलाइनच्या श्रोत्यांपैकी फ्रँकी, जिने 3 महिन्यांपूर्वी बाळाला जन्म दिला होता, ती म्हणाली की, तिचा पती आता पूर्वीसारखा सेक्समध्ये रस घेत नव्हता.

"सध्या मला माझं शरीर आवडत नाही आणि माझ्याकडे जोडीदाराने अधिक लक्ष द्यावं, असं अपेक्षित आहे. मात्र, आता त्याला माझ्यासोबत सेक्स करायची इच्छा नाही. मला सध्या अडकल्यासारखं वाटत आहे."

रॅचेल सांगतात की, पुरुषांना कधी कधी त्यांच्या भावना उघडपणे सांगणं कठीण जातं.

"पितृत्वात पाऊल ठेवल्याने पुरुषांच्या मनात अनेक भावना येऊ शकतात. त्यामळे त्याची लैंगिक संबंध ठेवण्याची म्हणजेच त्याची सेक्सची इच्छा कमी होण्यामागे हे कारण असू शकतं."

बाळंतपणाच्या चॅरिटी एनसीटीमध्ये काम करणाऱ्या फ्ल्यूर पार्कर सांगतात की, पुरुषांसाठी या भावना हाताळणं बहुतेकदा महत्त्वाचं मानलं जात नाही.

"तुम्हाला काय आणि कसं वाटतं याबद्दल तुमच्या जोडीदाराशी प्रामाणिकपणे बोलणं खरोखर मदत करू शकतं; असं समजू नका की, त्यांना आधीच माहीत आहे की तुम्ही काय अनुभवत आहात किंवा काय विचार करत आहात."

बाळंतपणानंतर पुन्हा लैंगिक संबंध सुरू करणाऱ्या जोडप्यांसाठी टिप्स :

  • जर सेक्स करताना वेदना होत असतील, तर नक्की सांगा. जर तुम्ही सगळं ठिक आहे असं भासवलं, पण खरोखर तसं नसेल, तर तुम्हाला सेक्स त्रासदायक किंवा अप्रिय वाटू लागेल.
  • हळूहळू सुरुवात करा, कारण बाळंतपणानंतर हार्मोनल बदलांमुळे सेक्स करताना आरामासाठी कधीकधी ल्युब्रिकंट वापरावा लागतो.
  • एकत्र आराम करण्यासाठी वेळ काढा. जेव्हा तुमचं मन इतर गोष्टींपेक्षा फक्त एकमेकांवर असेल, तेव्हा जवळीकता अनुभवायला सोपं जातं.
  • जर गरज भासली तर मदत घ्या. बाळंतपणानंतर तपासणी करूनही वेदना होत असतील, तर डॉक्टरांशी बोलणं आवश्यक आहे.

वरील टिप्स डॉ. जेनिफर लिंकन यांनी दिल्या आहेत. अधिक माहिती एनएचएसच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)